पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१८४

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१८४


"फक्त तुम्ही आणि मी...... निवांत! असं बोलायचं होतं."

त्यालाही फक्त हेच हवं होतं..  'ती आणि तो' त्याच्याच मनीचे बोल तिच्या ओठून निघाल्यामुळे कृष्णाने गालात हसत भुवई उंचावली,
"हम्म...?"

त्याच्या नजरेतील खट्याळ भाव ओळखून सखी खाली बघतच लाजरी हसत होकारार्थी हुंकारली,
"हम्म ऽ....."

गुंतलेला श्वास हा..
सोडवू दे थांब ना..
तोल माझा सावरू दे थांब ना...


तो गालात हसत बोलला,
"मग रात्री स्वयंपाक लवकर उरका काय.. पण पलंगावर पडल्या पडल्या रोज सारखं लगेच झोपू नका."


त्याच्या बोलण्याने सखीला उगाचच गुदगुल्या झाल्या. ती तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत गालात हसली तेव्हाच एवढा वेळ शांत बसलेल्या आरवने खाटेवरून आवाज दिला,
"आयं ऽ, श्येंगा बी दे की खायाला."


कृष्णा खिडकीला लावलेला आपला आडवा हात काढत हसत बोलला,
"जा आता. आईचं पिल्लू हाका मारतंय."


त्याच्या बोलण्याने सखी पुन्हा हसली. त्याने मघाशी दूर लोटलेला टेबल पायानेच पुन्हा खिडकीजवळ घेतला. ती हसतच खाली उतरली आणि बाहेर जाणार एवढ्यात कृष्णाने आवाज दिला,
“आरवच्या आई ऽ ऽ….”


किती दिवसांनी त्याच्या तोंडून पहिल्यासारखी हाक ऐकून सखीने हसून मागे पाहिलं आणि तीही त्याच्याच सुरात बोलली,
“बोला सुरजचे बाबा…”


कृष्ण ही हसला,
“नाही म्हटलं......, संध्याकाळी जरा लवकर आवरा.”


त्यांच्या गप्पांसाठी त्याची तिच्या इतकीच आतुरता पाहून सखीला किती आनंद झाला.
“बरं.” सखी हसली आणि स्वयंपाकघरात गेली.


बाहेर सायंकाळ पासून चालू झालेला पाऊस थांबला नव्हता आणि आत मध्ये कृष्णाच्या चेहऱ्यावरील हसू ही काही केल्या थांबत नव्हतं. तो उगाचच हसत होता. तिचं आसपास असणं जणू त्याला भुरळ घालत होतं.


खूप दिवसांपासूनच्या त्यांच्या गप्पा तिला ही खुणावत होत्या, त्यात दुपारचे त्याच्यासोबतचे हळवे क्षण आठवून तरं सखी सुद्धा गालात हसतच स्वयंपाक उरकायच्या मागे लागलेली. ती स्वयंपाकघरात होती आणि कृष्णा ओटीवर मुलांची उजळणी घेत होता.


रात्रीचे नऊ दहा वाजले असतील. पळसगावातील प्रत्येकाच्या घराचे दरवाजे बंद होते कारण पाऊस नुसता मी म्हणत होता. हवे सोबत पाऊस बेफाम कोसळत होता, त्यामुळे घराघरांत सगळ्यांनी लवकर जेवणं उरकून अंथरुणाची ऊब आपलीशी केलेली. मोहित्यांच्या घरात सुद्धा असंच वातावरण होतं. गरमागरम जेवण झाल्यावर आरव-गौरी लगेच झोपी गेलेले. सुरज सुद्धा कृष्णाच्या कुशीत लगेच झोपलेला.


आज एका दिवसात बरंच काही घडलेलं. सखी आणि सुरेखाचं भांडण हे तरं अख्खं पळसगाव विसरणार नव्हतं मग त्यांच्या भांडणाचा साक्षीदार असलेला कृष्णा कसा विसरेल. पलंगावर पडल्या पडल्या दुपारचं भांडण आठवून सखीची वाट बघत तो आता ही एकटाच हसत होता.


सखी आणि सोनाईने स्वयंपाकघरातला भांड्यांचा पसारा आवरला. सगळं झाकून पाकून ठेवलं, शिंकाळ्यावर दूध ठेवलं मग सखी आपल्या खोलीत आली.‌ तिने दरवाजा नेहमी सारखा ढकलला आणि थंडावलेल्या कानांना स्कार्फ बांधत कृष्णाकडे पाहिलं.‌


तो कधीपासून तिची वाटच पाहत होता. ती आल्यावर त्याने सुरजला लगेच तिच्या गोधडीमध्ये सारलं. त्या गारठ्यात सखी ही लगेचच स्वेटरचं शेवटचं बटन लावून पलंगावर पडली.

बाहेर -
आरव आणि गौरीच्या अंगावर पुन्हा गोधडी टाकून सोनाई ही प्रसन्न मनाने गोधडीत शिरली. आज कौलांवर कोसळणाऱ्या पावसांच्या सरींमुळे खोलीतील कसलीच चाहूल तिला लागत नव्हती पण तिला खात्री होती, ते दोघे आता ही आतमध्ये गुटुर गुटुर करत असतील.


सुरजला कुशीत घेऊन सखी स्वेटरवर ब्लॅंकेट,  ब्लॅंकेटवर अजून दोन गोधड्या घेऊन पलंगावर कृष्णाकडे बघत पडलेली. तो ही जागा होता म्हणूनच, भिंतीला चिटकून तिच्याकडे फिरूनच अंगावर गोधडी ओढून पडलेला.

पलंगावर आल्यावर दोघेही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसले. किती दिवसांनी त्यांना अशी उसंत मिळालेली. मघापासून तिची वाट पाहणाऱ्या कृष्णानेच बोलायला सुरुवात केली. पलंगावर आल्यावर आपोआप त्याचा आवाज हल्ली बारीक निघत होता. तो त्याला शक्य तितक्या हळू आवाजात बोलला,
“तुम्ही मुंबईवरून आल्यापासून तुमच्याशी असं निवांत बोलणंच झालं नाही.”

सखी सुरजला कुशीत घेत,
“हो... ना..."

कृष्णा उगाचच तिला छेडत खोडकरपणे हसत बोलला,
“आम्ही आपलं रोज कोणाची तरी बोलण्याची वाट पाहतो पण नाजूक माणूस पडल्या पडल्या झोपी जातात.”


सखी त्याच्याकडे बघून हसली. ती त्याच्याच सुरात बोलली,
“झोपल्यावर झोप लागते माणसाची.. त्याला काय करायचं.”


तो प्रेमपूर्वक काळजीने बोलला,
“थकून जाता ना दररोज..”


त्याची काळजी बघून तीही प्रेमाने बोलली,
“नाहीतर!”


तो कौतुकाने मान हलवत पुटपुटला,
“विसरलोच होतो, वेदना हसत हसत सहन करणं तरं तुमच्याकडून शिकावं.”


सखी हसली. बाहेर कोसळणारा पाऊस ऐकत ती ब्लॅंकेट सोबत दोन्ही गोधड्या अगदी मानेपर्यंत घेऊन सुद्धा हुडहूडी भरल्यासारखी बोलली,
“कसली थंडी वाजतीये ना..”


एवढं सगळं घेऊन ही, सुरजला कुशीत घेऊन उबदार लोकरीचा स्वेटर अंगावर असूनही, तिला अजून थंडी वाजतीये हे बघून कृष्णाला गंमतच वाटली. तो हसत बोलला,
"तुम्ही इथला हिवाळा कसा काढणार सखी.. हिवाळ्यामध्ये तर लयीच थंडी असते."


सखी तिच्या गोधडी मध्ये चोरून शिरलेल्या हवेने कुडकुडत बोलली,
“माहिती नाही पण तो कृष्णा आहे ना.. तो करेल काहीतरी."


तेव्हाच त्याला आरतीचं नेहमीचं वाक्य आठवलं,
'किस्सू तुझ्या मिठीची ऊब.. जगात भारी!'


त्या कृष्णाचं नाव येताच या कृष्णाच्या अगदी ओठांपर्यंत आलं,
'तो कशाला? मी नाही काय?' पण त्याने ते गिळलं.


सखी तशीच कुडकुडत बोलली,
"थंडी जरा पण सहन होत नाही हो..”


तिच्या नाजूक फिक्कट गुलाबी ओठांची मादक थरथर पाहून कोणीही घायाळ झालं असतं, मग आता तरं तिच्यातच गुंतलेला कृष्णा याला कसा बरं अपवाद असेल! ती नाजूक थरथर पाहताना त्याचे ही ओठ हलकेच थरथरले आणि तो लगेचच त्या ओठांवरची नजर हटवत बोलला,
“तोंडावर घेऊन पडा म्हणजे बरं वाटेल.”


तो समोर असताना, तिच्याकडे पाहत असताना, आणि त्याच्याकडे पाहण्याचा तिला मोह असताना, तिने तोंडावर घेणं शक्य होतं का! त्याच्याकडे बघत गोधडी अगदी ओठांपर्यंत घेऊन सखी कुडकुडत बोलली,
“अं ऽ हं ऽ.. असंच ठीक आहे.”


थंडीने कुडकुडत असतानाही चेहऱ्यावर न घेण्याचा हट्टीपणा पाहून कृष्णा हसला आणि त्याला हसताना बघून ती सुद्धा हसली.


घरात आल्यापासून तिला सांगायचं सांगायचं म्हणून राहूनच गेलेलं. 'तिला सांगायलाच हवं' या भावनेने
कृष्णा थोडासा हसून पण त्याच्या परीने हळू आवाजात बोलला,
“सखी ऽ एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली."


एरवी त्याचा हळू आवाज बाहेर सोनाईला सहज ऐकू जायचा पण कौलांवर होणाऱ्या पावसाच्या माऱ्यामुळे, खिडकीवर हवे सोबत आदळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे पलंगावर सुद्धा त्याचा आवाज ऐकू आला नाही.

सखीने ऐकण्याचा प्रयत्न करत विचारलं,
“काय ते?”

कृष्णाने आपली उशी जराशी जवळ घेतली आणि पुढे सरकून बोलला,
“मी म्हटलं, मला एक दोन दिवसासाठी बाहेर जावं लागेल.”


तो एक दोन दिवसांसाठी घरात नसणार हे ऐकून सखीला आत्ताच टेन्शन आलं,
“काय? कशाला? म्हणजे तुम्ही कशाला? आणि कुठे जाणार आहात?” तिची प्रश्नांची सरबत्ती एकदमच आली.


एरवी हळूहळू बोलणाऱ्या सखीचा अचानक चढलेला स्वर पाहून कृष्णा थोडासा हसून बोलला,
“हळू बोलाल काय जरा.. आईने ऐकलं तरं आत्तापासून तोंड चालू होईल तिचं.”

तो हसला पण तिचं हसू गायब झालेलं. सखी गोंधळून बोलली,
“पण कधी?


कृष्णा पुन्हा हसला,
“अजून वेळ आहे. पावसाने उघडीप दिल्यावर जाणं होईल.. तुम्हाला कल्पना असावी म्हणून फक्त तुमच्या कानावर घालवलं.”


तिचा तोच चिंतीत स्वर..
“पण कशाला जात आहात?”


गावकीचा विषय निघाल्यावर गावच्या प्रगतीसाठी मनापासून झटणारा कृष्णा लगेचच गंभीर झाला आणि तिला समजावत बोलला,
“सरपंचकीच्या निवडणुका आता तोंडावर आलेत सखी आणि मला यावर्षी गावचं घाणेरडं राजकारण मुळापासून छाटून टाकायचं आहे, त्यामुळे जावंच लागेल. तुम्हाला कल्पना नाही, मुंबई पुण्यात अर्ध्यापेक्षा जास्त गाव आहे. पाटलांच्या गाड्यांमध्ये ते लोक बसून येतात आणि खिसे गरम करून झाल्यावर आपल्या बोटाची शाई पाटलाच्या नावाने करून जातात. गेल्या वर्षी सुद्धा खूप वाद झाला. शेवटी पाटील आणि शिंपी सरपंच अडीच अडीच वर्ष सरपंच झाले.”


त्याने सांगितलेलं कळत असून सुद्धा तो जाणार या काळजीने सखी टेन्शनमध्ये बोलली,
“पण तुम्हीच का?”


कृष्णा थोडासा हसून बोलला,
“प्रत्येक जण हाच विचार करतो 'मीच का?' पण 'मी का नाही' हा विचार कोणीच करत नाही सखी. कमीत कमी आपण तरी तो विचार करावा आणि मी एकटाच नाही माझ्यासोबत सुधीर आहे, राकेश आहे, दत्ता आहे, प्रशांत आहे आम्ही सगळेच जाणार आहोत.”


त्याचा उत्साह पाहून सखी नाराजीने बोलली,
“काय करणार जाऊन?”


कृष्णा उत्साहाने बोलला,
“पहिल्यांदा मुंबईत जाणार आणि गावकीच्या खोलीवर मुलांची मीटिंग घेणार. या वर्षी एकमताने सुधीरला उभं करण्याचा विचार आहे माझा.. इंग्रज जाऊन इतकी वर्षं झाली तरीही आपल्या गावच्या ओढ्यावर साधा एक पूल नाही. ते काही नाही बदल अपेक्षित आहे.”


तो मुंबईला जाणार म्हटल्यावर सखीच्या डोक्यात नवीन विचार आला आणि उत्सुकतेने ती सुद्धा थोडीशी त्याच्याकडे सरकत माहेरच्या ओढीने हसून बोलली,
“मग मीही येऊ का तुमच्यासोबत?”


तिच्या बोलण्याने कृष्णा हसला. तो त्याच्या हळू आवाजात बोलला,
“तुम्ही येऊन काय करणार?”

त्याच्या हसण्याने सखी हुरळून जाऊन उत्सुकतेने बोलली,
“तुम्ही मिटींगला जा आणि मी दादाकडे जाईन.”

कृष्णा पुन्हा हसला,
“व्हयं काय? पण असला लाड चालणार नाही .. आणि मुलांच्या शाळांचं काय करायचं? आत्ता आल्या नाहीत की निघाल्या लगेच माहेराला.”


माहेराला जाण्याच्या विचाराने तिला सगळ्याचा विसर पडलेला. त्याच्या बोलण्याने कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव होऊन ती डोळे मिचकावत हसली आणि तिची ती नवी अदा पाहून त्याची उगाचच नजर कैद झाली….

.. आणि तेव्हाच बाहेरच्या दरवाजावर जोरात थाप वाजवण्याचा आवाज आला. नुकताच डोळा लागणारी सोनाई दचकून उठली आणि बिछान्यातूनच ओरडली,
“कोन हाये रं ऽ?”


“काकू ऽ मी वसंत. मास्तर हायेत का?”
बाहेरून आवाज आला.


‘रातची झुपू बी दिव नगा..’ सोनाई तोंडात कुरकुरत उठली आणि बाहेरचा दरवाजा उघडत बोलली,
“त्यो झाॅपलाय काय काम हाये?”


वसंतने आत डोकावलं आणि कृष्णा आपल्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर येताना दिसला. मुसळधार पावसात अशा रात्री रेनकोट घालून छत्री घेतलेल्या वसंतला पाहून कृष्णाने काळजीने विचारलं,
“काय झालंय वसंत? आत ये की..”


वसंत हातातील पिशवी दाखवत बोलला,
“मास्तर ऽ, आबा दोन दिस झालं आंबेगावच्या सरकारी दवाखान्यात हायेत.. त्यांना काय तिथलं जेवान जात न्हाय. मीच डबा घिवून जातो पन.. आज कधीपास्न पाऊस उघाडन्याची वाट बघतोया..त्यो वाढतोय पन कमी व्हयना.”

सोनाईला अंदाज आला तरीही तिने विचारलं,
“मं? हितं कशाला आलायंस?”

वसंत सोनाईला भीत भीतच जरा दबकून बोलला,
“सायकलीव कसा जावं? फरशीवनं पानी गेलं आसंल आनि रस्तं बी धड न्हायंत. मास्तरांनी सोडंल आसंत तं… सोबत बी झाली आसती.”


उसळणाऱ्या सरींकडे बघून सोसाट्याच्या वाऱ्यासोबत बेफाम कोसळणाऱ्या त्या पावसाकडे बघून सोनाई वसंतला ओरडली,
“वशा, आरं ऽ यडा झालायंस व्हयं? म्हाताऱ्याच्या नरड्यात आडाकतंय व्हयं तिथंल ज्येवान? तू बी निघालायास ह्या पावसात रातचा यरीचा जेवान घिवून.”


तो सोनाईला काही बोलला नाही पण मास्तर दाराशी आलेल्यांना कधीच कोणालाच नाही म्हणत नाहीत, हे माहित असलेला वसंत या कोसळणाऱ्या पावसात ही  कृष्णाकडे आशेने बघत होता.


कृष्णा लगेचच भिंतीला अडकवलेला रेनकोट चढवत बोलला,
“तू घरून उरकून आलायस काय?”


“व्हयं.. व्हयं.” वसंतने उत्साहात होकार कळवला.


पावसाचा जोर बघून सोनाई काळजीने कृष्णाला अडवत बोलली,
“आर किशना ऽ, वशासारखा तू बी खुळा व्हव नगं. पाऊस वकतोय नुसता.. त्यो म्हातारा यक रात त्याज्या गुनानं उपाशी ऱ्हायला तं ऱ्हाव दे पन तू नगं जावं.”

अख्या गावात वसंत इतक्या आशेने याच घरी आलेला त्यामुळे कृष्णा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत घाईत बोलला,
“आई ऽ, मी लगेच आलो जाऊन...तू झोपून घे.”


खोलीचा दरवाजा उघडा होता. तो बंद करण्यासाठी कृष्णा पुढे झाला तर सखी मागे वळूनच बघत होती. 
ती तरं त्याची वाट पाहत होती पण अचानक त्याला रेनकोट घातलेला पाहून अंगावरची गोधडी बाजूला करत ती उठण्याची धडपड करतच होती की कृष्णा स्वतःच पुढे झाला आणि तिची गोधडी ब्लॅंकेटसह पुन्हा तिच्या अंगावर घालत प्रेमाने बोलला,
“तुम्ही झोपून घ्या. मी जरा आंबेगावला जाऊन आलो.”


यावेळी अचानक तो बाहेर निघालाय हे ऐकून सखी त्याच्याकडे बघत खूप दिवसांनी साप पहिल्यासारखी ओरडली,
“क्काय?? कशाला? कोणाला काय झालं?”


तिला अशी रिऍक्ट झालेली पाहून कृष्णा तिच्या डोक्यावरून हलका हात फिरवत थोडासा हसून पण प्रेमाने बोलला,
“काही नाही. ते वसंतचे आबा ऍडमिट आहेत. त्यांनाच डबा घेऊन जातोय.”


एवढ्या पावसात तो जाणार त्यामुळे त्याच्या काळजीने ती लहान मुलासारखा चेहरा करून काळजीने बोलली,
“पण तुम्हीच का?”

कृष्णा आपल्या वडिलांच्या म्हणजे सर्जेरावांच्या
आठवणीने कुठेतरी हरवल्यासारखा बोलला,
“बाप बाप असतो सखी. त्याचा काय किंवा माझा काय. एवढ्या पावसात वसंतला त्याच्या बापासाठी जेवण घेऊन जावंस वाटतंय, किती कौतुकाची गोष्ट आहे ही."


तो खोलीत घुटमळल्यामुळे सोनाई लगेचच वसंतला कटवण्यासाठी बोलली,
“किशना ऽ, वशाला घरी जायाला सांगते रं ऽ…”

“नको ऽ……” कृष्णाने मागे फिरून तिथूनच सूर ओढला आणि पुन्हा सखीच्या बारीक झालेल्या चेहऱ्याकडे पाहत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तितक्याच प्रेमाने बोलला,
“तुम्ही घ्या झोपून. आलोच.” आणि तो लगेच बाहेर जायला निघाला.

“लवकर या ऽ .. आणि हळूहळू जा..” मागून सखीचा काळजीचा स्वर कानी पडला आणि कृष्णा दरवाजा बाहेरून ओढून घेताना तिच्याकडे पाहून हसला. 

अंगणातून वाहत चाललेला पाण्याचा लोंडा पाहून सोनाई काळजीने बोलली,
“आरं किशना ऽ, आईक माजं.. नगं की जाव.”

कृष्णाने खुंटीला अडकवलेली चावी घेतली आणि बाहेरची पावसाळी बूटं घालत थोडासा हसून बोलला,
“आई, नको जीव वरखाली करू. येतो लगेच.. तू झोपून जा.”


“वसंत तू रस्त्यावर थांब, मी बाईक काढतो.” असं बोलून कृष्णा मागच्या पडवीत गेला आणि मागच्या बाजूने रस्त्यावर जाऊन वसंतला सोबत घेऊन दोघेही बाईकच्या प्रकाशात पाण्यातून वाट काढत पळस गावातून निघाले.


थोड्यावेळातच पाऊस थकल्यासारखा ओसरला. कृष्णा आंबेगावात पोहोचला तेव्हा पावसाची सर जरा उघडल्या सारखी वाटल्याने वसंत घाई करत बोलला,
“मास्तर ऽ, दोघं बी थांबलो तं दोघं बी आडकू.. मी यक काम करतो. आजची रात मी हितंच ऱ्हातो. तुम्ही लगीच निघा.”

कृष्णा बाईक स्टॅन्डला लावत हसून बोलला,
“त्याला काय होतंय. आबांच जेवणं झाल्यावर निघू की दोघंपण.”

वसंत हात जोडत कृतज्ञतेने बोलला,
“मास्तर ऽ, यक शबूद टाकला आनि तुम्ही लगीच गाडीच काढलीव. तुमचं डोंगरायवढं उपकार झालं बघा पन आईका माजं. आवं आकरा वाजत आल्या..यवढ्या रातच्याला तुम्हाला एकट्याला जा म्हनताना मला बराबर वाटत न्हाय पन तुमची बी बायकापोरं तुमची वाट बघत आसतील. पाऊस उघाडलाय ता निगा की तुम्ही.”


त्याचा हात खाली करत कृष्णा घरच्या ओढीने हसून बोलला,
“बरं निघतो आता.. काही वाटलं तरं मला मेसेज टाक नाही तर आईच्या फोनवर फोन कर. तिच्या फोनला चोवीस तास रेंज असते."

“व्हय. निघा आता बिगीनं.” वसंत पुन्हा चालू झालेली रिमझिम बघून जरासा घाई करत बोलला.


“बरं… येतो चल.” कृष्णा हसतच माघारी फिरला. अंधारामुळे तो लगेचच दिसायचा बंद झाल्यावर वसंत हॉस्पिटलमध्ये गेला. बघता बघता रिमझिम जोराच्या सरीत रूपांतर झाली आणि हेल्मटमुळे कृष्णाला समोरचं काहीच दिसेनासं झालं. त्याने लगेचच बाईक शाळेच्या आडोशाला थांबवली आणि स्वतः ही शाळेच्या वऱ्हांड्यावर थांबला. 

शाळेच्या पत्र्यामुळे सरींचा आवाज अगदी भीतीदायक येत होता जणू एखाद्या राक्षसाची गर्जनाच! या वेळेपर्यंत आजूबाजूच्या घरातले देखील सर्वांचेच दिवे गेलेले त्यामुळे दुपारी गजबजलेलं ठिकाण असणारी जागा आता भकास आणि भयंकर वाटत होती. नेहमीसारखी एवढ्या वादळवाऱ्यात कुठेतरी तार तुटून रस्त्यावरचे दिवे नेहमीसारखेच गेलेले. कृष्णा पाऊस उघडण्याची वाट पाहत सहजच वऱ्हांड्याच्या एका कोपऱ्यात आला आणि त्याला कोणीतरी डोकावून पाहिल्याचा भास झाला.

गर्द अंधारात सुद्धा त्याच्या नजरेने कोणाची तरी सावली पाहिली आणि तो ओघानेच ओरडला,
“कोण आहे?”

पावसाच्या सरींमुळे त्याच्या आवाजाला मर्यादा आली  पण तो लगेचच वऱ्हांड्यातून खाली उतरला आणि वेगाने शाळेच्या मागे निघाला. शाळेच्या मागे तर डोळ्यात बोट घालून सुद्धा दिसणार नाही इतका काळोख! झाडांच्या पानांवर आणि शाळेच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे एक विचित्र असा नाद त्या वातावरणात घुमत होता मधूनच आकाशात विजा कडकडत होत्या. वातावरणाने खूप भयंकर रूप धारण केलेलं जसं की ते आभाळ कोणासाठी तरी रडत होतं.

शाळेच्या मागे आल्यावर वळचणीच्या अंगावर पडणाऱ्या पाण्याची तमा न करता कृष्णा त्या अंधारातच ती सावली शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि ….  आणि ती सावली त्याला दिसली. त्या भयंकर वादळ वाऱ्यात सुद्धा कृष्णाच्या कानांनी बारीकसा बांगड्यांचा आवाज ऐकला आणि समोर कोणीतरी स्त्री आहे, या कल्पनेनेच स्तब्ध झाला.

जोरदार कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, सैरावैरा धावणारा वारा, चिर्र काळोख अशा वातावरणात गावच्या ठिकाणी कोणी स्त्री अशी अंधारात
लपलेली……

कृष्णा त्या अंधारात दिसणाऱ्या तिच्या आकृतीकडे बघत स्थिर आवाजात बोलला,
“घाबरू नका. मी पळसगावचा कृष्णा मास्तर आहे.”

सर तशीच जोरात कोसळत होती. ती अंधारातील सावली कृष्णाला उगाचच हलल्यासारखी वाटली; कदाचित जवळ आली असावी. शेजारच्याच डोंगरावर जोरात वीज कोसळली आणि लख्ख प्रकाशात बोचकं उराशी कवटाळलेली, डोळ्यांत पाणी असलेली ती दिसताच कृष्णाच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तो आश्चर्याने अस्पष्ट पुटपुटला,
“यती?”

उर्वरित भाग पुढे...

© प्रियांका सुभा कस्तुरी
२८/०६/२०२४

............


(तब्येतीच्या कारणाने भाग यायला वेळ लागला. किती वेळा तुम्हाला सॉरी बोलू आता मलाच कसं तरी वाटतं. अजून खूप काही लिहायचं आहे.. बरंच काही फुलायचं आहे, अशावेळीच नेमकं लिहायला जमत नाहीये... असो, लॉन्ग ब्रेक घेण्यापेक्षा हेही नसे थोडके!

भेटू लवकरच!)


🎭 Series Post

View all