पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१८३

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१८३

तिचा लाजलेला अस्पष्ट आवाज आला,
"आत्ता नको... नंतर... नंतर निवांत.... नक्की.."


काहीच संदर्भ न लागून सुद्धा पहिल्यांदाच तिला लाजेने गोरीमोरी झालेली पाहताना उगाचच त्यालाच गुदगुल्या झाल्या, तेव्हाच संपूर्ण घरात प्रेममयी स्वर घुमत होते...

का जीव तुझ्यासाठी तोळा तोळा झुरतो?
उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो..
हरवुनी, तुझ्यात मी..
पुन्हा-पुन्हा का नाव तुझे गुणगुणतो..?


“म्हाळसा ऽ, आगं कुठं ऱ्हायलीस? तू ठेवनार यका ठिकानी आनि मी शोदनार धा ठिकानी.”
सोनाईची पुन्हा हाक वजा आवाज आला आणि सखी त्या निमित्ताने आपल्या खोलीतून बाहेर आली.‌


तिच्यापाठोपाठ कृष्णा ही खेचल्यासारखा खोलीतून बाहेर गेला. सखी स्वयंपाकघरात गेल्यावर कृष्णा तसाच पुढे होत अंगणाच्या दरवाजात उभा राहिला. बाहेर पावसाची रिमझिम चालू होती नुकतीच सर येऊन बरसल्याने सगळीकडे पाणी पाणी झालेलं. कृष्णाला पहिल्यांदाच त्या पावसामध्ये भिजावसं वाटत होतं. तो बाहेरच्या पायरीवर उभा राहून हातामध्ये वळचणीची धार झेलत होता की त्याला पाहताच आपल्या अंगणातून दत्ताने आवाज दिला,
“मास्तर ऽ ऽ ऽ ऽ..”

कृष्णा हसतच बोलला,
“काय रे?”


कृष्णाला एकट्यालाच दरवाजात पाहून थोडक्यात सोनाई ओटीवर दिसत नाहीये हे पाहून दत्ताने समोरंच घर असणाऱ्या सुधीरला आवाज दिला,
“सुध्या ऽ, मास्तर बग भायर आलतंय.”


अर्धा दिवस बँकेत जाऊन आलेला सुधीर त्याच्या आवाजाने लगेच बाहेर आला आणि दबक्या आवाजात कृष्णाला हाक मारत बोलला,
"मास्तर इकडं या की जरा.."

कृष्णाने हातानेच त्यांना बोलावलं,
"या इकडे."

सोनाईच्या भीतीने दत्ता कानाला हात लावत बोलला,
"नगं नगं… तुम्हीच या."

कृष्णाने चप्पल अडकवली आणि दगडांवर पाय देत वाहत्या पाण्यातून अंगण उतरलं.‌ सुधीरला आवाज दिलेला ऐकून राकेश सुद्धा बाहेर आला. दत्ता, सुधीर राकेश तिघांचही आधीच बोलणं झालेलं आता फक्त कृष्णाला विचारायचं बाकी होतं.


सुधीरच्या ओसरीवर दत्ता, सुधीर, कृष्णा सुधीरचे अप्पा चौघेही बसलेले. कृष्णा सरळ विषयाला हात घालत बोलला,
"काय ठरलं मग?"

दत्ता नेहमीसारखा शांत आणि दबक्या आवाजात बोलला,
“मी काय म्हणतोय मास्तर, पावसानं उघडीप दिल्याव जावून यिव की मुंबै पुन्याला नंतर भांगालनी उराकता उराकता काढनी यिल आनि कारखाना बी तवाच चालू व्हैल त्यामुळं समद्यांनी आत्ताच दोनतीन दिस काढलं आसतं तं बरं झालं आसतं.”


सुधीर सुद्धा दत्ताच्या बोलण्याला दुजोरा देत बोलला,
“दत्ता बरोबर बोलतोय मास्तर. निवडणुकांच्या तोंडावरच कामाचा ढीग आणि तेव्हा सुट्ट्यांचं सगळ्यांचंच अवघड होईल, त्यामुळे पाऊस उघडल्यावरच जाणं झालं असतं तर बरं झालं असतं.”


कृष्णा विचार करत बोलला,
"चालतंय की तसं ही दिवाळीच्या मोक्यातच लग्न, निवडणुका, शेतीचे कामं सगळंच एकदम येतंय त्यामुळे हा खटका आत्ताच उरकून टाकू.”


दत्ता लगेच सोनाईच्या धाकाने बोलला,
"वैनींच काय न्हाय पन काकू? ती आम्हाला लै शिव्या घालंल."

कृष्णा हसला,
“ती काही करत..” आणि सहजच त्याच्या मनात विचार डोकवला,
'सखींना तर कल्पना दिलीच नाही, त्यांनाही सांगायला हवं.. नाहीतर ऐनवेळी-'

“मास्तर ऽ, पाटील यकामाणसाचं पाचशे रुपय आनि घरटी कुंबडी देनार हाये आसा आवाज हाये.”
दत्ताने आतली गोष्ट दबक्या आवाजात सांगितली आणि कृष्णा सखीच्या विचारातून क्षणात बाहेर आला आपसूकच त्याच्या कपाळावर वक्ररेषा उमटली आणि पुन्हा तिथे सरपंचकीचा विषय चिघळला.

……….

“म्हाळसा ऽ, आगं कुठं ऱ्हायलीस? तू ठेवनार यका ठिकानी आनि मी शोदनार धा ठिकानी.”
सोनाईची पुन्हा हाक वजा आवाज आला आणि सखी त्या निमित्ताने आपल्या खोलीतून बाहेर आली.‌


ती स्वयंपाकघरात स्वतःच्याच तंद्रीत गालात हसत गेली. ती आल्याची चाहूल लागतात सोनाई डब्याचं झाकण उघडत वैतागून बोलली,
“आगं कंच्या डब्यात ठेवलतयंस शेंगदानं?”

तिच्या बोलण्याचं एक अक्षर ही न कळून सुद्धा सखीने गालात हसतच समोरच्या डब्याला हात लावला. सोनाईने हातातील डबा बाजूला ठेवला आणि सखीने दाखवलेल्या डब्याचं झाकण उघडत वैतागून बोलली,
“हौसंनं घेतलंतं डज्यनभर डबं पन यक गोष्ट शोधायला धा डबं इस्काटाय लागतीतंय.. लक्षात काय ऱ्हायना माझ्या.”

सोनाईच्या बडबडीचा आणि सखीचा काडीमात्र संबंध नव्हता. ती स्वतःच्याच धुंदीत गालात हसत स्वयंपाकघराच्या दरवाजाला टेकून बाहेरची बारीक बारीक रिमझिम न्याहाळण्यात गुंतली होती.


झालं! सखीने सांगितलेल्या डब्यात सुद्धा शेंगदाणे न सापडल्यामुळे सोनाई पुन्हा दुसऱ्या डब्याचं झाकण उघडत वैतागली,
“यिव दे भंगारवाला, समदी डब्यांची खुगीरभरती भंगाराव देते का न्हाय बग.. “ बडबडत असतानाच सोनाईला एकदाचे शेंगदाणे सापडले.


शेंगदाणे टोपात ओतून तो टोप सखीच्या हातात देत सोनाई नेहमीसारखी बोलली,
“म्हाळसा ऽ, ह्यं शेंगदानं जरा घवळ-घवळ भाज आनि मीठाचा शितूडा दे.. पावसापान्याचं हिरड्या हालवायला बरं आसत्यात.”


सखी बाहेर हलकीशी रिमझिम बघत हुंकारली,
“हम्म ऽ….”

“पोरंबाळ हिकडून तिकडून यत्यात भूक भूक करत्यात. शेंगदानं, हारभार भाजल्यालं आसलं म्हंजी चट खात्यात.” सोनाईने सखीशी बोलत हरभऱ्याच्या डब्यातून हरभरे ताटलीत काढले आणि तिला द्यायला मागे वळली तर चुलीचं भरण जळून जात होतं. सखी निवडलेल्या शेंगदाण्यांमध्ये बोटं फिरवत बाहेर बघत स्वतःशीच हसत होती.


सोनाई चुलीची लाकडे मागे ओढत बडबडली,
“आगं यडे, भरानं गेलं की जळून…”

सखी बाहेर बघतच गालात हसत हुंकारली,
“हम्म ऽ….”


तिचा हुंकार ऐकून सोनाईने कपाळावर हात मारला आणि मुद्दामून तिच्या हातात हरभऱ्याची ताटली ठेवत बोलली,
“धर ह्यं बी भाज.. आनि वरनं साखरंच पानी शिपड.”


सखीने बाहेर बघतच गालात हसत सोनाईच्या हातातून ताटली घेतली आणि टोपावर ठेवून पुन्हा त्या ताटलीत बोट फिरवत हुंकारली,
“हम्म ऽ…”


सोनाई काहीतरी बोलत होती, तिने काहीतरी सांगितलं, आपल्या हातात काहीतरी आहे.. सखीला कशाचंच भान नव्हतं. तिच्या नजरेसमोर खट्याळ नजरेने बघणारा कृष्णा आणि त्याची गालावरून फिरणारे बोटे, बस एवढंच होतं. कानात सुद्धा फक्त त्याचाच मादक स्वर घुमत होता,
‘सखी ऽ ऽ…’

त्याचा आवाज, त्याचं बोलणं, त्याची नजर सगळं आठवून सखी मधूनच खुदकन हसत होती. तिला स्वतःमध्येच गुंग पाहून सोनाई ही तिच्याकडे बघून हसली. तिच्या हातातून शेंगदाण्याचा टोप आणि हरभऱ्याची ताटली घेऊन स्वतःच चुलीपुढे भाजायला बसली.


शेंगदाणे भाजताना सोनाईने सखीकडे पाहिलं. ती बाहेर दूरवर बघत, स्वतःशीच हसत दरवाजाला टेकून उभी होती. हातात काही नसून शेंगदाण्यातून बोटं फिरवल्यासारखी तिची अजूनही हवेत बोटे तरंगत होती, मधूनच ती गोड गालात हसत होती.


तिचं ते स्वतःमध्येच गुंग होणं, स्वतःशीच हसणं पाहून सोनाई भाजलेल्या शेंगदाण्यांवर मीठाचं पाणी शिंपडत कौतुकाने हसत बडबडली,
‘किशनाच्या नादानं यडी झाले नुसती.’


.. तिने तसाच दुसरा पाण्याचा शिंतोडा सखीच्या तोंडावर मारला तशी सखी दचकली. सोनाई लगेचच हसत बोलली,
“किशना कवापास्न बोलावतोय…. ध्यान कुटं हाये तुजं?”


कृष्णाचं नाव ऐकताच सखीची नजर लगेच दरवाजाकडे गेली आणि आपोआप पावले उचलत ती स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली,
“बोलावलं का..”


सोनाई तिच्याकडे बघून हसत होती. सखी नजर बाहेर ठेवूनच सोनाईकडे न बघता संथ पावले उचलत अगदी हलक्या पावल्यांनी बाहेर निघून गेली ती सरळ आपल्या खोलीत.


तिने दरवाजातूनच खोलीभर नजर फिरवली. तो खोलीत नसूनही ती तशीच चालत त्यांची खास जागा असलेल्या खिडकीजवळ आली. शेजारचा टेबल पायाखाली घेतला आणि खिडकीत बसली.


आत्ता इथे तिला हवा तो एकांत होता. खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून ती पावसाची रिमझिम हातावर घेत होती. खिडकीच्या थंड गजांमध्ये आपला चेहरा खुपसून पावसाचे कण चेहऱ्यावर घेताना ती तिच्याच धुंदीत होती. हसत होती. खरं तरं तिची मघासची धुंदी अजून उतरलीच नव्हती. उतरेल तरी कशी? त्याच्या हनुवटीचा स्पर्श तिच्या ओठांमार्फत तिच्या अंतरंगात जो पाझरलेला!


तिला वेडं होण्यासाठी दुसरंच कारण होतं- त्याची वाढीव मागणी! पुन्हा त्याच्या गालावर, त्याच्या समक्ष, जागेपणी ओठ टेकवणं म्हणजे त्यांच्या नात्याचं पुढचं पाऊल!


विचारांनीच तिला गोड गुदगुल्या होत होत्या. तिच्या गालात हसू येऊन लाजून जात होतं. फार फार वेडी अवस्था झालेली तिची. तिचं मन पहिल्यांदाच इतकं वेडावलेलं. कृष्णाने स्वतः पाऊल उचललं म्हटल्यावर वेड का नाही लागणार! आधीच त्याच्यात गुंतलेली सखी आता तिची उरलीच नव्हती!


कृष्णा निवडणुकीचं बऱ्यापैकी नियोजन करून पुन्हा घरी आला. त्याला आश्चर्य वाटलं. तीनही मुलं अजूनही खाटेवर बसून टीव्ही बघत होती फक्त आता गाण्यांऐवजी बाल हनुमान लागलेलं. तिघेही ताटलीतील शेंगदाणे चघळत टीव्ही बघण्यात व्यस्त होते. कृष्णा सखीच्या ओढीने सवयीने स्वयंपाकघरात आला. सोनाई चुलीपुढे शेंगा भाजत होती. तो भाजलेल्या दोन शेंगा उचलत सहज बोलला,
“सखी कुठं गेल्या?”

सोनाई चेहऱ्यावरचं आपलं हसू लपवत बोलली,
“तिजं डोकं दुखतंय.. पडली आसंल.”


कृष्णा हातात घेतलेल्या शेंगा पुन्हा खाली टाकत काळजीने बोलला,
“एवढं दुखतंय काय….” आणि लागलीच आपल्या खोलीत आला पण तिच्याजवळ जाईपर्यंत त्याची काळजी किंचित हसण्यात बदलली. सखी अगदी आरवची आई शोभेल अशी खिडकी बसून बालिशपणे वागताना दिसली. खिडकीच्या बाहेर हात काढून, त्या लोखंडी गजांना चेहरा लावून पावसाचं पाणी चेहऱ्यावर, हातावर हसऱ्या चेहऱ्याने घेताना दिसली.

तो हसत बोलला,
“सखी ऽ….”

एवढा वेळ स्वतःच्याच धुंदीत असणाऱ्या सखीच्या कानांनी त्याचा आवाज बरोबर टिपला आणि हसतंच मागे पहिलं पण नजरानजर झाल्यावर लाजून तिची नजर पुन्हा खाली झुकली.

पुन्हा तिला मघासच्या सारखंच हसताना पाहून कृष्णाला भारी वाटलं पण तिच्या हसण्याचं गुपित मात्र गुपितच राहिलं. सखी खिडकीतून येणारी थंड हवा अंगावर घेत आपल्या पायाच्या अंगठ्याकडे बघत गालात हसत होती.


मघापासून त्यांच्यात अबोल संवादच चालू होता. गंमत म्हणजे त्या संवादात शब्द तरं नव्हतेच पण ठळक अशा भावना सुद्धा नव्हत्या, फक्त होते ते गोड तरंग! ज्यांना नाव नव्हतं, चेहरा नव्हता, ओळख नव्हती, होती ती फक्त जाणीव.. एक गोड अनुभूती! जी दोघांच्याही अंतर्मनापर्यंत अलवार पोहोचत होती.


तिच्याशी नेहमीच बोलण्याच्या मोहात असणारा कृष्णा आज मात्र तिला अशी लाजरी हसताना न्याहाळण्यात गुंतला. खिडकीला टेकून हाताची घडी घालून तिचं ते लाजरं रुपडं डोळ्यांत साठवण्यात मास्तर हरवून गेले.

सखी अगदी नवी नवरीसारखी आपली साडी सावरून गुडघेउराशी घेऊन आपल्या पायाच्या अंगठ्याकडे पाहत खाली बघून लाजरी हसत होती.‌ अगदी खिडकीजवळ उभ्या असलेल्या त्याचं अस्तित्व तिला वेड करण्यासाठी पुरेसं होतं.

तिला इतकी सुरेख लाजरी हसताना पाहून कृष्णा ही स्वतःला विसरून तिच्याकडे एकटक बघत सुरेलपणे बोलला,
"सखी ऽ ऽ....."

'त्याची गोड आर्जव पुन्हा आली' या विचारानेच सखीच्या अंतरंगात गोड गुदगुल्या झाल्या. ती पुन्हा त्याच्याशी बोलताना सुद्धा लाजली.

तिच्या गोड चेहऱ्याकडे पाहताना त्याला तिचं नाव सुद्धा खूप गोड वाटलं. तो असंच....! उगाचच..! त्याला हवं होतं म्हणून प्रेमाने पुटपुटला,
"सखी ऽ ऽ....."

एखाद्या आवाजाच्या कान सुद्धा प्रेमात पडावे!
त्याचा आवाज मधुर नव्हताच पण तिच्यासाठी त्याच्या तोंडून इतक्या प्रेमाने 'सखी' ऐकणं म्हणजे पर्वणीच होती.


जणू तिचा नवरा तिला इतक्या प्रेमाने लडिवाळपणे हाक मारत होता. सखीचं मन उगाचच बावरं झालेलं. प्रेमाची चाहूल लागलेल्या सखीचं अंतर्मन त्याच्याकडे दोन्ही हात पसरून झेपावत होतं पण नजर काही उठत नव्हती.


तिला पुन्हा खाली बघूनच गालात हसताना हलकीशी लाजताना पाहून कृष्णाला ही कसंतरीच व्हायला लागलेलं. तिच्याकडे पाहताना तो ही गोड हसला आणि ते कसंतरीच मोकळ्या मनाच्या कृष्णाच्या तोंडून रांगड्या बोलीत बाहेर आलं,
"च्यामारी सखी! काय चाललंय तुमचं. काही खरं नाही बाबा!"


सखी पुन्हा खाली बघूनच लाजरी हसली. मघापासून ती त्याच्याशी एक शब्द देखील बोलली नव्हती. तिचं हसणं आणि लाजणंच चालू होतं. तिला अजूनही तशीच हसताना पाहून तिच्याकडे पाहताना कृष्णा मोकळेपणाने हसला. त्याचा आवाज अगदी स्वयंपाकघरात सोनाईला सुद्धा ऐकू गेला. त्याचा हसतानाचा आवाज ऐकून स्वयंपाकघरात चुलीवर शेंगा भाजणारी सोनाई सुद्धा आनंदाने हसली.


कृष्णाला हसताना गालावर काहीतरी जाणवलं. कृष्णाने हसतच दोन चार पावलं मागे येऊन आरशात पाहिलं. उतरत्या गालावर बारीक बारीक पिठाचे कण दाढी मध्ये अजूनही तसेच होते. कृष्णाचा हात पुन्हा दाढीकडे गेला पण सखीकडे पाहताना आपसूकच तो खाली आला.

तिच्यावर जसा की त्याचा अधिकारच होता. त्यालाही जाणवत होतं सखी पहिल्यापेक्षा खूप खास झालीये. तिचं खास होणं त्याला खूप आवडत होतं. तिच्याशी हक्काने बोलणं, अधिकार गाजवणं हे तर आता त्याच्या सवयीचं झालेलं.

बाहेरची पावसाची रिमझिम पूर्ण थांबलेली पण पाऊस पडून गेल्याने थंड हवा नुसतीच बोकळत होती. ती खिडकीतून ही आत मध्ये झेपावत होती. सखीचा खांद्यावरचा पदर फडफडत होता. तिचे वेणीतून निघालेले बारीक केस त्या हवेवर डुलत होते.

मघापासून स्वतःच्याच कोशात असलेल्या आणि आपल्या अबोल अदांनी त्याच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या सखीकडे पाऊल उचलताना ही त्याचं मन उगाचंच वेडावलं. कृष्णा अगदी खिडकी जवळ आला. मधोमध उभा राहून तोही तिच्याच धुंदीत असल्याकारणाने सुरेलपणे बोलला,
"सखी ऽ......"

त्याचं पुन्हा इतक्या जवळ येऊन इतक्या प्रेमाने तिला आवाज देणं म्हणजे........ सखीची हालत लाजून खराब झालेली. तिने खाली पाहतच अंग चोरलं.

ते वातावरणच वेगळं होतं! त्यांच्या नात्याची चाहूल दोघांनाही खुणावत होती. एक प्रेममय जग दोघांचीही वाट पाहत होतं. त्या अनोख्या दुनियेतले काही मोहक तुषार या क्षणांमध्ये शिंपडलेले.. ज्याचा प्रभाव त्या दोघांवरही दिसून येत होता.

लग्नाचा जसा की दुसराच दिवस होता आणि नवरा आपल्या नववधूला प्रेमाने साद घालत होता,
"सखी ऽ, एकदा बघताय काय माझ्याकडं.."


आपल्या गुडघ्या भोवती हातांचा घट्ट वेढा देऊन त्याची प्रेमळ आर्जव आल्याने सखीने लाजून बिघडलेल्या स्पंदनांनी हळूहळू त्याच्याकडे पाहिलं. तिचा तो लाजरा देखणा चेहरा इतका वेळ पाहून सुद्धा त्याने पुन्हा नजरेत साठवला आणि आपला गाल तिच्याकडे करत फक्त हुंकारला,
"हम्म ऽ...."


आईशप्पथ! सरळ सरळ त्याने गाल पुढे केलेला. सखीचं सर्वांग शहारलं. तिची बावरी नजर दरवाजाकडे गेली. दरवाजा उघडाच होता. स्वयंपाकघरातून सोनाईचा आवाज आल्यासारखा वाटत होता पण तिच्या कानांना काही काही ऐकू येत नव्हतं. तिला काही सुचतही नव्हतं. सखी याक्षणात देहभान विसरलेली.

तिच्या हृदयाची धडधड टिकटिक वाजण्यापलीकडे सुसाट धावत होती. तिचं एक मन त्याच्याकडे सैरावैरा झेपावलं पण दुसऱ्या मनाच्या संवेदना अजूनही जाग्या होत्या. ओटीवरून येणारा मुलांचा आवाज तिची लाजेची छटा अजूनच दृढ करत होता. असं सरळ सरळ त्याच्या गालावर ओठ टेकवण्याच्या कल्पनेने सखी लाजेने लाल झाली. ती खाली बघूनच गोरीमोरी होत अस्पष्ट बोलली,
"आत्ता नको..... नंतर... नंतर निवांत!"


पुन्हा तिचे तेच लाजलेले बोल ऐकून कृष्णाच्या काळजाची तार छेडली गेली आणि त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तिला पाहताना त्याची स्पंदने पुन्हा नव्याने बिघडू लागली. त्या गोऱ्या गालांवर लाजेची लाली चढलेली. तिथे श्वास वाढलेले तो डोळ्यांनी पाहत होता. काय झालं त्याला कळलं नाही पण या सखीने त्याला घायाळ केलेलं.

तिची धुंदी असलेला कृष्णा तिच्या चेहऱ्याकडे पाहत अस्पष्ट पुटपुटला,
"पुन्हा बोला!"

सखी लाजेने चूर झालेली. गुडघ्याभोवती हातांचा वेढा घट्ट देऊन ती खाली बघूनच मान नकारार्थी हलवत लाजरी हसली. ही नेहमीची सखी नव्हतीच! या सखीने वेडावलेल्या, तिला पाहण्यात हरवलेल्या कृष्णाचा तोल जाणार इतक्यात तो स्वतःला सांभाळत भिंतीचा आधार घेऊन उभा राहत हसत मोकळेपणाने बोलला,
"पडलो असतो... राहू द्या, मीच पुसतो..."

कृष्णा त्या धुंद वातावरणात गालात हसतच कधी आरशात बघत तर कधी सखीकडे बघत आपल्या दाढीवरचे राहिलेले पिठाचे कण बोटाने उडवत बोलला,
"हाताला लागेल ते काढून सुद्धा शेवटी राहीलंच
तरी सकाळीच तुम्हाला पुसा म्हणत होतो.. पण पीठ लावायला पुढे आणि पुसायला मागे.."

त्याला आरशात बघत दाढी वरचे पिठाचे कण बोटाने उडवताना पाहून, मघाशी गाल पुढे का केला असेल याचा पुसटसा अंदाज येऊन सखी आत्ताशी त्याच्याशी त्याचा अंदाज घेत काहीशी लाजून बोलली,
"म्हणजे तुम्ही आत्ता पीठाचे कण पुसायला सांगीतलेले?"

कृष्णा आपल्या दाढीवरून हात फिरवत बिनधास्त गालात हसत बोलला,
"हा मग.. लावणाऱ्यानेच पुसायचं असतं."


'म्हणजे मघाशी सुद्धा तो स्वतःच्या दाढीवरचे पिठाचे कण बोटाने खरवडत होता' सखीच्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला आणि ती कपाळाला हात मारत स्वतःच्या वेडेपणावर हसत नकळत बडबडली,
'कृष्णा ऽ, काय रे तू.... हे असं होतं आणि मला वाटलं...' बोलता बोलता तिने जीभ सावरली.


"तुम्हाला काय वाटलं?" तिची रिअॅक्शन बघून त्याचा ओघानेच प्रश्न आला.

सखी स्वतःच्याच वेडेपणावर हसतच कपाळाला हात लावून बडबडली,
"काही नाही.. वेडी आहे मी... खरंच वेडीच आहे मी.."


कृष्णा ही हसला. गोष्ट किती साधी होती आणि आपण भलतीच समजलो आणि फक्त समजलोच नाही तर त्या विचारांतच डुंबलो, त्या क्षणांमध्ये गुरफटलो याचा विचार करून सखीच्या चेहऱ्यावरचं लाजरं हसू थांबतच नव्हतं.


आपल्या वेड्या लाजऱ्या विचारांनी ती स्वतःशीच मान हलवत हसली. बाहेर जाण्यासाठी तिने पाय खाली सोडले आणि ती निघालीये हे लक्षात येताच कृष्णाने लगेचच खिडकीला आडवा हात लावला.

त्याचा हात पाहून सखी तसेच मोकळेपणाने हसत बोलली,
"झाला ना गाल स्वच्छ.. जाऊ द्या आता.."

कृष्णा तिच्या त्या लाजऱ्या वाक्याचा अर्थ न समजून तिच्या डोळ्यांत पाहत बोलेला,
"तुम्ही जा पण एका प्रश्नाचं उत्तर देऊन."


"कोणता प्रश्न?"
तिने हसू आवरत घेत विचारलं.


बोलतानाही त्याला आत मध्ये हलकिशी हुरहूर जाणवली आणि तो गालात हसत बोलला,
'आत्ता नको... नंतर .‌..' म्हणजे?


त्याचं बोलणं ऐकून सखी पुन्हा स्वतःच्या विचारांवर हसली. ती लाजून नकारार्थी मान हलवत बोलली,
"काही नाही."


कृष्णा खिडकीजवळच्या भिंतीचा हात अगदी ताठ करून तिच्या चेहऱ्यासमोर चेहरा आणत हट्टाने बोलला,
"सांगितल्याशिवाय जाऊ देणार नाही."


सखी त्याच्याकडे पाहताना ही लाजली. अजूनही मघासची लाज तिच्या गालावर कायम होती. पुन्हा संथ गतीने नजर खाली आणत ती लाजून बोलली,
"खरंच... काही नाही.."


तिच्या लाजऱ्या नकाराने त्याच्या मनातलं कुतूहल जास्तच फडफडलं. तिचं ते लाजरं गुपित जाणून घेण्यासाठी तो अधिकच आतुरला. तिच्या लाजलेल्या चेहऱ्यावरून नजर फिरवत तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा आणत तो ओठांत पुटपुटला,
"सांगा ना... 'आत्ता नको... नंतर' म्हणजे काय?"


त्याच्या अशा जवळ येण्याने आणि सुरेल स्वरात बोलण्याने तिच्या आत मध्ये पुन्हा तरंग उठले. आधीच लाजेची लाली गालावर असताना, श्वासांची लय बिघडलेली असताना, पुरेशी सावरलेली नसताना सखी पुन्हा त्या नाजूक पायवाटीवर घसरली आणि दिल के हातो मजबूर होऊन हळूहळू नजरेला त्याच्या नजरेपर्यंत आणत त्याच्या डोळ्यात पाहत लाजून बोलली,
"ते गोड गुपित आहे!"


तो तिच्या डोळ्यांत पाहत श्वास बिघडू देत बोलला,
"मग सांगताय काय.."

लाजने सखीचे ओठ थरथरले. मनीचे गूज तरं ती त्याला सांगू शकत नव्हती पण त्याच्या नजरेत स्वतःला शोधत सखी त्याच्यावर पहिल्यांदा बेमालूमपणे हक्क गाजवत ओठांत पुटपुटली,
"फक्त तुम्ही आणि मी...... निवांत! असं बोलायचं होतं."

त्यालाही फक्त हेच हवं होतं.. 'ती आणि तो' त्याच्याच मनीचे बोल तिच्या ओठून निघाल्यामुळे कृष्णाने गालात हसत भुवई उंचावली,
"हम्म...?"

त्याच्या नजरेतील खट्याळ भाव ओळखून सखी खाली बघतच लाजरी हसत होकारार्थी हुंकारली,
"हम्म ऽ....."


गुंतलेला श्वास हा..
सोडवू दे थांब ना..
तोल माझा सावरू दे थांब ना...
सर सुखाची ही श्रावणी....

© प्रियांका सुभा कस्तुरी
२४/०६/२०२४

.......

मागच्या भागाच्या समिक्षांसाठी खूप खूप मनापासून धन्यवाद!

वेळेच्या ट्राफिक मधून स्वतःसाठी वेळ काढणं खूप अवघड झालं आहे तरीही प्रयत्न चालू आहेत..

उत्तरार्ध चालू आहे तुमचं प्रोत्साहन असंच राहू द्या म्हणजे योग्य ठिकाणी पोहचेपर्यंत तुमची सोबत राहिल.

भेटू लवकरच!)

🎭 Series Post

View all