पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१९१

कृष्ण सखी
कृष्ण सखी-१९१

नवऱ्यासारखा फील येऊन तो लगेचच गालात हसतच पाठमोरा झाला. सखीने एकदा हळूच तिरप्या नजरेने मागे पाहिलं आणि लाजून साडी सावरू लागली. निऱ्या करताना होणारा त्याच्या आवडीचा तो लयबद्ध काकणांचा आवाज ऐकून आधीच कामातून गेलेलं कृष्णाचं मन पुरतं वेडावलेलं. तनामनात फक्त सखी, सखी आणि सखीच उरलेली! तो पाठमोराच गालात हसत होता.


मन त्याच्याभोवती लाजून घुटमळत असताना थाऱ्यावर नसलेल्या मनासोबत कशातरी तिने बोटांमध्ये निऱ्या पकडून नेहमीच्या ठिकाणी खोवल्या आणि “झालं!” असं स्वतःलाही ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात पुटपुटली.


आपली साडी चाचपडत सखी आपल्याच धुंदीत स्वयंपाकघरात गेली.‌ ती गेल्याच जाणवताच कृष्णाने एकदा मागे वळून पाहिलं आणि स्वतःशीच हसत सुरजला कुशीत घेऊन त्याच क्षणांमध्ये गुंग झाला.


सखी स्वयंपाकघरात आली तेव्हा सोनाईची शेवटची भाकरी तव्यात होती. उठायला खूपच उशीर झाला हे ओळखून सखीने तोंड पाडून लांब सुरू ओढला,
“आई ऽ ऽ ऽ ऽ.”


तिचा सूर बघूनच सोनाई हसत बोलली,
“आसू दे, गारठ्यात न्हाय पाॅरांचा डोळा उघडत आनि म्हाताऱ्यांना झाॅप न्हाय लागत. पानी तापलंय. जा आंगूळ उरकून घे.”

सोनाईला हसत बोलताना पाहून सखीच्या मनावरचं ओझं उतरल आणि ती हसतच अंघोळीला गेली. त्याच्या मिठीची ऊब, त्यांचं लाजरं बोलणं, ते हवेहवेसे क्षण तिथेही तिच्या भोवती रुंजी घालत होतेच!

स्वयंपाक उरकल्यावर सोनाईने पुन्हा स्वयंपाकघरातून केरसुणी फिरवली आणि सखीची वाट बघू लागली. एरवी शाळेत जाण्याच्या गडबडीत अंघोळ उरकून येणारी सखी आज अजून आली नव्हती. कृष्णाही उठला नव्हता.


‘दोघांचं पन आरामात चाललंय. शाळंला सुट्टी हाये का काय?’ सोनाई स्वतःशीच बडबडली आणि दुधाच्या गाडीचा हॉर्न ऐकू आल्यावर दुधाची किटली घेऊन दूध घालायला गेली.


सोनाई दूध घालून आल्यावर तिने डोक्यालाच हात लावला. सखीची आंघोळ अजून झाली नव्हती! कृष्णाही अजून पलंगावरच लोळत होता!


सोनाई चुलीपुढे बसत दुधाची वाटी फस्त केलेल्या मनीकडे बघून नवलाने बोलली,
“मने, शाळंला सुट्टी हाये व्हयं गं?”

पोट भरलेली मनी आरामात कुशीवर पडून हळूच ओरडली,
“म्या ऽ ऊ ऽ.”

“मला बी कळना. दोघंबी लैच निवांत हायेत.” सोनाई हसत बोलली आणि न्हाणीघरातून सखी अंघोळीचा टॉवेल मानेवरून फिरवत स्वयंपाकघरात आली. ती आल्याबरोबर साबणाचा सुगंध स्वयंपाकघरात पसरला आणि सोनाई मनीला हसत बोलली,
“मने, मालकीनीनं साबनाची वडी संपावली वाटतं.”


सखी सोनाईकडे बघून हसतच हाताचा सुगंध श्वासांत भरत ओटीवर जाणार आणि कृष्णा स्वतःच्या नादात स्वयंपाकघरात येणार एकच वेळ! दरवाजात दोघेही आत-बाहेर येताना धडकणार इतक्यात सावरले. सखी आतमध्ये तरं कृष्णा चौकटीच्या बाहेरच राहिला.


एकमेकांकडे पाहताना मिठीचा दरवळ मनावर असताना दोघांच्याही चेहऱ्यावर हळूच हसू उमटलं. दोघेही गालात हसत एकदम डावीकडे झाले मग एकदच उजवीकडे झाले मग पुन्हा एकमेकांकडे बघून गालात हसले.

नुकत्याच न्हालेल्या तिच्या देहाचा गंध दुरूनच श्वासांत भरत तो गालात हसत बोलला,
“अंघोळ झाली वाटतं!”


सखी हातातील ओल्या टॉवेलकडे बघत हुंकारली,
“हम्म ऽ.”


तिच्याकडे बघत तो दुसऱ्या बाजूने आतमध्ये जाणार आणि टाॅवेलकडे बघत ती ही त्याच बाजूने बाहेर येणार एकच वेळ! पुन्हा धडक होता होता दोघेही हसतच मागे सरले. कृष्णा मोकळेपणाने हसत बोलला,
“आज काय खरं नाही बाबा! धडक होतेच वाटतं!”


सखी गालात हसली,
“तुम्ही या ना.”


तो ही गालात हसत,
“अं ऽ हं ऽ. तुम्ही आधी आलेला ना! मग तुम्ही जा.”


सखी हसली,
“तुम्हाला अजून आवरायचं आहे ना? या तुम्ही.”


कृष्णाही गालात हसत बाजूला होत बोलला,
“लेडीज फर्स्ट असतंय! या तुम्ही!”


सखी लाजरी हसत दरवाजावर बोटाने नक्षीकाम करत बोलली,
“घरी नसतंय तसलं काही! या तुम्ही!”


सोनाई त्या दोघांकडे बघत तोंडाला पदर लावून खुदुखुदु हसत होती.


तिच्या गंधाने वेडावलेलं मन सावरत कृष्णा हसत माघारी फिरला आणि दिंडीच्या दरवाजाने बाहेर गेला. तो गेल्यावर सखीही हसतच माघारी फिरली. तिने हातातील टाॅवेल कोपऱ्यातील कमरेएवढ्या न्हाणीघराच्या कट्ट्यावर पसरला आणि पुन्हा हसतच ओटीवर गेली.


ती इकडून बाहेर गेली आणि तिकडून स्वयंपाकघराच्या मागच्या चौकटीतून कृष्णा आतमध्ये आला. सोनाई दोघांचा वेडेपणा बघून हसत होती.


उशीर झाल्याने सोनाईने मुद्दामून विचारलं,
“किशना ऽ, आंगूळ?”


“ही काय करतोय की!” कृष्णा हसतच पाणी उतरत बोलला आणि लगेच अंघोळीला गेला.


सोनाई स्वतःशीच हसत बडबडली,
“लैच गुडीला आलीतंय! आज शाळंत जातीतं वाटतं!”


न्हाणीघरात गेल्यावर कृष्णाने टाॅवेल दोरीवर लटकवला आणि तिथं सखीची आठवण प्रकर्षाने करून देणाऱ्या, आपल्या सुवासाने न्हाणीघरात दरवळणाऱ्या त्या ओलसर अंघोळीच्या साबणाच्या वडीला त्याने प्रेमाने हातात घेतलं. नुकत्याच सखीच्या सर्वांगाला स्पर्शलेल्या त्या साबणाच्या वडीकडे पाहताना कृष्णाच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू होतं. तो सुगंध श्वासांत भरत कृष्णा तीचं साबणाची वडी आपल्या देहावरून फिरवत अंघोळीच्या कार्यक्रमाचा आनंद घेत गुणगुणत होता,

बडे ऽ अच्छे ऽ लगते ऽ हैं…
ये धरती ऽ ऽ…..
ये नदियाॅं ऽ ऽ…. ये रैना ऽ ऽ….
और तु ऽ म ऽ…….


कृष्णा अंघोळीचा यथासांग कार्यकम आटोपत होता तोपर्यंत सखीने केसांची वेणी घातली आणि सोनाईने केलेला चहा स्वयंपाकघराच्या दरवाजात उभी राहून दूरवर दिसणारे धबधबे पाहत आरामात फुंकून फुंकून पिऊ लागली. एरवी अंघोळ उरकून आल्यावर सखी आणि सोनाईच्या गप्पा व्हायच्या पण आज सखीने सोनाईला सपशेल दुर्लक्षित केलेलं. ती स्वतःच्या तंद्रीत होती. चहा पिताना समोरच्या डोंगरावरचे ठराविक अंतर सोडून दिसणारे ते धबधबे पाहताना ती हरवली होती.


स्वयंपाकघराच्या चौकटीतून तसे तरं दररोज दिसणारे पण ते धबधबे आजच तिला खुणावत होते. कृष्णाचा हात हातात घेऊन त्या धबधब्यां खाली येथेच्छ भिजावं. आपण भिजता-भिजता त्यालाही भिजवावं. त्याच्यासोबत खळखळून हसावं. पुन्हा लहान व्हावं, या विचारांमध्ये चहा थंड झाला तरी तिचं फुंकर घालून मध्येच एखादा खोट घेणं चालूच होतं.


न्हाणीघराचा दरवाजा उघडल्यावर सखीने तिरप्या नजरेने पाहिलं. त्याला टाॅवेलवर पाहून स्वतःशीच लाजत ती चटकन स्वयंपाकघरात गेली आणि पाठमोरी उभी राहून पदराने कपाटावरच्या वाट्या पुसू लागली.‌ काही क्षणांतच कृष्णा स्वयंपाकघरात आला पण सखीला पाठमोरी पाहून त्याचे पाय तिथेच जडावले. तिच्याशी बोलण्याचा मोह आवरत तो हसतच आपल्या खोलीत निघून गेला. तो मागून जाताना त्याच्या गरम देहाभोवतीची ती उष्ण हवा, तो सुगंध काही काळ पाठीमागे घुटमळल्याच जाणवतात सखी पाठमोरी स्वतःशीच हसली.


सोनाई हसतच दोघांना बघत होती. त्यांचे नजरेचे खेळ बघताना तिलाच गुदगुल्या होत होत्या. कधी एकदा ही ताजाखबर नानाला सांगते असं तिला झालेलं.


“बडे ऽ अच्छे ऽ लगते ऽ हैं…”
गुणगुणतच कृष्णा आपलं आवरून पुन्हा स्वयंपाकघरात आला. सखी नव्या नवरीसारखी पाटावर गुडघ्याला हातांचा वेढा देऊन गालात हसत कुठेतरी हरवल्यासारखी बसलेली.


त्याच्याकडे पाहणाऱ्या सोनाईला दुर्लक्षित करून कृष्णा सखीसमोर चवड्यावर बसून चुटकी वाजवत हसत बोलला,
“ओ ऽ समाधी!”

सखी दचकून हसली आणि कृष्णा हसतच बोलला,
“निघायचं नाही काय?”

“तुमचीच वाट बघत होते.” सखी हसून बोलली आणि दोघेही उठले की सोनाई लगेचच ग्लासमध्ये दूध ओतत बोलली,
“दूद घे की थाम जरा.”

तिच्या सहवासानेच मन भरलेला कृष्णा निघण्याच्या तयारीत बोलला,
“उशीर होईल. राहू दे आता. आल्यावर पितो.”


'धा वाजल्यातरी टंगळमंगळ करतीय आनि दूद प्याला उशीर व्हतोय.’ सोनाई मनातच कुरकुरली आणि त्या दोघांचाही मूड लयीच चांगला होता म्हणून ती ही जराशी नरमाईनेच बोलली,
“सोमटवनी(कोमट) हाये. पान्यावानी पिऊन टाक. न्हाय व्हत उशीर.”


“घ्या ना दूध.” सखीही आग्रहाने बोलली मग कृष्णाने दूधाचा ग्लास घेतलाच आणि कोमट दूध मिनिटांत संपवून सखीची डब्याची पिशवी घेऊनच सरळ बाहेर निघत बोलला,
“चला आता.”


“येते हां आई ऽ.” सोनाईचा निरोप घेऊन सखी नेहमीसारखी निघाली. दोघांनीही भिंतीवरच्या घड्याळावर नजर टाकली नव्हती हे विशेष! आठचे दहा वाजलेले तरीही दोघे आठच्याच दिमाखात रमत-गमत वागत होते. ते अंगणातून पुढे गेले की सोनाई डाराडूर पडलेल्या मुलांच्या मागे लागली.


बांधावरून पुढे गेल्यावर कृष्णाने नेहमीसारखा तिचा हात हातात घेतला पण आज दोघांचीही बोटे एकमेकांत जाणूनबुजून गुंफत होती. ती होणारी हालचाल दोघांनाही चलबिचल करत होती. आज त्यांच्यात नेहमीसारख्या गप्पा नव्हत्या पण मधूनच होणारी नजरानजर, हाताला जाणवणारा स्पर्श, यातूनच फुलनारा त्यांचा अबोल संवाद दोघांनाही खुलवत होता.


तिचा हात हातात घेऊन कृष्णा आताही आपसूकच अंतर्मनात रुंजी घालत असलेलं तेच गाणं गुणगुणत होता,
“बडे ऽ अच्छे ऽ लगते ऽ हैं…
ये धरती ऽ.. ये नदियाॉं ऽ …
हम्म ऽ… हम्म ऽ… हम्म ऽ….
और तुम ऽ ऽ…..”


‘तो फक्त आपल्यासाठी गुणगुणतोय. त्याच्या ओठांतून निघणारा प्रत्येक शब्द फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आहे’ या विचाराने सखीला गुदगुल्या होत होत्या.


सपाटीवर जाईपर्यंत वातावरण बदललं आणि आभाळ दाटून आल्यासारखं झालं. कृष्णाने वर पाहिलं आणि आपल्या हातातील पिशवीवर नजर टाकत बोलला,
“आज छत्री राहिली वाटतं. पाऊस येऊ नये म्हणजे झालं.”


सखी याउलट तिच्या कृष्णाला आनंदाने मनात बोलली,
‘कृष्णा, छत्री नाहीये. पाऊस आला तरं किती मजा येईल रे!’


सखीच्या काळजीने कृष्णा वेगाने पाय उचलत बोलला,
“पाय उचला सखी, पाऊस आला तरं भिजू आपण.”


सखी वर आभाळाकडे बघत बोलली,
“येऊ द्या ना मग.. भिजूया आपण.”


कृष्णा चालता चालता तिच्याकडे बघून हसला,
“आजारी पडायचा आहे काय?”


सखीही त्याच्या इतकीच हट्टीपणा दाखवत त्याचंच वाक्य त्याच्याच सुरात बोलली,
“आपण एवढंस भिजल्यावर आजारी पडत नसतो.”


कृष्णा पुन्हा हसला,
“व्हयं काय? पण नाजूक माणसं लगेच शिंकायला लागतात त्याचं काय?”


सखी हसली आणि तशीच हट्ट करत बोलली,
“काही नाही आज पाऊस आला तर मी भिजणार.”


“व्हय काय! आणि शाळा?” कृष्णा हसत बोलला.

“छत्री नाही म्हटल्यावर असेही भिजणारच मग भिजण्याचा आणि शाळेचा काय संबंध? कारणं सांगतात.” सखी त्याला ऐकू जाईल अशी तोंडात कुरकुरली आणि कृष्णा हसला.


पावसावरून त्यांचं चालू होतं इतक्यात हा हा म्हणता पावसाने सुरुवात केली. कृष्णा सखी भिजू नये म्हणून सपाटीच्या कडेलाच असलेल्या झाडाखाली तिला सोबत घेऊनच झाडाखाली उभा राहिला.


कृष्णा झाडाच्या पानांतून हवेमुळे टपकणारे मोठे थेंब केसांवरून पुसत बोलला,
“छत्री पण आणली नाहीये सर जाईपर्यंत येतेच थांबूया.”


समोर पावसाची हलकी हलकी रिमझिम होत होती जणूकाही ढगाच्या बारीक चाळणीतून पावसाचे ते नाजूक थेंब जमिनीच्या ओढीने पडत असावे. तो सोबत असताना, मन आधीच सैरभैर असताना सखीची पाऊले सपाटीवर लुसलुशीत हिरवळीवर साचलेल्या पावसाच्या पाण्यात थिरकण्यासाठी आतुर झालेली.

त्याचा हात सोडून घेत सखी तिला खुणावणाऱ्या त्या पावसाकडे बघत लाडीगोडी लावत बोलली,
“क्रिष्ण् ऽ ऽ, प्लीज जाऊ द्या ना.”

तिचा तो सूर ऐकूनच कृष्णा हसला,
“व्हयं काय?”

त्या लोभस वातावरणात उन्हानेही हजेरी लावली. दूरवर वाहणारे धबधबे, सभोवताली पावसाने ओलाचिंब न्हाणारा हिरवागार निसर्ग, आजूबाजूला हलकीशी पडणारी रिमझिम आणि तिच्या मोहत असणारा आणि सपाटीवरच तिच्यासाठी धावून येणारा तो उन्हाचा भला मोठा कवडसा.‌ जणू काही दीर्घ प्रतीक्षेनंतर त्या पावसाच्या थेंबांसोबत प्रणयाचे खेळ खेळण्यासाठी ती उन्हाची तिरीप आपली कोवळीत घेऊन सपाटीवर उतरलेली. आजूबाजूचा परिसर सावलीत नाहत असताना फक्त सपाटीवर चाललेल्या ऊन पावसाच्या प्रणयाचा भाग होण्यासाठी सखी उतावीळ झाली.

त्याच्या हातातून आपला हात सोडत सखी ठेवणीतला चेहरा करून अगदीच लाडाला येऊन बोलली,
“प्लीज ना ऽ ऽ, सोड ना ऽ ऽ ऽ.”

तिचा तो मादक स्वर ऐकताना त्याच्या काळजाची तार छेडली गेली तिचा हात त्याच्या हातातून आपसूक सुटला. सखी लहान मुलाच्या उत्साहातच पदर हवेवर उडवत सपाटीवरच्या साचलेल्या पाण्यात खेळू लागली. ते पाणी पायाने उडवताना ती स्वतःच ओलीचिंब होत होती आणि स्वतःच कृष्णाकडे बघून चेहऱ्यावर हात ठेवून हसत होती. तिचं ते खळखळत हसू पाहताना नजरकैद होऊन कृष्णा यंत्रवत तिच्याकडे चालू लागलेला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून पावसात भिजताना त्याच्याही चेहऱ्यावर हसू धावतच आलेलं.

आज फिर जीने की तमन्ना है..
आज फिर मरने का इरादा है..

या गाण्यातील ओळींसारखी सखी सुद्धा आज स्वैर होऊन बागडत होती. जणू ते क्षण तिच्या हक्काचे होते. पावसात भिजताना तो पाहतोय म्हणून तरं सखीला जास्त चेव आलेला.‌ आपले दोन्ही हात खोलून पावसाचे थेंब हातावर, चेहऱ्यावर घेताना तिचा देह कोणत्याही संगीताशिवाय थिरकू लागलेला. तिच्या नाजूक देहाची मोहक हालचाल, तिच्या चेहऱ्यावरचं खळखळत हसू पाहताना कृष्णा पुरता सखीमय झालेला. पावसाचे नाठाळ थेंब तिच्या देहाला चिंब चिंब करत होते. तिच्या ओल्याचिंब देहामुळे तिचं स्त्री-सौंदर्य जसं की खुलून दिसत होतं.‌ त्याच्या अवतीभवती भिरभिरणाऱ्या खळखळून हसणाऱ्या, आपलं सौंदर्य सृष्टीत उधळू पाहणाऱ्या सखीकडे पाहताना कृष्णाच्या हृदयाचा वेग आपोआप वाढलेला. तो चेहऱ्यावर राखीव हसू घेऊन नजरेत फक्त तिलाच साठवत भान हरपून तिच्याकडे बघत होता.


तिला लहान मुलासारखी बागडताना पाहून पावसाने कपाळावर आलेले आपले केस मागे घेताना कृष्णा हसतच खट्याळपणे बोलला,
“सखी ऽ, आज काय खरं नाही बाबा!”


त्याच्या बोलण्याचा अर्थ उमगून सखी तोंडावर हात ठेवून पावसाची सर अंगावर झेलत पुन्हा खळखळून हसली आणि त्याचा हात पकडून हिरवळीवर साठलेल्या पाण्यामध्ये पायाची वल्ली करून पाणी दुभंगू लागली. कृष्णाला ती नुकतीच वयात आलेली अल्लड तरुणी वाटली आणि तोही एका हातानेच तिला सावरत हसू लागला.‌


त्या दोघांना एकांत देत पावसाशी मन भरून सलगी झाल्यावर ऊन मागच्या पायाने मागे सरलं आणि ढगांचा गडगडाट होऊन वीज चमकली तशी सखी घाबरून कृष्णाला बिलगली पण ते बिलगणं नेहमीच नव्हतं. त्याच्या उबदार मिठीत गेल्यावर ती मिठी हवीहवीशी वाटून सखी त्याला अजून घट्ट बिलगली.‌

तिचा नाजूक देह मिठीत आल्याबरोबर कृष्णाने तिला आपल्या बाहूपाशात कैद केलं. ते ओले देह एकमेकांच्या मिठीत आल्यावर स्वतःलाही विसरले. क्षणाक्षणाला एकमेकांच्या मिठीत देहभान विसरू लागले. वरून लहरी पाऊस त्या दोघांना भिजवतच होता. भर पावसात पडलेला तो ओल्या देहांचा पाश दोघांनाही सोडवत नव्हता.

“आ ऽ च्छीं ऽ ऽ.“ त्याच्या मिठीत सखी शिंकली आणि आपसुकच तिच्या काळजीने त्याची मिठी सैल झाली. तिच्याकडे बघत कृष्णा काळजीने बोलला,
“काय होतंय?”

एका हाताने आपलं नाक चोळत सखी जराशी मान वर करून काहीशी लाजून हुंकारली,
“अं ऽ हं ऽ तुमचे कान वाजले.”

तिला नाक चोळताना पाहून कृष्णा हसला,
“अस्सं?”

त्याच्या जवळ असल्याने त्याच्याकडे बघायचं टाळत
ओल्याचिंब चेहऱ्याने सखीने वरून खाली मान हलवली,
“हम्म ऽ.”


तिच्या पातळसर ओल्या पापण्या, स्वच्छ नितळ ओल्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी विसावलेले पावसाचे चुकार थेंब, ते नाजूक फिक्कट गुलाबी ओठ आणि नेहमीसारखी थंडीने त्यांची होणारी हलकीशी थरथर! त्या ओठांकडे पाहताना त्याच्या काळजात आता ही नाजूक खळबळ झाली.


त्या ओठांकडे पाहत असताना तिच्या ओठांचं मनसोक्त चुंबन घेणारे तिचे खट्याळ सोनेरी केस त्याच्याकडे बघून हसत होते.
तिच्या ओठांवर त्यांना असं पुन्हा दिमाखात बसलेलं पाहून ते केस हवेने उडवण्यासाठी कृष्णाने तिच्या ओठांवर फुंकर घातली आणि त्याच्या अचानक आलेल्या गरम फुंकरीने सखी शहरली. ती डोळे बंद करून पुन्हा श्वास घेतच होते की पुन्हा त्याची गरम फुंकर तिच्या ओठांवर झेपावली आणि सखीचा रोमरोम शहारला.‌

तिचे हात आपसूकच त्याच्या छातीमार्फत खांद्याकडे सरसावले. तिचे ओठ काहीच अंतरावर असणाऱ्या त्याच्या ओठांना स्पर्श करण्यासाठी आतुरले. तिच्या हृदयातील पाखरू त्याच्या स्पर्शासाठी फडफडलं.


तिचे हात खांद्यावरून वर आल्यावर त्या नाजूक स्पर्शाने कृष्णाही त्या क्षणांचाच झाला. हृदयाचा वेग सांभाळत त्याने पुन्हा अलगद फुंकर तिच्या ओठांवर घातली तसे तिसे ओठ पुन्हा थरथरले. त्याची कॉलर हातात घट्ट पकडून सखीचा रोमरोम ‘त्या’ स्पर्शाची त्याच्याकडे मागणी करू लागला.


तिथे थरथरणारे ओठ पाहून आपसूकच त्याचेही ओठ थरथरले. तिच्या ओठांवरचे तिचे केस अलगद चिमटीत पकडून त्याने कानामागे सारले आणि भावना अनावर होऊन सखी डोळे बंद करून तोंडाने श्वास घेऊ लागलेली. त्याच्या मानेभोवती हातांचा वेढा देत टाचा वर करून आपल्या ओठांची थरथर त्याच्यापर्यंत नेत सखी त्याचीच झालेली.

त्या धुंद वातावरणात, त्या धुंद पावसांत सखीमय झालेल्या कृष्णाने सखीने टाचा वर करताच एका हातानेच तिला सावरलं आणि त्या नाजूक कमरेवर तो भारदस्त हात पडताच सखीने लाजून अंग चोरलं. आपसूकच लाजेने मान खाली आली. ते नाजूक ओठ दूर जाताच त्याने तो लाजलेला चेहरा नजरेत साठवत तिची हनुवटी पुन्हा अलगद वर केली.

सखीचे डोळे बंदच होते पण श्वासाला श्वास जाणवू लागले तसं तिच्या हृदयातील पाखरू ‘त्या’ स्पर्शासाठी आसुसलं! तिचे ओठ थरथरले जसे की पावसात ओलेचिंब भिजवूनसुद्धा वर्षानुवर्षी ते त्या प्रेमाच्या स्पर्शासाठी व्याकुळ होती. त्या स्पर्शाची वाट पाहत असताना श्वासांना श्वास भिडल्यावर तिच्या ओठांना त्याच्या ओठांचा स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाने सखीचं सर्वांग मोहरलं. तिच्या बंद डोळ्यांतून त्या सुखाचे आनंदाश्रू हसत-हसत पाझरले.


उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
१८/०७/२०२७

………


तुम्हाला वाटेल एवढासा भाग लिहायला इतके दिवस लागतात का?

तर– एक स्पर्धक धावण्याच्या शर्यतीत लाल रेबीन दिसेपर्यंत धावतो आणि ती रेबीन नजरेच्या टप्प्यात आल्यावर अचानकच त्याच्या अंगातून त्राण गेल्यासारखं होतं मग नजरेतील अंतरसुद्धा त्याला प्रकर्षाने जाणवतं आणि एक एक पाऊल तो कष्टाने उचलतो अगदी अशीच अवस्था माझी आहे. या टप्प्यावर भागांना होणारा उशीर मलाही आवडत नाहीये. जवळपास महिना झाला आता.
ब्रेक घ्यावा का? असाही विचार कितीतरी वेळा मनात येऊन गेला पण ब्रेक घेतला तरं कथेचं काही खरं नाही. त्यामुळे चालू ठेवली आहे. तुम्हाला जो त्रास होतोय त्यासाठी दिलगीर आहे!


भागाबद्दल बोलाल ही अपेक्षा!

भेट लवकरच!)



🎭 Series Post

View all