पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१८८

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१८८

सखीसाठी त्याचं हृदय करुणेने दाटून आलेलं. त्याने जे पाहिलं ते त्याला सहनच होत नव्हतं. त्याच्या सखीने इतकं सहन केलंय! की तो कल्पनाही करू शकत नव्हता! कृष्णाच्या डोळ्यांतील धारांचा वेग वाढला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत आलेल्या हुंदक्यामुळे बघता बघता पुरुषासारखा पुरुष ही मान दुसरीकडे फिरवून चेहऱ्यावर हात ठेवून लहान मुलासारखा रडू लागला.


सखी त्याच्या पायाला हातांनी गच्च पकडून त्याच्या गुडघ्यावर डोकं ठेवून रडत होती. तिचे शब्द मुके होऊन ते अश्रू रुपाने बाहेर येत होते. पुन्हा तीच नकोशी गॅंग्रीन झालेली ज्वलंत खपली उघडी पडलेली. तिचा तो वेदनादायी दाह सखीला सहन होत नव्हता.

सखी हुंदके देऊन रडत काहीतरी ओठांत स्वतःलाही कळणार नाही अशी बडबडत होती आणि कृष्णा तिच्या डोक्यावर थोपटत मान दुसऱ्या बाजूला करून तिचं दुःख सहन न झाल्याने भावनिकरित्या कमजोर पडला होता.

“श्शी ऽ ऽ… श्शी ऽ ऽ ऽ….” सखी हुंदके देत त्याच्या गुडघ्यावर माथा आपटत बोलली‌.

मघाशी पाहिलेलं दृश्य नजरे समोर येऊन सखी स्वतःचाच रागराग करत बडबडली,
“किळस वाटतीये मला स्वतःचीच…. श्शी ऽ ऽ ऽ..”


तिचं अनपेक्षित बोलणं ऐकून कृष्णाने स्वतःला सावरलं. आपले डोळे घाईघाईत पुसून कृष्णा गुडघ्यावर तिच्यासमोर बसला आणि तिचे डोळे पुसत तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिला समजावणीच्या सुरात बोलला,
“सखी ऽ, काही पण काय बोलताय.. किळस स्वतःची नाही त्या नालायकाची वाटायला हवी.”


मोबाईल वरील नितीनसोबतचा बिभत्सक प्रसंग नजरेसमोर जसाच्या तसा असल्यामुळे त्याच्या नजरेला नजर देतानाही सखीला स्वतःचीच लाज वाटली. ती डोळे बंद करूनच रडत कशीतरी बोलली,
“कुठे … कुठे मिळाली ही घाण?”


कृष्णा दरवाजाजवळ गेलेल्या त्या मोबाईलकडे बघत काहीसा रागाने बोलला,
“खूप प्रयत्नांनी शोधलंय हे.”


सखीने दुःखाने त्याच्याकडे पाहिलं,
“कशासाठी?”


तेव्हाच सोनाई धुतलेला हात पदराने पुसत कृष्णाचा आवाज आल्याने स्वयंपाकघरातून त्यांच्या खोलीत येताना बोलली,
“किशना ऽ, कधी रं आलायस?”


कृष्ण सखी पलंगाजवळ खाली बसलेले. सखी उसासे देऊन रडत होती तरं कृष्णाही रडवेलाच होता. त्या दोघांनीही सोनाईकडे पाहिलं आणि त्या दोघांना रडताना पाहून सोनाई घाबरून छातीवर हात ठेवून बोलली,
“पांडुरंगा ऽ आरं काय झालं रडायला? समदं धड भलं हाये ना?”


कृष्णाने आपले डोळे पुसले आणि स्वतः सोबत सखीचं मनगट पकडून तिला उठवत बोलला,
“उठा. आपल्याला निघायचंय.”


सखी गोंधळून बोलली,
“कुठे?”


त्या दोघांची अवस्था पाहून सोनाई काळजीने डोक्याला हात लावत बोलली,
“आरं काय झालंय किशना? बोल की.. “


कृष्णा स्वतःच्या तोंडावरून हात फिरवत गंभीर स्वरात बोलला,
“कोळसेवाडीला जातोय. आज शेवटचा वार!”

कोळसेवाडीचं नाव ऐकताच सखी त्याच्या हातातून आपलं मनगट काढून घेत उसासे देत बोलली,
“नाही. मला त्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये.”

कोळसेवाडीचं नाव ऐकताच सोनाईच्या कपाळावर वरपर्यंत उभी रेषा उमटली आणि ती रागाने बोलली,
“काय केलं त्या भाडखावनं?”


कृष्णाने सोनाईच्या पायाजवळच चौकटीपाशी पडलेला मोबाईल उचलला आणि खाटेवर असणाऱ्या एनवलप मध्ये ठेवून पुन्हा दोन्ही मोबाईल आपल्या खिशात ठेवत सोनाईकडे बघून बोलला,
“तुला शेवटचं भेटायचं होतं ना? तू ही चल.”


कृष्णाने पुन्हा हात पकडताच सखी त्याच्या हाताला हिसका देत काहीशी रागात बोलली,
“का कळत नाहीये तुम्हाला? त्याला बघून मी काय करेन माझं मलाही माहिती नाही.. मला नाही भेटायचं त्याला.”


“आगं कशाला घाबरतेस आम्ही हाये….”
सोनाई बोलतच होती की कृष्णाने हात करून तिला मध्येच थांबवलं आणि पुन्हा सखीचा हात पकडून तिच्या डोळ्यांत पाहत वेदनेने घोगऱ्या आवाजात बोलला,
“आज मी तुम्हाला थांबवणार नाही.. चला.”

सखी रडवेली झालेली. कृष्णा तिचे डोळे पुसत घोगऱ्या आवाजात बोलला,
“आता रडायचं नाही.. तरं स्वतःसाठी लढायचं!”


पुढे सखीला बोलू न देताच कृष्णा सखीचा हात हातात घेऊन बाहेर पडला. लगोलग सोनाईने ही सगळे दरवाजा बंद केले. बाहेरच्या दरवाजाला कडी घालून ती ही अंगण उतरली. स्वतःची बाईक रस्त्यावर आणत नुकताच घरी आलेला सुधीर त्याच्या अंगणात दिसताच कृष्णाने आवाज दिला,
“सुधीर ऽ ऽ…”

“काय मास्तर ऽ ऽ ?”

सखीला बाईकवर बसायला खुणावत कृष्णा शांतपणे बोलला,
“आईला कोळसेवाडीला घेऊन ये, लगेच.”

एवढंच बोलून कृष्णा पुढे निघाला. सुधीर घाईघाईत गेलेल्या कृष्णाकडे बघतच राहिला. सुधीरला शुंभा सारखा उभा पाहून सोनाई ही घाई करत बोलली,
“आरं यं की लवकर.. त्याचा बांध भरायचा हाये.”


भानावर येत सुधीर पायात सॅंडल चढवत कुतहलाने बोलला,
“काय मॅटर झाला का काकू?”

“त्या नित्याची डुली घालवायची हाये. तू यं बिगीनं.”


सोनाईच्या आवाजाने कलाई, धुरपा, वासंती पटापटा बाहेर आल्या. सोनाई दरवाज्याकडे हात करत कलाईला बोलली,
“कले, दरवाजा उघडा हाये बग. पोरं यतील ध्यान ठीव.”

सोनाई बोलेपर्यंत सुधीरने गावच्या ग्रुप वर मेसेज टाकला-
‘मास्तरांचा कोळसेवाडीत मॅटर झालाय. लगेच पोहोचा.’


सुधीर निघेपर्यंत लगेच त्याच्यापाठोपाठ तीन-तीन मुले बसलेल्या सात-आठ बाईक भुंगाट निघाल्या. प्रशांत घरी जेवायला आलेला. त्याच्या वडाप मध्ये सुद्धा बसतील एवढी गडी माणसे घेऊन तो ही कोळसेवाडीला लागलीच निघाला.
‘मास्तरांचा मॅटर’ हे ऐकूनच सगळे झपाटल्यासारखे कोळसेवडीला निघालेले.


कृष्णा पाठोपाठ अर्धा निम्मा गाव कोळसेवाडीकडे रवाना झालेला. संतापाने लालेलाल झालेला कृष्णा वेगाने कोळसेवाडीकडे निघालेला. सखीच्या डोळ्यांतून नुसतंच पाणी झिरपत होतं. भूतकाळ आणि वर्तमानाची अचानक झालेली सरमिसळ तिला दुखावून गेलेली. तिने कितीही केलं तरी तो घाणेरडा भूतकाळ तिची पाठ सोडायला तयारच नव्हता त्यामुळे तिचे डोळे घरून निघाल्यापासूनच एकसारखे वाहत होते.


कृष्णाची गाडी कोळसेवाडीत पोहचली आणि आतमध्ये मुख्य कमानीजवळ नितीनच्या आॅफिसबाहेर थांबली. सखी खाली उतरल्यावर कृष्णाने बाईक एका बाजूला लावली.

“इथेच थांबा.” एवढं बोलून कृष्णा वेगाने त्याच्या ऑफिसमध्ये निघाला. कृष्णाला पुन्हा आलेला पाहून मागच्या वेळची नितीनची हालत आठवून त्याचे चमचे शहाणे बनवून लगेच एका बाजूला झाले तरं दोघेजण निरोप पोहोचवायला आत मध्ये धावले.

“भाऊ ऽ ऽ.. मास्तर आलेत.”
एक जण घाबऱ्या आवाजात बोलला.

खुर्चीवर पसरून बसलेला नितीन कृष्णाचं नाव ऐकताच घाबरून खुर्चीवरून उठला,
“कृष्णा मास्तर?”

“हो हो… तेच.” दुसऱ्याने लगेचच होकार कळवला.

मागच्या वेळेसचा प्रसाद अजूनही झोपेत आठवून दचकून जागणारा नितीन, आत्ता कुठे हाताचं प्लास्टर काढलेला नितीन काहीसा घाबरून स्वतःशीच बडबडला,
‘तो इथं कशाला आलाय?’

इतक्यात धाडकन दरवाजा उघडला आणि कृष्णा ऑफिसमध्ये दाखल झाला. कृष्णाला पाहताच नितीनचे चमचे लगेचच कोपऱ्यात सरकले.

त्या दिवसानंतर पुन्हा नितीनला प्रत्यक्ष पाहून कृष्णाच्या कपाळाची शीर संतापाने फुगली आणि कृष्णाला रागवलेला पाहून नितीन काहीसा घाबरून बोलला,
“काय झालं? पण मी काही नाही केलं. साधी पोलीस कम्पलेट पण केली नाही.”


नुकतीच पाहिलेली व्हिडिओ क्लिप आठवून कृष्णाच्या संतापाचा उद्रेक झालेला. नितीनला पुन्हा कुत्र्यासारखा मारण्यासाठी, त्याचा जीव घेण्यासाठी कृष्णाचे हात शिवशिवलेले. त्याचा ढोंगीपणा पाहून कृष्णा वेगाने त्याच्याजवळ गेला आणि त्याची कॉलर पकडून प्रचंड रागात बोलला,
“इथेच तुझे तुकडे तुकडे करावे असं खूप वाटतंय.. पण मी आज तुला हात देखील लावणार नाही.”

कृष्णा मारणार नाही हे ऐकून नितीनने मोकळा श्वास सोडला. त्याला किंचित हसताना पाहून कृष्णा रागातच त्याच्याकडे पाहून हसला,
“फक्त नीच नाहीस तरं महामुर्ख ही आहेस तू.”


नितीन स्वभावाप्रमाणे लगेच डील करत बोलला,
“मास्तर ऽ जे काय आहे ते बसून सेटलमेंट करूया का? पण एकदा माझा पिच्छा सोडा.”


त्याच्याच उंची एवढा कृष्णा त्याची कॉलर पकडून नजरेनेच खाऊ की गिळू असा बघत रागात बोलला,
“पिच्छा सोडणारच आहे.. आणि सेटलमेंट सुद्धा करणार आहे पण इथे नाही, बाहेर चल.”


कृष्णा नितीनच्या कॉलरला पकडूनच त्याला ऑफिसच्या बाहेर ओढत घेऊन आला.‌ कॉलर वरचा हात सोडवण्याच्या नादात नितीन सुद्धा कृष्णाबरोबर बाहेर खेचला गेला. त्यांच्यासोबत नितीनच्या चमच्यांचा समूह देखील मागच्या पावलांनी मागे मागे आला.‌

आॅफिसबाहेर आल्यावर सखीला समोर पाहताच नितीन यंत्रवत कृष्णासोबत नाक्याच्या मधोमध तिच्यापर्यंत आला. तोपर्यंत सुधीर सोनाईला घेऊन पोहोचलेला. पोरांच्या सगळ्याच बाइक्स, प्रशांतच वडाप सगळे सगळे पळसगावच्या नाक्यावर गर्दी करून उभे होते. कृष्णाने नितीनला ओढत आणलेलं पाहून सगळ्यांचे हात शिवशिवले. पळसगावची बायकामाणसं देखील गर्दी झाल्याने लगेच गोळा झाली.


अशा तुडुंब गर्दीमध्ये कृष्णाने सखी समोर नितीनला उभं केलेलं. सखी डोळ्यांतून पाणी वाहत त्याच्याकडे रागाने पाहत होती.

मागे उभे असणारी सोनाई नितीनला पाहताच बांगड्या मागे सारत जिभेला सैल सोडून त्याच्यावर डाफरली,
“मुडद्या, लूत लागलेल्या कुत्र्यासारखा कीडं पडून मरशील....तुझी चमडीच सोलते थाम…’’


“आई ऽ ऽ…’’ कृष्णाने तिथेही सोनाईला थांबवलं.

लगेचच प्रशांत नितीनकडे रागात पाहत बोलला,
“मास्तर तुम्ही फकस्त इशारा करा.. ह्या नित्याचा कोळसा हितंच भायर काढतो. लैच मांद हाये ह्याला.”

“व्हय मास्तर… माझ्या तरं डोक्यातच जातो ह्यो.”
राकेश सुद्धा पुढे येत रागाने बोलला.


सगळेच खवळलेले. सगळ्यांचे हात नितीनला मारण्यासाठी शिवशिवलेले पाहून कृष्णा हातानेच सगळ्यांना थांबवत खणखणीत आवाजात बोलल्या,
“कोणीही पुढे येणार नाही. याचं काय करायचं ते सखी पाहतील.”


कृष्णाच्या बोलल्याने पुढे आलेले आपोआप एक पाऊल मागे गेले. सगळ्यांच्या नजरा सखीकडे वळल्या. कृष्णाने इथे देखील त्याला सूट दिल्यामुळे नितीनने पुन्हा मोकळे श्वास घेत सखीकडे पाहिलं. ही सखी त्याला वेगळीच वाटली. आजवर त्याने पाहिलेली सखी ही भित्री, सतत घाबरणारी, रडणारी, भितीने नजर चोरणारी अशीच काहीशी होती.. अगदी मागच्या वेळी भेटेपर्यंत ती तशीच त्याला दिसलेली पण आज समोर असलेली…
आपले डोळे वाहत असताना ही नजरेत नजर घालून रागाने त्याच्याकडे पाहणारी ही सखी थोडीशी त्याला वेगळी वाटली.


भडकलेले लोक पाहून नितीन स्वतःला वाचवण्यासाठी सरळ सखीला शरण जात हात जोडून बोलला,
“मला माफ कर… मी खरंच बदललोय.”


विद्याच्या अंगावर पाहिलेले व्रण आठवून सखी स्वतःच त्याच्या जवळ जात त्याच्या डोळ्यांत पाहत प्रचंड तिरस्काराने बोलली,
“तू कोणत्या जातीचं जनावर आहेस हे माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाला ठाऊक! त्यामुळे तुझी नाटकं बंद कर.”


त्याला पाहताना सखीच्या संतापाचा कडेलोट झालेला. ती त्याच्या तोंडावर थुंकली तसे नितीनने डोळे बंद केले. त्याचे सगळे अत्याचार आठवून सखी दुःख, वेदना, राग सगळ्या भावनांनी थरथरायला लागली. डोळे तर तिचे वाहतच होते. सखी पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर तिरस्काराने थुंकली आणि रडत तरीही प्रचंड रागात बोलली,
“मी तुला स्पर्श करावा ही तुझी लायकीच नाही काळ्या नासक्या!”

“मी खरंच बदललोय.. तुझ्या कृष्णा शपथ….”
नितीन हात जोडून बोलला आणि त्याच्या तोंडून कृष्णाचं नाव ऐकताच सखीने संतापाने थरथरत पायातलं पायथन काढून सनकन त्याच्या थोबाडीत वाजवली.

वहिनींवर हात टाकला, वाकड्या नजरेने पाहिलं एव्हाना ही सगळ्यांमध्ये कुजबूत झाली आणि सगळेच हाताच्या मुठी आवळून दात ओठ खाऊन नितीन कडे बघू लागले.‌


गर्दीतील कोळसेवाडीतील बायका देखील त्याच्या नावाने बोटं मोडू लागल्या आणि तेवढ्यातच त्या गर्दीतून एक जण पुढे आली.

“ताई ऽ ऽ…” सखीला ओळखीचा आवाज आल्याने नितीनवरची नजर हटवून तिने शेजारी पाहिलं. खांद्यावरून पदर घेतलेली विद्या डोळ्यांत पाणी घेऊन तिच्याकडेच बघत होती.


मायेचा धबधबा जरी.. तरी कोसळणारी वीज तू..
ममत्वाचा पूर तू, तरी दूष्टांसाठी प्रलय तू..
उठ तू... पेट तू..
सामर्थ्य तुझे ओळख तू...
तू दुर्गा... तूच शक्ती..
तू अंबिका.. तूच चंडीका
आता उठ तू... अन् पेट तू..
सामर्थ्य तुझे ओळख तू…


दोघींनीही एकमेकींकडे पाहिलं. विद्याच्या खांद्यावरचा पदर सखीने स्वतः पुढे होऊन तिच्या कमरेला खोचला. विद्याला असं भडभडून आलेलं. सखी तिचे डोळे पुसत तिला धीर देत रागात बोलली,
“आता रडायचं नाही विद्या… आता लढायचं.”


विद्या डोळे पुसत हुंकारली आणि दोघीही पुन्हा एकमेकींकडे बघून किंचित हसल्या. पुन्हा दोघींच्या ही चेहऱ्यावर दुःखाची लकेर पसरली आणि दोघींनीही नितीनकडे रागात बघून निऱ्या खोचल्या.

नितीन भैसाटल्यासारखा त्या दोघींना पाहत होता. गर्दीमुळे धावायला ही जागा नव्हती. तुडुंब भरलेल्या गर्दीत तो मधोमध अडकलेला.


कृष्णाने आपला पट्टा काढून सखीच्या हातात दिला..लगेचच सुधीरचा ही पट्टा विद्याच्या हातात गेला. दोघीही पिसाळलेल्या वाघिणीसारख्या त्याच्याकडे बघत हातातील पट्टा घट्ट आवळून पुढे पुढे सरकत होत्या आणि नितीन त्यांचा रुद्रावतार पाहून घाबरून एक एक पाऊल मागे होत स्वतःचा बचाव करण्यासाठी बडबडत होता,
“ए ऽ… ए ऽ काय करताय.. माझ्या बायका होता दोघीही.. “

त्याच बोलून व्हायच्या आधीच सखीच्या पहिल्या पट्ट्याचा जोरदार व्रण त्याच्या चेहऱ्यावर उमटला आणि सखी रडत त्याच्यावर खेकसली,
“बायको म्हणजे काय? तुला आयुष्यभर कळणार नाही गेंड्या..”

आपल्या पट्ट्याचा चाबूक त्याच्या अंगावर उठवत विद्याही रडत बडबडली,
“कोठ्यावर नेऊन विकायचा बाकी होतास आणि बायको? दल्ला कुठला..”


दोन्ही हातांनी घाबरून चेहरा वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितीनच्या नाजूक भागावर लाथ घालत सखी संतापाने थरथरत ओरडली,
“जिवंतपणी मारलंस मला… आणि आत्ता बायको आठवतीये?” बेसावध असलेला नितीन वेदनेने विव्हळला आणि त्याचं थोराड शरीर धपकन रस्त्यावर आदळलं.

त्याचे सगळे अत्याचार आठवून विद्याही रडत त्याच्या छाताडावर लाथा घालत रागाने बेभान होऊन बडबडू लागली,
“कुत्र्याच्या जातीचा, दलींदर… दळभद्री… तुझ्या मर्दाकीवर थू… दोन बापाची औलाद @#@#@....” ती रागाच्या भरात त्याच्या सगळ्या शिव्या त्याला पुन्हा व्याजासकट परत करत होती.


संतापाने थरथरणारी सखी त्याच्या नाजूक भागावर पट्ट्याचे व्रण एकामागोमाग एक उठवत रडत बडबडत होती,
“दिवस रात्र बायको…. बायको…...बायको……
कलंक आहेस तू…. नवरा-बायकोच्या नात्याला कलंक आहेस तू… समाजाला कलंक आहेस तू…. नामर्द आहेस तू…”


सखी आणि विद्या त्याला मारत असताना आतापर्यंत कृष्णाच्या शब्दाखातर संयम बाळगून असणारी सोनाई पित्त खवळल्यामुळे कासुटा खोचून त्याच्यावर तुटून पडली,
“लै जवानी रसरसल्यानी ना मुडद्या.. तुझ्या तोंडात कुत्रं मुतलं.. @#@#@#... ”


सखी-विद्या रडत फक्त त्याला मारत नव्हत्या तरं त्यांच्या मनातील अगदी खोल अंतर्मनातील वेदनेची जळमटं बाहेर काढत होत्या.

कृष्णा सखीला पाहत होता. आजही तिचे डोळे संतापाने लालेलाल झालेले. तिच्या संतापाची लाली तिच्या गालावर उतरलेली. तिचे ओठ रागाने थरथरत होते. ती रडत ओरडत होती. त्याला लाथा घालत बडबडत होती, मध्येच आपले डोळे पुसून त्याच्यावर पट्ट्याने सर्व ताकतीनिशी पुनः पुन्हा वार करत होती. तिच्याकडे पाहताना कृष्णाच्या डोळ्यांच्या कडा ही सारख्याच ओल्या होत होत्या.


सखी-विद्या-सोनाई दिसेल तिथे त्याला लाथा घालत होत्या आणि तो वळवळत्या किड्यासारखा वेदनेने तडफडत व्हिवळत होता. सखी आणि विद्याच्या पट्ट्यांच्या मारामुळे त्याचं शरीर लगेचच सुजून काळ निळं पडलेलं.. सखीच्या मारामुळे तर आधीच नामर्द असलेला आता खरोखर नामर्द झालेला.
त्यांचं पाहून गर्दीतून नितीनच्या नजरेच्या शिकार झालेल्या कोळसेवाडीतीलच बायका पदर खोचून लगेचच पुढे सरसावल्या आणि त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून नितीनचा समाचार घेतला. आज सगळ्यांमधील रणरागिणी जागी झाल्यामुळे नितीनच्या शरीरातील हाड आणि हाड गळून गेलेलं.


स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू समजणाऱ्या नितीनला आज ‘तिचा’ रुद्रावतार पाहताना आपला शेवट जवळ आल्यासारखा वाटत होता.

©प्रियांका सुभा कस्तुरी
०३/०७/२०२४

………

🎭 Series Post

View all