Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१६७

कृष्ण सखी

कृष्ण सखी -१६७

तिच्यासाठी तिच्याशीच भांडत तो कठोरपणे बोलला,
"ऐका नाही आणि बिका नाही काय. तुम्हाला जायचं होतं तरं एक शब्द ही न बोलता पाठवलं ना पण आता जर तुम्ही दिवसावर दिवस वाढवत असाल तर ते चालणार नाही काय..  मी शाळेतून घरी यायच्या आधीच तुम्ही घरात हव्यात... बाकी आपल्याला काय माहिती नाही. नाही तरं जोरात भांडण होईल हां आपलं.."

कृष्णा नवऱ्याच्या अधिकाराने तिच्यावर नवरेगिरी दाखवत बोलला आणि त्यानेच फोन कट केला.


कृष्णा मोबाईल चार्जिंग लावून तरातरा स्वयंपाकघरात आला आणि न तापलेलं पाणी उतरू लागला तशी सोनाई काळजीने रागावली,
"गारठ्यात गार पान्यानं आंगूळ करून आजारी पडायचं हाये व्हयं?"

"कसला गारठा? आधीच तापलोय मी..गरम पाणी घेऊन पेटू काय?" कृष्णा पाणी उतरत भडकला.


त्याचाच सूर उचलून सोनाई त्याला समजावत बोलली,
"कशाला यवढा तापलायस? काय फोन मधनं यनार व्हती का ती? फोनवर धड बोलायला काय व्हतं तुला?"


कृष्णा पाण्याची बादली घेऊन न्हाणीघरात जाईपर्यंत त्याची बडबड ऐकू आली-
"तू त्यांचीच बाजू घेणार त्यामुळे तू माझ्याशी बोलू नकोस काय. गावी जायचं म्हटल्यावर कोण जातं हॉटेलमध्ये जेवायला? आणि घरी जेवण नव्हतं काय हॉटेलमध्ये जेवायला?  फिरायला जातायत, पिक्चर बघायला जातायेत,  गावी येणं सोडून बाकी सगळं करतायेत..  येऊ देच त्यांना... भांडतोच बघ कसा."


"हम्म... त्यवढंच कर." सोनाई पुन्हा टोपात भर घालत बडबडली आणि बाहेर जाऊन तिने तिच्या बटणाच्या मोबाईलवरून चार नंबरचं बटन दाबून सखीला फोन केला. थोडा वेळ बोलली आणि पुन्हा घरात आली.


सकाळी सकाळी मूड खराब झालेला कृष्णा तसाच पडलेला चेहरा घेऊन शाळेत गेला. त्याला राहून राहून प्रत्येक गोष्टीचा राग येत होता. नुसती चिडचिड होत होती. पहिली सुट्टी झाली तरीही तसंच..  जेवायच्या सुट्टी झाली तरीही तसंच! तो चेहरा लटकवून तसाच बसलेला. जेवण्याची अजिबात इच्छा नव्हती की त्याचा मोबाईल वाजला आणि तेव्हाच त्याला शांत बसलेलं पाहून त्याची काळजी असणाऱ्या राधा मॅडमनी त्याला आवाज दिला,
"सर, जेवायची सुट्टी झाले."

कृष्णा मोबाईलकडे बघत बोलला,
"मग तुम्ही जेऊन घ्या. मला काय सांगताय."

"पण तुम्ही कधी जेवणार?" राधा मॅडमची काळजी..

कृष्णा वाजणाऱ्या फोनकडे बघत वैतागून बोलला,
"बायकोचा फोन येतोय माझ्या..
उचलू की नको तुम्हीच सांगा.. की तुमची बडबड ऐकत बसू?"

राधा मॅडम काहीशा लाजून,
"काय हो सर, मी नाही बोलल्यावर बोलणार नाही का..."

तिचं नेहमीसारखं त्याला न आवडणार गोड बोलणं पाहून कृष्णा फोन उचलत राधा मॅडमवर आवाज चढवून वैतागून बोलला,
"तुम्ही गप्पच बसा काय..."

दुपारच्या सुट्टीत फोन करण्याची सखीची पहिलीच वेळ. प्रेमाने बोलायचं हाच विचार करून तिने फोन केलेला पण पलीकडून खाऊ का गिळू अशा स्वरात ओरडलेला ऐकून सखी ही ठेक्यात बोलली,
"गप्पच आहे मी..."


राधा मॅडम तोंड पाडून बोलल्या,
"बरं सर, मी पुढे जाते.. तुम्ही या मागून मागून.."
त्या गेल्यावर कृष्णा कानाला मोबाईल लावत सुरात बोलला,
"बोला, कशाला फोन केलाय?"

ही कुठली पद्धत बोलण्याची? सखीने एकवार मोबाईल पाहिला आणि मान हलवत त्याच्यात सुरात बोलली,
"असाच टाइमपास करायला फोन केला."


'ती मुंबईमध्ये आहे आणि ती आजही संध्याकाळची बस चुकवणार आहे' या त्याच्या स्वतःच बनवलेल्या विश्वासाने त्याची नुसती चिडचिड होत होती. खूप राग येत होता.. खूप भांडायचं होतं.. अर्थात सखीशीच!

तो रागेरागे बोलला,
"व्हयं काय? टाईमपास करायला तुमच्या सासू रुपी आईला फोन करा.. ती घरीच आहे.. टाइमपास करायला आपल्या जवळ वेळ नसतो काय."

सखीने एकदा मागे पाहिलं आणि थोडी पुढे येऊन उगाचच रागात बोलली,
"तुम्ही जर असेच बोलणार असाल तर मी नाही येणार घरी."

"व्हयं काय?"
कृष्णाच्या कपाळावर वक्ररेषा उमटली. कपाळावर आठी घेऊन तो त्याच रागात बोलला,
"लयीच वाढीव बोलायला लागलाय तुम्ही सुद्धा!"

सखी नाक मुरडत बोलली,
"हा मग.. वाढीव काय फक्त तुम्हाला बोलता येतं?"

"सखी.... मला डिवचू नका काय."
कृष्णा रागावला.

'प्रेमाने बोलायला फोन केलेला पण यांना भांडणाशिवाय येत काय..' सखी ओठ तिरपा करत हुंकारली,
"हूं ऽ..."


तिचा  हुंकार ऐकून तर कृष्णाच्या कपाळावरची वक्र रेषा अगदी वरपर्यंत गेली. 'सखी गावी यायला नकार देतीये' हे ऐकून तरं रागात काय करू आणि काय नको असं झालेलं त्याला. तो तरातरा मैदानाच्या बाहेर येत भांडत असल्यासारखा बोलला,
"लयीच बदलला मुंबईला गेल्यावर.. मुंबईचं पाणी लागलं म्हणायचं."


"आली का मुंबई? पण गावच्या पाण्यापेक्षा मुंबईचं पाणी हलकं असतं आणि फिल्टर केलेलं चांगलं असतं.. माहितीये ना?" सखी मुंबीचा स्वाभीमान गोंजारत बोलली.

कृष्णा रागात बोलला,
"चांगल नाही. दूषित असतंय ते...  तुमच्या मनासारखं!

शब्दावरून शब्द वाढत होता!

सखी रागात तरी नाराजीने बोलली,
"माझ्यासारखं? म्हणजे मी तुम्हाला इतकी वाईट वाटते?"


"मला वाटतं तशा तुम्ही आहात काय? रक्षाबंधनच्या निमित्ताने तिकडे गेला आणि तिकडच्याच झाला. गुपचूप घरी निघून यायचं." कृष्णाचा सूर बदललेला.


सखी हट्टाने बोलल्यासारखी बोलली,
"आता तर येणारच नाही."

"सखी.........??"
तो रागात ओठांत बडबडला. रागात त्याचे श्वास वाढलेले. त्याला इतका राग आलेला तिचा! तिला भेटण्यासाठी त्याचा जीव कासावीस होत होता आणि ही बिनधास्त दिवस वाढत होती, असं कुठे असतं का!
तो धुसफुसत बोलला,
"व्हयं काय... नकाच येऊ मग.. रहा तिकडंच!"


...आणि आजूबाजूला धावणाऱ्या मुलांकडे बघून हळू आवाजात बोलला, (त्याच्या हळू आवाजात बरं का)-
"तुमच्याशी तरं मी घरी आल्यावर बोलतो.. बोलायचं तर नाहीच मला... भांडायचंच आहे!"


सखीने ही एकदा आजूबाजूला पाहिलं मग पुन्हा तडकीफड बोलली,
"व्हयं काय? भांडणाशिवाय सरळ बोलताय काय तुम्ही?"


कृष्णा रागात बडबडला,
"अजिबात माझ्यासारखं बोलायचं नाही काय.. आणि गपगुमान रात्रीच्या गाडीला बसायंच.. लय झालं माहेरपण!"


त्याची चाललेली दादागिरी पाहून भांडणात त्यालाच आदर्श मानणारी सखी... त्याला ही फटकून बोलली,
"नाही येणार मी...."

..आणि मागून आरोळी आली-

"म्हाळसा ऽ ऽ..."  सोनाईने हाक मारली तशी सखी मोबाईलवर हात ठेवून माघारी फिरली.


सोनाई पाण्याचा तांब्या हातात घेऊन दरवाज्यात उभी राहून बोलली,
"आगं पानी तरी पे."

मोबाईलच्या स्पीकरवर घट्ट हात ठेवून सखी हळू आवाजात हसत बोलली,
"मी नंतर पिते आई."

"तुझ्या आयला सांग.. मी इच्यरंत व्हते." सोनाई हसून बोलली आणि पुन्हा सागरसोबत बोलायला माघारी वळली.

सोनाई आत गेल्यावर सखी पुन्हा त्याच्याशी वरवर भांडायला तयार झाली.


"नाही येणार मी...."
तिचं पुन्हा तेच उलट बोलणं ऐकून कृष्णाचा संताप झाला. तो पुन्हा रागात बोलणार इतक्यात---

'म्हाळसा ऽ ऽ ऽ ऽ' पलिकडून आवाज आला.

तसे त्याचे कान टवकारले. हृदयाची धडधड झाली. बुडबुड्या वर बुडबुडा .. बुडबुड्या वर बुडबुडा असा त्याचा रागाचा मनोरा वर निघालेला. तो टचकन खालचा बुडबुडा फुटला आणि वरचे रागाचे बुडबुडे हवेत फुटून त्याचे तुषार त्याच्या अंगावर उडाले.. तो मोहरला. हवेवरचा राग हवेत मिसळला आणि आपोआप गालात हसू येऊन त्याने उत्साहात विचारलं,
"कुठं आहात?


सोनाई आत गेल्यावर सखी पुन्हा त्याच्याशी वरवर भांडायला तयार झाली. ती खोटं तरीही ठेक्यात खरं बोलली,
"आईच्या घरी आहे."

कृष्णा हसत बोलला,
"व्हयं काय.."

ती कलाईच्या घराकडे बघत..
"व्हयं."

'ती घरीच आहे... आपल्या घरी आहे' या विचाराने तो बिनधास्त झाला. कपाळावरच्या रेषेच्या ठिकाणी आता त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
कृष्णा आता तिची खेचत बिनधास्त बोलला,
"मग तिथेच रहा मुंबईत.. फक्त माझ्या पैलवानाला पाठवून द्या‌."


तिला थोडं वाईट वाटलं. ती काहीशी नाराजीने बोलली,
"खरंच? म्हणजे नको येऊ मी?"

तो बिंधास्त मोकळेपणाने बोलला,
"नका येऊ. हव्या तेवढ्या रहा.. महिना दीड महिना."


त्याला पलटी मारलेली पाहून सखी दुखावली-
"नाहीच येत आणि आता तर मीच तुमच्याशी बोलणार नाही.. ठेवा फोन..." तिने नाराज होत हलक्या रागात फोन ठेवला आणि स्वतःशीच बडबडली,
'सकाळी आले नाही म्हणून रागावले.. किती बोलले आणि आता आलीये तर बोलतात नका येऊ? लयीच खवाटेत! येऊ दे, बोलणारच नाही मी.'


कृष्णाने तशीच मनगटावर नजर टाकली. शाळा भरायला अजून वीस मिनिटं बाकी होती. साडेपाच वाजेपर्यंत त्याला धीर धरवेना. कधी एकदा तिला पाहतोय..  तिच्याशी बोलतोय...  तिला भेटतोय त्याला असं झालेलं... तिच्यासाठी अधीर झालेला तो.
तो सुसाट घरी यायला निघाला. आनंद त्याच्या चेहऱ्यावर मावत नव्हता.

'सखी घरी आलीये' हा त्याच्यासाठी सुखद धक्का होता. 

खड्ड्या खड्ड्यांच्या दगडी डांबरी रस्त्यावरून कृष्णा सुसाट वेगाने वीस मिनिटांचा रस्ता दहा मिनिटांत कापून घरी पोहोचला. आंब्याखाली गाडी लावल्यावर त्याची नजर दरवाजावर गेली. तो हसतच अंगणाच्या पायऱ्या चढला की ओटीवर खेळणाऱ्या सुरजने त्याला पाहिलं आणि उत्साहात त्याला हाका मारत बाहेर  धावला-

"बाबा आयी ऽ ..  बाबा आयी .."

त्याच्या काळजाचा तुकडा त्याला हाका मारत धावत आल्यावर कृष्णाने हसतच त्याला उचलून हवेत फेकलं आणि-
"पैलवान ऽ ऽ ऽ..." सुजरला झेलत तो हसतच ओठांत पुटपुटला.


सुरज दोन्ही हात पाय हवेत पसरून हसत खिदळत होता आणि कृष्णा हसतच त्याला पुन्हा पकडून वर हवेत फेकत होता.


'बाबा आयी' हे ऐकताच सखी अविश्वासाने बावरल्यासारखी स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि तो अंगणात दिसताच ती अत्यानंदाने त्याच्याकडे धावली.

सखी घरात आल्या आल्या जशी सोनाईला आनंदाने बिलगलेली.. आताही अगदी तशीच त्याला बिलगण्यासाठी..  तिचे हात वर त्याच्या कमरेभोवती विसावण्यासाठी पुढे झालेले पण सुरजसोबत त्याला व्यस्त पाहून सखी स्वतःच्याच वेडेपणावर हसत पाठमोरी झाली.


सुरजला खाली घेतल्यावर त्याची नजर सखी वर गेली आणि अडीच दिवसांच्या विरहानंतर अचानक समोर आलेल्या त्याच्या सखीला पाहताना तो ही हसतच, उत्साहात, अत्यानंदाने तिला कवटाळण्यासाठी पुढे झाला पण.... पण तोही अडखळला.‌

सखीने हसतच त्याच्याकडे पाहिलं. सुरजला एका हातावर घेऊन तोही तिच्याकडे हसून पाहत होता. दोघांचेही श्वास आनंदाने वाढल्यासारखे झालेले. 

'ती रात्री न येता कुठेतरी फिरायला गेलेली.. याचा राग त्याच्या मनात होताच. तिच्या मघासच्या बोलण्याचा राग त्याच्या मनात होताच' तरीही तिला पाहून त्याच्या  चेहऱ्यावरचा आनंद हटत नव्हता.

'तो सुद्धा तिच्यावर इतका रागवलेला..  किती काही बोललेला त्याचा राग तिच्या मनात होताच' पण त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसूभर सुद्धा कमी झालं नव्हतं.

थोडक्यात, आपापला राग मनात सुरक्षित ठेवून दोघेही एकमेकांकडे पाहून भेटीचा तो क्षण जगून घेत मोकळेपणाने हसत होते.


तिच्या चेहऱ्यावर खिळलेल्या नजरेने काही क्षण मनमुरादपणे जगल्यानंतर कृष्णा सुरजला हातावर नीट घेत त्याच्या तऱ्हेने प्रेमाने बोलला,
"कशाला आलात? राहायचं ना तिकडंच."


समोर सुद्धा त्याचा तोच सूर!
सखी लगेचच आपलं हसू आवरत घेत गाल फुगवून बोलली,
"असं का? मग जाते मी परत दादासोबत."


आपला तोरा जपत कृष्णाने तिच्याकडे पाहून खांदे उडवले आणि सुजचा गाल चावत बोलला,
"जा की मग. कोणी अडवलंय."


सखीने नाराजीने त्याच्याकडे पाहिलं आणि ओठ तिरपा करत बोलली,
"जातेच मग..." आणि ती खरोखर जायला वळली.. तसा कृष्णाने पुढे होऊन तिचा पदर पकडला. पदराला हिसका बसताच सखी खांद्यावर हात ठेवून जागीच थांबली. तिचा पदर आपल्या हातात संथपणे गुंडाळत कृष्णा तिच्याकडे बघत गालात हसत बोलला,
"आता जाऊन दाखवा काय."

सखीसाठी त्याचं हे खोडकरपणे वागणं म्हणजे.......... मोहक शरदाचं चांदणं होतं!

पदराला ओढ लागल्यावर गालात हसू घेऊन एक एक पाऊल मागे येताना तिच्या हृदयाची धडधड उगाचच वाढलेली.  अगदी त्याच्या जवळ आल्यावर सखीने तिरप्या नजरेने लाजून त्याच्याकडे पाहिलं. कृष्णा तिचा संपूर्ण पदर हाताला गोल गुंडाळून तिच्या कानात कुजबुजला,
"आता कुठेच जायचं नाही काय..... का विचारा?"


त्याचा आवाजच असा होत की कानात बोलण्याची काय गरज!  त्याच्या गरम श्वासांनी कानाला होणाऱ्या गुदगुल्यांनी गालात हसत ती कशीतरी बोलली,
"का?"

तो पुन्हा कानातच कुजबुजला,
"मी म्हणतोय म्हणून...‌.."


त्याचं हळू बोलणं ऐकून सुरज दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत हसत बोलला,
"बाबा बोलती म्हनून.... बाबा बोलती म्हनून."

सखी गालात हसली. तिचा पदर हातातून मोकळा करत कृष्णा तिलाच उद्देशून पण सुरजचे गाल ओढत बोलला,
"पैलवान, रात्री स्वयंपाक लवकर उरका काय."

सखी पाठमोरीच गालात हसत बोलली,
"काय कारण?"

तिच्या अर्ध्याच दिसणाऱ्या गालात हसणाऱ्या मोहक चेहऱ्याकडे बघत कृष्णा स्वतःही गालात हसतच बोलला,
"कारण मला पोटभरून भरून भांडायचंय.. मुंबईचं पाणी लागलेल्या माणसासोबत."

"अजून भांडायचं आहेच का?"
सखी गालात हसत बोलली.

"हा मग आता वेळ नाही म्हणून.... सुटला."
कृष्णा हसत बोलला आणि सुरजला खाली सोडत त्याचा निरोप घेत बोलला,
"चल पैलवान, मी निघतो आता." न राहवून त्याने सुरजच्या गोबऱ्या गालांचा हलकासा चावा घेतला आणि हसतच शांत मनाने बाहेरूनच शाळेत घाईत निघून गेला.

कृष्णा गेल्यावर सुरज आपल्या ओल्या गालावरून हात फिरवत बोलला,
"आई ऽ, बाबा सारखीच चावती."

"प्रेमाने चावतात सुरु.. तू त्यांचा लाडका आहेस ना."
सखी प्रेमाने त्याला समजावत बोलली.

सुरज आपल्या लाल झालेल्या गालावरून हात फिरवत तसाच बोलला,
"मं मलाच का चावती.. तुला का नाही चावती?"


'आपल्या गालावर ही ते दातांच नाजूक नक्षीकाम!' कल्पनेनेच सखीच काळीज मोहरलं आणि ती  लाजून ओठांत बोलली,
"चूप बस... !"

उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
२७/०५/२०२४