Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२१३

कृष्ण सखी

कृष्ण सखी -२१३


त्याच्या ओठांच्या भिरभिरणाऱ्या ओल्या स्पर्शाने सखीचा रोमरोम मोहरला. तिचा उर अनामिक ओढीने भरून आला. त्या शहाऱ्यांनी बेभान होऊन तिच्या अंग चोरण्याने तिच्याच पायाखाली तिचा पदर चोळामोळा झाला. तिला मिठीत सामावून घ्यायला आतुर झालेल्या त्याचा तिच्या कानावर पुन्हा ओलसर मादक स्पर्श धडकला,
"बायको ऽ खाऊ काय तुम्हाला?"

सखीने लाजून होकारार्थी हुंकार भरला,
"हम्म ऽ."

बस् दुसऱ्याच क्षणी सखी त्याच्या हातात होती. तिच्याकडे बघतच कृष्णाने अलगद तिला पलंगावर ठेवलं आणि स्वतः ही तिच्याजवळ सरकला. प्रेमाची कबुली दिल्यानंतरचा धुंद प्रणय आणि त्या नंतरची धुंद सकाळ त्या दोघांना भुलवत होती. वाढलेल्या श्वासांनी अनामिक ओढीने व्याकुळ होऊन सखीचे ओठ थरथरले. त्या नाजूक ओठांचं आमंत्रण स्वीकारात तो ही सखीमय झाला मग त्याचे ओले स्पर्श आणि तिचे लाजरे हुंकार वाढतच गेले अगदी त्यांच्या प्रेमासारखेच!


असं म्हणतात की नव्याचे नऊ दिवस लगेच संपतात!
पण कृष्ण सखीच्या बाबतीत असं अजिबात नव्हतं. जोडीदाराला फक्त देण्याची दानत असल्याने ते दोघेही दिवसेंदिवस एकमेकांत अधिकच गुरफटत गेलेले. अगदी एकमेकांसाठी वेडं होणं काय असतं हे त्यांच्याकडे बघून कळत होतं.


अगदी वर्षभरानेही त्यांची सकाळ अशीच...
फक्त त्यांची होती. हा पण प्रेम करण्याची पद्धत बदललेली पण ते बदललेलं प्रेमही दोघांना सुखावत होतं.


जवळपास वर्षाने:

"आह ऽ कृष्णा ऽ!"
गालावर हलकासा चावा घेतल्याने नाजूक वेदनाचा अस्फुट उद्गार ओठांवर येत तिने डोळे उघडले. कृष्णा तिच्याकडे गाल फुगवून बघत होता. काल रात्रीही ती नेहमीप्रमाणे बोलता बोलता झोपी गेलीली आठवून सखी मुद्दामून गालावर हात फिरवत त्यालाच हळू आवाजात रागावली,
"सारखं काय चावता? दुखत माणसाला."

'चोर तो चोर वरून शिरजोर' हे भाव नजरेत आणत कृष्णा डोळे बारीक करून गुरगुरला,
"गप्प बसा नाहीतर खाऊनच टाकीन."

हल्ली का असं होत होतं तिलाच कळत नव्हतं. मनात असूनही तिचा देह तिची सोबत करत नव्हता. त्याच्या कुशीत शिरल्यावर कधी डोळे झाकत होते तिलाच समजत नव्हतं त्यामुळे दररोज जोडीदाराची वाट बघून बघून एक नैसर्गिक वैताग येणं स्वाभाविक होतं याची सखीलाही जाणीव होती.

कृष्णा डोळे बारीक करूनच पुन्हा गुरगुरला,
"काल पुन्हा माझी गोष्ट अर्ध्यात राहिली आणि तुम्ही गुल, लगेच झोपी गेला."

सखी त्याला लाडीगोडी लावत त्याच्या गालावरून बोटे फिरवत लाडात येत बोलली,
"मग तुम्ही उठवायचं ना!"

कृष्णा तिच्या वर आलेल्या गालाचा गालगुच्चा घेत प्रेमाने पण त्याच्या तऱ्हेने बोलला,
"झोपलेल्या बायकोला उठवायला, मी काही हा नाही."


सखी त्याच्याकडे बघून हसली. पुढे होऊन तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि पुन्हा बारीक चेहरा करून बोलली,
"हल्ली पाय भरून येतात हो माझे! अंग गळून जातं त्यामुळे पडल्या पडल्या झोपी जाते."


"व्हय काय? मग सांगणार कधी?
कृष्णा गोधडी बाजूला सारून लगेच उठून बसला आणि हलकेच तिचे पाय चेपत काळजीने बोलला,
"आपण आजच गोखलेबाईंकडे जाऊया, त्यांचा लगेच गुण येतो."


सखी लगेचच त्याच्या हाताला हात लावत घाईघाईत बोलली,
"प्लीज नको.. मला बरोबर नाही वाटत ते."


कृष्णा पाय चेपतच डोळे वटारून तिच्याकडे बघत बोलला,
"गपचूप पडून राहताय काय!"


त्याच्या अशा प्रेमाची आता सखीलाही सवय झालेली. ती डोळे बंद करून गालात हसत पडून राहिली. त्याच्या पाय चेपण्याने तिला खूप आराम वाटत होता. पाय अगदी हलके हलके झाल्यासारखे वाटत होते.


तिच्या बंद डोळ्यांत हळूच ओलसर आनंद उतरला तेव्हाच अंतर्मनात कुठेतरी बासरीच्या धुनीसोबत काही शब्द रेंगाळले-
'सुख... फक्त सुख!'
 

आपल्या सुखाला आपलीच नजर लागण्याची भीती पुन्हा तिच्या मनात दाटून आली आणि तिचं घाबरं मन तिच्या सख्ख्याकडे धावलं-
'कृष्णा ऽ, तू असं रे माझ्यासोबत! जे पदरात दिलंयस ते तूच पेल रे बाबा! माझ्या संसाराला माझी नजर लागू देऊ नकोस!'


डोळ्यांची कडा हलकेच म्हणजे त्याच्या नकळत पुसून सखी पुन्हा त्याच्या हाताला हात लावत प्रेमाने बोलली,
"बास झालं क्रिष्ण्!"

कृष्णा तिचे तळवे हलके दाबत तिच्या चेहऱ्यावरचे भाव वेचत बोलला,
"आता बरं वाटतंय काय?"


सखी त्याच्याकडे पाहून गोड हसली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याला बरं वाटलं. तो पुन्हा पलंगावर आडवा झाल्यावर सखी लगेचच त्याच्यापासून दूर होत गडबडीत बोलली,
"आज तरी आईंच्या आधी उठू द्या."


कृष्णा तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचत गालात हसत बोलला,
"मग त्या तर उठलाच आहात की!"


सखी हसत बोलली,
"उठते तर दररोज पण तुम्ही पलंगावरून उतरू कुठे देता?"


कृष्णा तिच्या या बोलण्यावर मोकळेपणाने हसला की लगेचच सखी त्याच्या तोंडावर हात ठेवून चोरासारखी बोलली,
"श्श ऽ ऽ ऽ हळू! आई उठतील!"

कृष्णा आपल्या तोंडावरचा हात काढत हसत बोलला,
"तुमच्या याच सवयीमुळे दरवाजा नीट करून घेतलाय, विसरला काय.  आता आवाज बाहेर जात नसतो."


सखी त्याचा कमरेवरचा हात काढत त्याला लाडीगोडी लावत बोलली,
"सोडा ना.. रोज रोज आईच चुल पेटवतात.
मला बरोबर नाही वाटत ते."


पुन्हा तिच्या पायांवर पाय टाकत पायानेच तिचे पाय गुंफत कृष्णा लहान मुलासारखा चेहरा करत बोलला,
"आता गेला तर रात्रीशिवाय माझ्या हाताला लागत नाहीत, तरी रोजच तुमची जाण्याचीच घाई."


सखी गालात हसली. तिने हळूच पुढे येऊन त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याच्या डोळ्यांत बघत पुन्हा त्याला लाडीगोडी लावत सुचकपणे बोलली,
"आज शंभर टक्के!"

कृष्णा नजरेनेच खुणावत,
"नक्की काय?"

ती लाजरी हसली,
"हम्म ऽ."

कृष्णा तिचे पाय मोकळे करत तिची कंबर हलकेच दाबत गालात हसत बोलला,
"रात्री मी तुमचं अंग दाबून देईल. चालेल काय?"

"हम्म ऽ."
सखी पुन्हा गोड हसत हुंकारली.


त्याच्या सर्वांगाला होणाऱ्या स्पर्शाच्या आठवणीनेच तिला आत्ताच गोड शिरशिरी आली पण आपल्या मोहक भावनांना आवरत ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तशीच गोड हसत बोलली,
"सोड ना मला.. प्लीज ऽ!"


ती त्याला लाडीगोडी लावतीये, हे कळत असून सुद्धा कृष्णा मुद्दामून वेडा बनला. त्याने हसतच तिच्या कमरेत असलेल्या त्याच्या हाताचा पाश सोडला आणि तिचा गाल ओढत बोलला,
"तुम्हाला वाटतं तुम्हीच लय हुशार! पळा."


सखीने लगेचच गोधडी बाजूला सारली. पंगावरून उतरून विस्कटलेल्या साडीला जागा दाखवली. खांद्यावरून पदर टाकला आणि पुढे जाणार तोच पदर ओढला गेला. सखी माघारी फिरली तसा पिन नसलेला पदर सरळ कृष्णाच्या हातात!

सखी त्याच्या हातातून पदर सोडत लाजरी हसत बोलली,
"किती वेळा सांगितलं, पदर ओढत जाऊ नका. पदर खांदा सोडतो क्रिष्ण्!"


कृष्णा तिच्याकडे बघत मिश्किलपणे बोलला,
"आता त्या पदराला आणि तुमच्या खांद्यालाही सवय झालीये. मालकीणीला कधी सवय होणार काय माहित!"

इकडे दोघांची गुटूर गुटूर चालू असताना बाहेरून हलकासा आवाज झाला,
"म्हाळसा ऽ, पाणी तापलंय गं!"

सखीने डोक्याला हात लावला आणि ती बोलणार त्या ऐवजी कृष्णाच बोलला,
"हो आल्या ऽ .. थांब जरा!"

सखी त्याच्या हातातून पदर हिसकावून घेत किंचित लाजरी वैतागून बोलली,
"श्शी बाबा, तुम्ही कशाला आवाज दिलात?
आईंना काय वाटेल आता?"

"तिला काही वाटत नसतं."
कृष्णा हसला आणि बाहेरून पुन्हा आवाज आला-

"चांगलं तापलंय पानी. दोघांची बी आंगूळ व्हैल. यतोयस का?"

सोनाईचं बोलणं ऐकून लाजेने सखीचा हात तोंडावर गेला आणि कृष्णा मोकळेपणाने हसत बोलला,
"पाणी उतर मग .. आलोच!"

त्याच्या बिनधास्त मोकळ्या बोलण्याने लाजवीट सखी लाजूनच त्याच्या हातावर हलकेच चापट मारत बोलली,
"क्रिष्ण् ऽ लाजत जा ना जरा!"


कृष्णा पुन्हा मोकळेपणाने हसत बोलला,
"आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार! आणि
माझ्यावरच्या पण तुम्हीच लाजता की, दोघेपण लाजायला लागलो म्हणजे झाला संसार!"


"गप्प बसा!"
त्याला गप्प करून सखीने दरवाज्याकडे बघून  सूर ओढला
"आले आई ऽ, क्रिष्णची पाठ दाबून देतीये."

"चोराच्या मनात चांदणं"
एवढं बोलून कृष्णा पुन्हा हसायला लागला. सखी आपलं हसू आवरत पदर कमरेला खोचून त्याच्यावर प्रेमाने रागावली,
"तसं बोलायचं असतं..
आणि तुम्ही जरा लांब राहात जा ना."

"अरे!" कृष्णा हसला.

"मी जाते आता."
सखी गडबडीत दरवाज्याकडे वळली की कृष्णा पुढे येऊन तिच्या कमरेला खोचलेला पदर चिमटीने ओढत मोकळेपणाने बोलला,
"किती वेळा सांगितलं, माझ्यासमोर कंबर मोकळी ठेवत जा."

सखी त्याच्याकडे पाहून वैतागून हसली.
त्याचं वेड म्हणजे कहर होता. ती किंचित वैतागून काहीशी हसत बोलली,
"आता मी बाहेर जातीये ना?"


कृष्णा लाडाला आल्यासारखा तिच्या कमरेत प्रेमाने हात सारत बोलला,
"अजून तर इथेच आहात की!"

सखी त्याच्या कमरेवरचा हात काढत गोड चेहरा करत बोलली,
"जाऊद्या ना!"


कृष्णा दोन्ही हात कमरेवर ठेवून गालात हसत बोलला,
"जा पण रात्रीसाठी गोष्ट तयार ठेवा.
आजची गोष्ट तुम्ही सांगणार. ती सुद्धा राजा राणीच्या प्रेमाची!"

त्याच्या नवनवीन गोष्टी आणि गोष्टींतून
ओथंबून वाहणार प्रेम!

सखी त्याला बाजू देऊन मुंगीच्या पावलांनी पुढे जात गालात हसत बोलली,
"तुमच्यासारखं रोमँटिक नाही हा जमणार मला!"


कृष्णा ही तिच्यासोबत पाऊल उचलत गालात हसत बोलला,
"तुमच्यासारखा सात्विक रोमान्स असला तरी चालतोय की."

सखी अगदी दरवाजापर्यंत पोहोचलेली. तिच्या सहवासाचे अजून काही क्षण चोरण्याच्या हेतूने कृष्णाने दरवाजावर हात ठेवला. इतका वेळ त्याच्याशी बोलून सुद्धा अजूनही सखीचं मन भरलं नव्हतं. तिचा सुद्धा हात आपोआप दरवाजावर गेला आणि ती त्याच्या डोळ्यांत पाहत बोलली.
"त्या राजा राणीला दोन राजकुमार असतील आणि त्यांना घरंदाज पण तितकीच प्रेमळ राजमाताही असेल हं!"


..लगेचच कृष्णा मनीची सुप्त इच्छा वर आणत तिचा अंदाज घेत त्याच्या हळू आवाजात पण संथपणे बोलला,
"राजाला राजकुमारी पण हवी असेल तर?"

बाळाचा विषय कधी नाही आणि असा अचानक निघाल्यामुळे सखी लाजली. ती त्याच्याकडे बघत  गालातल्या गालात हसली.

तिचं अगदी कंठाशी आलं,
'राणीलाही मुलीची फार ओढ आहे.'

..पण बोलेपर्यंत स्वयंपाकघरातून सोनाई वैतागून कडाडली,
"किशना ऽ, माजी आंगूळ पन झाली. तू लैच मातर हायेस हां!"

© प्रियांका सुभा कस्तुरी
११/११/२०२४

...........

फक्त कृष्ण सखी!

भागाबद्दल बोलाल अशी अपेक्षा!

भेटू सरप्राईज भागासोबत! संध्याकाळीच!