पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१८९

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१८९


सखी-विद्या-सोनाई दिसेल तिथे त्याला लाथा घालत होत्या आणि तो वळवळत्या किड्यासारखा वेदनेने तडफडत व्हिवळत होता. सखी आणि विद्याच्या पट्ट्यांच्या मारामुळे त्याचं शरीर लगेचच सुजून काळ निळं पडलेलं.. सखीच्या मारामुळे तर आधीच नामर्द असलेला आता खरोखर नामर्द झालेला.
त्यांचं पाहून गर्दीतून नितीनच्या नजरेच्या शिकार झालेल्या कोळसेवाडीतीलच बायका पदर खोचून लगेचच पुढे सरसावल्या आणि त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून नितीनचा समाचार घेतला. आज सगळ्यांमधील रणरागिणी जागी झाल्यामुळे नितीनच्या शरीरातील हाड आणि हाड गळून गेलेलं.


स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू समजणाऱ्या नितीनला आज ‘तिचा’ रुद्रावतार पाहताना आपला शेवट जवळ आल्यासारखा वाटत होता. सगळ्या स्त्रिया त्याच्या शरीराचा जो भाग दिसेल त्यावर शिव्यांची लाखोली वाहत त्याला तिरस्काराने लाथडत होत्या.

एकाच वेळी संपूर्ण शरीरावर होणाऱ्या हल्ल्याने नितीन रडत होता. आपल्या प्राणांची भीक मागत होता. त्या सर्वांच्या आवाजामुळे त्याचा आवाज त्याचा त्यालाही ऐकू येत नव्हता पण काही वेळाने त्याचा आवाज कान देऊन ऐकणाऱ्या कृष्णाला त्याचा आवाज यायचा पूर्णपणे बंद झाला तसं कृष्णाने पुढे येऊन दोघींना हाताला धरून बाजूला केलं आणि नितीनला पाहिलं तर तो मढ्यासारखा काळा निळा होऊन पडलेला.


त्याने सुधीर आणि प्रशांतला इशारा करताच त्यांचा चार पाच मुलांचा समूहच पुढे आला आणि स्त्रियांना हाताला धरून बाजूला काढू लागला पण खवळलेल्या बायका काही ऐकणात..  शेवटी कृष्णाच आवाज मोकळा सोडत बोलला,
“बास करा आता… तो मेलाय.”


कृष्णाचं बोलणं ऐकूनच बायकांचा रागाचा पारा क्षणात खाली घसरला आणि सगळ्या स्वतः हून घाबरून पटापट मागे सरल्या.

क्षणातच तिथलं वातावरण बदललं आणि सगळी गर्दी मूग गिळून गप्प झाली. सगळ्यांच्या नजरा सुजून काळ्या निळ्या पडलेल्या नितीनवर गेल्या.


सोनाई, विद्या आणि सखी तिघींना त्याचं बोलणं ऐकू गेलंच नव्हतं. त्या तिघीही त्याला रागात लाथाडतच होत्या. सोनाई आणि विद्याच्या हाताला पकडून कृष्णा दोघींनाही त्याच्यापासून बाजूला आणत दोघींचेही हात हलवत बोलला,
“बास करा आता.. संपलाय तो.”

सोनई रागाने मोठे श्वास घेत काळ्या निळ्या पडलेल्या नितीनकडे बघून थुंकली,
“मरायलाच पाहिजे भाड#@व…”


विद्या थरथरत रागात त्याच्याकडे पाहत होती. कृष्णा तिचा हात मोकळा करत शांतपणे बोलला,
“तो संपलाय. शांत व्हा ताई.”


तिच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण संपल्याचं कळताच विद्या हसत हसत रडू लागली. पहिलीच बायको असेल नवरा मेल्याचं कळताच आनंदाने रडत होती. तिने रडतच तिच्या बांगड्या आणि मंगळसूत्र त्याच्या अंगावर फेकलं जणू ती त्याच्या बंधनातून मुक्त झालेली.


“बायको हवीय…?  घे.. अजून घे… अजून घे…”
रडतच थकल्यासारखा आवाज आल्यावर कृष्णाने मागे पाहिलं.


घामाने ओथंबलेली सखी थरथरत रडत त्याच्या निपचित पडलेल्या अंगावर पट्ट्याचे व्रण उठवत मनातील मळभ अजूनही बाहेर काढतच होती.

“सखी ऽ…..”
तिला आवाज देत कृष्णा तिच्याजवळ गेला तरी  त्याच्या चेहऱ्यावर आपल्या पट्ट्याचे व्रण उठवत सखी तशीच रडत बडबडत होती,
“चटके द्यायची भारी हौस आहे ना तुला… घे… अजून घे… बायको पाहिजे?… अजून घे…”


“सखी ऽ ऽ ऽ….” कृष्णा तिच्या शेजारीच उभा होता. तरीही भूतकाळाने आतून ढवळून निघालेल्या सखीला आजूबाजूचं कसलंच भान नव्हतं. ती फक्त तिच्यावर झालेल्या अन्यायाचा, तिने सोसलेल्या दाहक वेदनेचा प्रतिशोध घेत होती. त्याला मारून मारून ती रागाने लालबुंद झालेली. तिचं शरीर घामाने ओलचिंब होऊन तापलेलं. रडत बडबडत तिच्या हातातील पट्टा त्याच्या शरीरावर नवीन व्रण उठवत होता.

आवाज देऊन सुद्धा सखीला तशीच मारताना पाहून कृष्णाने सखीचा उभारलेला हात पकडला तशी रागाने सखीची नजर कृष्णावर गेली,
“हात सोडा माझा.”

कृष्णा तीच मनगट घट्ट पकडून घोगऱ्या संथ आवाजात बोलला,
“मेलाय तो.”

संतापाच्या आहारी गेलेल्या सखीच्या मेंदूपर्यंत लगेचच त्याचं बोलणं पोहोचलं नाही. ती तशीच हाताला झटके देतीये हे पाहून कृष्णा आवाज वाढवत बोलला,
“सखी ऽ ऽ ऽ…. संपलाय तो!”


काही सेकंद कृष्णाकडे पाहिल्यावर आता कुठे त्याच्या बोलण्याचा अर्थ तिच्या लक्षात आला.
सखीने तिरस्काराने रस्त्यावर पाय पसरून पसरलेल्या नितीनकडे पाहिलं आणि धिक्कार करत पुन्हा त्याच्या पोटावर लाथ घालत धुसफुसली,
“लवकर गेला..  महानीच!”


‘तो गेला’ हे कळल्यावर सगळे स्तब्ध झालेले; शिवाय सोनाई, विद्या आणि सखी. त्याच्या मेलेल्या मढ्याला सुद्धा अजून अजून मारावं असंच त्या तिघींनाही वाटत होतं.


नितीन मेला याचं टेन्शन येऊन प्रशांत आणि सुधीर लगेच कृष्णाजवळ येऊन घाबरून बोलले-

“मास्तर, आव आपल्याला जड जाईल की आता.” प्रशांतने भीती बोलून दाखवली.

सुधीर सुद्धा सहमती दर्शवत बोलला,
“आता काय करायचं आपण?”


कृष्णा रागातच नितीनकडे बघून हळू आवाजात बडबडला,
“गेंड्याची कातडी आहे त्याची.. इतक्यात मरतोय होय तो? आणि जे पेरलंय ते फेडल्याशिवाय देव सुद्धा त्याला उचलणार नाही. बेशुद्ध पडलंय ते बेनं.”


नितीन जिवंत आहे हे ऐकून प्रशांत आणि सुधीरच्या जीवात जीव आला.

“पाणी आणा रे.” कृष्णाने सांगताच पिंट्याने धावत जाऊन शेजारच्या दुकानातून पाण्याची बाटली आणली. कृष्णाने झाकण काढून सरळ ती बाटली नितीनच्या चेहऱ्यावर आडवी धरली. पाण्याची धार नाकातोंडात जाताच नितीन खोकतच व्हिवळत जागा झाला.


नितीनला जिवंत पाहून गर्दीतील बायकांच्या जीवात जीव आला पण सोनाई, विद्या आणि सखी तिघीही पुन्हा संतापाने पेटून उठल्या.


कृष्णा लगेचच त्या तिघींच्या समोर जात त्यांना थांबवत समजावत बोलला,
“बास की आता..  खरोखर जीव घेणार आहात काय त्याचा?”

एका क्षणात-
“हो..  होय…व्हयं..”
विद्या, सखी, सोनाई तिघींचाही एकच सूर आला.


कृष्णा त्याच्या भाषेत त्या तिघींना समजावत बोलला,
“रागाच्या भरात वेड्या होऊ नका.. त्याचा जीव घेऊन जेलमध्ये जायचं आहे काय? त्याचं काय करायचं ते मी पाहतो. शांत व्हा की जरा.”

सोनाई नितीनकडे बघून डाफरली,
“काय बी कर पन ह्याची मोट मुकळी सुडू नगं.”

“होऽ आई ऽ, तू घरी जा.  आम्ही मागून येतो.”
सोनाईला सांगतच कृष्णाने सुधीरला खुणावलं,
“सुधीर, आईला तू घरी घेऊन जा.”

“पण तुम्ही?”

“याला त्याच्या घरी पाठवून आम्ही नंतरच घरी येतो.”
कृष्णा ही नितीनकडे बघत गुरगुरला.

सगळ्यांना तिथेच ठेवून जाण्याच्या कल्पनेने सुधीर नाखुशीने बोलला,
“मास्तर, मी पण थांबतो की.”

“मास्तर मी बी तुमच्याबरूबरंच घरी जानार.”
प्रशांत थोडा हट्टाने बोलला की राकेशनेही सूर ओढला,
“मी बी…”


कृष्णाने कपाळाला हात लावला आणि सगळेच एकदम बोलले,
“मास्तर ऽ ज्यं व्हैल, त्यं समद्यांच व्हैल.”


ज्या गावासाठी कृष्णा आजवर निरपेक्षपणे झटला तोच गाव आज त्याच्या बाजूने ठामपणे उभा पाहून कृष्णाला मूठभर मांस चढल्यासारखं झालं.

तो पटापट सूचना देऊ लागला-

सखी आणि विद्याकडे पाहून,
“तुम्ही दोघी वडापमध्ये पुढे बसा.”

लगेचच प्रशांतला..
“प्रशांत, याला वडापमध्ये मागे घ्या.”

..पुन्हा सुधीरकडे पाहून,
“सुधीर, तू आईला घेऊन आमच्या मागे ये.”

आपल्या बाईकची चावी शेजारच्या मुलाच्या हातात देत..
“मच्छू, तू गाडी घेऊन ये.”

..आणि गावातील सळसळत्या रक्ताकडे बघून, “तुम्ही सगळेच!  मिरवणुकीला गेल्यासारख्या हुक्क्या, शिट्ट्या, शेरेबाजी, टोमणे, शिव्या काही चालणार नाही. मान्य असेल तरच चला नाहीतर आल्या पाऊली घरी जा.”

सखी आणि विद्या पुढे बसल्या की चार-पाच दणकट मुलांनी नितीनला ओढतच वडापच्या मागे बसवलं.   कृष्णा त्याच्यासमोरच बसला. वडाप पुन्हा भरली आणि पुढे निघाली. मागून सोनाई आणि तिच्या मागून गावातील सात आठ बाईक्स. पुन्हा त्यांचा लवाजमा कोळसेवाडीतून माघारी आंबेगावाकडे निघालेला.


नितीन कोसळू नये म्हणून त्याला आधाराला शेजारी दोन मुले बसलेली. रक्तबंबाळ झालेला, काळा निळा झालेला नितीन कसेतरी डोळे उघडून समोर बघत होता. त्याच्या नजरेसमोर तारे चमकल्यासारखे कृष्णाचा चेहरा चमकत होता. एक.. दोन..तीन … त्याला मोजताना न येण्याएवढे कृष्णा त्याच्याकडे रागाने बघत त्याच्या समोरच होते. त्यातला कोणता खरा आणि कोणता खोटा हे त्यावेळेस त्याला सांगणं अशक्य होतं.


तो मोकाट मदमस्त बैलासारखा उधळलेला. जोवर कृष्णा त्याच्या आयुष्यात आला नव्हता. कुठून पनवती सुचली आणि सखीचा मागोवा काढत पळसगावला गेलो, याचा त्याला जबर पश्चात्ताप होत होता. त्याचं संपूर्ण अंग अंग वेदनेने टाहो फोडत होतं. शरीराचा नक्की कोणता अवयव, कोणता भाग जास्त दुखत होता हे सांगणं त्याच्यासाठी महाकठीण काम होतं. त्या वेदना सहन न होऊन नितीन खाली बघून रडायला लागलेला.


गाडीतील त्याचा रडण्याचा हुंकार ऐकून सखी आणि विद्याच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचलेली. त्यांच्या कमजोर देहाने कितीतरी वेळा रडत हात जोडून त्याच्याजवळ भीक मागितलेली पण त्याच्यातील पिशाच्चाला त्यांची कधीच दया आली नव्हती. रागाचा वणवा उरात असताना ही भूतकाळाच्या खपल्यांनी दोघींचे ही डोळे अबोलपणे वाहू लागलेले.


कृष्णाने आज खूप संयमाने घेतलं असलं तरी त्याचीही अवस्था सखी आणि विद्यापेक्षा वेगळी नव्हती. त्याचं फुंदनं पाहून कृष्णा नजर रोखून एकटक त्याच्याकडे बघत बोलला,
“ए ऽ कोळशा, तुझ्या श्वासाचा देखील आवाज नाही आला पाहिजे काय.. ते तोंडाचं गटार बंद करायचं आधी.”


आधीच काळा असणारा चेहरा अजून काळा निळा होऊन सोलपटून निघालेला, सुजलेला. डोळेही सुजून लालभडक झालेले त्यामुळे तर तो पहिल्यापेक्षा भयंकर दिसत होता.


कृष्णाने जरब दिल्यावर नितीन घाबरून ओठ बंद करून आतल्या आत घुमू लागला. कृष्णा रानात कुठेतरी नेऊन आपल्याला मारून टाकणार या जीवाच्या भीतीने तो आतून हादरलेला.


कृष्णा थोडा पुढे सरकून त्याच्या चेहऱ्या जवळ चेहरा आणत संतापाची ठिणगी शब्दांतून व्यक्त करत बोलला,
“तुझी ओळख वापरून, नाही तर टेबल खालून खिसे गरम करून जर चुकून जरी बाहेर आलास तर विसरु नकोस, आज मी तुला हात सुद्धा लावला नाही.  आपली ही भेट माझ्यावर उधार राहिलं!”


नितीन घाबरून ‘नाही नाही’ अशी मान डोलावत आतल्या आत घुमत राहिला आणि थोड्या वेळाने वडाप एका बाजूला थांबवून प्रशांतने मागे बघून आवाज दिला,
“मास्तर पोचलो.”


“उतरा सगळे.”
कृष्णा बोलताच सगळी गाडी खाली झाली. गाडीत फक्त कृष्णा आणि नितीन होते.


कृष्णा नितीनचे केस हाताच्या मुठीत घट्ट आवळून  संतापाने बोलला,
“आत मध्ये जाऊन अतिशहाणपणा केलास तर तुला लय महागात पडेल. मी तुझ्या लायकीला उतरलो ना तर तुला झेपणार नाही लक्षात ठेव! तुला आधीच सांगितलेलं, जरं मी मास्तरकी बाजूला ठेवली तर तुला पळता भुई थोडी होईल! त्यामुळे अजूनही तुझ्या लायकीत रहा.” आणि त्याने रागातच न राहवून आपल्या भारदस्त हाताचा एक जबरदस्त छापा त्याच्या गालात खाडकन उतरवला तसा नितीन गाडीच्या बाहेर धाडकन पडला. कृष्णाच्या त्या जोरदार ठोशाने त्याचा एक कान कायमचा बधीर झालेला.


‘आपण इथे कुठे आलो?’ हा विचार करत असतानाच सखीची नजर रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या ‘आंबेगाव पोलीसस्टेशन’ या बोर्डवर पडली.  पुढे काय घडणार आहे याची तिला कल्पनाच नव्हती.


त्या बोर्डकडे पाहत असतानाच कृष्णाचा जवळून आवाज आला,
“विद्याताई, तुम्हाला भीती वाटते काय?”


विद्या इरेला पेटलेली. काहीही झालं तरी तिला  त्याला आयुष्यातून हाकलून लावायचा होता त्यामुळे ती मन घट्ट करून बोलली,
“अजिबात नाही.”

कृष्णा कौतुकाने बोलला,
“हीच हिंमत कायम ठेवा.”

…आणि त्याने मोर्चा सखीकडे वळवला. दोघी आधीच एका बाजूला उभ्या राहिल्यामुळे कृष्णा जरा हळू आवाजात बोलला,
“सखी आपल्याला सुद्धा तक्रार करायची आहे.”

सखी अंदाजे बोलली,
“त्रास दिलेल्याची?”

कृष्णाने नकारार्थी मान हलवली.

सखी हळू आवाजात बोलली,
“विनयभंगाची?”

कृष्णा पुन्हा हळू आवाजात बोलला,
“नाही. तुमच्यावर झालेल्या अत्याचाराची.”


त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून सखी गोंधळली. इथंवर सगळं ठीक होतं पण ज्या गोष्टी स्वतःशी देखील ती बोलली नव्हती, आता त्या सर्वांसमोर उघड करायच्या? विद्याची आधीच मानसिक तयारी झालेली पण लाजऱ्या सखीचं तसं नव्हतं.
सर्वांसमोर लाजेचा पडदा बाजूला सरायच्या कल्पनेनेच सखीला नकोसं झालं. तिचा चेहरा बावरला. डोळ्यांत पाणी आलं.‌


…………………..


सखी घरी आल्यापासून गप्प गप्प होती. आज पहिल्यांदाच पोलीस स्टेशनची पायरी चढलेली ती.. तिला सगळं पचवायला जड जात होतं. घरी आल्यावर सुद्धा ती तिच्याच कोशात होती.

ते नितीनला घेऊन आत मध्ये गेले. जमावला पाहून स्वतः पुढे आलेल्या इन्स्पेक्टरनी बलात्काराची केस म्हटल्यावर विषय त्यांच्या पद्धतीने हँडल केला.


कृष्णाने पुराव्या दाखल जमा केलेले मोबाईल त्यांच्या हातात दिल्यावर त्यांनी त्या व्हिडिओंवरून नजर फिरवली आणि स्वतःचे असे अश्लील व्हिडिओ जग जाहीर झाल्याने सखीला तिथेच पहिला मानसिक धक्का बसला. 


मग पुढे तक्रार देणं असेल, त्या दोघींचं मेडिकल असेल सगळी प्रोसिजर सखीने यंत्रवत केली. तिथलं सगळं उरकता उरकता त्यांना घरी यायला बराच उशीर झालेला. घरी आल्यावर भूक भूक करणारी मुले पाहून सखीने झटपट पिठलं भाकरी करायला घेतली.


धार काढायची वेळ चुकल्यामुळे रंगीही गोठ्यातून हंबरत होती. त्यामुळे सोनाई आणि कृष्णाने आपला मोर्चा तिकडे वळवला.

रंगीची धार काढणाऱ्या कृष्णाला सोनाईने वासराला गोंजारत विचारलं,
“किशना ऽ, त्यं टिवीत दाखावत्यात तसं त्यो काळ्या आता पुन्हा भायर न्हाय ना येनार?”


सोनाईकडे न बघताच कृष्णा धार काढत तिला समजावत बोलला,
“नाही आई ऽ, जाधव सर बोललेत, त्यांना सुद्धा त्याला कुठेतरी अडकवायचाच होता. त्यांचे सुद्धा तसेच प्रयत्न चालू होते. आपली केस मजबूत आहे, त्यात भर म्हणून त्याच्या मागच्या दोन विनयभंगाच्या केसेस सुद्धा जाधव सर चालू करणार आहेत. आता नितीन जेलची हवा खाणारच! तो काय आता बाहेर येत नसतो.”


धार काढून झाल्यावर दुधाचा टोप उचलून घरात जाताना सोनाई सखीचा उतरलेला चेहरा आठवून हळू आवाजात बोलली,
“पुरगीचा चेहरा पडलाय. काय लावून घेतलंय मनाला काय म्हायती.. जरा बोल तिज्याशी..”

“हम्म….. त्यांना तर आनंद व्हायला पाहिजे होता.. एवढं सगळं त्यांच्यासाठीच तर केलं.” कृष्णाही तिचा पडलेला चेहरा आठवून नाराजीने बोलला.

तशी सोनाई माघारी फिरली आणि हळू आवाजातच पण मोकळेपणाने बोलली,
“आता आसं तिज्यासमोर बोलू नगं.. सगळं तुज्यासाटी करून बी ताॅंड का पाडलयंस म्हनून.. न्हाय तं जीवाला लागंल तिज्या.”


कृष्णा लगेचच कपाळावर रेषा आणत बोलला,
“तुला काय वाटतं तुला एकटीलाच काळजी आहे काय त्यांची? मलाही कळतं.”

सोनाई मान हलवत हुंकारली,
“हम्म ऽ… लै कळतं.

..आणि गोठ्यातून बाहेर जाताना स्वतःशीच बडबडली,
“बायच्या मनातलं देवाला बी कळत न्हाय तं तुला काय कळायचं..”

दुधाची किटली हातात असलेला कृष्णा तिचं बोलणं ऐकून स्वतःशीच बोलल्यासारखा बोलला,
“दुसऱ्यांचं माहित नाही पण मला कळतात सखी. आतबाहेर एकच जशा... हसऱ्या, साध्या, मनमिळाऊ…”


तो घरात गेल्यावर सोनाई जागीच थांबून पुन्हा स्वतःशीच बडबडली,
“तुज्या मनाचा तुला थांगपत्ता हाये का? त्यं तिज्या मनाचा आंदाज लागायचा हाये? यडा नाऱ्या कुठला.”


‘नितीन प्रकरण’ कायमचं संपल्यामुळे कृष्णा आणि सोनाई मनापासून आनंदी होते पण सखीच्या उतरलेल्या चेहऱ्याने त्या दोघांना तो आनंद अनुभवता येत नव्हता फक्त ती शांत होती त्यामुळे घरामध्ये मुलांचा गोंधळ असूनही उदासीचं वातावरण होतं आणि मुलांमुळे त्या नाजूक विषयावर बोलण्यासाठी कृष्णा आणि सोनाईला हवा तसा एकांतही मिळत नव्हता.

गरमागरम पिठलं भाकरी खाऊन एकदाची मुले झोपली आणि सुरजला थोपटता थोपटता कृष्णा खोलीत तिची वाट पाहू लागला.

स्वयंपाकघरात सखीने गपचूप भांड्याचा पसारा गोळा केला आणि भांड्यावर बसली. एक नाही की दोन नाही. पहिल्यांदाच असं झालेलं त्या दोघी असताना सखी एक शब्दही बोलली नव्हती.


घरी आल्यापासून सखी स्वतः शांतच होती तरीही तिला शांत शांत असणारे सोनाई आणि कृष्णा प्रकर्षाने जाणवले कारण रोजच्यासारखं त्यांचं म्हाळसा म्हाळसा नव्हती की सखी सखी नव्हतं. त्या दोघांच्या अशा तुटक वागण्यामुळे सखी आतल्या आत जास्तच कुढत होती.

तिला गप्प गप्प पाहून सोनाईला एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटलं. तिने सखीच्या हाताला धरून तिला बाजूला घेतलं आणि काळजीने विचारलं,
“काय झालंय म्हाळसा? का आशी गपगप हायेस?”


आपला साबणाचा हात न्हाणीघरात धुताना सखीचे डोळे मघापासून आतल्या आत कुढून भरून आलेले. पदराने हात कोरडे करताना सखी पाठमोरीच दुःखाने बोलली,
“त्याला शिक्षा करायचीच होती पण…. पण….”

तिच्या दंडाला धरून स्वतःकडे फिरवत सोनाईने न कळून विचारलं
“पन काय?”

सखी रडवेली होत बोलली,
“झाकली मूठ उघड झाली आई… आता सगळ्यांना सगळं कळलं.”


सोनाई तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत बोलली,
“हा मग… खऱ्यानं आमरूत पिल्याल आसतं त्याला मरान हाये व्हय? आज ना उद्या त्यं समद्यांना कळनारच व्हतं की.”


सखी तिच्या मनीची सल उघडी करत रडवेली होत बोलली,
“आई ऽ, आता बायकां-बायकांमध्ये, घराघरांत माझाच विषय चालेल. सून म्हणजे घरची इज्जत  आणि इज्जतीवर आलं की थोडसं वाईट वाटतंच की.. बायकांमध्ये गेल्यावर तुम्हाला ही माझी लाज वाटेल ना आई… “


सोनाई ही भाऊकपणे तिचे डोळे पुसत बोलली,
“आगं काय बोलत्यास तू म्हाळसा? आनि कसली लाज? आगं तुज्या जागी माजी ल्यक आसती तं काय टाकली आसती व्हय तिला?”


“आई ऽ…. …”
सखी सोनाईचा हात हातात घेऊन हळवी होऊन बोलतच होती की सोनाई तिचे डोळे पुसत आईच्या मायेने स्वतःही भाऊक होत बोलली,
“आता काय बी बुलू नगं…पन यक ध्यानात ठ्यव म्हाळसा… आगं काय बी झालं तरी आय कधीच लेकराला टाकत न्हाय आनि तिजी माया कधीच कमी व्हत न्हाय.”


नेहमीप्रमाणे सखीला सोनाईचा खूप मोठा आधार वाटला आणि “आई ऽ ऽ….” पुटपुटत सखीने भाऊक होत सोनाईला मिठी मारली.


सोनाई तिच्या खरबडीत हातांनी सखीच्या पाठीवर थोपटत मायने बोलली,
“तू काल बी तशीच व्हतीस आनि आज बी तशीच हायेस… नगं लै इचार करू..”

सखी सोनाईपासून बाजूला होऊन मनापासून बोलली,
“थँक्यू आई…  खूप खूप थँक्यू.‌ तुम्ही माझा आधार आहात. कायम अशाच पाठीशी राहा.”


सोनाई तिचे डोळे पुसत थोडीशी हसून बोलली,
“जित्ती हाय तवर हायेच की मी तुला तरास द्याला.”

सखी किंचित हसली आणि सोनाई तिच्या तोंडावरून हात फिरवत बोलवली,
“दमलेस ना… जा पड आता… “

“पण भांडी……?”

सोनाई हसून बोलली,
“तुज्यासारखं मी भांड्याशी गप्पा मारत बसत न्हाय. मी बघते त्यांना..  तू जा पड..”

सखी अवघडून बोलली,
“पण आई ऽ….” 

लगेच सोनाईने आवाज वाढवला,
“जा म्हनले की गपगुमान जायाचं.”

सखी हसली. आल्यापासून विचार करून करून तिचं डोकं तसंही जड झालेलं. “येते.” बोलून सखी आपल्या खोलीत गेली.

सुरजला झोपवून कृष्णा कधीपासून सखीची वाट पाहत होता. बाहेर पावसाची रिमझिम बघत कृष्णाच्या नजरेसमोरून पोलीस स्टेशन मधील प्रसंग पुढे पुढे सरकत होता. जाधव सर प्रामाणिक, न्यायाने वागणारे त्यामुळे त्यांच्या सहकार्याने सगळं सुरळीत पार पाडलेलं.


नितीनला संतापाने थरथरत मारणारी सखी, कृष्णाच्या नजरे समोरून जात नव्हती. तिचा एवढासा देह तरी वीजेसारखा त्याच्यावर कोसळत होता.. मग असं असताना आज सखी खुष असायला हवी होती, आनंदी असायला हवी होती पण तसं नव्हतं. मघापासूनच ती अचानक गप्प झालेली. तिचा उतरलेला चेहरा पाहून कृष्णाचं मन कशातच लागत नव्हतं.


तो तिच्या विचारांत हरवलेला असताना दरवाज्याचा आवाज आला आणि कृष्णाने मागे पाहिलं. ती नेहमीसारखी खोलीत आली पण ती नेहमीसारखी नव्हती. 


सखीने दरवाजा आतून ढकलला आणि आपोआप नजर पलंगावर गेली. सुरजला एकटाच पलंगावर पाहून तिची नजर आपोआप खिडकीकडे धावली आणि दोघांची नजरा नजर झाली. लगेचच तिची नजर अवघडून खाली आली आणि सखी नजरेसारखीच अवघडलेल्या देहाने पलंगावर बसली.


सायंकाळी इथेच नितीनसोबतची अश्लील व्हिडिओ क्लिप आणि त्याच्यासोबत स्वतःला नको त्या अवस्थेत पाहिलेलं आठवून सखीला आता ही कसंसंच झालं.

जे तिच्या डोळ्यांना सहन झालं नाही तेच कृष्णाने पाहिलेलं, तिला नितीनसोबत तशा अवस्थेत पाहिलेलं.. आणि आता जाधव सरांनी पाहिलेलं.. पुढे जाऊन अजून कोणी पाहतील, या सगळ्यांचा विचार करून सखीला भरून आलं.‌ तिला लाजेने कुठे तोंड लपवू असं झालं.


पलंगावर बसलेल्या सखीकडे कृष्णा एकटक पाहत होता. दोन्ही हातांमध्ये गोधडी घट्ट पकडून तिची नजर सैरभर झालेली. मोठे श्वास घेऊन चेहरा रडवेला झालेला, जसं की ती आत्ता रडेल..  तिला काय झालंय? हे त्याला कळतच नव्हतं. नितीनला शिक्षा झाली याचा आनंद व्हायचा सोडून सखीची ही अवस्था?


कृष्णा लगेचच तिच्याजवळच जात काळजीने बोलला,
“काय झालंय सखी? तुम्ही बोलणार नाही मग मला कळणार कसं?”

नुकताच गालावर आलेला अश्रू गडबडीत पुसत सखीने खाली बघूनच ‘नाही’ अशी मान हलवली.
तिला आतल्या आत झुरताना पाहून कृष्णा हवालदिलपणे बोलला,
“सखी ऽ, त्याला शिक्षा भेटली याचा तुम्हाला आनंद नाही झालाय काय?”

सखीने भरलेल्या डोळ्यांनी समोर उभ्या असलेल्या एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खाली बघून मान होकारार्थी हलवली.

“मग काय झालंय? का रडताय तुम्ही?”
त्याने काळजीने विचारलं.


फक्त काही सेकंद पाहिलेल्या क्लिपमधील नितीनसोबतचे ते बिभत्सक क्षण नजरेसमोर येऊन सखी रडू लागली. तसा कृष्णा व्याकुळला.. तिच्या शेजारी बसून तिच्या दंडाला पकडून तिला आपल्याकडे फिरवत त्याने काळजीने विचारलं,
“काय झालंय सखी? बोला ना…”


सखी खाली बघूनच उसासा घेत बोलली,
“त्याला शिक्षा करण्यासाठी तुम्ही हे नव्हतं करायला पाहिजे.”

कृष्णा गोंधळून बोलला,
“काय केलंय मी?”

सखी नजर खाली ठेवूनच थरथरत्या ओठांनी दुःखाने बोलली,
“माझी इज्जत अशी चव्हाट्यावर आणली.”


“सखी ऽ ऽ ऽ…..?”
तिच्या बोलण्याने कृष्णाला धक्काच बसला. तिचे दंड दोन्ही हातांनी घट्ट पकडून तो काहीसा वेदनेने बोलला,
“काय बोलताय तुम्ही? मी असं करीन काय?”

त्याच्या नजरेला नजर देत सखी दुःखाने बोलली,
“तुम्ही ती व्हिडिओ…….”

.. बोलताना ते दृश्य नजरेसमोर येऊन सखीची नजर लज्जने झुकली आणि ती तशीच दुःखाने बोलली,
“जाधव सरांनी पाहिलं.. अजून कोण कोण पाहिलं.. श्शी ऽ ऽ….”


“सखी….!”
कृष्णा काही क्षण गोंधळला पण लगेचच स्वतःला सावरून तिला समजावत बोलला,
“जाधव सरांनी मनोरंजनासाठी नाही पाहिलं. तो पुरावा आहे सखी .. न्यायाधीश सुद्धा गरजेपुरतं पाहतील आणि ती आपल्या केसची गरज होती सखी.. फक्त तुमच्याच नाही तरं विद्याताईंच्या सुद्धा क्लिप त्यामध्ये….”

तो बोलता बोलता थांबला आणि सखीने पुन्हा दुःखाने त्याच्याकडे पाहिलं,
“तुम्ही तुलना करताय आमची?”


“नाही……  नाही सखी… पण तुम्ही समजून घ्या ना.. तुम्ही तर किती समजूतदार आहात.” कृष्णा काकुळतीला येऊन बोलला.


सखी आपला ओठ दातात घट्ट दाबून आवंढा गिळण्याचा प्रयत्न करत होती. तिला खूप काही बोलायचं होतं पण तिचा हुंदका तिला बोलू देत नव्हता. हुंदका आतल्या आत दाबण्याचा प्रयत्न करण्याने सखी मोठे श्वास घेऊ लागली. तिला अशी रडताना पाहून कृष्णाने स्वतः तिला छातीशी कवटाळलं आणि व्याकुळतेने बोलला,
“तुम्ही रडू नका काय… तुमच्या डोळ्यांतील अश्रू त्रास देतात मला.”

त्याच्या कमरेला हातांचा वेढा देऊन सखी आपला हुंदका मोकळा सोडून रडू लागली. ती रडत कशीतरी  बोलली,
“त्याला शिक्षा करण्यासाठी तुम्ही मला सुद्धा शिक्षा दिली क्रिष्ण्….”


तिचे बोल कृष्णाच्या मनाला लागले आणि आपसूकच त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. सगळं चांगलं करताना आणि तिच्यासाठीच करताना तीच दुखावली गेलेली.

‘आपण तिला गृहीत धरायला नव्हतं पाहिजे.. एकदा तिला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. तिची त्यासाठी परवानगी घ्यायला हवी होती. कदाचित तेव्हा तिला इतका त्रास नसता झाला.’ कृष्णाला जाणीव झाली पण वेळ निघून गेलेली.

तिच्या डोक्यावरून हात फिरवीन कृष्णा जड स्वरात बोलला,
“मला माफ करा सखी… मी तुमच्या बाजूने विचार केलाच नाही.”


सखी रडतच बोलली,
“प्लीज माफी मागून मला लाजवू नका… तुमचे अगणित उपकार आहेत माझ्यावर.. माफी मागून मला अजून छोटं करू नका क्रिष्ण्.”

“अशी उपकारांची भाषा करून मला परक करू नका सखी..” तो ओघानेच दुःखाने बोलला.

सखी रडता रडता अजूनच त्याला घट्ट बिलगली आणि डोळे मिटून त्याच्या छातीवर डोकं ठेवून तिचं स्त्री दुःख बाहेर काढू लागली,
"खरं सांगा.. मला त्याच्यासोबत त्या अवस्थेत पाहिल्यावर… श्शी ऽ….” पुढे तिची जीभ उचललीच नाही.

ती बोलल्यावर त्याच्या नजरेसमोर त्या व्हिडिओ मधील भ्यायलेली, रडणारी, त्याचा अत्याचार घाबरून सहन करणारी सखी आली आणि
कृष्णा तिच्या डोक्यावरून हात फिरवत वेदनेने बोलला,
“तुमच्यावर झालेल्या अत्याचार बघून मी पुढे बघूच शकलो नाही आणि त्या अवस्थेत तर नाहीच नाही.”


त्याने काही पाहिलं नाही या एका विचाराने तिला किती दिलासा मिळाला पण तरीही गाव बोभाटा झाल्याचे दुःख तिच्या उरी होतच. त्याच्या मिठीत सखी डोळे बंद करूनच उसासे देऊन बोलली,

“उद्यापासून पारापारवर फक्त माझाच विषय असेल. तुम्हाला गावात किती इज्जत.. किती मानसन्मान… पण माझ्यामुळे…. साॅरी!”

तिला घट्ट मिठीत घेऊन कृष्णा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला,
“तुम्ही लयीच वाढीव विचार करताय सखी.. आपण नको तिथं जगाचा विचार करत नसतो.”


“तरी ही….”


“श्श ऽ ऽ…. शांत व्हा…”
तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो जड आवाजात..


त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे बंद करून त्याच्या मिठीत सखी हळूहळू शांत झाली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो प्रेमाने तिला समजावत होता,
“आता शेवटचा घाव होता, तो सुद्धा झाला त्यामुळे इथून पुढे तुमच्या आयुष्यात अश्रूंना जागा नाही. तुमच्या डोळ्यांत पाणी नाही आलं पाहिजे आता..”


“हम्म ऽ…” ती डोळे मिटूनच हुंकारली. त्याची मिठी ही तिच्यासाठी तिच्या सुखाचा ठेवा होता. कसल्याशा भीतीने हळूच मान वर करून त्याच्याकडे बघत सखी बारीक चेहऱ्याने बोलली,
“क्रिष्ण् ऽ ऽ….”


“हम्म ऽ…?” तिच्याकडे प्रेमाने बघत तो हुंकारला.


कपाळावर हलकीशी रेषा आणत त्याच्यापासून दूर जाण्याच्या भीतीने सखी पुन्हा बारीक चेहऱ्यानेच बोलली,
“तुम्ही मला सोडून तरं जाणार नाही ना?”


तो किंचित हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने बोलला,
“वेडाबाई! तुम्हाला सोडून कुठं जाऊ?”

“मला माझीच भीती वाटते क्रिष्ण् ऽ…” सखी ओठांत पुटपुटली आणि पुन्हा त्याला बिलगली. त्याच्या मिठीत असतानाही उगाचच तिचे डोळे पाझरत होते. तो मात्र तिला अलवार थोपटत राहिला.

काही वेळाने स्वेटर घातलेला नसताना.. गोधडी अंगावर नसताना.. त्याच्या मिठीच्या उबेने सखी त्याच्या कुशीत झोपी गेली.

तिचा सगळा भार अंगावर आल्यावर ती झोपी गेलीये हे त्याला जाणवलं पण ती इतक्या हक्काने त्याच्या मिठीत विसावलेली की तिला आपल्यापासून त्याला दूर करावसंच वाटलं नाही. तिला तशीच मिठीत घेऊन तो पलंगावर हळूच आडवा झाला.

तिची झोप लागली तरी नाजूक ओठांची उसासे देताना अचानक थरथर होत होती. रडल्यामुळे गालांवर ओलाई ही तशीच होती. पातळसर पापण्यांमध्ये पाणी चकचकत होतं.‌

तिला एका हाताने मिठीत घेऊन तो अलगद तिचे गाल कोरडे करत पुटपुटला,
“त्या व्हिडिओच्या नादात नितीनला शिक्षा दिल्याचा आनंद तुम्हाला अनुभवताच आला नाही सखी..”

खिडकीतून आलेल्या थंड हवेच्या झुळकीमुळे सखी  उबेसाठी झोपेतच त्याला लहान मुलासारखी बिलगली.‌ तिच्या स्पर्शात जादू होती ज्यामुळे तिच्यावरची नजर क्षणभर सुद्धा न हटवता कृष्णाने गोधडी अंगावर पांघरली आणि झोपेतही उसासा देणाऱ्या तिच्या डोक्यावर अलगद हात फिरवत हळूहळू तो ही झोपेच्या अधीन झाला.

© प्रियांका सुभा कस्तुरी
०७/०७/२०२४

........

(मी मुद्दामून नितीनचा पोलीस स्टेशन मधील प्रसंग गाळला कारण ती प्रोसिजर आपल्याला सगळ्यांनाच माहीत असते. गुन्हा केला म्हटल्यावर शिक्षा तर भेटणारच पण कथेमध्ये लिहिताना त्यात अजून मला एक दोन भाग करायचे नव्हते त्यामुळे थोडक्यात उरकलं.

.. आणि भाग का उशिरा आला? तर माझी तब्येत सध्या ठीक नाहीये.. त्यामुळे जोपर्यंत पूर्णपणे कव्हर होत नाही भाग असेच वेळी वेळी अनियमित येत राहतील त्यासाठी मी दिलगीर आहे.. आशा आहे तुम्ही समजून घ्याल.

भाग आले तर दररोज सुद्धा येतील त्याची काळजी नसावी परंतु येतीलच अशी शाश्वती मी सुद्धा देऊ शकत नाही, एवढंच!

भागाबद्दल बोलाल ही अपेक्षा!

भेटू लवकरच!)

🎭 Series Post

View all