Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२०५

कृष्ण सखी
कृष्ण सखी-२०५

कृष्णा नजरबंदी झाल्यासारखा तिच्याकडे बघत पायरीपर्यंत चालत गेला. कृष्णाला पुतूळ्यासारखा सखीकडे बघताना पाहून सोनाई ठसक्यात बोलली,
"आता न्हाय व्हय रं उशीर व्हतं?"

कृष्णा सखीकडे बघून गालात हसत बोलला,
"आता इतकं वाढीव तयार व्हायला थोडासा वेळ तरं लागतोयंच की."

सखी गालावर रेंगाळणारे केस कानामागे घेत गालात हसत बोलली,
"ठीक आहे ना?"

कृष्णा हात पुढे करत तिच्या धुंदीत धुंद होत गालात हसत बोलला,
"लयीच बेकार वाढीव दिसताय तुम्ही. अगदी नव्या नवरीसारख्या."

त्याच्या अशा पाहण्याने, तोंड भरून कौतुक करण्याने सखीला गुदगुल्या झाल्या. ती लाजरी हसली आणि सोनाई यावेळीही तोरा मिरवत बोलली,
"नव्या नवरीसारख्या म्हंजी? ती हायेच नवी नवरी."


सखीने हातावर आलेला पदर सांभाळत कृष्णाच्या हातात हात दिला आणि एका हाताने निऱ्या सांभाळत सावकाश उंबऱ्याजवळच्या पायऱ्या उतरली. सखीचा बदललेला पेहराव, तिची देहबोली कृष्णाला भलतीच भावली. तिच्याकडे किती बघू आणि किती नको असं त्याला झालेलं. अंगणातून चालताना सखीला डोळ्यांत साठवत कृष्णा तिच्याकडेच बघत चालत होता. त्याच्या अशा पाहण्याने सखीला नुसत्याच गुदगुल्या होत होत्या.

त्या दोघांचे नजरेचे खेळ पाहताना सोनाई तोंडाला पदर लावून हसत होती. खाली उतरल्यावर कृष्णाने बाईक तिच्याजवळ आणून थांबवली आणि सूचक नजरेने बघत गालात हसत बोलला,
"बाईकवर बसता येतंय ना?"

त्याच्या बोलण्याने सखी केस कानामागे घेत हसली. तिचं असं जवळून हसणं म्हणजे त्याच्या नजरेसाठी मेजवानीच होती, इतकी ती सौंदर्याची उधळण होती.

सखीने केस बांधले. पदर कमरेला खोचला आणि साडी सावरून त्याच्या खांद्यावर नेहमीसारखी हात ठेवून बाईकवर बसली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिचा खांद्यावर हात येताच कृष्णाची मान हलली आणि
सोनाई हात हलवत बोलली,
"दमानं जा."

"येतो आई ऽ."
सखी हसून मान हलवत बोलली.

"चले आई ऽ, गेलो गं."
कृष्णाने ही सूर ओढला आणि भुर्रकन तिथून निघाला. बाईक गावाच्या बाहेर आल्यावर एकदम संथ झाली आणि तिचा पहिल्यासारखा खांद्यावर हात बघून कृष्णा थोडासा मागे बघत मोठ्याने बोलला,
"जरा पकडून बसताय काय."

त्याच्या बोलण्याचा अर्थ न समजून सखी त्याचा खांदा जाणीवपूर्वक पकडत हसत बोलली,
"हां बसलीये."

त्याच्या खांद्यावर मागेपुढे हललेला तिचा हात पाहून कृष्णा मान हलवत बोलला,
"श्यॅ! लयीच प्रोढ आहात तुम्ही. थोड्या पण राॅमॅन्टिक नाही."

गाडीवर काय रोमॅन्टिक? अननुभवी सखीला समजायला थोडा वेळ लागला पण जेव्हा समजलं तेव्हा ती स्वतःशीच हसली आणि खांद्यावरचा हात काढून हळूच त्याच्या पोटावर ठेवला तशी कृष्णाची कळी लगेच खुलली.

कृष्णा थोडासा मागे बघत मोठ्याने बोलला,
"तशा हुशार आहात."

सखी हसली. बाईकचा वेग वाढल्यावर तिच्या सळसळीत केसांचा अंबाडा आपोआप सुटला आणि तिच्या भावनाही तिच्या केसांप्रमाणे स्वैर झाल्या.  त्याच्या पोटावर असणारा तिचा हात हळूहळू आपली जागा सोडू लागला, तशी तिच्या मनात चुळबुळ माजली. त्याचा पुरुषी स्पर्श अनुभवताना सखीच्या अंतर्मनात गोड हुरहूर दाटली.


तिच्या नाजूक स्पर्शाने तिच्या धुंदीत असलेल्या कृष्णाच्या अंतरंगातही नाजूक वीज सळसळली आणि बाईकचा वेग बेताचा करून त्याचा एक हात सहज तिच्या हातावरून  फिरला. ती नाजूक बोटे, तो नाजूक स्पर्श, त्या काचेच्या बांगड्या त्याला खुळं करत होत्या.

बोटांवर त्याची अलवार फिरणारी बोटे, मधूनच बांगड्यांवरही भिरभिरत होती तशी सखी स्वतःशीच गालात हसत होती. तिच्या हातापुरता मर्यादित असलेला त्याचा स्पर्श तिला वेडं करण्यासाठी पुरेसा होता. नवरा-बायको म्हणून चालू झालेल्या कृष्णसखीच्या प्रवासातील त्यांचा हा प्रवास दोघांनाही संपूच नये असं वाटणं साहजिकच होतं.


अत्तराच्या धुंदीत असलेल्या माणसाला तो सुंगध वेड लावतो, अगदी नादवतो अजून हवाहवासा वाटतो पण जेव्हा तो सुगंध अचानक येईनासा होतो तेव्हा-


बाईकच्या बेताच्या वेगाने त्यांचा प्रवास लांबला आणि कृष्णसखी वेळ घेऊन मावशीकडे पोहचले. मावशीच्या दारात बाईक लावल्यावर कृष्णाने अजूनही त्याच्या पोटावर त्याला चाचपडू पाहणाऱ्या
तिच्या नाजूक हातावरून प्रेमाने हात फिरवला आणि मोठा श्वास सोडत आपला हात तिच्या हातावरून बाजूला केला. 


त्याचा अलवार स्पर्श थांबल्यावर, तो धुंद प्रवास, ते मोहवणारे स्पर्श अचानक थांबल्यासारखे सखीला जाणवलं. त्या स्पर्शाच्या ओढीने तिने पाठमोऱ्या कृष्णाकडे बघत आश्चर्याने विचारलं,
"काय झालं क्रिष्ण्?"

तिचा प्रश्न ऐकताच कृष्णाला लहर आली आणि तो हसतच मागे बघत थट्टेने बोलला,
"मुलगी झालीये."

"कोणाला?"
सखीने न कळून विचारलं.

कृष्णाला थट्टा करतानाही गुदगुल्या झाल्या.  तो बाईकचा हॅंण्डल नीट पकडून मागे वळून तिच्याकडे बघत खट्याळपणे बोलला,
"आपल्याला."

क्षणासाठी सखी गोंधळलीच पण त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच लाजेची लाली तिच्या गालावर चढली.  ती नजर चोरत लाजून पुटपुटली,
"काहीही!"

अनायसे निघालेला बाळाचा विषय आणि बाळाचं नाव काढताच अनामिक हुरहूर लागलेले कृष्ण सखी, दोघेही आपल्याच दुनियेत होते.

कृष्णा लाजलेल्या सखीकडे बघत गालात हसत सुचकपणे बोलला,
"मास्तरीणबाई, मुलगी आवडते ना?"

सखीने हळूच त्याच्याकडे पाहिलं पण त्याच्या नजरेतील मोहक भाव बघून ती लाजेने नजर चोरत लाजूनच हुंकारली,
"हम्म ऽ."

कृष्णाला कल्पनेनेच पोटात गुदगुल्या व्हायला लागलेल्या. तो ही किंचित लाजत गालात हसत बोलला,
"आपल्याही तुमच्यासारखी बाहुली लयीच आवडेल."

सखी खाली बघूनच गालातल्या गालात हसली. त्याच्या स्पर्शावीना 'त्यांच्या'  बाळाच्या कल्पनेनेच ती मोहरली. कृष्णाही इकडे तिकडे बघत गालात हसू लागला.
ते दोघे त्यांची भावी आयुष्याची मधुर स्वप्न रंगवत असताना कृष्णाच्या मावशीने म्हणजे बनाईने आवाज दिला,
"पोरांनू आलाव व्हय."


ओळखीचा आवाज आल्यावर सखीने मानेला त्रास देत बाजूला पाहिलं. दारातच बनाईला बघून पोहचल्याची खात्री पटून सखी मावशीकडे बघून हसतच बाईकवरून खाली उतरली.

कृष्ण सखीला आलेलं पाहून बनाईला खूप आनंद झाला. ती घरात लगबगीने जात बोलली,
"भायरंच थामा. मी आले."

कृष्णाने हसतच बाईक झाडाखाली लावली आणि सखीसमोर हात पुढे करत बोलला,
"चला."

बाईकवरून उतरल्यावर सखी स्वतः मध्येच मश्गूल होती-
केसांवरून बोटं फिरवत तिने केसांना जागेवर बसवलं मग हातभर पदर पुन्हा व्यवस्थित हातावर घेतला. साडीला एकदा नजरेखालून घालून ती साडीची दुमडलेली किनार सरळ करू लागली. 
कृष्णा तिच्याकडे गालात हसत बघत होता.

"या की रं."
बनाई मावशी बोलल्यावर कृष्णा पुन्हा थट्टेने सखीला बोलला,
"मास्तरीणबाई, जरा 'स्व' मधून निघून आजूबाजूच्या माणसांना बी भाव द्या की."

सखी गालात हसत त्याच्याच भाषेत बोलली,
"तुमचे भाव सदानकदा वाढलेलेच असतात."

कृष्णा तिच्या खांद्याला आपल्या खांद्याने टिकलंत गालात हसत सुरातच बोलला,
"व्हय काय मग तुमच्यासाठी भाव जरा खाली आणतो की."

सोनाईने सांगितलं होतं तेच बनाई डोळ्यांनी पाहत होती- कृष्णाला पुन्हा पहिल्यासारखं हसताना, बोलताना पाहून बनाईलाही आनंद झाला. ती सोनाईची धाकली बहीण असल्याचं सिद्ध करत हसत बोलली,
"आरं, घरात यिवून बसा की गूलूगुलू बोलत."

मावशीच्या बोलण्याने सखीला लाजल्यासारखं झालं. ती चटकन उंबऱ्यात आली. कृष्णाला मात्र गुदगुल्या झाल्या. तो ही उंबऱ्यात येत सखीकडे बघून डोळे मिचकावत गमतीने बोलला,
"सखी, मावशीने परवानगी दिलीये म्हटल्यावर गुलूगुलू बोलायला सुरुवात करायची काय?"

त्याला अगदी आरतीसारखंच सखीसोबत वागताना पाहून मावशींना समाधान वाटलं. सखीने कृष्णाला जिंकलं हे तरं दिसत होतं पण कृष्णा सखीमध्ये पूर्णपणे गुंतल्याची ती पोचपावती होती.


मावशीने हसतच दोघांवरून भाकर तुकडा ओवाळला. त्याच्या बोलण्याने सखीला मात्र लाजल्यासारखं झालं. मावशी घरात गेल्यावर मोकळा-ढाकळा वागणाऱ्या कृष्णाला बघत सखी लाजून हळूच बोलली,
"क्रिष्ण् ऽ थट्टा पुरे हं ऽ! मावशी काय बोलतील."

तिच्या लालचुटुक ओठांवर संधी मिळताच विराजमान झालेल्या त्या सोनेरी केसांना बघून कृष्णा ते दोन केस अलवार चिमटीत उचलत बोलला,
"नवरा-बायकोमध्ये तेवढं चालतंय आणि हे मावशीला माहितीये."

त्याची ओठांवर अडकलेली नजर पाहून सखीचे ते नाजूक ओठ लाजले.

"बाय यं की गं."
मावशीने आवाज देताच सखी गालात हसत घरात गेली. ती गेल्यावर कृष्णा उगाचच स्वतःशीच हसला आणि खेचल्यासारखा घरात गेला. दोघांनाही पाणी देत मावशी हसत बोलली,
"तुम्ही यनार म्हनून आक्काचा वाढ्योळ फोन आलेला पन लै उशीर लागला याला, वाटत गाडी बंद पडल्याली का?"

सखीने उत्तरासाठी कृष्णाकडे पाहिलं. कृष्णा सखीकडे बघून हसतच बोलला,
"काय करायचं मावशे, तुझ्या सुनेला बाईकची भीती वाटते त्यामुळे आलो हळूहळू."

सखीच्या सौंदर्याला तिचं घाबरणंही शोभून दिसल्यासारखं वाटून बनाई हसत बोलली,
"आसू दे... आसू दे. नाजूक पुरी कशाला बी घाबारत्यात."

..आणि एकदा पाहून मन न भरल्याने पुन्हा सखीच्या देखण्या चेहऱ्याकडे बघत हसत बोलली, 
"किशना ऽ, तुज्या बायकूला लगीन मानावलंय हा, आता जरा पानी आलंय तोंडाव."

सखी केस कानामागे घेत गालात हसली. कृष्णा मुद्दामून सखीच्या समोर आला आणि तिचे गाल बारकाईने बघत बोलला,
"कुठे पाणी आलंय मावशे ऽ?"

..आणि हलकेच त्या ओठांच्याकडच्या उंचवट्यावर बोटे फिरवत गालात हसत बोलला,
"गालांवर पाणी यायला अजून वेळ आहे."

त्याची गालावरून बोटे फिरताच सखीने बावऱ्या नजरेने मागे पाहिलं. बनाई स्वयंपाकघरात गेलेली. पाहुण्या घरी कृष्णाचं बिनधास्त वागणं पाहून सखी बावरली. ती पाठमोऱ्या मावशीकडे बघत ओठांत पुटपुटली,
"क्रिष्ण् ऽ ऽ."

तिच्या नाजूक मनाच्या लज्जेचा थांगपत्ता नसलेला कृष्णा तिच्या दरवळणाऱ्या सौंदर्याकडे बघत नेहमीसारखा मोकळ्या आवाजात हसत बोलला,
"बोला मास्तरीणबाई."


त्याचं मोकळं बोलणं मावशीच्या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात घुमलं आणि मावशीने आतून विचारलं,
"काय रं म्हनत्या?"

कृष्णा सखीकडे बघून खोडकरपणे हसत बोलला,
"मला सोडून कुठ्ठं कुठ्ठं जाऊ नका, असं बोलत्यात."

त्याचं बोलणं ऐकून सखीने लाजेने तोंडावर हात ठेवला आणि बनाई बाहेर येत हसत बोलली,
"त्यो न्हाय कुठं जात आनि ह्यं बी तुजंच घर हाये. घाबरू नगं."

सखी उगाचच हसली आणि पाटावर बसली. घरून निघाल्यावर असो, प्रवासात असो, इथं आल्यावर असो कृष्णाचा बदललेला अंदाज सखीला झेपत नव्हता म्हणजे हा हक्क गाजवणारा, बायको म्हणून त्रास देणारा कृष्णा तिला वेड लावत होता पण त्याच्या अशा वागण्याने आधीच लाजवीट सखी, बनाईसमोर लाजेने बावरत होती.‌


लहानपणापासून मावशीकडे येणं जाणं असल्याने कृष्णा स्वतःच्या घरासारखाच तिथेही वावरत होता.  त्याच्यासाठी सोनाई आणि बनाई दोघी सारख्याच! त्यामुळे बनाईसमोर सखीला बिनधास्त पाहणं, तिला छेडणं कृष्णासाठी सहज होतं.

कृष्णा मुद्दामून समोर बसलेल्या सखीला पाहता यावं म्हणून मावशीच्या शेजारी बसलेला. जेवणं झाल्यावर सखी आणि मावशी गप्पा मारत बसल्या आणि कृष्णा प्रेक्षक झाला. नेहमी मेकअपचा लवलेश नसतानाही त्याची सखी वरून नजर हटायची नाही मग आज तर सखी कहर दिसत होती. तिची प्रत्येक अदा पाहताना कृष्णा पहिल्यांदाच पाहिल्यासारखा पाहत होता-

मावशीसोबत बोलताना तिचं मधूनच केस मागे घेणं, तिचं गालातल्या गालात हसणं, हसताना-बोलताना तिच्या ओठांची मोहक हालचाल कृष्णा डोळे भरून गालात हसत पाहत होता. 

गप्पा बराच वेळ चालल्यावर बनाई उठली आणि सखीसाठी खरेदी केलेली साडी तिच्या हातात देत बोलली,
"आता वटी भराय कोन न्हाय. तेवढं तुजं तूच कुकू लाव.

सखी नम्रपणे नकार देत बोलली,
"मावशी हळदीकुंकू लावते मी पण साडी वैगेरे काही नको." आणि संमतीसाठी कृष्णाकडे बघत बोलली,
"हो ना क्रिष्ण्?"

गावच्या रितीभाती माहिती असलेला कृष्णा थोडासा हसून बोलला,
"मावशीने प्रेमाने आणलीये तरं घ्या की."

बनाई तरं हक्काने बोलली,
"नेसल तं काय करंल."

मावशीमध्ये सोनाईची छोटीशी झलक बघून
सखी हसली आणि बनाई तिला समजावत मोकळेपणाने बोलली,
"मी आनले आपली साधी-भुळी पन तू निसूनच जा. निसशील ना?"

बनाईचं बोलणंच इतकं अधिकारवाणीचं होतं की सखीने एकदाचा होकार दिला. ती हसून बोलली,
"नेसते."

'ट्रिंग ट्रिंग..  ट्रिंग ट्रिंग'
कृष्णाचा मोबाईल वाजला. नाना असेल हा विचार करून कृष्णा खिशातून मोबाईल काढत बोलला,
"मावशे ऽ, नानाशी बोलतेस का रं?"

मावशी हो बोलेपर्यंत स्क्रीनवरचं नाव पाहून पुन्हा कृष्णाच हसत बोलला,
"तुझ्या बहिणीचा फोन आलाय. धर, तुझ्यासाठीच केला असणार."

बनाईने हसत मोबाईल घेतला,
"बोल गं आक्कं? जेवलीस का?"

पलिकडून सोनाई,
"व्हय. कधी पोचलं जोडपं?"

लगेचच बनाई सखीकडे बघून बोलली,
"तू साडी न्येस, तवर मी हायेर भायेर." आणि ती मोबाईल घेऊन बोलत बाहेर गेली,
"आलीतंय मगाशीच."

"म्हाळसा काय करत्या?"
लाडक्या सासूने पलिकडून विचारलं.

"साडी नेसत्या."

"बगितलीस ना म्हाळसा? कशीये वागायला, बोलायला?" सोनाईने तोऱ्यात विचारलं.

बनाई सावलीला दगडीवर बसत कौतुकाने बोलली,
"लय गुनाचीये. काय ग्वाड हासती, काय बुलती आनि काय बी बोललं तरी सारखी हासत." बनाई लाडीगुडी लावल्यासारखी बोलली,
"मी काय म्हनते आक्कं, आलीतंय तरं ऱ्हावदे की यक-दोन दिस.. बाय बरं तं किती बुलू आनि किती नगो आसं झालंय मला."

सोनाई घाईघाईत बोलली,
"न्हाय न्हाय. त्यवढं सुडून बोल. हिकडून तिकडून आल्याव ती घरात लागती मला. म्हाळसा नसंल तं मला करमत न्हाय. तुला पायजे तं तूच हितं यिवून ऱ्हा."

बाहेर बहिणी बहिणींच्या गप्पा रंगल्या आणि आतमध्ये तितकीच रंगीत वातावरण झालं.

सखीने बनाईची साडी पिशवीतून काढली. नाजूक लेस असलेली गुलाबी सिल्की साडी सखीला पाहताक्षची आवडली. सखी ती साडी हातात घेऊन हसत बोलली,
"सुंदर आहे ना!"

कृष्णाने ती साडी खोलून सखीच्या खांद्यावर टाकली आणि तिच्याकडे बघत गालात बोलला,
"तुमच्यावर ही खुलून दिसेल."

सखी गालात हसली आणि आपल्या केसांचा आंबोडा घालत बोलली,
"आवरायला हवं नाहीतर उशीर होईल."

तिच्या आंबोड्यातून गालावर रुळणाऱ्या बटेकडे बघत कृष्णा गालात हसत बोलला,
"आवरा की मग."

सखी हसली,
"तुम्ही गेल्याशिवाय कशी आवरू?"


तिच्या गालावरची बट कानामागे सारत कृष्णा तिच्या डोळ्यांत बघत गालात हसत बोलला,
"मी असतानाच आवरा की."

सखी लाजली. त्या साडीकडे पाहताना कृष्णाच्या अंतर्मनातील हुरहूर पुन्हा वाढली. त्याची नजर तिला त्या गुलाबी साडीत पाहण्यासाठी आतुरली. त्याला साडीच्या पदराशी खेळताना पाहून सखी त्याला अंदाज घेत बोलली,
"मला साडी नेसायचीये क्रिष्ण्."

कृष्णा तिच्या पदराशी खेळत तितक्याच सहजतेने बोलला,
"नेसा की मग."

सखी त्याच्या हातातून पदर काढून घेत बोलली,
"मग जा ना बाहेर."

"नाही."

सखी लाडीकपणे बोलली,
"असं काय करता? बास ना मस्करी, आपल्याला जायला उशीर होईल."

तिची लाडीगोडी पाहून कृष्णा जवळ येऊन तिच्या कानांत कुजबुजला,
"मावशी काय आता अर्धा तास येत नसते. तुम्ही म्हणत असाल तरं आपल्याला साडी नेसवताही येते."

ती कल्पनाही सखीच्या मनासोबत तिच्या देहाला गोंजारून गेली. त्याच्या बोलण्याने लाजवीट सखी आणखीनच लाजली. ते काही क्षण स्थीरावल्यासारखे झाले. त्या धुंद क्षणांच्या दरवळाने दोघेही मोहरले. तिच्या खांद्यावरची गुलाबी साडी हातात घेताना कृष्णाचा हातही लाजेने श्वासांसारखाच कंपला.

© प्रियांका सुभा कस्तुरी
२४/०९/२०२४

🎭 Series Post

View all