पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१९०

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१९०


तिला एका हाताने मिठीत घेऊन तो अलगद तिचे गाल कोरडे करत पुटपुटला,
“त्या व्हिडिओच्या नादात नितीनला शिक्षा दिल्याचा आनंद तुम्हाला अनुभवताच आला नाही सखी!”


खिडकीतून आलेल्या थंड हवेच्या झुळकेमुळे सखी उबेसाठी झोपेतच त्याला लहान मुलासारखी बिलगली.‌ तिच्या स्पर्शात जादू होती ज्यामुळे तिच्यावरची नजर क्षणभर सुद्धा न हलवता कृष्णाने गोधडी अंगावर पांघरली आणि झोपेतही उसासा घेणाऱ्या तिच्या डोक्यावर अलगद हात फिरवत हळूहळू तो ही झोपेच्या अधीन झाला.


एका कुशीवरच त्यांची रात्र उजाडली. पहाट झाली. सकाळ झाली तरी सुद्धा दोघेही गाढ झोपेत होते.‌ बाहेर सोनाईने नेहमीसारखी उठून चूल पेटवली. पाणी तापत ठेवलं. स्वयंपाकघरातून केरसुणी फिरवली तरीही सखी उठली नव्हती. कृष्णाची वाट बघून सोनाईने धार काढली. अंघोळ उरकून घेतली तरीही दोघांचा अजून पत्ता नव्हता.


सखीला उशीर व्हायला नको म्हणून सोनाईने दुसऱ्या चुलीवर भाजी करायला घेतली आणि चूलीजवळ पसरलेल्या मनीकडे बघून ती विचार करत बडबडली,
“मने, रातच्याला तं लवकर झोपल्यालीत तरी बी का गं यळ झाला आसंल?”

मनी हातपाय पसरून जांभई देत ओरडली,
“म्या ऽ ऊ ऽ.”

सोनाई मनीकडे बघून हसली,
“तुला बी त्यच वाटतंय ना? ज्यं मला वाटतंय?”

मनी आपली शेपटी हलवत पुन्हा ओरडली,
“म्या ऽ ऊ ऽ.”

मनीच्या डोक्यावर बोटाने टिचकी मोरत सोनाई कुरकुरली,
“तुज्या पोटात तं सारखाच भुकनं खड्डा पडल्यालो आसतो. थाम देते दूद.”


ज्यांच्या उठण्याची सोनाई वाट पाहत होती. ते दोघे एकमेकांच्या मिठीच्या उबेने गाढ झोपी गेलेले.‌ झोप पूर्ण झाल्यावर सखी आरामात झोपेच्या उंबरठ्यावर आली. झोपेतही तिला पायांवर नेहमीसारखंच ओझं जाणवलं. तो आसपास असल्याची जणू खुणच होती ती! ज्यामुळे ती झोपेतही गालात हसली. झोप पूर्ण झाल्याने तिने हलकेच डोळे उघडले पण नेहमीप्रमाणे सुरजच्या केसांऐवजी कृष्णाच्या मानेवर तिची नजर गेली. तिने थोडं वर पाहिलं तरं तिच्या श्वासांच्या दूरीवर कृष्णाचा शांत झोपलेला चेहरा!


स्वतःला त्याच्या मिठीत बघून ती साखर झोपेत असल्यासारखी स्वतःशी हसली,
'कृष्णा! किती रे सुंदर स्वप्न!’

मान वर केल्यामुळे तिच्या कपाळावर त्याचे लयीत येणारे श्वास जाणवू लागले तशी सखी गुदगुल्यांनी गालात हसली पण लगेचच तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. थोडा मानेला त्रास देत इकडे तिकडे पाहिलं आणि आपण खरंच कृष्णाच्या मिठीत आहोत, हे कळल्यावर तरं तिची झोपच उडाली!


‘कधी? कसे?’ तिला काहीच आठवत नव्हतं. उगाचच सकाळी सकाळी तिच्या काळजाचा वेग वाढला. त्याच्या कमरेवरचा आपला हात काढण्याचा तिने प्रयत्न केला पण तिच्यावरून आलेल्या त्याच्या हाताने तिचा हात हलला देखील नाही. ती पूर्णपणे त्याच्या बाहूपाशात कैद होती.

‘त्याच्या मिठीतून त्याच्या इच्छेशिवाय सुटका नाही’, हे माहीत असल्यामुळे तिने तिचे चिमणीचे प्रयत्न करणे थांबवले आणि डोळे झाकून घेतले.


आतमध्ये झोपेचं सोंग घेतलेल्या सखीला बाहेरून आरोळी ऐकू आली,
“किशनाची आय ऽ ऽ.”

सोनाईने स्वयंपाकघरातून लगेच सूर ओढला,
“कोन गं ऽ? यं की आत.”


वासंती टोप घेऊनच स्वयंपाकघरात जात बोलली,
“नाचनीच पीठ हाये का वं? माजं संपलंय.”

“शिंदूर लावल्याला डब्यात हाये. घे हातानं.”

“तुम्ही भाकरी टाकताय आनि सखी कुठं गिली?”
वासंतीने सहजच विचारलं.


तिचा प्रश्न ऐकून ‘उठायला उशीर झालाय’ हे कळल्यावर इकडे सखीच्या काळजात धडकी भरली आणि सोनाई नेहमीसारखी सहजच बोलली,
“आंगूळीला गेल्या.”

‘कृष्णा ऽ फारच उशीर झाला का रे? उठवणारे क्रिष्णना. ते उठल्याशिवाय मी कशी उठू? तू पण ना, प्रत्येकवेळी फसवतोस मला.’ सखी मनातच बडबडली.

..आणि बाहेरून पुन्हा आरोळी आली,
“किशनाची आय ऽ आयतवारी (रविवारी) घालीन हा पीठ.”

“कदी बी घाल ऽ पन मागाय लाव नग.”
स्वयंपाकघरातून पुन्हा सोनाईचा आवाज बाहेरच्या दरवाजापर्यंत पोहोचला आणि इकडे कृष्णा सोनाईच्या आवाजाने गजर लावल्यासारखा जागसूद झाला. झोपेच्या उंबरठ्यावर ही त्याला तिची नाजूक मिठी जाणवली आणि त्याने डोळे किलकिले करून डोळ्यांना त्रास दिला पण तो त्रास त्याच्या डोळ्यांना फारच आवडला. नजर उघडताच नजरेला सखीचा शांत चेहरा भावला. डोळे बंद करून ते किती शांत झोपलेली.


त्याची हालचाल झाल्यावर सखीला जाणवलं, तो जागा झालाय. अजून उशीर करून चालणार नव्हतं. आधीच उठायला तिला खूप वेळ झालेला पण त्याच्या मिठीचा नाजूक गुंता तिच्याच्याने सुटत नव्हता.

तो पाहत असेल, हे स्वीकारूनच तिने हिंमत करून लाजेने हळूहळू डोळे उघडले आणि तिच्याकडे हरवून पाहणाऱ्या कृष्णाकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि एकमेकांना एकमेकांच्या मिठीत पाहून दबक्या पावलांनी अवघडलेपण हळूच डोकावलं.

अवघडलेपणामुळे दोघांच्याही काळजाचा वेग समान वेगाने ऐकू येऊ लागला. तिला तशीच मिठीत घेऊन कृष्णा बावरलेल्या मनाने तिच्या डोळ्यांत आळीपाळीने बघत हळू आवाजात अस्थिरपणे बोलला,
“ते ऽ ऽ, ते काल रात्री झोप कधी लागली कळलंच नाही!”

सखी ही नजर चोरत बोलली,
“मलाही!”

तो गोड अपघात जसा की हवाहवासा होता त्यामुळे
ते दोघेही एकमेकांच्या मिठीत कसे आले? हा प्रश्न दोघांसाठी सुद्धा आता गौण होता.


बावरलेली मने अवघडल्याने जास्तच बावरली. मिठीचा मोह त्यांच्या देहासोबत मनाला ही खुणावत होता. नजरा सैरभैर झालेल्या असताना प्रत्येक सेकंद जणू त्यांना अजून लाजवत होता. गालात अवघडलेलं लाजरं हसू दबक्या पावलांनी येऊ पाहत होतं. ते जागेपणीचे काही क्षण दोघांच्या मनीचं गूज ओळखून जसे की मंतरल्यासारखे निसटून जात होते.


“मने व्है की तिकडं.. चूलीफुडं कडमाडतेस कशाला?” सोनाईचा आवाज आला आणि सखीला त्या मंतरलेल्या क्षणांतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला. सखी नजरचोरून खाली बघत लाजून कशीबशी पुटपुटली,
“मला गेलं पाहिजे!”

तो फसलेल्या भावनांना सांभाळत बावरून हुंकारला,
“हम्म ऽ.”

तिच्यावरची नजर हटवत कृष्णाने तिच्या कमरेवरचा हात अलगद काढला पण साडीने जागा सोडल्याने कमरेचा मुलायम स्पर्श झालाच आणि त्या स्पर्शाने सकाळी सकाळी उगाचच त्याच मन बावरलं. आपला पाय एवढा वेळ कुठे आहे, हे लक्षात येताच त्याने पटकन तिच्या पायावरचा पाय बाजूला काढला आणि त्या नाजूक क्षणांमध्ये गुरफटून, बावरून मागे होणार एवढ्यात पाठीला सुरूजचं डोकं लागलं. पुढ्यात सखी आणि पाठी सुरज त्याला हलायला सुद्धा जागा नव्हती त्यामुळे तो पुतळ्यासारखा अवघडून कुशीवर पडून राहिला.

त्यांच्या मिठीची धुंदी दोघांवरही सारखीच पसरलेली त्यामुळे सकाळी सकाळीच दोघांचही डोकं कामातून गेल्यासारखं झालेलं. दोघेही जागे होते. दोघांनाही एकमेकांचे श्वास जाणवत होते. हृदयाची धडधड घेऊन दोघेही एकमेकांपासून नजर चोरत होते, हेच ते मोहक क्षण!


त्याच्या कमरेवरच्या ओझरत्या स्पर्शाने नखशिखांत शहारलेली सखी लाजून स्वतःशीच पुटपुटली,
“फारच उशीर झाला!”


त्याने मोकळं केल्यावरही मागे पलंग संपल्यामुळे सखी अजूनही त्याच्या उबेलाच होती. काही बोलण्याच्या अवस्थेत ती नव्हतीच. पर्याय नसल्याने त्याच्याकडे बघायचं टाळत त्याला पकडूनच ती उठून बसली. बावरलेल्या मनासोबत अंगावरची गोधडी बाजूला करून तिने पाय खाली सोडले आणि साडीची अवस्था पाहून ती स्वतःशीच लाजली. तिच्या साडीला त्याच्या पायाचा भार सहन झाला नव्हता.

‘आधीच उठायला इतका उशीर झालेला आणि अशा अवस्थेत बाहेर गेले तरं—’ सखी विचारानेच लाजली. सोनाई भलताचा अर्थ लावेल याची तिला खात्रीच होती जणू!


पलंगावरून उठून आपली अर्धवट सुटलेली साडी सांभाळत डोळे बंद करून लाजलेल्या आवाजात मजबुरीने तिने कृष्णाला आवाज दिला,
“क्रिष्ण् ऽ ऽ.”

तिची लाजेने लाजलेली नाजूक हाक सरळ त्याच्या काळजात गेली आणि काळजाची तार छेडूनच बाहेर आली. आपल्या श्वासांचा वेग सांभाळत तो पाठमोऱ्या तिच्याकडे बघून,
“काय?”

सखी डोळे बंद करून लाजूनच कशीतरी बोलली,
“प्लीज, तिकडे फिरून पडता का?”

‘काय कारण?’ असं सवयीने त्याला विचारावं वाटलं पण तिच्या देहाची गंध अजून श्वासांत असताना अशा नाजूक प्रसंगी तिची लाजरी आर्जव तो नाकारेल कसा!

नवऱ्यासारखा फील येऊन तो लगेचच गालात हसतच पाठमोरा झाला. सखीने एकदा हळूच तिरप्या नजरेने मागे पाहिलं आणि लाजून साडी सावरू लागली.

निऱ्या करताना होणारा त्याच्या आवडीचा तो लयबद्ध काकणांचा आवाज ऐकून आधीच कामातून गेलेलं कृष्णाचं मन पुरतं वेडावलेलं. तनामनात फक्त सखी, सखी आणि सखीच उरलेली! तो पाठमोराच गालात हसत होता.


मन थाऱ्यावर नसताना कशातरी तिने बोटांमध्ये निऱ्या पकडून नेहमीच्या ठिकाणी खोवल्या आणि
“झालं!” असं स्वतःलाही ऐकायला जाणार नाही इतक्या हळू आवाजात पुटपुटली.

उर्वरित भाग पुढे-

© प्रियांका सुभा कस्तुरी
१२/०७/२०२४

………

खूप वेळ वाट पाहायला लागला त्यासाठी साॅरी! पण लिहिण्यासाठी कंडिशन नव्हती, असो!

हा भाग कसा वाटला जरूर कळवा आणि सगळ्यांचा नेहमीचा प्रश्न-

कृष्णाला कधी त्याच्या मनाची अवस्था कळेल? तर कळेल आता पुढच्या भागात!

भेटू लवकरच!