Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२१२

कृष्ण सखी
कृष्ण सखी- २१२

प्रणयाच्या धुंदीत झोपेच्या अधीन झाल्यानंतर पहाटे पहाटे कृष्णा कसल्याशा जाणिवेने जागसुद झाला. चेहऱ्यावर वळवळल्यासारखं वाटून त्याचा हात चेहऱ्याकडे गेला आणि हातांना तिची नाजूक लांबसडक बोटे लागल्यावर त्याचा हात तसाच खाली सरकला. त्याची बोटे फिरल्याबरोबर तिच्या काकणांची किणकिण त्याच्या कानांना झोपेच्या उंबरठ्यावरही ऐकू आली आणि झोपेतही रात्रीचे लाजरे क्षण आठवून क्षणासाठी त्याच्या हृदयाची धडधड वाढली. ती शांत होते ना होते तोच त्याने डोळे उघडले.

त्याच्या हातावर अगदी त्याला बिलगून सखी शांत झोपलेली. झिरो बल्बच्या प्रकाशात तिच्या गालांवर त्याच्या दातांचे ठसे पाहताना आताही त्याचे दात  शिवशिवले. रात्रीचे त्यांचे धुंद क्षण आठवून तिचे फिकट गुलाबी ओठ या क्षणी त्याला जास्तच गुलाबी दिसले आणि तो गालात हसला. तिच्या चेहऱ्यावर विस्कटलेल्या केसांना मागे घ्यायला त्याचे हात मोकळे होतेच कुठे! ज्या हातावर तिचं डोकं होतं त्याच हाताच्या मिठीत ती बंदिस्त होती तरं त्याचा दुसरा हात तिच्या काकणांवर फिरत होता. तिच्या ओठांवर नेहमीसारखे विराजमान झालेले तिचे नाठाळ केस पाहून कृष्णाने हलकेच तिच्या चेहऱ्यावर फुंकर घातली.

त्याच्याशिवाय तिच्या ओठांना दुसऱ्या कुणी स्पर्श करावा! त्याला हे कसं बरं आवडेल? त्याने पुन्हा जोरात तिच्या ओठांवर फुंकर घातली तेव्हा कुठं त्या केसांनी जागा सोडली. तो जागा झाला असताना तिचं असं झोपणं त्याला फारसं रुचलं नाही त्यामुळे थोडंसं पुढे होऊन त्याने तिच्या कानावर ओठ टेकवले.


त्याच्या उबदार मिठीत असताना अचानक चेहऱ्यावर आलेल्या गरम फुंकरीने सखी हलकीशी जागी झाली. ती पुन्हा झोपेच्या अधीन होणार इतक्यात पुन्हा चेहऱ्यावर फुंकर आणि कानात गुदगुल्या करणाऱ्या स्पर्शासोबत आवाज आला,
"मास्तरीणबाई ऽ, उठा की!"

'हे मधुर स्वप्नच' असं वाटून तिने हलकेच डोळे उघडले तर कृष्णा टक लावून गालात हसत तिच्याकडे पाहत होता. झोपेची झालर डोळ्यांवर असल्यामुळे त्याच्याकडे बघत डोळे जडावल्यासारखे संथ गतीने उघडझाप करत होते. कृष्णा तिच्या अर्धवट जागलेल्या चेहऱ्याकडे बघत गालात हसत बोलला,
"रात्री झोपायला लयीच उशीर झाला काय?"


त्याच्या एका प्रश्नाने सखीने टक्क त्याच्याकडे पाहिलं. त्याच्याकडे पाहता पाहता रात्रीचे लाजरे क्षण आठवून आताही तिच्या काळजात गोड खळबळ दाटली. त्याच्याकडे पाहतानाही सखी लाजली आणि तिने लाजून डोळे मिटून घेतले.

तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेत कृष्णाने गालात हसत विचारलं,
"झोप झाली नाही काय?"

सखी डोळे बंद करूनच लाजरी हसली.  लाजूनच तिची हलकीशी नकारार्थी मान हलली आणि ती आणखीच त्याच्या कुशीत शिरली. तिला मिठीत घेत कृष्णाने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि हलकेच त्याचा हात तिच्या डोक्यावरून फिरू लागला. सखीने हलकेच त्याच्याकडे पाहिलं आणि गालात हसत पुन्हा डोळे मिटले. तिचे सहज मिटलेले डोळे त्याच्या थोपटण्याने पुन्हा झोपेच्या अधीन झाले. तिची झोप लागल्यावर कृष्णाही पुन्हा झोपी गेला.


बऱ्याच वेळाने कमरेवर कसलीशी हालचाल जाणवल्यावर सखी जागी झाली. तिने किलकिले डोळे करून पाहिलं. त्याला झोपलेला पाहून मात्र तिची नजर इतरत्र फिरली. खिडकीच्या बाहेरून पुरेसा प्रकाश आलेला पाहून उजाडलं याची नोंद तिच्या मनाने घेतली कारण आज आवाज देऊन उठवायला सोनाई नव्हती.


रात्री त्याच्या प्रेमाच्या अलवार वर्षावात चिंब भिजलेली सखी आता त्याच्याकडे पाहतानाही लाजत होती त्यात त्याची कमरेवर फिरणारी बोटे सकाळी सकाळीच त्याच्या मिठीत असतानाही काळजात उगाचच हुरहुर निर्माण करत होती.

एकिकडे तिच्या हक्काच्या मिठीत असंच त्याला बिलगून राहावं असं एक मन म्हणत असताना दुसरीकडे मात्र गोठ्यातून हंबरणाऱ्या रंगीचा आवाज तिला उठण्यासाठी मजबूर करत होता. असं असतानाही बावरलेलं तिचं मन, तिची नजर त्याच्या देखण्या सावळ्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. अगदी श्वासांच्या अंतरावर असलेले त्याचे ओठ तिला चलबिचल करत होते.

सकाळी सकाळी सखी वेगळ्याच धुंदीत होती. त्याचा स्पर्श, त्याचा गंध तिला वास्तव विसरण्यास मजबूर करत होता. कमरेवर फिरणाऱ्या त्याच्या बोटांनी आपली जागा सोडावी आणि देहाचा पाठपुरावा करावा असं उगाचच तिच्या लाजऱ्या मनाला वाटत होतं.

त्याचे दीर्घ श्वास चेहऱ्यावर झेलताना सखी मोहरत होती. त्याच्या ओठांकडे बघत क्षणाक्षणाला ती त्याच्याकडे खेचली जात होती.

ती हळूच त्याच्या जवळ सरकली.
जवळ... अजून जवळ... अजून जवळ आणि ओठांवर ओठ टेकणार तोच कृष्णाने डोळे उघडले. सखी चोरी पकडल्यासारखी क्षणात मागे झाली पण सोडतील ते मास्तर कसले!

क्षणात तिला जवळ ओढत कृष्णा तिच्या डोळ्यांत पहात खट्याळपणे बोलला,
"मी झोपलेलो बघून चोरी करत होता काय?"

सखी अशी लाजली!
ती होती तर त्याच्याच मिठीत पण उगाचच तिरपी बघत लाजून पुटपुटली,
"ओठांजवळ काहीतरी लागलेलं तेच काढत होते."


कृष्णाला गुदगुल्या झाल्या. एका हाताने तिला मिठीत बंदिस्त करत दुसऱ्या हाताने अलगद तिची हनुवटी वर करून तो गालात हसत बोलला,
"ओठांनी काढत होता काय?"


त्याच्या बोलण्याने इतक्या मुश्किलीने वर गेलेली नजर लाजून पुन्हा खाली झुकली. सखी लाजरी गालातल्या गालात हसून त्यालाच बिलगली. तिला मिठीत बंदिस्त करत कृष्णा मनापासून हसला.


सकाळी सकाळी ती गोड मिठी दोघांना सुखावून गेलेली. दोघांच्याही उरात गोड हुरहूर दाटून आलेली. जिथे नजरेला नजर मिळत नव्हती तिथे स्पर्श बरंच काही बोलत होते.

आपल्या खांद्यावर विसरलेल्या तिच्याकडे बघत कृष्णाने अलगद तिची हनुवटी वर केली आणि ओठांत पुटपुटला,
"ए ऽ बायको!"


बस् तो इशाराच काफी होता!
तिची झुकलेली नजर, गालातलं लाजरं हसू, हवेलाही जागा न ठेवण्याइतपत त्याला बिलगणं, तो तर धुंद झालेला आणि त्याच्या अपेक्षेनुसार त्याच्या बायकोचा लाजऱ्या नकारातील होकार आलाच पण तो तिच्या पद्धतीने-

सखी लाजून बोलली,
"क्रिष्ण् ऽ, फार उशीर झालाय. आता उठायला हवं."

तो तिच्या नजरेतील होकार ओळखून तिच्या ओठांवर अलगद बोटं फिरवत बोलला,
"घरात कोणी ओरडणार आहे काय?"

त्याच्या ओठांवरील स्पर्शाने सखीचे ओठ थरथरले आणि ती जे बोलणार होती, तेच विसरली.

तिच्या चेहऱ्यावरचे ते मोहक गोंधळलेले भाव पाहून कृष्णाने वेळ न घालवताच हलकेच तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतला आणि बाकी सगळं विसरून सखीची बोटे आपण त्याच्या केसांतून भिरभिरू लागली. ओठांना ओठ बिलगले तिथे देह मंत्रमुग्ध झाले.


काही क्षण हक्काचे जगल्यानंतर श्वासांना श्वास भिडल्यानंतर दोघेही श्वास बिघडल्यावर बाजूला झाले. गोठ्यातून येणाऱ्या रंगीचा आवाज, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे बाहेरून येणारे आवाज सखीला ओरडून ओरडून सांगत होते आता लखलखाठ झालाय तर त्याची अजूनही कमरेवर डौलाने मागे पुढे होणारी बोटे तिला वेगळाच इशारा करू लागली.


आपल्या मोहक भावनांना आवरत श्वास सांभाळत सखी त्याचा कमरेवरचा हात काढत गालात हसत बोलली,
"आता उठायला हवं."


"थांबा ना थोडा वेळ!"
तो गोडीला येऊन बोलला.


"फार उशीर झाला क्रिष्ण्!"
सखीही गोड हसली.


"एखाद्या दिवशी चालतंय की!"
तो सखीला मनवत होता इतक्यात गोठ्यातून त्याच्या सखीने सूर ओढला,
'हंबा ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ.'


रंगीचा आवाज ऐकून कृष्णाने सखीवरची नजर हटवून खिडकीकडे पाहिलं. खिडकीतून ऊन आल्यासारखं वाटून कृष्णा वेळेचं गणित करत स्वतःशीच बोलला,
"लईच उशीर झालाय वाटतं."


त्याचा सैल झालेला हात कमरेवरून काढत सखी संधी ओळखून पलंगावरून उठली पण आपली विस्कटलेली साडी पाहून तिने लगेचच पुन्हा गोधडी अंगावर ओढली. तिची विस्कटलेली साडी पाहून कृष्णा खोडकरपणे गालात हसत खाकरला,
"अहंम्म ऽ ऽ अहंम्म ऽ ऽ."

त्याच्या हळूच पुढे सरकणाऱ्या हातावर हलकेच चापट मारत सखीने हसतच त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला. आपल्या लाजऱ्या बायकोचा मूक इशारा समजून कृष्णाने हसतच डोळे बंद केले.


त्याच्याकडे तिरप्या नजरेने बघत सखीने पदराला खांदा दाखवला आणि गोधडी बाजूला सारून ती चटकन पलंगावरून उतरली. विस्कटलेली साडी पुन्हा अंगावर चढवताना तिच्या गालात गुलाब फुललेले.


कृष्णा डोळ्यांवर हात ठेवूनच गालात हसत बोलला,
"मास्तरीणबाई झालं काय?"

"हम्म ऽ."
एवढाच हुंकार आणि कृष्णा पलंगावरून खाली.


तिच्यासोबत अजून वेळ घालवण्यासाठी त्याची चाललेली लगबग, त्याचं तिच्यासाठी वेडं होणं पाहून सखीला आनंदाच्या जशा की उकळ्या फुटत होत्या.


कृष्णा लगेच तिच्यासमोर उभा राहिला. रात्री त्याच्या रुंद लालसर देहाला प्रेमाने गोंजारणारी सखी आता मात्र त्याच्या त्या रुंद छातीकडे एक नजर बघून खाली बघत गालात हसत बोलली,
"शर्ट घाला ना!"

"क्काय?"
कृष्णाने हसतच तिच्याकडे पाहिलं मग एक नजर स्वतःला न्याहाळलं आणि पुन्हा थोडीशी वाकडी मान करत तिच्याकडे बघत तो मिश्किलपणे बोलला,
"शर्ट घालू? रात्री तर तुम्ही मोठ्या प्रेमाने---"

"श्श ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ."
कोणीतरी ऐकेल या भावनेने सखीने लगेच ओठांवर बोट ठेवत त्याला मध्येच तोडलं.

कृष्णा गालात हसत बोलला,
"मला असं बघून तुम्हाला कसंतरी होतंय काय?"


तिच्या मनीचे लाजरे भाव त्याने बरोबर टिपल्याने सखीने पाठमोरी होत लाजून चेहरा ओंजळीत झाकला.

तिच्या लाजऱ्या अदांनी आधीच घायाळ झालेल्या कृष्णाने प्रेमाने तिला पाठून मिठीत घेतलं.
कृष्णा तिच्या मानेवर नाक घोळसत बोलला,
"सखुबाई, लाजून लाजून मला वेड करणार आहात काय?"


"इश्श्य!"
सखी पुन्हा ओठांत पुटपुटली.


"अस्सं! अस्संच लाजून लाजून तुम्ही मला वेड केलंय!" कृष्णा मादक स्वरात कानात कुजबुजला आणि अलवार त्याचे ओठ तिच्या मानेवर भिरभिरू लागले. त्याच्या स्पर्शा स्पर्शागणिक सखी शहारली.
त्याच्या पोटावर असणाऱ्या हातावर तिचे हात विसावले. हृदयाची धडधड त्याच्यासारखीच वेगाने होऊ लागली. तिच्या खांद्यावरचा पदर अडथळा वाटून त्याने ओठांत पकडून बाजूला सारला तसा तो पदरही लाजून तिच्या पायाशी झुकला.


त्याच्या ओठांच्या भिरभिरणाऱ्या ओल्या स्पर्शाने सखीचा रोमरोम मोहरला. तिचा उर अनामिक ओढीने भरून आला. त्या शहाऱ्यांनी बेभान होऊन तिच्या अंग चोरण्याने तिच्याच पायाखाली तिचा पदर चोळामोळा झाला. तिला मिठीत सामावून घ्यायला आतुर झालेल्या त्याचा तिच्या कानावर पुन्हा ओलसर मादक स्पर्श धडकला,
"बायको ऽ खाऊ काय तुम्हाला?"

© प्रियांका सुभा कस्तुरी
०९/११/२०२४

.................


हा भाग केवळ त्या वाचकांमुळे लिहिला गेला ज्यांनी मागच्या भागावर गोड समीक्षा रुपी समीक्षण केलं की मागचा भाग लिहिताना शेवटी मी कुठेतरी घाई केली त्यामुळे कृष्णसखीचे निवांत असे सकाळचे खास क्षण त्या वाचकांना भेट!

आणि आपली संस्कृतीच अशी की फुल फुलाला भेटलं किंवा दरवाजा बंद झाला तरी आपण समजून जातो, अशावेळी प्रत्येक पदर विस्कटून सांगणं मी टाळलं. कुठेतरी मी बरोबर होते कुठेतरी तुम्ही बरोबर होता. असो, ते कृष्णसखी वरचं तुमचं प्रेमच होतं किंवा माझ्या लेखनीवरचा तुमचा विश्वास होता. जो तुम्ही बोलून दाखवलात आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाचं मला फार कौतुक वाटलं!

ही सुंदर सकाळ कशी वाटली कळवा.
भेटू सरप्राईज भागासोबत! आणि तेही एक ते दीड दिवसात!


🎭 Series Post

View all