पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१९२

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१९२


सखीच्या ओल्या चिंब भिजल्याने, तिच्या खळखळून हसण्याने, तिच्या स्वैर उधळलेल्या सौंदर्यात कृष्णा पुरता घायाळ झालेला.‌ मनाचे कवडसे खोलून तो आज फक्त तिचाच क्रिष्ण उरलेला. त्याच्या ओल्या देहाला पडलेली सखीची नाजूक मीठी म्हणजे पहाटेची मोहात टाकणारी साखर झोपंच! तिला बाहू पाशात कवटाळत जणू तो स्वतःत सामावून घेत होता.


तिच्या ओलसर ओठांवरचे केस बोटाने हळूच उचलताना तिच्या मुलायम ओठांचा स्पर्श…. आणि नजरेला दिसणारे ते थरथरणारे ओठ! त्याच्या हृदयाची धडधड वाढलेली असतानाच सखीच्या हातांचा त्याच्या मानेला वेढा पडला आणि कृष्णा पुरता सखीमय झाला.

त्याच्या नजरेला तिचे थरथरणारे आणि क्षणाक्षणाला जवळ येणारे ते ओठ दिसत होते. फार फार वर्षांपासून व्याकुळलेले त्याचे ओठही त्याच्याही नकळत थरथरायला लागलेले. ते कधी पुढे झाले ते त्यालाही कळलं नाही. तो तिच्या गंधात पुरता वेडावला. कधी तिच्या कमरेला त्याच्या हाताचा वेढा पडला, कधी तिच्या मानेमध्ये अलगद हात घालून श्वासांना श्वास भिडले हे त्याला कळलंच नाही. तिच्या धुंदीत धुंद होऊन आजवर त्याला खुणावणाऱ्या त्या फिक्कट गुलाबी ओलसर ओठांवर त्याने ओठ टेकले आणि तिच्या देहासारखाच तेव्हा तोही थरथरला.


त्या गंधाळलेल्या क्षणांमध्ये ना ती तिची राहिली!
ना तो त्याचा राहिला! त्या क्षणांमध्ये दोघेही स्वतःला विसरलेले. त्याच्या ओल्या केसांमध्ये तिची बोटे तिच्या बिघडलेल्या श्वासांसारखी सैरभैर धावत होती. दोघेही एकमेकांच्या स्पर्शाने विरघळत होते. बिघडलेल्या श्वासांना अजून बिघडू देत त्या क्षणांचं माधुर्य क्षणाक्षणाने मनसोक्त जगत होते.


आजपर्यंत फक्त ओरबाडणं जगलेल्या तिच्या ओठांवर आज प्रेमाची उधळण होत होती. कोणतीच घाई नसल्यासारखी त्याच्या ओठांच्या अलवार मधुर स्पर्शांनी ती पावसात नाहीतर प्रेम रसात नहात होती, प्रेम रसाने ओलीचिंब होत होती. चुंबनाची मधुरता जगताना-अनुभवताना तिच्या शरीराचा कण न कण रोमांचित होत होता. त्या माधुर्याच्या गोडीने त्या उत्कट क्षणांमध्येही तिच्या डोळ्यांच्या ओल्या कडा अत्यानंदाने आपसूकच पुनः पुन्हा ओल्या होत होत्या.


किती वर्षांनी कृष्णा पुन्हा त्याच अविट गोड क्षणांमध्ये हरवलेला. नाजूक ओठांमध्ये किती वर्षांनी तो पुन्हा गुंफलेला. किती वर्षांनी तो पुन्हा तेच क्षण नव्याने जगत होता. तो त्याच त्याला भुलवणाऱ्या क्षणांमध्ये पुन्हा स्वतःला विसरलेला.


अंतर्मनातील गोड खळबळ आणि बिघडलेले श्वास दोघांच्याही आवाक्याबाहेर होते. त्याच्या केसांत भिरभिरणारा तिचा हात तिची उत्कटता दाखवत होता. अंगचोरुन त्याला बिलगून त्याच्याच स्पर्शाने ती वेडावलेली तरं तिच्या गंधात विरघळून त्या मुलायम ओठांना तो तितक्याच हळुवारपणे जणू गोंजारत होता. बरसणारा पाऊस, ती हिरवीगार सपाटी, पलिकडचा पांढराशुभ्र धबधबा, रानातील पशुपक्षी, आजूबाजूचा निसर्ग सगळे-सगळे त्यांच्या त्या लाजऱ्या आणि तितक्याच उत्कट क्षणाचे साक्षीदार होते.

नखशिखांत ओलेचिंब झालेले त्यांचे देह त्या मधुर क्षणांमुळे फुललेले. त्यांच्या भावनांसारखेच श्वासही आता गरम होऊ लागलेले. त्याच्या केसांमध्ये भिरभिरणारा तिचा हात क्षणाक्षणाला अजूनच सैरभैर होऊ लागलेला. त्या नाजूक ओठांचा गुंता सोडवण्यात तो ही मश्गूल होता. दोन वेडे जीव प्रेम सागरात नहात असतानाच निसर्गाने आपलं रूप पालटलं. काळ्या ढगांची गर्दी होऊन ढगांचा गडगडाट झाला आणि शेजारच्याच डोंगरावर वीज कोसळली. त्या कर्णकर्कश आवाजाने दचकून दोघेही एकमेकांना बिलगले पण-


काही क्षणांच्या उसंतीनंतर दोघेही वास्तवात आले. त्याच्या मिठीत असताना सखी लाजेने गोरीमोरी झाली. तिच्या हृदयाची धडधड तिला अजून सावरताच येत नव्हती. या लाजऱ्या क्षणानंतर त्याच्या मिठीत ती अजूनच लाजली आणि लाजून स्वतःच त्याच्यापासून हळूच एक पाऊल मागे आली.


तिच्या ओठांवरचे त्याच्या ओठांचे अलवार स्पर्श अजूनही तिच्या अंतरंगात उतरत असल्यामुळे ती जशी की हवेवर तरंगत होती. आपल्या ओठांवर असणारा त्याच्या ओठांचा ओलावा अनुभवत सखी अजूनही शहारत होती. लाजेने झुकलेली नजर, गालावर खिळलेलं लाजरं हसू आणि नखशिखांत लाजलेली सखी! त्या मधुर क्षणांमध्ये गुरफटलेली असताना कृष्णाचा अनपेक्षित आवाज आला,
“माफ करा. मी.. मी वहावलो!”


कितीतरी वर्षांनी स्वतःच देहभान विसरून कृष्णा पुन्हा त्या नाजूक ओठांचा गुंता अगदी प्रेमाने सोडवण्यात गुंतला होता. हे क्षण जगताना तो पुन्हा ‘त्याच’ क्षणांमध्ये पोहोचलेला, ज्या क्षणांमध्ये तो प्रणयातुर क्षण जगलेला. या क्षणी सुद्धा हा उत्कट क्षण त्याला तिथेच घेऊन गेलेला.

तो सखीसोबत होता? की आरतीसोबत? त्याचा तन आणि मन वर्तमानातून भूतकाळात आणि भूतकाळातून पुन्हा वर्तमानात फेऱ्या मारत होतं पण तो मनापासून या क्षणांना समर्पित झालेला.

विजेचा कडकडाट झाला आणि सखी पुन्हा मिठीत आली तसा कृष्णा वास्तवात आला. काही क्षणांमध्येच सखी त्याच्यापासून दूर झाली आणि कृष्णा तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला.


पलिकडे पडलेल्या विजेमुळे फक्त ते झाड उन्मळून पडलं नव्हतं तरं कृष्णाच्या सखीसोबतच्या त्या नाजूक प्रसंगाने आरतीच्या प्रियकराने त्याला अंतर्बाह्य झिडकारलं होतं. हेच तुझं प्रेम? हाच तुझा संयम? त्यामुळे तो.. तो गडबडला, बिथरला आणि आपल्या केसांवरून हात फिरवत बावरून बोलला,
“माफ करा. मी.. मी वहावलो!”


सरींवर सरी वाऱ्यासोबत कोसळत होत्या.‌ त्या मोठाल्या गारांचा मारा शरीराला होत असताना दोघेही बेसूद असल्यासारखे झालेले.

त्याचे ते शब्द गरम शिस्यासारखे कानांत चर्रकन उतरून सखीच्या काळजापर्यंत पोहोचले. मेंदूला झिणझिण्या आल्या. हवेवर तरंगणाऱ्या सखीची नजर आपोआप अविश्वासाने त्याच्यावर गेली आणि ती न ऐकल्यासारखे बोलली,
“काय?”

कृष्णा बिथरल्यासारखा केसांतून हात फिरवत सैरभैर नजरेने बोलला,
“माफ करा. मी… मी वहावलो.”

ज्या क्षणांना समर्पित होऊन, ती अविट गोडी चाखून काही क्षण देखील उलटले नव्हते की लगेचच कोणीतरी उंच उंच कड्यावरून ज्वलंत दरीत ढकलून दिल्यासारखं सखीला झालं. त्याच्याकडे पाहता-पाहता तिचे डोळे भरून आले.

जे नाजूक क्षण ती नुकतीच त्याच्यासोबत जगलेली त्या क्षणांवर तिचा अधिकारच नव्हता? ते क्षण तिच्या मालकीचे नव्हतेच? पुन्हा नशिबाने दगा दिलेला. तिला तिच्या नशिबाचाच राग आला. त्याच्याकडे पाहताना तिचे डोळे वाहू लागले. दुःखाने थरथरणारे हात ओठांवर गेले. काही क्षणांपूर्वी प्रणयाच्या धुंदीत थरथरणारे तिचे ओठ आता दुःखाने थरथरायला लागलेले.

ती कशीतरी बोलली,
“तुम्ही वाहवला?

नाही नाही….”

कृष्णाच्या डोळ्यांतून वेदनेने अश्रू वाहत होते. त्याचं काळीज जड झालेलं. डोकं बधिर झालेलं. तो बिथरलेला. आरतीचा प्रियकर त्याला क्षणोक्षणी झिडकारत होता. सखीबद्दलच्या भावना पुरत्या न उमगल्यामुळे तो स्वतःशीच झगडत होता.


काही क्षणांतच सृष्टी सारखंच तिथलं वातावरण बदललेलं. जिथे ऊन-पावसाने प्रणयाचा खेळ रंगवलेला तिथेच आता वीज पडल्यामुळे त्या विषारी वृक्षाचा विचित्र दर्प दरवळत होता. जिथे काही क्षणांपूर्वी दोन वेडे जीव प्रेम रसात नहात होते तेच आता दुःखाच्या वनव्याच्या ज्वालांनी होरपळत होते.

त्याच्या डोळ्यांत अपराधीपणा पाहताना सखीला यातना होत होत्या.

‘तो तिचा नाही',
ही टोचणी तिच्या अंतर्मनात खोलपर्यंत टोचत होती.
त्याच्याकडे पाहतानाच सखी थरथरता हात ओठांवर ठेवून रडू लागली.

त्या बिथरलेल्या मनःस्थितीत तिच्या डोळ्यांतील अश्रूंचा अर्थ आपल्या परीने लावत कृष्णा बावरून बोलला,
“तुम्ही रडू नका काय.. मी वहावलो तुम्ही नाही. तुम्ही सखीच आहात माझी.”


सखी त्याच्याकडे बघत त्या कोसळणाऱ्या पावसात मागे मागे जात दोन्ही हातांनी साडी घट्ट पकडून सखी हुंदके देऊन रडू लागली.


कृष्णाच्या ही भेगाळलेल्या काळजातून गुमनाम अश्रू वाहू लागले. भंगलेल्या हृदयाला सांभाळत तिला रडताना पाहून तो जास्तच हवालदिल झाला. काय होतंय हे त्याला कळत नव्हतं पण त्याला खूप त्रास होत होता. तिच्याकडे पाहताना तो ओठांत पुटपुटला,
“सखी ऽ ऽ ऽ…”


आकाशात ढगांचा गडगडाट झाला. वीज पुन्हा कडाडली पण यावेळी सखी घाबरली नाही कारण तिच्यावर कोसळलेल्या वीजेने त्या पावसातही ती अंतर्बाह्य गोठली होती.

सखी त्याच्याकडे बघत रडत बोलली,
“याचंच दुःख आहे. मी तुमची सखी असूनही तुमची नाही.”

“सखी ऽ ऽ ऽ….”
कृष्णा दुःखाने ओठांत पुटपुटला.

सखीला रडतच पुन्हा परतीच्या वाटेवर निघालेली पाहून कृष्णाने पुढे होऊन तिचा हात पकडला आणि तो पुन्हा काही बोलणार एवढ्या सखी आपला हात त्याच्या हातातून हिसकावून घेत मुसमुसत बोलली,
“हात बायकोचा पकडतात, मैत्रिणीचा नाही.”

तिची दुःखी नजर त्याच्या दुःखी नजरेला भिडली आणि सखी डोळे पुसतच त्या मुसळधार गडगडाटी पावसात पुन्हा घरी येण्यासाठी एकटीच टेकडी उतरू लागली. आज तिला कशाचीच भीती वाटत नव्हती कारण आतला भावनांचा गडगडाट तिला बाहेरच्या दुनियेचा पत्ताच लागू देत नव्हता. ती स्वतःच्याच कोशात हुंदके देऊन वाट मागे टाकू लागली.


© प्रियांका सुभा कस्तुरी
२३/०७/२०२४

……..

(कथेचे संपूर्ण अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत त्यामुळे ऑडिओ, व्हिडिओ किंवा कोणत्याच स्वरूपात छेडछाड सहन केली जाणार नाही. कथा तुम्हाला वापरायची असेल तर मला मेसेज करा, मेल करा, आपण बोलू पण उगाचच विनापरवानगी वापर करून तुम्हाला आणि मला त्रास नको. धन्यवाद!)

वाचकांसाठी -
भाग यायला वेळ लागला, साॅरी!
पण अगदीच अनपेक्षित भाग आहे,
तुम्ही कसं घेता हे पाहणं आवडेल.. पुढील भाग, लवकरच!)

🎭 Series Post

View all