Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२०७

कृष्ण सखी
कृष्ण सखी-२०७

सखीच्या चेहऱ्यावरचा नकार आठवून कृष्णा स्वतःशीच नाराजीने पुटपुटला,
'नवरा-बायको मध्ये तेवढं चालतंय की! जगावेगळा हट्ट होता काय माझा? जाऊ दे, यानंतर सखी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत तोवर मी ही-'

तिला बायको म्हणून मनापासून स्वीकारलेला कृष्णा, त्यांच्या नात्यात पुढचं पाऊल टाकण्यासाठी आतुर असलेला कृष्णा सखीचं मागचं पाऊल पाहून तिच्यावर नाराज झालेला.

सखीसोबत लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच कृष्णा कारण नसतानाही घराबाहेर थांबलेला. आज तो पारावर होता म्हणून तिथे गप्पांना वेगळीच रंगत आलेली. कामावरून आलेले सुधीर, दत्ता, मच्छिंद्र सगळेच पारावर जमा झाले. गावातील जेष्ठ देखील गप्पांमध्ये सामिल झाले आणि वेगळाच माहोल तयार झाला असं असतानाही कृष्णाच चित्तं थाऱ्यावर नव्हतं. त्यांच्या गप्पा ऐकून सुध्दा त्याच्या मनापर्यंत पोहचत नव्हत्या. जेवणाची वेळ होईपर्यंत त्याने कसातरी कट काढला मग दत्तासोबत सर्वांचा निरोप घेऊन घरी निघाला.

बनाईच्या घरून निघाल्यापासून कृष्णाचं बदललेलं वागणं सखीला दुखावणारं होतं. सखी त्याची वाट बघत उंबऱ्यात उभी राहिलेली. झालेल्या प्रकाराने तिचा चेहरा मलूल झालेला.

एरवी हरएक गोष्ट सोनाईला सांगणाऱ्या सखीने आज दोघांबद्दल अवाक्षरही तिच्याकडे काढलं नव्हतं, काय झालं असेल याचा ठसठशीत अंदाज आल्याने सोनाईनेही सखीला काही विचारलं नव्हतं पण दुपारची संध्याकाळ झाली तशी सखी जास्तच अस्वस्थ वाटली. कृष्णाचाही अजून पत्ता नव्हता त्यामुळे सोनाईने बाहेर अस्वस्थपणे बघणाऱ्या सखीकडे बघत मुलांचं टिव्हीवरील दुर्लक्ष होऊ नये म्हणून हळू आवाजात विचारलं,
"म्हाळसा, समदं धड भलं हाये ना?"


सोनाईपासून आपली अस्वस्थता लपवत सखी पुन्हा खाटेवर बसली आणि उगाचच हसत बोलली,
"हो आई, सगळं ठीक आहे. ते भूक लागलीये म्हणून क्रिष्णची वाट बघतीये."


तिच्या चेहऱ्यावरचे कोरडे भाव कळूनही न कळल्यासारखे सोनाई हसली आणि बाहेरून दत्ताचा आवाज आला,
"मास्तर, तुमच्यामुळं गप्पांचा फड आज भलताच रंगला, आसंच आधीमधी यळ काढून यत जा की पाराव. तुम्ही आसल्याव जीव यिरंगाळतो."

दत्ताचा आवाज ऐकून सखी लगेच उंबऱ्यात आली तेव्हा कृष्णा अंगणाच्या पायऱ्या चढत थोडासा हसत बोलला,
"येत जाईन. जा जेऊन घे आता."

दत्ताशी बोलल्यावर तेच हसू चेहऱ्यावर ठेवून पुढे आलेल्या कृष्णाची नजर सखीवर गेली. नजरेला नजर मिळाल्यावर सखी किंचित हसली आणि कृष्णा लगेच नजर चोरत चपला उतरवत बोलला,
"चला जेवायला घ्या, भूक लागलीये."

सोनाई टिव्ही बंद करत बोलली,
"च्याचा घोट बी घेतला न्हाईस मं भूक लागनार तं काय व्हैल."

कृष्णा पाठोपाठ सखी आणि लागलीच सोनाईसोबत मुलंही स्वयंपाकघरात गेली. जेवताना मुलांचा नेहमीसारखा किलबिला चालू होता पण कृष्णा गपचूप जेवत होता. त्याची चूप्पी सखी आणि सोनाईला लगेच जाणवली.

सोनाईला वेगळं वाटू नये म्हणून सखी कृष्णाशी मुद्दामून बोलत होती,
"क्रिष्ण् ऽ, कालवण देऊ?"

कृष्णा ताटासमोर हात करत बोलला,
"नको."

सखी थोडीशी हसून बोलली,
"मग थोडीशी भाजी देऊ?"

कृष्णा ठाम नकार असल्यासारखा बोलला,
"नको."

सखी सोनाईकडे बघून उगाचच हसली. सोनाईही बोलायचं म्हणून बोलली,
"त्याला लागलं तं त्यो घिल की, तू ज्येव."

सखी पुन्हा उगाच हसली. सोनाईसमोर पुन्हा कृष्णाचा नकार येऊ नये म्हणून ती काही क्षण गप्प बसली. त्याची भाकरी संपताच सखी पुन्हा काहीच झालं नसल्यासारखं नेहमीसारखं बोलली,
"तुम्हाला आवडतो ना, म्हणून मुद्दाम जिऱ्याची फोडणी देऊन भात केलाय."

सखीची त्याच्याशी बोलण्यासाठीची धडपड कृष्णाला कळत होती तरीही तो नव्या नवऱ्यासारखा तिच्यावर फुरंगटून बसलेला. तो रागावला असताना तिचं असं काहीच न झाल्यासारखं वागणं पाहून त्याने ठळकपणे आपली नाराजी दाखवली.

तो त्याच्यासाठी केलेला भात नाकारत ताटात हात धुवत बोलला,
"भूक नाहीये."

"आरं थोडातरी-"
सोनाई बोलेपर्यंत कृष्णाने हात धुतला आणि तडक बाहेर गेला.

कृष्णा गेल्यावर सखीचा घास हातातच राहिला. तो अर्धपोटी उठलेला पाहून तिलाही जेवण जाईना. कृष्णा गेल्यावर सोनाईने मान हलवली आणि सखीचा उतरलेला चेहरा पाहून मुलांच लक्ष नाहीये हे बघून हळूच बोलली,
"गेला तंं जाव दे. आदीमदी चतकोर भाकरी कमीच खावी, चांगलं आसंत."

सखी तोंड पाडून बोलली,
"आई ऽ, किती रागावलेत हे!"

आरव आणि गौरीची जेवतानाही चाललेली मस्ती पाहून सोनाई नेहमीसारखी सखीला समजावत हळू आवाजात बोलली,
"त्याजा राग म्हंजी पान्यावरचा बुडबुडा. बायकूनं जरा हुशार वागलं तरं रातीच्या आंधारात नवऱ्याचा राग टिकतो व्हय?"


सोनाई भाकरीचा घास चघळत स्वतःशीच बडबडली,
"तू बी जरा हुशार वागत जा की, का समदं मीच इस्कटून सांगायला पायजे?"


सोनाईच्या बोलण्याचा अर्थ उमगून सखीला क्षणात लाजल्यासारखं झालं. सोनाईचा सुखी संसाराचा कानमंत्र ऐकून सखीच्या मरगळलेल्या मनाला जणू नवेपणाची पालवी फुटली.

सोनाईचं वाक्य तिच्या मनात घुमत राहिलं-
'रातीच्या आंधारात नवऱ्याचा राग टिकतो व्हय?'

रात्रीचं बायकोसारखं वागण्याच्या कल्पनेनेच सखीला गुदगुल्या झाल्या. ती स्वतःच्याच कोशात गेली आणि स्वयंपाकघर आवरताना मनाचे मनसुबे रचू लागली-

रागावलेला तो, मनवणारी ती,
थंड हवा खेळवणारी खिडकी!

तरीही नवरोबा ऐकले नाही तरं-

तरं मग तो- ती- त्यांचा एकांत- तीच साडी आणि अंगाला झोंबणारी थंडी, सगळ्यांचा गुंता होता.

बायकोसारखा विचार करण्यानेही सखीचे तिच्याही नकळत ह्रदयाचे ठोके वाढले. पुढचं पाऊल उचलण्याचा कल्पनेने तिला गोड हुरहूर जाणवू लागली.


सखीला भांडी धुताना स्वतःमध्ये गुंग गालात हसताना पाहून सोनाईला बरं वाटलं. दुपारपासून कोमेजलेल्या  चेहऱ्यावर आता संसाराची स्वप्नं दिसताच सोनाई भांड्यावर जोर काढत सहज बोलल्यासारखी बोलली,
"म्हाळसा, तू बी दमली आश्शील आनि आज गारठा बी लय जानावतोय, जा तू पड."

सखी थंड पाण्यात बोट फिरवत हसत बोलली,
"नको आई, भांडी आवरली की दोघीही-"

सोनाई मध्येच रागावली,
"त्यो फकस्त गाडीव बसून आनि बाता मारून दमला,  त्यो झोपला ना? मग दुपारपास्नं तं तुज्या हाताला जरातरी दम हाये व्हय? तू न्हायस व्हय दमलीस? जा, आत जाऊन पड जा."

सोनाईची माया पाहून सखी कुडकुडत हसली,
"आई ऽ ऽ."

सोनाई तोऱ्यात बोलली,
"गारठ्यात टाॅय टाॅय करू नगो. जा जाऊन पड परत सकाळी तुजा डोळा उघडत न्हाई."

सोनाईचा आग्रह पाहून सखी भांडी धुता-धुता उठली आणि चूलीवरच्या गरम पाण्यात हात धुवत चोरी केल्यासारखी हळूच बोलली,
"सकाळी जागच येत नाही. डोळे उघडतच नाहीत."

सखीचा तोच सूर पकडून सोनाईने पुन्हा तीच री ओढली,
"म्हनूनच बोलत्या जा पड."

खोलीत जाण्याच्या आतुरतेला सोनाईमुळे खतपाणी मिळाल्याने सखी हातावर हात घासत गालात हसत बोलली,
"थॅंक्यू आई, तुम्ही कित्ती चांगल्या आहात."

सोनाई काही बोलणार इतक्यात तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखून सखीच मोकळेपणाने हसत बोलली,
"हो, माझं थॅंक्यू चुलीत घालून जाते." आणि सखी हसतच आपल्या खोलीत गेली. ती गेल्यावर सोनाई मनापासून हसत बडबडली,
'म्हाळसा ऽ म्हाळसा, आगं किती निर्माळकुंडी तू!
तू सासूलाच याड लावलंस मं नवरा का न्हाय तुज्यासाटी खुळा व्हयाचा!'

मघाशी जेवण झाल्यावर कृष्णा तरातरा आपल्या खोलीत आला आणि सवयीने खिडकीपाशी उभा राहिला. त्याचा अबोला त्यालाच त्रास देत होता. उदास मनाने काही क्षण एकांतात घालवल्यानंतर त्याच्या पायांना नेहमीसारखा नाजूक वेढा पडला आणि सोबतीला नेहमीची लडीवाळ हाकही ऐकू आली, "बाबा मैं आयी."

सुरजच्या त्या मायेच्या स्पर्शाने कृष्णाच्या तगमगणाऱ्या जीवाला क्षणासाठी शांती मिळाली. सुरजला उचलून घेत कृष्णा हसत बोलला,
"पैलवान पोटभरून जेवला काय?"

सुरज आपल्या केसांचा टोप हलवत हसत बोलला,
"पैलवान लय लय पोटभरून जेवली."

कृष्णा त्याच्याकडे बघून मनापासून हसला. सुरज कृष्णाच्या खांद्यावर हाताने थोपटत बोलला,
"बाबा, पैलवान सोयेगी."

कृष्णा हसला आणि त्याच्यासकट पलंगावर आडवा झाला. गोधडी अंगावर घेऊन त्याला कुशीत घेऊन कृष्णा सुरजला थोपटू लागला. सुरज रोजच्यासारखा कृष्णाच्या कुशीत येताच पेंगुळला. कृष्णा मात्र झोपलेल्या सुरजला न्याहाळत प्रेमाने थोपटत होता.

सुरज म्हणजे सखीचीच प्रतिकृती!
तोच रंग, तीच चेहऱ्याची ठेवण, तसंच नाक, तसंंच दुसऱ्याला भुरळ घालणारंं बोलणं!
सुरजकडे पाहताना कृष्णा पलंगावरही तिच्या आठवणीत तिच्यासाठी तळमळला. त्याची नजर सखीच्या उशीवर गेली आणि आपसूकच प्रेमाने कृष्णाची बोटे त्या उशीवर रेंगाळली.

बायको म्हणून तिला स्पर्श करण्यासाठी, तिला कवेत घेण्यासाठी तिच्याप्रती असलेल्या ओढीने तो आतुरला  पण सखीला तिथेच, त्याच वळणावर संकोचलेली उभी पाहून तो उदास झाला.


प्रेम आहे तरं ते दाखवायचं! ते स्वीकारायचं!
ते मिरवायचं! ते जगायचं! ते भरभरून जगायचं!
हाच कृष्णाचा स्वभाव!

त्याच्या उमलत्या भावनेचा सखीकडून झालेला अवमान आठवून त्याचं मन पुन्हा दुःखी झालं. सुरजला कुशीत घेऊनच तो दुःखी मनाने डोळे मिटून गोधडी अंगावर घेत मनात बडबडला,
'सखी .. सखी .. सखी क्षणालाही त्यांचा विसर पडेना आणि त्यांना काही फरक पडेना. सखींच्या कृष्णा, त्यांनाही थोडं वेडंं कर की बाबा.'


सोनाईसोबत बोलून सखी मनाचे कंगोरे रचत खोलीत आली तेव्हा सुरजला कुशीत घेऊन कृष्णा झोपलेला. त्याची झोप लागलेली पाहून सखीला नवलच वाटलं.
तिच्यावर रागावून तिच्या जीवाला घोर लावून तो असा कसा झोपी गेला. सोनाई स्वयंपाकघरात होती त्यामुळे सखीने खोलीचा दरवाजा हळूच ओढून घेतला आणि ती पलंगाजवळ आली.

एरवी कृष्णाचा झोपेतही हसरा दिसणारा चेहरा आज तिला उगाचच उदास वाटला. त्याचा झोपेतही सखीच्या उशीवर असणारा हात पाहून तो तिची वाट पाहत झोपी गेल्याच तिला जाणवलं आणि तिचा चेहरा एवढूसा झाला.


त्याचा उबदार हात हातात घेऊन त्याच्याकडे बघतच सखी पलंगावर आडवी झाली. बेचैन मनाने सखीने कृष्णाची गोधडी पांघरली तरीही रात्रीचा गारवा ब्लॅंकेटमधूनही तिच्या अंगाला झोंबत होता. रोज तिच्या कुशीत असणारा सुरज आज त्याच्या कुशीत होता. तिच्यासाठी तिच्यावर रागवलेला कृष्णा पाहताना सखी गालात हसली आणि हलकेच सुरजजवळ सरकली. कृष्णा झोपेतच कुशी झाला आणि सुरजसोबत सखीलाही कुशीत घेऊन पुन्हा झोपी गेला. त्याचा वजनदार हात कमरेवर पडताच सखी शहारली. तिची नजर कृष्णावर स्थिरावली.
कृष्णाच्या स्पर्शाला आसुसलेली सखी त्याच्या चेहऱ्यावरून भिरभिरती नजर फिरवत बिघडलेल्या श्वासांनी ओठांत पुटपुटली,
'अगदी असंच, जागेपणी कधी कुशीत घ्याल!'

सखी अगदी वरचेवर त्याच्या चेहऱ्यावरून अत्यंत प्रेमाने हात फिरवत तशीच पुटपुटली,
'मला तुमच्यासारखं क्षणात मनातलं ओठांत नाही आणता येत क्रिष्ण् पण ही सखी क्रिष्ण् वेडी आहे. तुम्हाला जी ओढ आता जाणवतेय ती मी कधीपासून अनुभवतीये.'

तो झोपेत असतानाही मनीचे भाव ओठांवर येताना सखीचे श्वास वाढले. नजर भिरभिरली. सखी लाजरी हसत अस्पष्ट बोलली,
'आय... आय लव यू क्रिष्ण्!'

सखीचा हात चेहऱ्यावरून फिरत असल्याने कृष्णा मोरपीस फिरल्यासारखा गालात हसला आणि सखी स्वतःशीच लाजली. त्या शब्दांची गोडी जशी की तिच्या जिभेवर पसरलेली. सखीने हळूच त्याच्या रूंद कमरेवर हात टाकला आणि गालात हसत हळूहळू निद्राधीन झाली.

© प्रियांका सुभा कस्तुरी
२६/०९/२०२४
      

🎭 Series Post

View all