Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२०३

कृष्ण सखी
कृष्ण सखी -२०३

सोनाई मावशीसोबत काॅलवर बोलत असताना बाहेरून नाना हाका मारतच आला,
“ए ऽ कृष्णा, आलास का रे?”

“नाना ऽ, अरे मीच आले पुढे.”
सखी काळजीने पटकन बोलली आणि नंतर गालावरचा व्रण आठवून तिने तोंडावर हात ठेवला.

नाना स्वयंपाकघरात येत गडबडीत बोलला,
“तू आलीस आणि कृष्णा कुठं राहिला?”

‘नानाने व्रण पाहिला तर!’
या विचारासरशी सखी लगेच पाठमोरी होत गोंधळून बोलली,
“बाहेर बघ की आले असतील ते.”

“मी आत्ताच बाहेरून आलोय. तो नाहीये बाहेर.”
नाना वैतागून बोलला.

सखी पाठमोरीच गडबडीत बोलली,
“अरे असं कसं? आम्ही सोबतच तरं आलोय. बघ ना, बाहेरच असतील.”

नानाने घाईतच उंबऱ्याजवळ जात कृष्णाला हाक मारली,
“कृष्णा ऽ ऽ, ए ऽ कृष्णा ऽ ऽ ऽ ऽ.”

नानाने अंगणातून नजर फिरवली आणि बडबडतच पुन्हा स्वयंपाकघरात येत बोलला,
“कुठंय बाहेर? सांगतोय तरं ऐकत नाहीयेस.”


सोनाई दुखण्यातून उठलेल्या लहाण्या बहिणीबरोबर परड्यात बोलत होती. कृष्णाचाही पत्ता नव्हता आणि नाना सखीच्या मागेच लागलेला. सखी टेन्शनमध्ये स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली,
‘कुठं राहिलेत क्रिष्ण्?’


तिची बडबड ऐकून नाना वैतागून बोलला,
“तेच तुला विचारतोय कुठंय कृष्णा?”

..आणि मघापासून तिला पाठमोरी बोलताना पाहून तो तसाच वैतागलेल्या सुरात बोलला,
“तिकडंं फिरून काय बोलतीयेस? तुझ्या पाठीशी बोलतोय का मी?”

सखी गोंधळून लगेच लोखंडी कपाटावरील ताटली पुसत बोलली,
“अरे, काम करत बोलतीये ना..”

“मी तुमच्या घरी आलोय तरी तुला तुझंच काम महत्त्वाचं.. त्या कृष्णाला पण त्याचं काम महत्त्वाचं. च्यामारी! आपली काही किंमत आहे की नाही?”
तिला अजूनही पाठमोरीच पाहून नाना बडबडत स्वत:च तिच्या शेजारी गेला आणि त्याला अचानक शेजारी पाहून सखीने गालावर हात ठेवला.

तिला दचकलेली बघून नाना तिच्या गालावरच्या हाताकडे बघत बोलला,
“काय झालं? आणि गालाला का हात लावलास?”

सखी उगाचच हसत बोलली,
“अरे असंच.. सहज.”

“सहज काय? दाखव बरं.”

‘कृष्णा, नानाने पाहिलं तरं!….
मला लाज वाटतेय अरे.’
सखी गालावर हात ठेवून टेन्शनमध्ये पुटपुटली आणि मागच्या दरवाजातून कृष्णाचा आवाज आला,
“ए बेन्या, घरी येईपर्यंत दमधीर नव्हता का तुला? नुसता फोनाव् फोन.”


कृष्णाला पाहून सखीच्या जीवात जीव आला आणि नाना तक्रारीच्या सुरात बोलला,
“किती फोन केले तुला? कुठं होतास?”
नाना कृष्णाकडे जात बोलला आणि सखीने पुन्हा मोकळा श्वास घेतला.

कृष्णा एक नजर सखीकडे पाहून-
“महत्वाचं काम करत होतो पण जाऊ दे आता..”
आणि पुन्हा नानाकडे बघत,
“बोल, काय बोलतोयस?”

नाना तक्रारीच्या सुरात बोलला,
“काय बोलतोयस म्हणजे? लग्न ठरावलं म्हणजे झालं का? महिन्या दीड महिन्यात दिवाळी आली तरी माझ्या लग्नाची अजून काहीच तयारी नाही. कधी करायची तयारी?”


सखीसोबत असताना डिस्टर्ब केल्यामुळे कृष्णा किंचित वैतागून बोलला,
“दोन अडीच महिन्यांनंतर दिवाळी आहे आणि तू-”

नाना कृष्णाला पुढं बोलू न देताच टेन्शनमध्ये बोलला,
“ए बाबा ऽ, दीड महिन्यानंतरचा पहिला मुहूर्त आहे.. तोच बघ ना.”

..आणि पुन्हा सपोर्टसाठी सखीकडे बघत बोलला,
“पहिला मुहूर्तच चांगला असतोय ना सखी?”

त्याची चाललेली घाई पाहून सखी हसली,
“हो.”

आणि एकदाचा फोन आटोपून सोनाईही हसतच घरात येत बोलली,
“लगीन झाल्यापास्नंं मावशीकडं गेला न्हाइव ना म्हनून बोलवंत व्हती. यखूद्या आईतवारी जुडीनंं जावून या तिच्याकडं.”

सखी अंदाज लावत बोलली,
“आईतवार म्हणजे रविवार ना?”

“व्हय.”

एकट्यालाच ठेवून आल्यामुळे सखीवर जरा फुगलेला कृष्णा चौकटीला टेकून बोलला,
“सखी, थोडं पाणी मिळेल काय?”

सखीने गालावर हात ठेवून थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या सोनाईकडे टेन्शनमध्ये बघितलं. तिचं टेन्शन ओळखून सोनाई बिनधास्त बोलली,
“खऱ्यानं आमृत पेल्याल आसतं त्यामुळं त्याला मरानं नसतं आनि त्यात लाजायचं काय? दे पानी दोघांपन.”


ती नानाला लाजतीये हे कृष्णाला कळत होतं त्यामुळे तोही मुद्दामून बोलला,
“दोघांनाही द्या आणि लगेच द्या. आम्हाला गडबड आहे.”


नाना काय बोलेल या टेन्शनमध्येच सखीने जड पावलांनी पाणी घेतलं आणि कशीतरी ज्यांच्याजवळ आली. तिच्या गालावरचा तो लालसर व्रण बघून नानाने काळजीने विचारलं,
“सखी गालावर कसला डाग? काय चावलं?”

सखी गोंधळली आणि तिने मदतीसाठी कृष्णाकडे बघितलं. कृष्णा तिच्या हातातून पाणी घेत तिला अजून त्रास देत अगदी नानासारखाच उगाचच काळजीने बोलला,
“कसला हा डाग सखी? काय चावलं?”

कृष्णाच्या अचानक आलेल्या चौकाराने सखी गडबडली आणि मदतीसाठी बारीक चेहऱ्याने तिने सोनाईकडे पाहिलं,
“आई ऽ ऽ.”

सोनाई कृष्णाकडे बघून तोऱ्यात बोलली,
“सांग की, बोका चावला.”

नाना टेन्शनमध्ये,
“मग इन्जेक्शन घेतलंंस का?”

पहिलीच वेळ त्यात खोटं बोलायची सवय नसल्याने सखी पुरती गोंधळली मग सोनाईच बोलली,
“बोका मानसाळल्याला व्हता ना.. म्हनून न्हाय घेतलं इंजिक्शान.”

नाना सखीचा गाल बघत काळजीने बोलला,
“बोका चावेपर्यंत तू काय करत होतीस सखी?”

तिचा उडालेला गोंधळ पाहून कृष्णा गालात हसत बोलला,
“तेच तरं, बोका चावेपर्यंत तुम्ही काय करत होता सखी?”

स्वतःच कारनामा करून वरून त्याचं त्रास देणं पाहून सखी गोंधळली तेव्हाच चित्त थाऱ्यावर नसलेल्या नानाला बाहेरून नैनाचा आवाज आला,
“आयंं ऽ ऽ, मी हाये गं हिथं.”

नैनाचा आवाज ऐकताच तिला एक नजर पाहण्यासाठी व्याकुळ नाना लगेचच केसांतून हात फिरवत बाहेर जात बोलला,
“कृष्णा, मी आहे रे बाहेर. तू ही बाहेरच ये.”


नाना गेल्यावर कृष्णाकडे गाल फुगवून बघणाऱ्या सखीकडे पाहताना कृष्णानेही हसू आवरतं घेतलं आणि तिच्यासारखाच चेहरा करून बोलला,
“मला तिथंच ठेऊन आलात ना? काय केलं पुढं येऊन?”

सखी नाराजीच्या सुरातच बोलली,
“मी नानाच्या काळजीने पुढे आलेले ना?”

कृष्णाच जरा भाव खात बोलला,
“चांगलंय, अशाच ठेऊन येत जा मला.”


कृष्णाचं वागणं पाहून सोनाई कमरेवर हात ठेवून बोलली,
“चोर तो चोर वरून शिरजोर!”


कृष्णाचा खोडकरपणा पाहून सखी गाल फुगवून बोलली,
“तुमचं आता नानासमोर काय चालू होतं?”


कृष्णा गालात हसत बोलला,
“कुठं काय? आपण गुपचूप उभा होतो.”

सखी तशीच गाल फुगवून नाराजी दाखवत बोलली,
“मला नाही आवडलं ते!”


तिच्या गालावरचा व्रण, ते फुगलेले गाल आणि तिचं बोलणं ऐकून कृष्णाला तिचा अंदाज येईना. त्याने जरा साशंक मनाने तिचा अंंदाज घेत विचारलं,
“गालावर चावलो…. त्यामुळे तुम्हाला राग आलाय काय माझा?”


त्याचा गैरसमज झालाय हे सखीच्या लक्षात आलं तोपर्यंत सोनाई तोऱ्यात बोलली,
“आता इचारलंय तरं सांग, म्हणावं आलाय राग. आसंल वागणं आपून बिलकूल खपवून घेनार न्हाय.”

कृष्णा तोंड पाडून बोलला,
“खरंच काय?”

तशी सखीची मान घाईघाईत नकारार्थी हलली आणि ती सोनाईकडे बघून बोलली,
“नाही आई, उलट आवडलं मला.”


तिचं ‘आवडलं’ म्हणजे त्याला आमंत्रणच होतं. तिच्या बोलण्याने सोनाईने कपाळावर हात मारला आणि कृष्णा गालात हसत तिचा दुसरा पांढरा गाल बोलला,
“दुसऱ्या गालाला आता बेकार वाटत असेल काय?”

सखी लगेचच दुसऱ्या गालावर हात ठेवत बोलली,
“अजिबात नाही हं, मग मी जोकर दिसेन.”

कृष्णा हसतच बाहेर निघाला की नैनासोबत आॅंखो ही आॅंखो मैं झाल्यावर ओटीवर असलेला नाना पुन्हा घाईला आलेला.

नाना तक्रारीच्या सुरात बोलला,
“कृष्णा, नुसतं लग्न ठरवून ठेवलंय. अरे, महिन्या-दीड महिन्यात दिवाळी आली आणि लग्नाची काही तयारी नाही काही नाही. तुला माझी काळजी आहे की नाही?”

कृष्णा मान हलवत बोलला,
“हेच होतं ना तुझं महत्वाचं काम?”

नाना प्रचंड टेन्शनमध्ये बोलला,
“यापेक्षा महत्त्वाचं काय असू शकतं कृष्णा?”

“लग्नाची तारीख ठरली?”
कृष्णाने नवलाने विचारलं.

“ठरली म्हणजे तू ठरव ना.. मी फक्त पहिला मुहुर्त बघून आलोय.” नाना तोंड पाडून बोलला

कृष्णा हसला,
“बेन्या, जरा धीरानं घे की.. अरेंज मॅरेज आहे हे विसरू नकोस.”

नाना जरासा लाजत लाजत बोलला,
“म्हणून तरं तूच पुढं लागून कर ना सगळं.. मुहूर्त बघण्यापासून ये बारशापर्यंत.”

नानाची घाई बघून कृष्णा हसायला लागला आणि थट्टेने बोलला,
“बेन्या, लग्न होईपर्यंत तरी कळ सोस!” तसा नाना लाजून बाहेर निसटला.


सोनाई स्वयंपाकघरात हसत बडबडली,
“ह्या नानाचं म्हंजी आलं उतू आनि कुठं उतरू आसं आसतं जरा म्हनून दम धीर न्हाय.”


सखी हसत बोलली,
“तो सध्या प्रेमात आहे ना.. प्रेमात पडल्यावर सर्वांचं असंच असतं.”


सोनाई हसतच बडबडली,
“व्हय तरं आमच्या यळला कुठं पिरेम व्हत व्हतं आनि कवा पोरं व्हत व्हती कुनाला बी कळत नव्हतं आनि आजकालच्या पोरांची लगीन व्हयाच्या आधीपास्नच नुसती बोंबाबोंब.”

…………

गालावरच्या व्रणाची संवेदना हळूहळू कमी झाली पण सखीच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र दिवसभर कायम होतं उलट हलकासा दिसणारा तो लालसर व्रण पाहताना सखी स्वतःशीच गालात हसत होती.

तिन्हीसांजेला मुलं खेळून उत्साहात घरी आली. दिवाबत्ती झाली तरीही सकाळीच गेलेल्या कृष्णाचा पत्ता नव्हता. सखीची सारखी बाहेर जाणारी नजर पाहून सोनाई दातांवरून मशेरी फिरवत बोलली,
“हा काय नानाचं लगीन लावूनच यतो वाटतं.”

सखी चिंतीत स्वरात बोलली,
“बघा ना सकाळी गेलेत.. त्यात फोन पण लागत नाहीये. काय समजायचं आपण?”

सोनाई मशेरीचा तोबरा भरत बोलली,
“यिल आता नगं जीव बारीक करू.”


त्याची वाट पाहत सखी मुलांचा अभ्यास घेऊ लागली पण तिचे कान कृष्णाच्या बाईकचा आवाज ऐकण्यासाठी आतुरलेले. कृष्णा नव्हता म्हणून दातांना मनसोक्त मशेरी लावत सोनाई ओटीवर आली आणि कृष्णा अंगणाच्या पायऱ्या चढताना दिसला तशी ती मशेरीसकट दिंडीच्या दरवाजाने बाहेर जात गडबडीत बोलली,
“त्यो बग आला कामदार. मंगाशी धुरपी कशाला हाक मारत व्हती, मी जरा बगून यते.”


कृष्णाला दरवाजात बघून सुरजने खाटेवरून उडी मारली.
“सुरु, अरे पडशील.” सखी बोलेपर्यंत सुरज उंबऱ्यात कृष्णाच्या पायांना बिलगला.


सुरजला उचलून घेत मुलांना अभ्यास करताना पाहून कृष्णा सखीकडे बघून हसत बोलला,
“अभ्यास चालू आहे वाटतं.”


त्याचा घामाजलेला चेहरा बघून सखीच्या आधीच आरवने विचारलं,
“किती वलं वलं झालाव बाबा. कुठं गेलेलाव?”


कृष्णाने सुरजच्या गालाचा मुका घेतला आणि त्याला खाली सोडत हसत बोलला,
“नानासोबत फिरायला गेलेलो पण वाटेत बाईक बंद पडली.”


कृष्णाने टाॅवेल घेतला आणि हातपाय धुवून खोलीत जाताना सखीला विचारलं,
“आई कुठं कुठं गेले?”


“बाहेर गेलेत.”


‘यावेळी बाहेर?’
शर्ट अंगावेगळं करताना स्वतःशीच बडबडताना त्याने पुन्हा विचारलं,
“कधी गेले?”

सखी पाण्याचा तांब्या घेऊन खोलीत येत हसत बोलली,
“आईंशिवाय जराही करमत नाही का?”

कृष्णाने पाण्याचा तांब्या घेतला आणि पलंगावर बसत हसत बोलला,
“नाही करमत.”

आरव लगेचच खाटेवरून उडी मारून खोलीत आला आणि सखीच्या कमरेला बिलगून हसत बोलला,
“बाबा, मलाबी माझ्या आयशिवाय जराबी करमत न्हाय.”

सखीने कौतुकाने आरवच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कृष्णा सखीकडे बघून गालात हसत बोलला,
“तुझ्या आईशिवाय तरं कोणालाच करमत नाही.”


सखी तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत गालात हसली आणि आरव सखीला थोडीशी लाडीगोडी लावत बोलला,
“आयं ऽ, आमचा अभ्यास झालाय आता टिवी बघू का?”

त्याची लाडीगोडी पाहून सखी हसली,
“बघा.”

कृष्णा थोडसं पाणी प्यायला आणि पाठ धरल्याने कंबरडं मोडत बोलला,
“नानाने कीस पाडला आज पाठीचा.”

“पाठ दुखतीये का? आणि दिवसभर कुठे होता?”
सखीने काळजीने विचारलं.


कृष्णा पाठ हलकीशी मोडत बोलला,
“परिक्षा चालू झाल्यावर मी भेटायचो नाही म्हणून नानाने आजचं कपड्यांची खरेदी केली. बेन्याने घाम काढला माझा. त्यात गाडी पण ऐनवेळी बंद पडली.”


दिवसभर ताठल्याने त्याची पाठ नेहमीसारखीच दुखत असेल, याची जाणीव असल्याने आजवर खूप वेळा वाटलेलं, तेच सखी आज हिंमत करून बोललीच,
“मी दाबून देऊ का?”

कृष्णा जरा आश्चर्यानेच,
“क्काय?”

सखी काळजीने बोलली,
“पाठीला बाम लावून देऊ का? तुम्हाला बरं वाटेल.”

कृष्णा मान हलवत नकार दर्शवत बोलला,
“काही नको, ते नेहमीचंच आहे. उगाच तुमचे हात दुखतील.”

सखी पुन्हा त्याच्या काळजीने बोलली,
“प्लीज, लावते ना बाम.. तुम्हाला थोडातरी आराम पडेल.”


त्याची पाठ नेहमीसारखीच जाम झालेली. पाठीचं दुखणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं पण सखीचा आग्रह पाहून तो तयार झाला आणि तिच्याकडे पाहत तो शर्टची बटणे काढत गालात हसत बोलला,
“जर तुमचीच इच्छा आहे तरं—”


त्याच्या खालोखाल निघालेल्या शर्टच्या बटणांनी त्याची रुंद छाती दिसताच सखी बावरल्यासारखी लाजून पाठमोरी होत बोलली,
“कपडे का काढता?”


कृष्णाने स्वतःकडे पाहिलं आणि पुन्हा शर्टची बटणे लावत हसायला लागला. तिचा झालेला गैरसमज पाहून त्याला गुदगुल्या झाल्या आणि तो तिच्या कानात कुजबुजला,
“मास्तरीणबाई, बाम शर्टवरून लावणार आहात काय?”


सखी स्वतःच्याच विचारांवर लाजली आणि कृष्णा हसतच पलंगावर पालथा झाला.


विचारानेच लाजलेल्या सखीने टेबलच्या खणातून बाम काढला आणि कृष्णाकडे पाहिलं. त्याला शर्टसहीत पलंगावर पाहून सखी संथ पावलांनी पलंगाजवळ येत काहीशी लाजून बोलली,
“बाम खरंच शर्टवरून लावू का?”


तिला गालात हसताना पाहून कृष्णाही खट्याळपणे बोलला,
“तुमची इच्छा असेल तर लावा.”


त्याचा खोडकरपणा पाहून सखी गालात हसत पलंगावर बसली आणि बामच्या बाॅटलीच झाकण काढत थट्टेनेच बोलली,
“बघा हं ऽ, मी शर्टवरूनच लावेन.”


पहिल्यांदाच तेही स्वतःहून पाठ दाबून देणाऱ्या सखीला जास्त त्रास न देता कृष्णाने हसतच शर्ट अंगावेगळं केलं आणि पुन्हा पालथा आरामात पडला.

एका दिवसात फक्त त्यांचं नातंच बदललं नव्हतं तरं तेही बदलत होते. प्रत्येक गोष्ट नव्याने त्यांना सुखावत होती. नव्याने प्रेमात पाडत होती.

पहिल्यांदाच जागेपणी फक्त दोघेच पलंगावर असल्याने दोघांच्याही चोरट्या मनात चुळबुळ होऊ लागलेली. सखीने हळूच तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो डोळे बंद करून पडलेला. त्याचे डोळे बंद होते म्हणूनच सखी पलंगावर सरून सावरून बसली.

त्याच्या रुंद लालसर पाठीवरून तिची नजर हक्काने फिरली मग तिने प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. कृष्णाला अगदी मोरपीस फिरल्यासारखंच वाटलं. मोकळा श्वास घेत तो गालात हसला.

त्याची पाठदुखी कमी व्हावी, त्याला आराम मिळावा यासाठी सखीने त्याच्या पाठीला बाम लावून हलक्या हाताने पाठ चोळली मग तिच्या ताकतीने ती प्रेमाने त्याची मजबूत पाठ दाबू लागली.

कृष्णा डोळे बंद करून पडलेला. तिच्या प्रत्येक स्पर्शासोबत त्याला पाठीवर मोरपीस फिरल्यासारखंच वाटत होतं. काही क्षणांपूर्वी जी पाठ अवघडलेली, दुखत होती तीच पाठ आता हलकी हलकी जाणवू लागलेली. कृष्णा तिच्या स्पर्शाच्याच मोहात पडत होता.

त्याने डोळे उघडल्यावर सखीची नजर आपोआप त्याच्यावर गेली. ती प्रेमाने बोलली,
“थोडी कमी आली का दुखायची?”

कृष्णा शांत हसला.
“जादू आहे तुमच्या हातांत. पाठदुखी एकदम गायबच!”

सखी वर घेतलेले पाय खाली सोडत समाधानाने गालात हसली. ती जातीये असं समजून कृष्णा तिथेच उठून बसत बोलला,
“हात बघू तुमचे.”

सखी जराशी मागे फिरली पण जवळ असणाऱ्या त्याच्या उघड्या देहावर नजर जाताच तिच लाजली. खाली बघतच तिने हात पुढे केले आणि तिचे नाजूक हात आपल्या पसरट हातात घेऊन कृष्णा बारकाईने पाहू लागला.

सखी खाली बघूनच लाजून बोलली,
“काय पाहता?”

कृष्णा तिचे हात ओंजळीत पकडून काहीतरी शोधत असल्यासारखा बारकाईने बघत बोलला,
“तुमच्या हातातील जादू पाहतोय. जी मी आत्ताच अनुभवली.”

त्याच्या हातातून हात काढून घेत सखी पाठमोरी होत पुटपुटली,
“काहीही.”

अगदी वीतभर अंतरावर असणाऱ्या तिच्या जवळ सरकत कृष्णा प्रेमाने पुटपुटला,
“सखी ऽ.”

पाठीला त्याच जवळ येणं जाणवून सखी बावरली. नजर समोरच्या उघड्या दरवाजावर जाऊन सखी पटकन पलंगावर उठत बोलली,
“काय?”

कृष्णाही पलंगावरून उतरला आणि तिला थोडासा तिरपा उभा राहत तिच्या चेहऱ्याकडे बघत प्रेमाने बोलला,
“कधीकधी अशीच पाठ दाबून द्याल काय?”

सखीने तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं मग पुन्हा खाली बघत गालात हसत बोलली,
“तुम्ही म्हणाल तेव्हा!”

कृष्णा लगेच खोडकरपणे,
“मी रोज बोलेन.”


लगेचच सखीही पुटपुटली,
“मग मी ही रोज पाठ दाबेन.”


कृष्णा हसतच तिच्या पुढ्यात उभा राहिला आणि लाजऱ्या हसणाऱ्या तिच्या कमरेला हातांचा वेढा देत हसत बोलला,
“इतके लाड करू नका सखी, नाहीतर माझ्या सवयी बिघडतील.”

त्याची रुंद छाती श्वासांच्या अंतरावर असल्याने सखीची नजर लाजेने खालीच राहिली. त्याचं असं मोकळं वागणं पाहून पहिली तरं सखी गोंधळली मग लाजून खाली बघत बोलली,
“लाड करणारे असतील तरं.. लाड करवून घ्यावे.”

कृष्णा गालात हसला,
“व्हय काय!”

खाली बघतच सखीने लाजून वरून खाली मान हलवली,
“हम्म ऽ.”

बाहेरून टिव्हीसोबत मधूनच मुलांचा आवाज येत असल्याने कृष्णाचा सूर जरा खालचा लागला आणि
तिची खाली अडकलेली नजर पाहून तो त्याच्या हळू आवाजात कुजबुजला,
“तुम्ही म्हणत असाल तरं शर्ट घालू काय?”

सखी अजूनच लाजली. ती खाली बघत लाजरी हसली. तिचं इतकं गोड लाजणं पाहून कृष्णाच्या श्वासांची लय बिघडली. त्याची रुंद छाती तिच्यासाठी खालीवर होऊ लागली.

तिला एकाच हाताने कवेत घेऊन कृष्णाने दुसऱ्या हाताने तिचे हात आपल्या उघड्या खांद्यावर ठेवले आणि पुन्हा तिच्या नाजूक कंबरेला कवेत घेऊन तिच्याकडे गालात हसत बघू लागला.


त्याच्या बेफिकीर वागण्याने बावरलेली सखी, कंबरेवर होणाऱ्या त्याच्या रांगड्या स्पर्शाने शहारत होती. त्यात त्याचा उघडा देह तिच्या नजरेलाही लाजवत होता. त्याच्या मिठीत जाण्याचा मोहक विचार तिच्या मनात येताच त्यानेच तिच्या हातांना तो मजबूत खांदा दाखवला आणि सखीच मन चलबिचल झालं. श्वास उगाचच त्याच्यासारखेच वाढले.

तिचे हात त्या देहावरून फिरू पाहत होते की ओटीवरून ‘आय शाॅटच!’ ऐकू आलं आणि त्या एका शब्दाने सखी भानावर आली.

‘ही ती वेळ नाही, हा तो एकांत नाही.’
याचं भान येताच सखीचे हात त्याच्या खांद्यावरून घरंगळल्यासारखे खाली आले. तिचा ओझरता स्पर्शही जसा की त्याला वेडं करत होता. जणू उद्याची चुणूक दिसूनच कृष्णा बिघडलेल्या श्वासांनी तिच्या कानात कुजबुजला,
“इतक्या लाजला तरं तुमचं काही खरं नाही!”

उर्वरित भाग पुढे..

©प्रियांका सुभा कस्तुरी
२६/०८/२०२४
………

माफ करा खूप उशीर झाला. पण तुम्हाला कल्पना आहे बरेच दिवस झाले माझी तब्येत ठीक नाहिये त्यामुळेच काही दिवसांपूर्वी हवाबदलासाठी गावी आलीये. बघूया इथं किती फरक पडतो, तुम्हाला पुन्हा वाट बघावी लागली त्यासाठी साॅरी!

नेटवर्क प्रॉब्लेममुळे तुमच्या समीक्षा सुद्धा वाचता आल्या नाहीत पण मला माहित होतं तुमचे काळजीने भरलेले प्रेमपूर्वक मेसेजेस आले असणार...
तुमच्या चौकशीसाठी... तुमच्या काळजीसाठी खूप खूप धन्यवाद!

थोडं कथेबद्दल-
कथा अशी आहे की कितीही लिहिलं तरी कमीच वाटतं! आणि या टप्प्यावर असा उशीर होतोय म्हटल्यावर मलाच अपराधी वाटतं पण कथा थांबवण्यापेक्षा हे ही नसे थोडके!

लवकर भेटण्याचा मनापासून प्रयत्न करेन!

🎭 Series Post

View all