Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२०८

कृष्ण सखी
कृष्ण सखी -२०८

तो झोपेत असतानाही मनीचे भाव ओठांवर येताना सखीचे श्वास वाढले. नजर भिरभिरली. सखी लाजरी हसत अस्पष्ट बोलली,
'आय... आय लव यू क्रिष्ण्!'

सखीचा हात चेहऱ्यावरून फिरत असल्याने कृष्णा मोरपीस फिरल्यासारखा गालात हसला आणि सखी स्वतःशीच लाजली. त्या शब्दांची गोडी जशी की तिच्या जिभेवर पसरलेली. सखीने हळूच त्याच्या रूंद कमरेवर हात टाकला आणि गालात हसत हळूहळू निद्राधीन झाली.


"काकू, आज आर्धा लिटर दूध भेटंल का?"
"न्हे की."
"आता दे तुझ्याच तांब्यात."
"मं दे, फळीवरचा तांब्या."
थोडा कुतूहलाने प्रश्न आला,
"सूनबाय उठली न्हाय व्हय?"
..आणि लगेच सोनाईचं उत्तर आलं,
"आगं माज्या बी आदी उठल्याली ती, पन गारठ्यात रामाच्या पाऱ्हाला उठून काय करायचं? म्हनून मीच परत झोप म्हनले."


अर्धवट झोपेत असताना स्वयंपाकघरातून संवाद ऐकू आला आणि सखी खडबडून जागी झाली.
'आजही उठायला उशीर' या विचाराने तिने उठण्यासाठी चुळबूळ केली. लवकर झोपल्याने अंगावरील गोधडी हलल्यावर कृष्णा जागसूद झाला आणि त्याच्या हाताला नाजूक स्पर्श झाला, सोबत काकणांची किणकिण होतीच. कृष्णाने क्षणात डोळे उघडले आणि सकाळी सकाळी सुखद धक्का!

सखी त्याच्या गोधडीत त्याच्या मिठीत होती. कृष्णाने खाली पाहिलं तरं सुरज घोरपडीसारखा त्याच्या छातीला बिलगून झोपलेला.

कृष्णा रात्रीचं आठवू लागला, त्याला रात्री सखीसोबत बोलायचं होतं, थोडक्यात तिच्यावर रागवायचं होतं पण सहज त्याने डोळे झाकले आणि त्याची खरोखर झोप लागली. आता डोळे उघडले तर सखी जवळपास त्याच्या कुशीत होती. हे स्वप्न आहे की सत्य! सखीला श्वासांच्या अंतरावर पाहून कृष्णाची धडधड होऊ लागली. तो गालात हसत सखीकडे बघत होता.

सखी पटकन उठण्यासाठी आपल्या चिमणीच्या ताकतीने त्याचा भारदस्त हात आपल्या कमरेवरून काढण्याचा प्रयत्न करू लागली. कृष्णाला हात हलल्यासारखा वाटल्यावर त्याने हाताचा अंदाज घेत थोडसं चाचपून पाहिलं. अचानक उघड्या कमरेवर त्याची बोटे फिरल्यावर सखी शहारली आणि क्षणात नजरानजर झाली. पहिल्यांदाच पलंगावर जागेपणी इतक्या जवळ असलेल्या त्या दोघांच्या श्वासांची लय आपोआप बिघडली.

कृष्णाने गालात हसत तिच्या पायावरच्या पायाने तिचे पाय जवळ खेचले तशी सखीची नजर चलबिचल झाली. कृष्णा गालात हसत हळूच बोलला,
"सखी ऽ ऽ."

सखीही गालात हसत हुंकारली,
"हम्म ऽ.."

पायामध्ये पाय गुंतलेले असताना कृष्णाच्या पायाचा अंगठा सखीच्या पायावर रेंगाळू लागला. पायावर होणाऱ्या त्या अलवार स्पर्शाने सखी सकाळी सकाळीच मोहरली. तिच्या बिघडलेल्या श्वासांना लाजेची किनार लाभली.‌ सखी त्याच्याकडे बघतानाही लाजली.

कालपर्यंत तिच्याशी एक शब्दही धड न बोलणाऱ्या कृष्णाला पुन्हा पहिल्यासारखं तिच्या मध्ये हरवलेलं पाहून सखीला एक गोष्ट जाणवली,

'रात्रीच्या अंधारातच नाही तरं एकांतातील काही नाजूक हळव्या क्षणांमध्येही नवरा-बायकोमधील अबोला मिटवण्याचंं सामर्थ्य असतं.'


एखाद्या फुलाला गोंजाराव कृष्णा तसाच तिच्या पायाला गोंजारत होता. तो नाजूक स्पर्श पुन्ह: पुन्हा करताना तो स्वतःही फुलत होता. तिचा लाजलेला चेहरा पाहताना तिला कवेत घेण्यासाठी त्याचा देह आतुरला आणि कृष्णा क्षणात पुढे सरकला तसा छातीशी बिलगून असणाऱ्या सुरजची त्याला जाणीव झाली. उचललेली मान पुन्हा उशीवर ठेवत कृष्णा स्वतःच्या आतुरतेवर हसला आणि त्या नाजूक कमरेचं बोटांनी मोजमाप करत वाढलेल्या श्वासांनी गालात हसत पुटपुटला,
"सखी ऽ ऽ."

पायावर आणि कमरेवर एकसारख्या होणाऱ्या त्याच्या स्पर्शांनी मोहरलेली सखी वाढलेल्या श्वासांनी नजर चोरत हळूच ओठांत बोलली,
"काय?"

तिच्या पायावर अंगठा भिरभिरत कृष्णा गालात हसत बोलला,
"पैलवान आता मोठा झालाय ना?"

फक्त 'तो, ती आणि त्यांचे नाजूक क्षण' असं असताना त्याने अचानक सुरजचा विषय काढल्यावर सखीने न कळून त्याच्याकडे पाहिलं,
"हं ऽ?"

कृष्णा तिचा गोंधळ ओळखून तसाच गालात हसत खट्याळ नजरेने बोलला,
"नाही म्हणजे मोठी मुले आजीशेजारी गोष्टी ऐकत झोपतात म्हणून म्हटलं."

सखी त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून नजर चोरत लाजरी हसली. तिची धुंदी मनावर चढत असताना तिचं असं लाजरं हसणं म्हणजे-

कृष्णाचे श्वास भलतेच बिघडले. तिच्या कमरेवरचा हात हळुवारपणे आजूबाजूला सरकू लागला तसं सखीने लाजून अंंग चोरलंं. मोहक क्षणांच्या कल्पनेनेच तिच्या श्वासांंची लय बिघडली. त्याच्या स्पर्शाच्या ती मोहात पडली. तिचं बावरं मन 'अजून अजून आणि अजून' एवढीच मागणी करू लागलं. दोघेही प्रेमी प्रणयातुर भावनांना गोंजारत असताना स्वयंपाकघरातून पुन्हा आवाज आला,
'सुलायकाकू, हा घे तांंब्या.'

"ठ्येव तितं, बस च्या घे."

"च्या बी काय नगो. वावरात जायचं हाये."

"आगं बस, सकाळी सकाळी च्याला न्हाय बुलू न्हाय."

त्यांचा संवाद ऐकताच सखी भानावर आली. मोहक जग खुणावत असताना वास्तवाची जाणीव झाली आणि मनावर दगड ठेवून सखी कृष्णाचा हात कमरेवरून काढण्याचा प्रयत्न करत त्याच्या डोळ्यांत पाहत बोलली,
"उठायला हवं. फार उशीर झाला."

किती वर्षांनी पुन्हा जाग्या झालेल्या सुप्त भावनांना सांभाळत कृष्णा काहीसा हट्टाने बोलला,
"काही नाही उशीर झाला."

त्याची कमरेवरची घट्ट झालेली पकड पाहून सखीची द्विधा अवस्था झाली. तिच्या इतकीच त्याची आतुरता
पाहून तिचं ही मन वेडावलं पण उठायला उशीर झालाय, सोनाई कधीची उठलीये, आपल्यालाही उठायला हवं या विचारांनी ती गोंधळली.

"आजून उठली न्हाय व्हय सखी?"
त्या बाईने विचारल्यावर आपल्या नाजूक भावनांना सांभाळत सखी त्याचा कमरेवरचा हात काढत त्याला समजावत बोलली,
"आई उठलेत, मग मलाही जायला हवं ना!"

कृष्णा तिच्यासोबतच्या मोहक क्षणांच्या ओढीने कमरेवरील पकड जराही सैल न करता हट्टाने बोलला,
"थोडा वेळ इकडेतिकडे झालं तरी चालतंय की."

"पोराची जात हाये, कधीकधी व्हतो यळ."
सोनाई बोलल्यावर सखी पुन्हा खडखडीत जागी झाली आणि आपल्या कमरेवरचा कृष्णाचा हात काढत घाईत बोलली,
"प्लीज सोडा ना, उशीर होतोय."

तिच्यासोबत प्रत्येक क्षण घालवण्यासाठी त्याचा जीव आतुर असताना तिचा बाहेर जाण्यासाठी चाललेला हट्ट पाहून कृष्णा एकटक बघत स्थिर आवाजात बोलला,
"तुम्हाला खरंच जायचंय काय?"


त्याच्या नजरेतील राग ओळखून सखी तोंड पाडून बोलली,
"आई उठल्या म्हटल्यावर... मलाही बाहेर जायला हवं ना? आधीच उशीर झालाय."

ती बरोबरच बोलतीये, तिच्या जागी ती योग्यच आहे हे कळत असूनही कृष्णामधील नवरा तिच्यावर रागावला. त्याच्याप्रती तिला काहीच वाटू नये, याचं त्याला दुःख झालं. त्या तंद्रीतच त्याने झटकन तिच्या कमरेवरचा हात काढला, दुसऱ्याच क्षणी तिचे पाय मोकळे केले आणि बिघडलेल्या श्वासांनी तिच्याकडे बघू लागला.

त्याचा तोरा पाहूनच त्याच्या रागाचा अंंदाज येऊन सखी तोंड पाडून बोलली,
"तुम्ही रागावू नका ना प्लीज!"

कृष्णा नजर दुसरीकडे फिरवत तिरकसपणे बोलला,
"तुम्हाला जायचंय तरं जा, उगाच वेळ वाया घालवू नका."

अशा नाजूक प्रसंगी कृष्णा रागावल्यामुळे सखी काही क्षण तिथेच घुटमळली,
"क्रिष्ण् ऽ."

कृष्णा तसाच गाल फुगवून दुसरीकडे बघत गुरगुरला,
"तुम्हाला उशीर होतोय."

सखीने एकदा मागे वळून दरवाजाकडे पाहिलं-
'खूप उशीर झालाय, आता उठायलाच हवं'
या जाणीवेने तिने मनावर दगड ठेवून ती गोधडी बाजूला केली. त्याच्या पायाच्या भाराने आजही तिच्या साडीच्या निऱ्यांनी जागा सोडलेली. साडी सावरताना सखीने हळूच मागे वळून पाहिलं तरं कधी नव्हे तो कृष्णा तोंडावर गोधडी घेऊन झोपलेला. कृष्णा पुन्हा नाराज झाल्यामुळे काही क्षणांपूर्वी नवख्या भावनांनी हुरळून गेलेल्या सखीचं मन उदास झालं.


सखीची अंघोळ होईपर्यंत कृष्णाही उठला. खोलीत पडल्या पडल्या पाठ अवघल्यामुळे तो उठून बसला. साबणाचा मंद सुगंध खोलीपर्यंत दरवळला, सोबत ती नाजूक काकणांची किणकिणही ऐकू आली आणि कृष्णाचं मन सखीकडे ओढ घेऊ लागलं. त्याची नाराजगी होतीच तिच्यावर पण मन तिला पाहण्यासाठी तरसलं आणि कृष्णा तिच्या ओढीने आपोआप स्वयंपाकघरात खेचला गेला.


नुकतीच न्हाऊन टाॅवेल केसांना गुंडाळलेली. पदर कमरेला खोचून सोनाईकडे बघून हसणारी सखी पाहताना क्षणभर कृष्णाच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं.

सखीने सहज कृष्णाकडे पाहिलं. त्याला आपल्याडेच शांत चेहऱ्याने पाहताना बघून त्याचा राग गेला, असं समजून सखी त्याच्याकडे बघून गालात हसत बोलली,
"उठला तुम्ही, माझं लक्षच नव्हतं."

सखीला वाटलं कृष्णा नेहमीसारखा मस्करीत काहीतरी बोलेल पण झालं उलटंच. सखीला पुन्हा काहीच घडलं नसल्यासारखं बोलताना पाहून कृष्णा तिच्यावरची नजर हटवत सोनाईला कोरडेपणे बोलला,
"पाण्याला जाळ घाल, तोवर दूध घालून आलो."

सोनाईची नजर लगेच सखीवर गेली. तिचं बळेच हसू बघून सोनाईने न बघितल्यासारखं केलं. मघाशी खोलीतून दोघांंची खुसूरफुसूर ऐकून गाडी रुळावर आल्यासारखी तिला वाटलेलं पण-

कृष्णा दूधाची किटली घेऊन डेरीवर गेला. तो आल्यावरही तथास्तु होता. सोनाई फक्त उठल्यापासून दोघांचं वागणं पाहत होती. सखी जितका त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल तो तितकाच आपला राग मूकपणे व्यक्त करत होता. त्याने त्याच आवरलं आणि पाणी प्यायला पुन्हा स्वयंपाकघरात आला की सखी हातात दूधाचा ग्लास घेऊन तयारच होती.

तो आल्यावर सखी हातातील ग्लास पुढे करत बोलली,
"दूध घेताय ना."

कृष्णा एक नाही की दोन नाही. उठल्यापासून त्याचा असा अबोला पाहून सखीचा चेहरा उतरलेला. सखी तोंड पाडून बोलली,
"दूध घ्या ना."

तरीही कृष्णा गप्पच! तो मुद्दामून पाण्याचा तांब्या हातात पकडून उभा राहिला. मोरीजवळ कृष्णा, त्याच्यासमोर उभी सखी आणि चुलीपुढं सोनाई! दोघांमध्ये बोलायचं नाही असं ठरवलली सोनाई सखीचा उतरलेला चेहरा पाहून लाकूड पुढे सारत बोललीच,
"किशना ऽ, पुरगी कवापास्न बोलत्या.
आईकायला यत न्हाय व्हय?"


कृष्णा तांब्या मोरीच्या कठड्यावर ठेवत तिच्याच सुरात बोलला,
"गरम आहे दूध, तोंड भाजून घेऊ काय?"


लगेच सखी ग्लासवर फुंकर घालत काकुळतीला आल्यासारखी बोलली,
"पाच मिनिट थांबा हं, होईल थंड."


"पाच मिनिट?"
कृष्णा सखीकडे बघून रुक्षपणे बोलला,
"मलाही तुमच्यासारखीच लयी घाई आहे, की एक मिनिट थांबायला पण वेळ नाही."


त्याचा टोमणा सखीला बरोबर कळला आणि तिचा चेहरा पूर्ण उतरला. ती तोंड पाडून बोलली,
"उपाशी नका ना जावू."

सखीकडे एक नजर बघून कृष्णा स्वयंपाकघरातून तरातरा बाहेर गेला. त्याने बॅग उचलली आणि बाईकची चावी घेत सोनाईला आरोळी देत बोलला,
"आई ऽ, येतो."

"आरं डबा तरी घिऊन जा."
सोनाई चुलीपुढूनच बाहेर डोकावत गडबडीत बोलली.

"गेलो मी." त्याचा अंगणातून आवाज आला आणि काही क्षणांतच बाईक गेल्याचा आवाज आला.

कृष्णा गेल्यावर स्वयंपाकघरात फक्त सखी आणि सोनाई होत्या. सखीला गप्प झालेली पाहून सोनाई बोलायचं म्हणून बोलली,
"तू आज शाळंत न्हायस गिलीस?"

सखीला खूप अपराधी वाटत होतं. ज्या प्रेमासाठी ती भुकेली होती तेच प्रेम आभाळभर मिळत असताना तिला ते सावरता येत नव्हतं. सोनाईने सखीकडे पाहिलं तरं सखीचा चेहरा रडवेला झालेला. सोनाईला वाईट वाटलं. गुडघ्यावर हात ठेवून मध्यम वयाची सोनाई दमानं उठली आणि सखीजवळ येऊन तिला समजावत बोलली,
"त्याजं काय मनावं घितीस? त्यो आसाच."

सोनाईकडे बघताना सखीचे डोळे पुन्हा भरून आले. ती रडवेली होत बोलली,
"त्यांची काहीच चुकी नाही आई, चुकी माझीच."

सोनाई तिचे डोळे पुसत तिला समजावत बोलली,
"आगं पन झालंय काय? का यवढा ताठलाय त्यो?"

'सखी काय सांगणार? पण सोनाईला काही सांगायची खरंच गरज होती?'

सखीने लगेच नजर चोरली. सोनाईला अंदाज होताच ती थोडीशी हसली,
"यडे, नवरा जरा रागावला की आशी रडत बसनार व्हय तू?"

सखी काहीच बोलली नाही. सोनाई थोडीशी हसून बोलली,
"म्हाळसा, आजच्या दिस पाॅरांची शाळा ऱ्हाव दे."

सखी टेन्शनमध्ये बोलली,
"नको नको, क्रिष्ण् संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा माझ्यावर रागावतील. म्हणतील तुम्ही तरं गेलाच नाही वरून मुलांचीही शाळा बुडवली."

सोनाई तशीच हसून बोलली,
"पोरांची शाळा बुडले त्यं ध्यानात तं याला पायजे त्याज्या."

सखीच आधीच डोकं दुखत होती. काहीच न कळल्याने ती गोंधळून सोनाईकडे बघून लागली. सोनाई हसत बोलली,
"मी आऱ्या, सुऱ्या आनि गौरीला घिवून बापूकडं जाते. रातच्याला तितंच ऱ्हाते. सकाळच यिवू."

भोळ्या सखीने काळजीने विचारलं,
"का? मामांची तब्येत ठीक नाहीये का?"

सोनाई हसली,
"त्यो बरा हाये पन तुजा कामदाराचंच डोकं ठिकान्यावं न्हाय. त्यं तू ठिकान्याव आन."

सखीने बारीक चेहऱ्याने सोनाईकडे पाहिलं. तशी सोनाई सखीचा गाल थोपटत तिला समजावत बोलली,
"म्हाळसा ऽ, नवऱ्याशी कदी भांडावं? कदी वाकड्यात शिरावं? कदी नमतं घ्यावं? कदी यळ मारून न्यावी? कदी गुडीला यावं? ह्यं नवऱ्याच्या बायूकाला कळायला पायजे. आपलं आपूनच हुशार व्हयाचं."

चटकन पेन आणि डायरी काढून सोनाईचे शब्द टिपून घ्यावे, नेहमीसारखंं असंच सखीला वाटलं. सोनाईच्या शब्दांनी सखीच्या मनाला दिलासा मिळाला. ती गालात हसत मान हलवत हुंकारली,
"हम्म ऽ."

सोनाई हसत मोकळेपणाने बोलली,
"नुसती नंदीबैलावानी मान हालवू नगा. जरा हुशार वागा. का समदं मीच शिकवायला पायजे?"

सखी खुदकन हसली. तिच्या चेहऱ्यावर हसू बघून सोनाईच्याही चेहऱ्यावर मनापासून हसू आलं.

तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच राहण्यासाठी
सोनाई सखीला आईच्या मायेने पण नेहमीप्रमाणे तोऱ्यात बोलली,
"आनि जरा आरंला कारं बी करावं. नुसतंच मुळूमुळू रडू न्हाय. न्याय तं यकदा नवऱ्यानं आंदाज घेतला म्हंजी त्यो तसाच म्हनतो."

सोनाईसारखी सासू असल्यावर कोण्या गुरुची किंवा कोण्या मैत्रीणीची गरज ती काय!

सखीने प्रेमाने, कृतज्ञतेने सोनाईला मिठी मारली. तिची नाजूक मिठी पडताच सोनाई हसली आणि आपला खरबडीत हात सखीच्या पाठीवरून फिरवत गमतीने बोलली,
"सांच्याला नवऱ्याच्याबी आसंच मिठीत शिरा म्हंजी त्यो बी लोन्यावानी इरघळंल."

"आई ऽ ऽ!"
स्वतःशीच पुटपुटत सखी लाजून सोनाईपासून बाजूला झाली आणि सखीच्या पाठीवर हलकेच हसता हसता धपाटा घालून सोनाई खो खो हसू लागली.

© प्रियांका सुभा कस्तुरी
२६/०९/२०२४

..........

भाग एकदम आल्याने प्रत्येक भागावर समिक्षा करावी, अशी माझी अपेक्षा नाही पण या भागावर सर्व भागांची समिक्षा अपेक्षित आहे. एकदम भाग वाचताना कसं वाटलं ते ही कळवा!

भेटूया लवकरच!)

🎭 Series Post

View all