पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१८६

कृष्ण सखी
कृष्ण सखी-१८६

पावसाळ्याचे दिवस असूनही आज पूर्वेकडे आकाशाने आपला रंग बदललेला. हलक्या लाल पिवळ्या ढगांमधून तो केशरी गोळा खूप दिवसांनी दिमाखात वर वर सरकत होता. आजचं आभाळ सुद्धा निरभ्र वाटत होतं जणूकाही पाऊस कोसळून कोसळून ते काळे ढगे थकून विश्रांतीला गेलेले.


आंघोळ करून आलेली सखी त्या सूर्यनारायणाचे दर्शन दरवाजातूनच घेत चूलीपुढे बसलेल्या सोनाईला प्रसन्न मनाने बोलली,
“आई ऽ आजचा दिवस फार वेगळा वाटतोय ना!”


दिवसाची सुरुवात रोजच्याप्रमाणे झालेली सोनाई न कळून बोलली,
“यगळा म्हंजे?”


सखी ते क्षितिजावरचं सकाळचं प्रसन्न वातावरण पाहून उत्साहात बोलली,
“पहा ना खूप दिवसांनी सकाळी सकाळी इतकं प्रसन्न वाटत आहे. जसं की आज रोजच्यासारखा आज असूनही काहीतरी वेगळं आहे.”


सोनाई चुलीला जाळ फुकत हसत बोलली,
“तुम्ही बया शिकल्याली.. तुम्हाला कशात बी काय बी यगळं दिसतं, यगळं वाटतं. आम्ही जुनी खोडं, आमच्या मेलेल्या नजरला समदं सारखंच.”


नेहमीसारखं कमी शब्दांत खूप काही बोललेल्या सोनाईकडे पाहून सखी हसली आणि अंघोळीला पाणी उतरत सोनाईने तिथूनच कृष्णाला आवाज दिला,
“किशना ऽ, आरं दिस माथ्याव आला की ऽ, उठायचं न्हाय व्हय…”


“हो ऽ ऽ ऽ उठलो ऽ ऽ ऽ….” कृष्णाचा खोलीतून सूर लागला. सोनाई अंघोळीला जाताना सखीला गडबडीत बोलली,
“सकरूबाची भाजी (भारांग्याची रानभाजी) शिजवून पिळून ठेवल्या. भरपूर कांदा घालून परत तवर माजी आंगूळ व्हते.”

“बरं..”

.. पुन्हा न्हाणीघराकडे गेलेल्या सोनाईचा आवाज स्वयंपाकघरापर्यंत आला,
“शिक्याव हाये बग भाजी….”

“हो आई ऽ… “ सखी हसली.


सोनाईच्या हाकेनंतर कृष्णा जागीच उठून बसला. आपलं कंबरडं मोडताना त्याच्या कानांना नेहमीसारखा स्वयंपाकघरातून सोनाई आणि सखीच्या बोलण्याचा आवाज आला. आता त्याच्या कानांनाही त्या दोघींच्या गप्पा ऐकत जागायची सवय झालेली. त्याला कसं प्रसन्न वाटलं. अंगावरची गोधडी बाजूला करून त्यांच्या गप्पांमध्ये नेहमीसारखा डोकावण्यासाठी तो उत्साहातच स्वयंपाकघरात गेला तेव्हा सखी पाठमोरी बाहेरच्या पायरीवर केस विंचारत होती.

तिला पाहताच तो हसत सहजच बोलला,
“सखी ऽ ऽ..”

तिनेही हसतच मागे वळून पाहिलं-
नुकतीच अंघोळ केल्यामुळे कोणताही मेकअप न करता नेहमीपेक्षा जास्तच आकर्षक दिसणारी सखी! त्याच्याकडे पाहताना कधी नव्हे ते आपल्या केसांमधून बोटे फिरवत, एका अनोख्या सालस अदेने गालात हसत त्याच्याकडे पाहणारी सखी!
तिच्याकडे पाहताना सकाळी सकाळीच कृष्णाला अंघोळ न करता ही अगदीच प्रसन्न वाटलं.

आपल्या चारी दिशांना धावलेल्या केसांना एकाच रेषेत आणत, आपल्या केसांवरून हात फिरवत तिच्या सौंदर्याचं आपल्याच तऱ्हेने कौतुक करत कृष्णा हसतच बोलला,
“सकाळी सकाळी काय आहे?”

सखी हसली पण न कळून बोलली,
“म्हणजे?”

कृष्णा तिच्याशी बोलत अगदी दरवाजापर्यंत आला. सखी खालच्या पायरीवरच केसांतून कंगवा फिरवत होती. तो दरवाजाला टेकून तिच्या मुलायम, हलक्या सोनेरी केसांकडे बघत तरं कधी तिच्याकडे पाहत नुकत्याच नहावून आलेल्या सखीचा मंद सुगंध श्वासात भरत तिच्याकडे बघत सकाळी सकाळीच वेगळ्याच मूडमध्ये बोलला,
“काय चाललंय तुमचं?”

सखी केसांची वेणी घालत त्याच्याकडे बघून हसली,
“काय बोलताय तुम्ही मला खरंच कळलं नाही.”

“व्हय काय..” कृष्णा उगाचच छेडत बोलला,
“सकाळी सकाळी इतक्या तयार होऊन कुठे निघाला?”

सखी त्याच्याकडे बघून हसली,
“कुठे म्हणजे? शाळेत .. “

कृष्णा दरवाजाला टेकून तिच्याकडे बघत खोडकरपणे बोलला,
“बरं झालं आम्हाला इतक्या सुंदर बाई नव्हत्या नाहीतर आमचं काही खरं नव्हतं. आम्ही तरं रविवारी पण शाळेत गेलो असतो.”


झालं! सकाळी सकाळी त्याचं खोडकर बोलणं चालू झालं पण सखीला उगाचच लाजल्यासारखं झालं. केसांची वेणी घालून झाल्यावर सुद्धा ती केसांच्या गोंड्यामधून उगाचच कंगवा फिरवत गालात हसत बोलली,
“काहीही!”

इतकी सुरेख, सुंदर दिसणारी सखी आपल्याच वेणी सोबत बोटांचे चाळे करताना हलकीशी लाजताना तरं अधिकच सुंदर दिसली आणि कृष्णाची नजर अजूनच तिच्या मोहात पडली. तो अगदी चौकटीला टेकला आणि तिच्या चढत असलेल्या धुंदीत बोलला,
“सखी ऽ, अशा उठता बसता लाजला तरं आमचं काही खरं नाही बाबा!”


त्याचं नेहमीसारखं सुरात खोडकर बोलणं आलं आणि सखी गालात हसत स्वतःशीच लाजली. त्याचा गोड त्रास हवाहवासा वाटत असून सुद्धा संथपणे त्याच्या नजरेला नजर देऊन सखी लाजरी हसत उगाचच बोलली,
“तुम्ही हल्ली खूप त्रास देता हं क्रिष्ण्…”


तिची नजर काही वेगळं बोलत होती. चेहऱ्यावरचं लाजरं हसू काही वेगळंच सांगत होतं आणि लाजलेल्या ओठांतून काही वेगळंच तेही लाजून येत होतं. कृष्णा गालात हसत बोलला,
“घ्या. आम्ही तुमचं कौतुक करावं आणि तुम्हाला तो त्रास वाटवा? नाजूक माणसं लईच नाजूक..
काय सखी?”

पुन्हा त्याचं तेच बोलणं!

सखी हलक्याशा त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे बघत हसली आणि अंघोळ उरकून लुगडं अंगाभोवती गुंडाळून सोनाई वेगाने, पायरीवर असणाऱ्या सखीला आणि दरवाज्यात उभ्या असलेल्या कृष्णाला दोघांनाही धक्का देऊन स्वयंपाकघरात आली.


वाटेतच गर्दी केल्यामुळे सोनाई दोघांकडेही बघून दोघांनाही ओरडली,
“तुम्हाला बोलायला काय दरवाजाच भेटतो व्हयं? आख्खं घर मोकळं पडलंय की.”


सखी लगेचच अंग काढून घेत बोलली,
“मी तरं केस विंचारत होते आई… गप्पा नव्हते मारत.”


कृष्णा सखीकडे बघूनच बोलला,
“मी तर हवेला उभा राहिलेलो.”


सखी त्याच्याकडे बघून हसली,
“पावसाळ्यात हवा घ्यायला हवेला हीच जागा सापडली का?”


कृष्णा आत बाहेर एकच!
तो बिनधास्त बोलला,
“तुम्ही इथेच होता म्हटल्यावर हीच जागा सापडणार ना?”

त्यावर सखी काय बोलणार!
ती फक्त हसली. कृष्णा ही हसला. त्या दोघांची सकाळी सकाळी चालू झालेली गुटुर गुटुर बघून सोनाई सुद्धा हसली आणि सहजच आपला कासोटा खोचत तिची नजर चुलीकडे गेली.


सोनाई कपाळाला हात लावत सखीला ओरडली,
“म्हाळसा ऽ, चूल इझली की.. भात बग समदा किरवाजला.”

सखी लगेचच आत मध्ये येऊन त्या विझलेल्या चुलीकडे बघत तोंडावर हात ठेवून बोलली,
‘कृष्णा… माझं लक्षच नव्हतं!’

ती तोंड पाडून बोलली,
“सॉरी आई ऽ.”

सखीचं लक्ष का नव्हतं, हे सरळ सरळ दिसत असल्यामुळे सोनाई कृष्णाकडे बघून रागावली,
“तू कशाला सकाळी सकाळी तिच्या मागं मागं करतोयस? तिला काम करून दे की जरा.. शाळेत जायचं न्हाय व्हय?”

कृष्णा खांदे उडवत बोलला,
“ए ऽ आई, माझ्यावर कशाला कावतेस? मी आत्ताच उठलोय. सूनेला रागवायचं सोडून चांगलं चाललंय तुझं..”


सोनाई मान हलवत बडबडली,
“तू म्हायती न्हायस व्हय मला.. दुसऱ्या मानसाला यडा करतोस नुसता.. जा आता तांब्याव पानी घे बिगीन.”


कृष्णाला ओरडा भेटताना पाहून सखी स्वतःशीच हसत होती. विशेष म्हणजे एरवी राग राग करणारा कृष्णा सोनाई ओरडून सुद्धा हसतच अंघोळीला गेला. त्या दोघांचा नवा नवा सुखाचा संसार चालू झालेला पाहून सोनाईचा जीव सुपा एवढा मोठा झालेला.


दोघे एका पलंगावर असतात. दिवस-रात्र कधीही वेळ भेटला की त्यांची गुटुर गुटुर चालू होते. अगदी नवरा बायको सारखेच वागतात आणि हल्ली हल्ली तर बाहेर पडणाऱ्या पावसापेक्षा घरात चोवीस तास प्रेमाचाच पाऊस पडत होता. ‘आरु आरूच्या’ ऐवजी आता ‘सखी सखी’ ऐकू येत होतं आणि या सगळ्याची साक्षीदार स्वतः सोनाई होती. तिच्या मनाला उगाचच कुतूहल! त्यांच्यात सगळं आलबेल आहे ना? नवीन आयुष्याची सुरुवात केलीये ना? त्या दोघांपेक्षा तिलाच नातीची भारी घाई!

कृष्णाच्या सारखं सखीच्या मागे मागे करण्यामुळे तरं सोनाईच्या इच्छांना जशी की पालवी फुटलेली त्यामुळे सोनाई आपल्या उत्साह लपवत भाजीला कांदा चिरत बोलली,
“म्हाळसा ऽ, गौरी फुडच्या वर्शी शाळंला तिकडं जाईल ना गं?”

सखी जेवणाचा डबा भरत बोलली,
“हो आई..”

“आगं मं फुडच्या वर्शी आऱ्या-सुऱ्याला राखी कोन बांधल?” सोनाई हळूहळू मुद्द्यावर आली.

सखी साधेपणाने हसून बोलली,
“गौरी बांधेल.”

सोनाई लगेच आपल्या मनीची कधीपासूनची राखून ठेवलेली इच्छा बाहेर काढत बोलली,
“ती यिल न्हाय यिल.. सोयऱ्याच्या पाॅराव आपला काय आधिकार? पन दोघा भावांना हक्काची भैन नगो व्है?”


सखीचा हात डबा भरता भरता लाजेने थरथरला आणि ती आश्चर्याने सोनाईकडे बघून पुटपुटली,
“आई ऽ ऽ…!”


सोनाई त्याच सुरात सखीकडे बघून हसत बोलली,
“काय आय? घरात लक्षूमी मी बी पायजेच की…तुझ्यासारखी यखूदी भावली झाली तं होवू दे की…”


‘बाळ! क्रिष्णच आणि आपलं बाळ!’
विचारानेच सखी अश्शी लाजली!


तिच्या गोऱ्या गालावर लाजेची लाली लगेच चढली. डबा भरायचा अर्ध्यातच राहिला आणि सखी खाली बघूनच लाजरी हसत मैत्रिणीच्या हक्काने कशीतरी बोलली,
“आमच्यात….. तसं काही नाहीये आई ऽ….”


तिचं लाजणं ही किती गोड!
सोनाई डोळ्यांनी पाहत होती. तिचं हसणं, बोलणं, लाजणं सगळंच लईच नाजूक होतं. उगाच कृष्णा तिच्यात गुंतला नव्हता!


‘घोडा मैदान जवळ नाही’ हे अनुभवाने ओळखून सोनाई बारीक आवाजात बोलली,
“तसं न्हाय तं किशनाशी बोल की… नवरा-बायकूनं समदं इस्कटून बोलावं.
दुसरी नवी नवरा-बायकू बग.. कशी ताॅंडात ताॅंड घालून बसत्यात.. उगाच वर्शाच्या आत पाळना हालतोय व्हयं?”


सोनाईच्या बोलण्याने सखी लाजून गोरीमोरी झाली. आपला चेहरा झाकत ती स्वतःलाही ऐकायला येणार नाही अशी ओठांत बोलली,
“आई ऽ ऽ..….”

तिचं लाजणं बघून सोनाई सखीच्या नव्याने प्रेमात पडत गालात हसत बोलली,
“काय बया ग्वाड लाजती… उगाच किशना मागं मागं करतो व्हय तुज्या!”


सोनाईच्या बोलण्याने तरं सखी अजूनच लाजेने गोरीमोरी झाली. तो डबा भरायचा तिथेच सोडून ती आपल्या खोलीत लाजरी हसत गेली आणि सोनाई भाजीला कांदा चिरत स्वतःशीच आनंदाने हसली.


काही मिनिटांतच कृष्णा आपली अंघोळ उरकून खोलीत आला तेव्हा सखी पाठमोरी स्वतःशीच हसत होती. तिला एकटीलाच अशी हसताना पाहून आपसूकच कृष्णाच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तिला आवाज देण्याऐवजी तो अंगावर शर्ट चढवत हलक्या पावलांनी तिच्या पाठी गेला आणि मागून हळूच कानात बोलला,
“एकट्याच काय हसताय?”


सखी अचानक दचकली. मान चोरत तिने हसतच मागे पाहिलं. कृष्णा शर्टची बटणे लावत हसत बोलला,
“आम्हाला तरी सांगा म्हणजे आम्ही पण असतो की..”

सोनाईचं बोलणं आठवून ही सखीला लाजल्यासारखं होत होतं. ती नजर चोरत हसून बोलली,
“काही नाही… असंच!”


तेव्हाच स्वयंपाक घरातून सोनाईचा आवाज आला,
“म्हाळसा ऽ ऽ, माझा निरोप दे गं किशनाला…”


‘कृष्णा आणि आपलं बाळ! नवीन आयुष्याची लाजरी सुरवात..’ कल्पनेनेच सखी मोहरत होती. तिच्या आयुष्यातील खूप गोड आणि हवेहवेसे क्षण होते ते! जे यायच्या आधीच सखी नुसत्या कल्पनेनेच लाजेने गोरीमोरी होत होती!

© प्रियांका सुभा कस्तुरी
३०/०६/२०२४

……..

भाग छोटा होता या व्यतिरिक्त बोला! (विनोद आहे हा..)