पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१८५

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१८५


कृष्णा त्या अंधारात दिसणाऱ्या तिच्या आकृतीकडे बघत स्थिर आवाजात बोलला,
“घाबरू नका. मी पळसगावचा कृष्णा मास्तर….”


सर तशीच जोरात कोसळत होती. ती अंधारातील सावली कृष्णाला उगाचच हलल्यासारखी वाटली; कदाचित जवळ आली असावी. शेजारच्याच डोंगरावर जोरात वीज कोसळली आणि लख्ख प्रकाशात बोचकं उराशी कवटाळलेली, डोळ्यांत पाणी असलेली ती दिसताच कृष्णाच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तो आश्चर्याने अस्पष्ट बोलला,
“यती?”

वळचणीच्या आधाराने पुढे सरकत त्याला पाहून भाऊक झालेली ती रडविल्या आवाजात बोलली,
“कृष्णादा तुम्ही हितं कसं?”


कृष्णाने आश्चर्याने तिलाच उलट प्रश्न केला,
“यती तू इथं कशी? काय करतेस इथं?”


त्याला पाहून भाऊक झालेली यती त्याच्या प्रश्नाने भानावर येत पुन्हा कठोर होत आपलं कपड्यांचं बोचकं उराशी कवटाळत रुक्षपणे बोलली,
“यतीने पिंजऱ्यांतून निघाली कृष्णादा.. कायमची!”


“यती?”
तिच्या बोलण्यातील निर्धार पाहून कृष्णाला पुढे काय बोलावं हे कळलंच नाही. तो आपला गोंधळ लपवत तिला पोटतिडकीने समजावत बोलला,
"यती? इतका टोकाचा निर्णय नको घेऊ नकोस..  हवं तरं मी तुला सुखरूप घरी पोहचवतो आणि तुझी जबाबदारी ही......"


“घर? कुठलं घर?
त्याला पुढे बोलू न देताच यतीचा धारदार आवाज आला.


ती संतापलेल्या आवाजात बोलली,
"यतीने घराचा उंबरठा ओलांडला तेव्हाच ती त्यांच्यासाठी मेली. तुम्ही आज मला घेऊन जाल पण उद्या पुन्हा तुम्हाला माझ्या मातीसाठी यावं लागेल. पाटलांच्या फुकटच्या इज्जतीसाठी मरण पत्करायला यती रस्त्यावर पडलेली नाही.
आता अशी पन मेली आणि तशी पन मेली त्यामुळे यती आता मागे हटनार नाही."


कृष्णाला गेल्या वर्षी मावस बहिणीच्या लग्नात भेटलेली यती आठवली. हसरी धमाल करणारी त्याच्यासारखेच बिनधास्त, बेडर पण त्यानंतर तिची भेट झाली ती आत्ता.  या मधल्या काळात काय झालं याची त्याला कल्पनाच नव्हती आणि आत्ता तिला काही विचारण्याची वेळ देखील नव्हती.


त्याच्यासमोर एकोणीस-वीस वर्षांची यती होती. जी स्वतःचा रस्ता शोधायला बाहेर पडलेली. जगण्याची धडपड करण्यासाठी बाहेर पडलेली. तिच्या काळजीने कृष्णा ओठांत पुटपुटला,
“यती….”

त्याच्या आवाजातील कणव ओळखून यती हात जोडत बोलली,
“दादा, उपकार करा आणि पुन्हा घरी जायला सांगू नका. तुमचा शब्द मोडल्याचं जिव्हारी लागंल माझ्या.”

वळणवळणाच्या दूरच्या घाटातून गाडीची लाईट पाहून यतीची घालमेल झाली आणि ती गडबडीत बोलली,
“तुम्ही निघा दादा.. आणि यती भेटलेली हे विसरा.”

कृष्णा दूरवर दिसणाऱ्या एसटीच्या लाईटकडे बघत अस्वस्थपणे बोलला,
“ही शेवटची मुंबई गाडी आहे काय?”


यती त्या टेकडीवरचं लुकलुक करणाऱ्या गाडीच्या प्रकाशाकडे बघत विनवणी करत बोलली,
“व्हयं पण यती कुठं गेले हे कुनाला सांगू नका…”


कृष्णा क्षणात कठोर होत बोलला,
“पुढचा सगळा विचार केलायंस काय?”


यती दुःखाने, रागाने, तिच्यात लपलेल्या धगीने बोलली,
“जे व्हैल ते व्हैल पन यती मानूस म्हनून जगन्याचा अधिकार मिळवणार आनि जगून दाखवनार!”


त्या अंधारात दोघांचेही चेहरे एकमेकांना दिसत नव्हते. बोलण्याचे स्वर त्यांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवत होते. वीस वर्षांची यती जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी धडपडत होती.

शाळेच्या पत्र्याखाली उभा राहिल्यामुळे वळचणीचं पाणी डोक्यावर पडून अंगावर रेनकोट असून सुद्धा कृष्णा ओलाचिंब झालेला; तरीही त्याच्या डोळ्यांच्या कडा उष्ण पाण्याने नव्याने ओल्या झाल्या. तो तसाच कठोरपणे बोलला,
“मला शब्द दे यती.. पोटात भुकेने कितीही खड्डा पडला, इकडची दुनिया तिकडे झाली तरीही तू तुला लाज वाटेल असं काहीच करणार नाहीस.”


आकाशात पुन्हा वीज कडाडली. जवळच कुठेतरी पडली असावी. त्या लखलखत्या प्रकाशात यतीचा तेजस्वी पण वेदनेने भरलेला चेहरा कृष्णाच्या नजरेस पडला. ती वळचणीची ओंजळ हातात घेऊन कठोरपणे बोलली,
“यतीचा शब्द आहे कृष्णादा, यती पानी पिऊन जगेल पन कोनाफुडं झुकनार नाही. अख्ख्या जिंदगीत स्वतःचीच लाज वाटेल असं कधीच वागणार नाही.”


ते दोघे बोलतच होते की दोघांनाही शाळेच्या पुढून जाणाऱ्या रस्त्यावर दुरूनच बॅटरीचा झोत फेकल्यासारखा दिसला तशी यती बोचक उराशी कवटाळून प्रचंड रागात बोलली,
“पाटलांची कुत्री आली बघा पन त्यांच्याच काय… त्यांच्या बापाच्या हाती सुद्धा लागणार नाही ही यती.”


यती ते वळचणीचं पाणी हातात घेऊन स्वतःच रागाने लालबुंद होत कृष्णा समोर शपथ घेत बोलली,
“कृष्णादा, आज ही यती अंधाराला सोबती करून त्याच्याच साक्षीने त्याच्यासोबत अंधारात गुडूप होतीये पन एक दिवस यती पुन्हा येईल. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मानूस म्हनून जगन्याचा अधिकार मिळवून वाजत गाजत येईल. तेव्हा अख्ख्या आंबेगावला कळेल यती आली.  यती तेव्हा एवढी मोठ्ठी होईल, एवढी मोठ्ठी होईल की आज जी कुत्री माझ्या मागे लागलेत त्यांना हाड म्हनायला सुद्धा माझी मानसं असतील.”


तिच्या शब्दातील प्रखरता, तिचा दृढ निश्चय पाहून कृष्णाच्या डोळ्यांतून उष्ण पाणी गालावर धावलं आणि त्या अंधारातच चाचपडत तिच्या डोक्यावर हात ठेवत तो ओठांत आवंढा गिळत बोलला,
“तथास्तु! असंच होवो! तू इतकी मोठी हो, की तुझ्याकडे पाहताना मला मान वर करावी लागेल.”

त्याच्या बोलण्याने यती सुद्धा भाऊक झाली, किती वर्षांनी कोणीतरी तिला इतक्या मनापासून आशीर्वाद दिलेला. ती क्षणात विरघळली आणि वयानुरूप लहान असल्यासारखी बोलली,
“कृष्णादा, लाजवू नका.. तुमच्याकडे बघूनच मी मोठी झालीये. पाय जमिनीत खोलवर रोवल्याशिवाय आकाशाला हात टेकवता येत नाहीत हे तुमच्याकडे बघूनच शिकतीये.”


कृष्णा थोडा शाळेच्या भिंतीच्या आडोशाला सरकला आणि खिशातून आपलं पाकीट बाहेर काढून हाताने  अंदाजे असतील नसतील एवढे रुपये हातात घेऊन अंधारातच यतीचा हात चाचपडत तिच्या हातावर तो पैसे ठेवत बोलला,
“हे थोडे पैसे आहेत..  असू दे तुझ्या जवळ.”


यती आपला हात मागे घेत स्वाभिमानाने बोलली,
“नाही नको दा….”

कृष्णा पुन्हा तिचा हात चाचपड तिच्या हातात जबरदस्तीने पैसे ठेवत अधिकाराने बोलला,
“घे म्हटलं की घ्यायचं, कळलं काय?”


त्याचा आवाज चढल्यावर यतीने हाताची मूठ आवळली आणि कृष्णा मायेने बोलला,
“असं समज लहानपणी राखी बांधलेल्याची आता ओवाळणी दिली… आणि मास्तराच्या पाकिटात असून असून असणार किती? हजार दीड हजार असतील पण असू दे तुझ्या जवळ.”


या क्षणी हे हजार दीड हजार तिच्यासाठी लाखभर रुपयांसारखे होते. तिने अंधारातच त्या पैशांची गोळी करून मानेखाली सुरक्षित जागी सारली आणि जवळ येणाऱ्या त्या बॅटरींच्या झोताकडे बघून ती त्या अंधारातच दिसत नसून सुद्धा कृष्णा समोर हात जोडून बोलली,
“कृष्णादा, यतीने आजवर कुनासमोर हात जोडले नाहीत पण तुमच्या समोर जोडते. यसटी जरं चुकली तरं यती संपेल.  तुम्ही त्या माणसांना एसटी यायच्या आधीच आवराल का? लय उपकार होतील बघा.”


एसटीने घाट उतरलेला दिसत होता म्हणजे एसटी पाच सात मिनिटांत इथे पोहोचणार होती पण जर ती माणसे ही इथेच असतील तरं? कृष्णा लगेचच तिचा निरोप घेतला
“मी बघतो काय ते. काळजी घे आणि….”

“आणि काय?”


कृष्णा निघण्याआधी त्या बरसणाऱ्या पावसात, काळ्याकुट्ट अंधारात चेहरा ही न दिसणाऱ्या यतीकडे पाहण्याचा प्रयत्न करत कठोरपणे बोलला,
“तुझ्या आत जी ठिणगी आहे ती तशीच राहू दे. काही झालं तरी तिला विझू देऊ नको. छोट्याश्या गावातून जातीयेस याचा न्यूनगंड मनात कधीच बाळगू नको. एवढं मोठं वादळ पेलून तू जातीयेस याचा अर्थ तू स्वतःच सळसळती वीज आहेस यती फक्त काही झालं तरी हार मानू नको. सखींचा कृष्णा नेहमी तुझ्या सोबत असेल.. येतो.”


कृष्णा तिच्या बोलण्याची वाट न पाहताच वेगाने त्या काळोखातून माघारी फिरून पाऊले उचलू लागला.  त्याच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा ओल्या झालेल्या. तो चालता चालता स्वतःशीच बडबडला,
“आयुष्यात काही चांगली कर्म केली असतील तरी कुठल्यातरी वळणावर पुन्हा भेटू..  काळजी घे.”


डोळे कोरडे करून त्याने बाईक चालू केली आणि संथपणे निघाला. वरच्या बाजूलाच दोन-तीन बॅटरी वाली माणसे छत्र्या घेऊन आपापसात बोलत  रस्त्याने खाली येत होती. त्यांच्या जवळ बाईक गेल्यावर कृष्णाच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर बॅटरी मारली गेली आणि कृष्णा बाईक जागीच थांबून चेहऱ्यावर हात पकडत जरा रागेच बोलला,
“कोण आहे रे… ?”

“आरं ह्यं मास्तर हायेत बेन्या…”
त्यांच्यातील एक जण कृष्णाकडे वेगाने पाऊल उचलत बोलला,
“मास्तर ऽ तुम्ही हिकडं कुठं?”


कृष्णा बाईक एका बाजूला घेत काहीच झालं नसल्यासारखा शांतपणे बोलला,
“काही नाही दवाखान्यात आलेलो पण तुम्ही एवढ्या पावसात कुठं जाताय?”

तोपर्यंत ते तिघे सुद्धा तिथे आलेले. चौघांनीही एकमेकांकडे पाहिलं पण बोललं कोणीच काही नाही कारण प्रश्न त्यांच्या इज्जतीचा होता.

त्यातीलच दुसऱ्याने जरा दबकून विचारलं,
“मास्तर हितनं कुनाला लपून छपून जाताना बघितलंव का?”

कृष्णाला हवा असलेला प्रश्न आल्यामुळे तो उगाचच आठवल्यासारखा करत बोलला,
“हो ऽ हो ऽ …  पाहिलेलं.”

तसे ते चौघेही एकदमच ओरडले,
“कुठं?”

कृष्णा वरच्या टेकडीकडे हात करत बोलला,
“मघाशी येत होतो तेव्हा चालू मध्येच घाटा जवळ कोणीतरी बोचकं घेऊन जाताना दिसली. पाऊस पडत होता म्हणून मी लक्ष दिलं नाही. कोण होती?”

“नक्की बघितलं ना?”
दुसऱ्याने उत्स्फूर्तपणे घाईत विचारलं.

कृष्णा त्यांच्या उडालेल्या चेहऱ्यांचा रंग बघत तसाच रंगवून सांगत बोलला,
“व्हयं तरं.. मी तरं बाईक थांबवून विचारणार होतो पण दवाखान्यात यायला उशीर होत होता म्हणून घाईत आलो.”


“यतो मास्तर ऽ… च्हला रं….”
एकाने उडता उडता निरोप घेतला आणि चौघेही वेगाने चालत नंतर हळूहळू रस्त्याने धावायला लागले.


कृष्णा तिथेच उभा होता. दोघेजण बॅटरी घेऊन तसेच पुढे गेले, नंतरचे दोघेजण बाईक घेऊन त्यांच्या पाठोपाठ निघाले. त्यांच्याकडे पाहताना त्यांच्या समोरूनच मुंबईची एस टी कृष्णालाही क्रॉस करून निघून गेली. कृष्णाने मागे एसटीकडे पाहिलं पण  पुढच्या घरांमुळे एसटी नजरेआड झाली. काही क्षणांमध्येच लाल परी थांबलेल्याचा आवाज त्या पावसाला चिरून कृष्णापर्यंत पोहोचला आणि कृष्णाने मोकळा श्वास सोडला.

आपोआपच कृष्णाचे हात जोडले गेले आणि तो यतीसाठी प्रार्थना करत बोलला,
“सखींच्या कृष्णा, चिमणी उडाली आकाशी, तुझे आशीर्वाद असू दे तिजं पाशी.. सखींची काळजी घ्यायला आता मी आहे पण यती आता एकटी आहे.   तिचा ‘तो सखा' तिच्या आयुष्यात येईपर्यंत तू फक्त तिच्या सोबत रहा.”

  ती लाल परी खळखळ आवाज करत निघून गेली. रात्रीचे बारा वाजायला आलेले. पाऊस कोसळतच होता. विजा कडकडत होत्या. वाऱ्याचा सुळसुळाट चालूच होता अशा वातावरणात कृष्णा विषण्ण मनःस्थितीत घरी जायला निघाला. 


वादळवारे-पाऊस-काळोख यामुळे कृष्णाला घरी जायला जवळपास एक वाजला. बाईक दारातच लावून त्याने नेहमीसारखी दरवाजाची एक फळी बाहेरून उचलून बोटाने आतली कडी काढली आणि दरवाजा उघडला तरं समोर सखी खाटेवर हाताची घडी घालून आणि सोनाई अंथरुणावर भिंतीला टेकून बसलेली.


कृष्णाला पाहतच दोघींच्याही जीवात जीव आला.
त्याने ओला रेनकोट बाहेर खिळ्याला अडकवला आणि सॅंडल उतरवू लागला. रेनकोट असून सुद्धा त्याला ओला चिंब झालेला पाहून काळजीने सखीला रडू आलं तर त्याची वाट पाहून पाहून वैतागलेली सोनाई त्याला ओरडली,

“यक वाजल्या यक… घड्याळ कळतं का तुला? फरशीवनं पानी गेलंय. हिकडं काळजीनं आमचा जीव नुसता जात व्हता आनि तुला दुनियची पडले व्हयं?
आर सवताचा न्हाय तं आमचा तरी इचार करत जा.. तुला काय झालं तं कुनाकडं बगायचं आम्ही? आता काय पैल्यासारखा मोकळा हायेस व्हयं? सवताचा न्हाय तं बायकापोरांचा तरी इचार कर की जरा."


सोनाई ओरडून सुद्धा कृष्णा काहीच बोललं नाही. तो ओल्या कपड्यांनी आपल्या खोलीत गेला. इतक्या बेभान पावसात कृष्णाला इतक्या उशिरा आलेला आणि इतका भिजलेला पाहून सोनाई वसंतवर भडकली,  
“वशाला यिवदेच आता.. बरुबरच करते मुडद्याला.. तोंड उचलून कवा बी घरी यत्यात... त्यांना ना काळ ना यळ.”

‘यती एसटीत बसली असेल ना? तिला एसटी भेटली असेल ना? तिला दुसऱ्या कोणी पाहिलं नसेल ना? आपण पुन्हा जाऊन एकदा डोळ्यांनी पाहायला पाहिजे होतं.’ कृष्णा ओली कपडे अंगावेगळी करताना यतीच्याच विचारांत होता आणि बाहेर सोनाईचं तोंड चालूच होतं,

“तूच कर्नाचा आवतार म्हनल्याव त्यांना तरी बुलून काय फायदा… धा यळा सांगीतलंय तुला किशना यकटा न्हाईस माग पोरंबाळ हायंत.. पन न्हाय…
तुजं यंर माज्या मागल्या चालूच आसंत.”


सोनाई कृष्णाला बडबडत होती पण आज सखी देखील मध्ये पडले नाही कारण त्याच्या काळजीने तिचाही जीव नुसता टांगणीला लागलेला. तो हातात ओली कपडे घेऊन बाहेर आलेला दिसताच सखीने काही न बोलताच पुढे होऊन त्याच्या हातातून कपडे घेतली आणि स्वयंपाकघरातल्या न्हाणीघरामधील बादलीत टाकून पुन्हा ओटीवर आली तेव्हा सोनाई अंथरुणात अंगावर गोधडी घेऊन बसलेली. सखी येताच सोनाई अंथरुणावर पडून गोधडी अंगावर घेऊन बोलली,
“लाईट घालव आनि जा.. तू बी पड.”


“हम्म…”
सखी उगाच हसली आणि ओटीवरचा दिवा घालून आपल्या खोलीत आल्यावर तिने नेहमीसारखा दरवाजा ढकलला. कृष्णा उघडलेल्या खिडकीजवळ उभा होता. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस चालू होता, तशीच हवा आपलं अस्तित्व दाखवत होती.  या अशा पावसात…  या अशा काळोखात त्याची वाट पाहताना काळजीने सखीचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.


फरशीवरून पाणी तरं संध्याकाळीच गेलेलं. अंधारात त्या पाण्याचा त्याला अंदाज आला नाही तरं? बाईकला पाणी ऐकलं नाही तरं? तिथेच बाईक स्लीप झाली तर? या ‘तर’ ने तिचा जीव चांगलाच पोखरलेला पण सोनाई समोर ती आतल्याआत झुरत राहिली. आता त्याला समोर पाहून ती त्याच्याजवळ जात थोडी हळू आवाजात पण रागात बोलली,
“आई काहीही चुकीचं बोलत नाहीत क्रिष्ण्. तुम्हाला तरं रागावलंच पाहिजे आणि खूप खूप रागावलं पाहिजे.”


सोनाईची बडबड सवयीची झालेल्या त्याच्या कानांना सखीचे रागीट बोल लगेच समजले आणि तो
यतीच्या विचारांतून बाहेर डोकावत अविश्वासाने बोलला,
“काय?”

सखी त्याच्या समोर उभी राहून नजरेला नजर देऊन तिला झालेला मनःस्ताप बाहेर काढत त्याच्यावर रागावत बोलली,
“मदत करणार म्हणजे कधीही करणार का? वेळकाळ बघायला हवी का नको? या कोसळणाऱ्या पावसात आम्ही कुठं शोधायचं होतं तुम्हाला? पुढे गेल्यावर मागच्यांचा काही विचारंच नसतो का?”

त्याच्या काळजीने त्यालाच पहिल्यांदा इतक्या हक्काने रागावणाऱ्या सखीला पाहून त्याचं अस्वस्थ मन कुठेतरी शांत झालं आणि तो किंचित गालात हसला. ती इतकी रागावलेली असताना तो हसल्यावर सखी अजूनच रागावली,
“तुम्ही हसताय?”

तो आत्तासा शांतपणे बोलला,
“मी तुमच्या समोर आहे सखी.”

सखी पुन्हा रागावली
“हा मग? आत्ता आला समोर.. मागचे दोन अडीच तास काय करायचं होतं मी?....” आणि बोलता बोलता विजेच्या कडकडण्याने ती कानावर हात ठेऊन बोलली,
“मघापासून या विजा अशा किंचाळतायेत नुसत्या, ऐकताना सुद्धा भीती वाटते मग अशा वातावरणात तुमची काळजी नाही का वाटणार?”


घरात सुरक्षित वातावरणात असून देखील विजेच्या आवाजाला घाबरणाऱ्या सखीला पाहताना त्याला  त्या चिर्र काळोखात विजेलाही डोळे वटारून पाहणारी विजेसारखीच तळपणारी यती आठवली. दोन्ही स्त्रिया तितक्याच नाजूक पण दोघीही परस्पर भिन्न!


यतीच्या विचाराने त्याचं मन पुन्हा उदास झालं. खोलीतील प्रकाशामुळे बाहेरील दिसणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबांकडे पाहत तो उदासपणे बोलला,
“आज हा वाढीव कोसळतोय.”

“मग आम्हीही तेच बोलतोय ना…”
सखी तिच्या बोलण्याच्या ओघात त्याच सुरात मध्ये बोलली.

दूर आकाशात चमकलेल्या  विजेकडे पाहताना तो पुन्हा तसाच गंभीरपणे बोलला,
“ती ही अशीच आहे विजेसारखी! कदाचित त्यामुळेच तिला कोणी बांधून ठेवू शकत नाही.”

सखीचे कान लगेच टवकारले. तिने पुढच्या क्षणी विचारलं
“कोण ती?”

तो दूरवर चमकणाऱ्या विजांकडे पाहत स्थिर आवाजात बोलला,
“यती.”

“कोण यती?”
सखीच्या मनात क्षणात कितीतरी विचार येऊन गेले. त्याच्या दुःखी चेहऱ्याकडे पाहताना उगाचच बायको सारखी पहिलीच शंका डोकावली,
‘पहिली प्रेयसी?’ लगेच तिचंच उत्तर तयार होतं,
‘नाही. त्या तरं आरतीताई होत्या.. मग कोण?’
कृष्णा उत्तर देईपर्यंत यतीचं कौतुक ऐकल्यामुळे सखीचं कुतुहल खूप वाढलेलं.


कृष्णा त्या काळोखात दूरवरच्या काळोखाकडे पाहत बोलला,
“बारक्या मामाची मुलगी.”

कृष्णाला दोन मामा आहेत हे सखीला आत्ताच कळलं. तिने आश्चर्याने विचारलं,
“म्हणजे आईंची सख्खी भाची?”

कृष्णा मोकळा श्वास सोडत हुंकारला,
“हम्म ऽ….” पण त्यापुढे तो त्या मामा-मामी बद्दल काही बोलला नाही मग सखीने हे काही विचारलं नाही पण यतीबद्दल तिच्या मनात कुतूहल होतंच आणि ते बाहेर आलं,
“तिचं काय?”

ती भेटली काय आणि काही क्षणांच्या अंतराने त्याचा नजरेसमोरून कायमची निघून गेली काय.. कृष्णा संथपणे बाहेरची नजर सखीकडे आणत बोलला,
“गेली ती..  मला सांगून गेली. आपलाच नवीन रस्ता शोधायला पिंजरा तोडून गेली.”


एक स्त्री म्हणून सखीला न पाहिलेल्या यतीबद्दल वाईट वाटलं आणि तितकंच तिचं कौतुक सुद्धा वाटलं. सखी थोडीशी कौतुकानेच बोलली,
“फार धाडसी आहे ना ती?”


कृष्णा किंचित हसत बोलला,
“भाची मावळणीसारखी असते असे बोलतात. तिला पाहिलं तर तुम्हाला वाटेल ती माझी बहीणच आहे इतकी आई सारखी दिसते. स्वभावाला ही तिच्यासारखीच! निर्भीड आणि जिद्दी!”


तो बोलता बोलताच अचानक बोलला,
“सखी, माझ्यासाठी एक कराल?”

“विचारताय काय? सांगा ना, काय करू?”
सखी थोडीशी हसली.

कृष्णा तिचा हात हातात घेऊन बोलला,
“तुमच्या त्या सख्याला सांगाल काय यती एकटी आहे.. तिच्या सोबत राहा.. तिची काळजी घे.”

सखी थोडीशी हसून बोलली,
“तुम्ही सांगितलं तरी ऐकेल की तो..”

कृष्णा थोडीशी मान हलवत ठेक्यात बोलला,
“मी सांगीतलंय पण मला माहितीये तो तुमचंच ऐकतो.”

सखी हसली,
“बरं.”

तिचा थंडगार हात हातात आल्यावर कृष्णाचं आत्तासं तिच्याकडे लक्ष गेलं. मघाशी स्वेटर स्कार्फ गुंडाळलेली सखी आता थंडीने कुडकुडत त्याच्यासमोर उभी होती. कृष्णाने इकडे तिकडे पाहिलं तरं पलंगावर तिचा स्वेटर आणि स्कार्फ निवांत पडले होते. कृष्णा नवल करत बोलला,
“थंडी वाजतीये तरं स्वेटर का काढलाय?”


सखी हाताची घडी घालून खिडकीतून येणाऱ्या हवेने अजूनच कुडकुडत बोलली,
“तुम्ही बाहेर पावसात भिजायचं आणि मी घरात बसून स्वेटर घालायचा? हे काय बरोबर नाही.”


कृष्णा कपाळावर हात मारत बोलला,
“जा आधी स्वेटर घाला.”


सखी खिडकीकडे मान फिरवत खिडकीच्या बाहेर बघत थोडीशी हट्टाने बोलली,
“नको मला.”

“काय?’
त्याला तिचं वागणं थोडं विचित्रच वाटलं अगदी पहिल्यासारख!


तो तिच्या काळजीने किंचित वैतागून बोलला,
“तुम्ही आधी स्वेटर घालताय काय.”


सखी हाताची घडी घालूनच खिडकीच्या बाहेर बघत एवढुसा चेहरा करून बोलली,
“आज पहिली वेळ होती म्हणून ठीक आहे पण तुम्ही जर पुन्हा असे रात्री अपरात्री बाहेर निघाला तरं मी नाही जाऊ देणार तुम्हाला.”


त्या वैतागत सुद्धा कृष्णाच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. त्याने गालात हसत विचारलं,
“काय कारण?”

सखीने ती नाराजीची नजर संथपणे त्याच्यावर आणली आणि अजूनच चेहरा बारीक करून आपली नाराजगी दाखवत बोलली,
“काय कारण म्हणजे? आम्ही माणसं नाही का? आम्हाला काळजी वाटतच नाही का?”


कृष्णा आपसुकच थोडासा हसला आणि सखी पुन्हा त्याच्या हसण्यावर हक्काने रागावत अगदी बायको सारखी बोलली,
“हसू नका तुम्ही..  मी आधीच सांगून ठेवतीये, इथून पुढे असं रात्री अपरात्री मी नाही बाहेर पाठवणार तुम्हाला.”

सोनाईच्या रागावण्याला दुर्लक्षित करणाऱ्या कृष्णावर सखीच्या गोड धमकीचा मात्र लगेच परिणाम झाला.

तिच्या गोड प्रेमळ धमकीत सुद्धा किती हक्क होता.. अधिकार होता. त्याचं मघासंच सगळं टेन्शन तिच्या सहवासात असं विरघळू लागलं आणि कृष्णा पुन्हा तिच्या धुंदीत नेहमीसारखा गालात हसत बोलला,
“आणि तरीही मी निघालो तरं?”

“पकडून ठेवेन तुम्हाला.”
सखी हाताची घडी आवळत थंडीने कुडकुडत हट्टीपणे बोलली.


तिची चिमणीची ताकद पाहता कृष्णा खुदकन हसला. त्याच्या सावळ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आपसूकच सखीच्या चेहऱ्यावर ही हसू आलं. ती हसत बोलली,
“हसला तरीही नाही पाठवणार.”

तिचा आत्मविश्वास पाहून कृष्णा पुन्हा ओठ रुंदावत हसला पण काही क्षणांतच तिचा थंडीने गारठलेला देह पाहताना तो हसणं विसरला. यतीच्या विचारांत हरवल्यामुळे ती समोर असूनही तसं थोडसं तिच्याकडे त्याचं दुर्लक्षच झालं.

तिची आधीच नाजूक काया तिने अंग चोरल्याने त्याला अजूनच बारीक वाटली‌. मुंबईमध्ये लहानाची मोठी झालेल्या सखीला गावची थंडी जडच जाणार, याची त्याला ही कल्पना होती पण तिच्या नाजूक देहाला ही थंडी मानवेल का? याची ही त्याला काळजी वाटली.


तिला वाजणाऱ्या थंडीला औषध काय करावं? कृष्णाला प्रश्न पडला आणि तो तिचा हातात असलेला थंड हात प्रेमाने गोंजारत काळजी करत बोलला,
“आता ही थंडी कशी निघायची बरं? चुलीतील विस्तव सुद्धा संपला असेल. आजारी बिजारी पडला तरं?”

ओल्या मिठीचे गुज
कोण सांगेल तयास?
तुझ्या मिठीची ऊब पुरेशी,
तिच्या कुडकडणाऱ्या देहास!


खिडकीतून आलेल्या थंड हवेने सखीचे दात एकमेकांवर आपटले आणि शरीरावर सरसरून आलेला काटा कसातरी सहन करत ती थरथरत बोलली,
“थंडीत माझं काही खरं नाही.. थंडी अजिबातच सहन होत नाहीये.”


त्याने प्रेमपूर्वक काळजीने तिच्याकडे पाहिलं आणि सखी थंडी सहन न झाल्याने ओठांत पुटपुटली,
‘कृष्णा ऽ ऽ, तू असं रे सोबत!’


… त्याच क्षणी विजेचा जोराचा कडकडाट झाला आणि त्या कर्णकर्कश आवाजाला घाबरून सखी कृष्णाला बिलगत पुटपुटली,
“क्रिष्ण……..”


ती मिठीत आल्याबरोबर तिला आपल्या बाहू पाशात बंदिस्त करून कृष्णा लगेचच तिच्या डोक्यावरून हात फिरवत काळजीने बोलला,
“मी आहे सखी.. घाबरू नका.”


काही क्षण विजेच्या लखलखाटासह तो कडाडणारा आवाज तिकडे आसमंतात घुमत राहिला आणि इकडे तिच्या कुडकुडणाऱ्या देहाला त्याच्या देहाची ऊबदार ऊब मिळताच सखी हळूहळू त्या ऊबेच्या मोहात पडली. ती स्वतःच त्याला घट्ट बिलगली.


मिठीत ओल्या तुझ्या
खट्याळ अबोल खुणा
कसं सावरावे सांग जरा
विरघळते मी क्षणोक्षणा


काही क्षणांतच थंडीने होणारी तिची थरथर थांबलेली. तिच्यासाठी त्याच्या मिठीची ऊब, जगातील कोणत्याच…. कोणत्याच महागड्या ब्लैंकेटला येणार नव्हती. हिवाळ्यातील थंडी घालवण्याचं गुपीत ही तिला आत्ताच कळलेलं. ती गालात हसत त्याच्या काळजाची धडधड बावरलेल्या मनाने ऐकू लागली.


सखी त्याच्या मिठीतील प्रत्येक क्षण जगून घेत होती. ती हरवलेली  त्या क्षणांमध्ये!


विजेच्या कडकडाटासह तो थंड देह मिठीत आल्यावर तिची भीती घालवण्याच्या निमित्ताने पडलेल्या त्याच्या बाहूंचा पाश क्षणाक्षणाने आवळला; अगदीच क्वचित त्याच्या वाट्याला येणारी तिची जादुई मिठी! त्याला ही अगदी हवीहवीशी!


टक…. टक ….टक

काही क्षण गेल्यावर कृष्णा भानावर आला. सखी घाबरून बिलगली पण आपण? त्याच्या जवळ उत्तर नव्हतं त्यामुळे तिच्या पाठीवरचा भारदस्त हात मनात नसतानाही त्याने अलगद काढला. त्याची मिठी सैल झालेली पाहून सखी साखर झोपेतून जागी झाल्यासारखी तिच्या सख्यावर नाराज झाली आणि आज पहिल्यांदाच कृष्णाच्या मिठीच्या मोहापायी ती तिच्या सख्यावर रागावली,
‘कृष्णा अरे असा का वागलास तू? आत्तापर्यंत वीजांचा पाऊस पाडलास आणि आता कुठे मिठीत आले तरं वीजा गायब? हे काय बरोबर नाही केलंस तू.’


त्याचे हात बाजूला झाल्यावर सखीलाही मागे सरणं गरजेचं होतं. ती मिठी, ती ऊब तिच्याच्याने सोडवत नव्हती. मनावर लोखंड ठेवून मनातच तिच्या सख्याला लाडिकपणे रागावून खूप मुश्किलीने सखीने त्याच्या कमरेभोवतीचा हातांचा वेढा सोडला आणि संथ पावलाने मागे आली.


एकामेकांच्या स्पर्शाने बावरलेली दोन मने एकमेकांकडे पाहताना गोड गालात हसली.

त्याच्या पासून बाजूला झाल्यावर खिडकीतून झेपावलेल्या ओल्या हवेने सखीच्या अंगावर पुन्हा सरसरून थंडीचा काटा आला आणि सखी पुन्हा हाताची घडी घालत कुडकुडत तिच्या सख्यावर हक्काने रागावली,


'कृष्णा ऽ, अरे किती मुश्कीलीने मला ऊब मिळालेली.. आणि तू? अजून एक दोन वीजा जास्तीच्या पाडल्या असत्यास तरं काय बिघडलं असतं? जा. आता मीच बोलणार नाही तुझ्याशी.. हूं!’

तिचं ते प्रेमाचं रागावणं त्या सख्याला ही सहन झालं
नसावं त्यामुळेच सखी त्याला मनात रागावत कृष्णा पासून अजून एक पाऊल दूर जाणार इतक्यात पुन्हा कर्णकर्कश ढगांचा गडगडाट होऊन वीज कोसळली तशी मागे आलेली सखी घाबरून क्षणात पुन्हा कृष्णाला बिलगली आणि पुन्हा ती भारदस्त बाहुपाशात कैद झाली, यावेळी मात्र आकाशात उसंत न घेता ढगांचा नाद घुमत राहिला आणि इकडे
तिची आवळलेली मिठी पाहून कृष्णा मान थोडी खाली झुकवून सखीच्या कानात कुजबुजला,
“मी आहे… घाबरू नका…”

सखी त्याच्या मिठीत हरवत अस्पष्ट बोलली,
“भीती वाटतीये….”

तो ही तिची नाजूक काया आपल्यात सामावून घेत क्षणोक्षणाला स्वतःला हरवत पुटपुटला,
“आता?”

सखी डोळे बंद करूनच अगदी जागेपणी त्याच्या बाहूपाशात गालात हसत हुंकारली,
“अं ऽ हं ऽ…” तसा कृष्णा ही गालात हसला आणि हलकेच त्याची हनुवटी तिच्या खांद्याला स्पर्शली तशी सखी अंगभर गोड शहारली.


बाहों के दरमियाॅं... दो प्यार मिल रहे हैं ..
जाने क्या बोले मन,
डोले सुन के बदन.. धडकन बनी जुबाॅं..
बाहों के दरमियाॅं... दो प्यार मिल रहे हैं ..

© प्रियांका सुभा कस्तुरी
२९/०६/२०२४

…….

यती कोण आहे हे कळलं?

पुढच्या स्वतंत्र कथेची नायिका आहे आपली… तिच्या आत्याची म्हणजेच सोनाईची माॅडर्न कलाकृती!
यती कशी वाटली हे ही कळवा..

भाग कसा झालाय.. तब्येत ठीक नसल्याने खूप कष्टाने लिहिलंय.. वरवर वाटत नाही ना…कळवा..

भेटू लवकरच

🎭 Series Post

View all