Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२०६

कृष्ण सखी
कृष्ण सखी -२०६

सखी लाडीकपणे बोलली,
"असं काय करता? बास ना मस्करी, आपल्याला जायला उशीर होईल."

तिची लाडीगोडी पाहून कृष्णा जवळ येऊन तिच्या कानांत कुजबुजला,
"मावशी काय आता अर्धा तास येत नसते. तुम्ही म्हणत असाल तरं आपल्याला साडी नेसवताही येते."

ती कल्पनाही सखीच्या मनासोबत तिच्या देहाला गोंजारून गेली. त्याच्या बोलण्याने लाजवीट सखी आणखीनच लाजली. ते काही क्षण स्थीरावल्यासारखे झाले. त्या धुंद क्षणांच्या दरवळाने दोघेही मोहरले. तिच्या खांद्यावरची गुलाबी साडी हातात घेताना कृष्णाचा हातही लाजेने श्वासांसारखाच कंपला.


सखी लाजेने अंग चोरुन उभी होती. तिच्या लाजेला तिची संमंती समजलेला कृष्णा त्या धुंद क्षणांमध्ये गुरफटला. स्थळ-काळ-वेळ सगळ्याचा त्याला विसर पडला. त्याच्या ह्रदयाची धडधड वाढलेली. नाजूक क्षणांचा दरवळ कृष्णाच्या अंतर्मनाला स्पर्शून गेला.
तिच्या साडीला स्पर्श करण्याआधीच नाजूक क्षणांच्या कल्पनेने कृष्णाच्या हाताला कंप सुटला.

लाजेने अंग चोरलेल्या सखीने काही क्षणांच्या उसंतीनंतर डोळे उघडले. आजूबाजूला नजर भिरभिरल्यानंतर वास्तवाचं भान येऊन सखीने कृष्णाकडे पाहिलं. सखीची नजर दरवाजावर गेली. दरवाजा ढकललेला होता. परड्यातून बनाईचा आवाज येत होता. स्वतःला सावरत सखीने कृष्णाकडे पाहिलं. त्याच्या नजरेत मोहक भाव पाहून सखीने खांद्यावर हात ठेवून त्याच्याकडे बघत सुचकपणे नकारार्थी मान हलवली.
"अंं ऽ हं ऽ ऽ."

तिच्या खांद्यावरचा हात बघत कृष्णाने गालात हसत
भुवई उंचावून मूकपणे विचारलं,
'काय कारण?'

त्याचा इशारा ओळखून सखी नजर चोरत बोलली,
"मला लाज वाटतेय."

कृष्णा थोडा पुढे झुकत गालात हसत खट्याळपणे बोलला,
"नवऱ्याने साडीशी खेळावं, त्याने साडी विस्कटावी यासाठी बायका तरसतात आणि तुम्ही-"

त्याच्या बोलण्याने सखी लाजली. ती खाली बघूनच लाजून बोलली,
"तरीही तुम्ही बाहेर जा."

तिचा देखणा लाजलेला चेहरा बघून तरं कृष्णामधील नवरा हट्टाने बोलला,
"आपण जात नसतो."

.. आणि पुन्हा तिच्या पदरासोबत खेळत गालात हसत बोलला,
"नवऱ्यासमोर साडी नेसल्याने साडी अंगावर खुलते, माहीत नाही काय."

त्याचे तर्कवितर्क बघून तरं सखी थक्क झाली पण लाजेने खाली बघत लाजून बोलली,
"तरीही नको."

तिचा 'ना'चा पाढा बघून कृष्णा हाताची घडी घालून नाराजीने बोलला,
"नेसायची असेल तर नेसा नाही तरं बसा."


कृष्णाचा हट्टीपणा तिला झेपत नव्हता. त्याच्यासमोर साडी नेसण्याच्या कल्पनेने लाजेने सखीचे श्वास वाढलेले. तिचं एक मन लज्जेने नाचत होतं पण दुसरं मन परिस्थितीची जाणीव करून देत होतं.

एकतर पाहुणंघर त्यात मावशींची कधीही येणारी उपस्थिती त्यामुळे इच्छा असूनही सखी नकाराची घंटा वाजवत राहिली. काही क्षण दोघेही तटस्थ राहिले. तिच्यासोबत काही गुलाबी हळवेक्षण जगण्यासाठी आतुर असलेला कृष्णा तिच्या ठाम नकाराने नाराज झाला. त्याचा चेहरा बघून सखीचा चेहरा ही उतरला. तिलाच वाईट वाटलं.

"क्रिष्ण् ऽ..."

मनीचे विस्कटलेले नाजूक तरंग सांभाळत कृष्णा खट्टू मनाने नजर दुसरीकडे फिरवून तसाच भिंतीला टेकून उभा राहिला. सखी उदास मनाने कधी साडी तरी तरी कृष्णाला पाहत राहिली.

कृष्णाने सखीशी न बोलता हात मागे करून दरवाजा उघडला आणि बनाईला हाक मारली,
"मावशे ऽ, वर्षाच्या गप्पा आजचं मारून घेतेस काय?"

बोलणं अर्धवट सोडून मावशीची बाहेरून आरोळी आली,
"आले आले बाबा ऽ."

"तू बस बोलत मी निघोलो बघ."
कृष्णा त्याचं सुरात बोलला तशी मावशी फोन आवरून गडबडीत घरात आली तरं सखी हातामध्ये साडी घेऊन तशीच उभी होती. मावशीने नवलाने विचारलं, 
"बाय, साडी का गं न्हाय निसलीस?"

"मावशी ते....."
सखीला कारणं सुचेपर्यंत कृष्णा उगाच हसत बोलला,
"त्यांची मर्जी मावशी."

सखी उगाच हसत बोलली,
"एखाद्या खास प्रसंगी नेसेन, चालेल ना मावशी?"

मावशी हसली,
"तुजी साडी, कवा बी न्येस."

सखीने उगाचच हसत तशीच नजर कृष्णाकडे फिरवली. त्याची नाराजीची रोखलेली नजर पाहून सखी कसंनुसं हसत त्याच ओघात बोलली,
"तुम्हालाही चालेल ना?"

कृष्णा तिच्यावरची नजर हटवत रुक्षपणे बोलला,
"तुम्हाला हवं तेव्हाच तुम्ही साडी नेसणार मग
मला कशाला बिनकामाचं विचारायचं?" आणि तो तसाच तरातरा घराबाहेर गेला.

त्याचं बोलणं आणि सूर पाहून सखीचा चेहरा उतरला. तिचा पडलेला चेहरा बघून कृष्णाच्या स्वभावाची सवय असलेली मावशी सखीला हळू आवाजात समजावत बोलली,
"बाय, तू नगं ध्यान दिव त्याच्याकडं. त्यो जरा तिरसींगरावच हाये. घटकत आसा तं घटकत तसा."

'तिरसींगराव' कृष्णासाठी हा शब्द सखीला एकदम चपखल वाटला आणि सखी गालात हसत बोलली,
"थोडेसे रागीट आहेत पण मनाने खूप चांगले आहेत."

मावशी हुबेहूब सोनाईसारखी कमरेवर हात ठेवून बोलली,
"तसा चांगला तं यकदम गुळासारखा ग्वाड हाये की पन गिऱ्हान फिरलं तं तू कोन आनि मी कोन? आसं आसतं त्याजं."

कृष्णा बाहेर गेल्यामुळे सखीही आपली पर्स उचलत मावशींचा निरोप घेत बोलली,
"मावशी निघतो आता."

"आजच्या रात ऱ्हा की, आक्का काय खाते व्हय."
मावशी आपलेपणाने बोलली.

सखी हसली,
"आईंच काही नाही पण मलाच दुसरीकडे करमत नाही."

बनाई कौतुकाने हसली,
"सास्वा सुना मातंर.... यकामिकीला शोभलाय."

सखी एका हातात पर्स आणि साडीची पिशवी पकडून बाहेर आली. मागून मावशी डोक्यावर पिशवी घेऊन आली. ती पिशवी बघूनच कृष्णा कपाळावर आठी आणत बोलला,
"काय देतेस?"

"नाचन्या देते. आक्काला आवाडत्यात ना."
बनाई सोनाईच्या आठवणीने भाऊक होत बोलली.

"व्हय काय? आणि घरात नाचण्यांनी टिप भरलंय त्याचं काय करू?" कृष्णा खांदे उडवत बोलला.

"तुज्या घरात न्हाय म्हनून देत न्हाय. माज्या भनीला आवाडतं म्हनून देत्या." बनाई अधिकारवाणीने बोलल्यावर कृष्णा मान हलवत बोलला,
"मग ठेवा बाईकवर."

"एक मिनिट हं मावशी." बोलतच सखी साडी सावरून बाईकवर बसली. ती नाचण्याची पिशवी मध्ये घेण्यापेक्षा सखीने मांडीवर घेणं पसंत केलं. सखीने एका हाताने मांडीवरची पिशवी धरली दुसऱ्या हातात पर्स घेतली. तिचा खांद्यावरचा हात निघताच
कृष्णाने तिरप्या नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता फक्त हात मागे केला. सखीने ही काही न बोलता पर्स आणि पिशवी त्याच्या हातात दिली. मास्तरीणबाईंच सामान बाईकच्या हॅण्डलला अडकवत कृष्णा लगेचच मावशीचा निरोप घेत बोलला,
"आईसारखी आठवण काढते तुझी. चार-आठ दिवस ये राहती."

मावशी हसत बोलली,
"न्हाय बाबा. मी यिवून माज्या कोंबड्या कुठं घालवू?"

"कोंबड्या कोंबड्या करून मरून जाशील. शेजाऱ्यांना डाळायला सांग आणि ये की सवड काढून." कृष्णा त्याच्या तऱ्हेने आग्रहाने बोलला.

लगेचच सखीही हसत प्रेमाने बोलली,
"मावशी, या ना चार-आठ दिवस. आईही सारखी आठवण काढत असतात तुमची."

सखीच्या बोलण्याचा परिणाम म्हणूनच बनाई लगेच पारडं बदलंत बोलली,
"आसं म्हनतीस, मं यिन दोन-चार दिस."

'मग मी काय वेगळं बोललेलो काय? जाऊ दे '
स्वतःशीच कुरकुरून कृष्णा बनाईचा निरोप घेत बोलला,
"यायची असल्यावर फोन कर न्यायला येतो. चल जातो."

"नक्की या मावशी."
सखी आग्रह करेपर्यंत बाईक भुर्रकन पुढे निघून गेली.

गाडी रस्त्याला लागल्यावर कृष्णसखी दोघेही शांतच होते. त्याची वाट पाहून सखीच मुद्दामून हसत बोलली,
"क्रिष्ण् ऽ, मावशी किती चांगल्या आहेत ना."

कृष्णाने ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं. त्याने ऐकलं नसावं असं स्वतःलाच फसवत सखीने मुद्दामहून खांद्यावरचा हात हलकासा थोपटला आणि पुन्हा विचारलं,
"क्रिष्ण् ऽ, मावशी किती चांगल्या आहेत ना."

कृष्णाने ऐकूनही पुन्हा एक नाही की दोन नाही. सखीने पाठमोऱ्या त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच
त्याच्या पोटावर ठेवला.

पोटावर मखमली स्पर्श झाल्यावर त्याचं मन चलबिचल झालं. हात तिच्या नाजूक हातावरून, बांगड्यांवरून फिरण्यासाठी आतुरला पण महत्प्रयासाने त्याने मनाला आवरलं आणि बाईकचा हॅंण्डल अजून घट्ट पकडला. त्याच्या वागण्यातील बदल सखीला जाणवत होता तसं तिचं मन उदास होत होतं.

तो काही बोलला नाही मग सखीने ही काही विचारलं नाही. संपूर्ण प्रवास दोघांसाठीही भकास गेलेला.
बाईक दारात लागताच कृष्णा तिला तिथंच ठेऊन घरात आला. खाटेवर बसत त्याने आरोळी ठोकली,
"आई ऽ, पाणी."

"आले आले ऽ, मी गोठ्यात हाये."
सोनाईचा गोठ्यातून आवाज आला आणि
सखी घरात येत बोलली,
"देते हंं पाणी."

कृष्णा आपली नाराजी तिला कळण्यासाठी लगेचच बाहेर जात सोनाईला आरोळी देत बोलला,
"आई ऽ, मी बाहेर जातोय गं. रात्रीच येईन."

"आत्ताच तरं आला. थोडा आराम तरं-"
सखी बोलेपर्यंत कृष्णा पाणीही न पिता घराबाहेर पडला आणि लगेच वाडीत गेला.

सोनाई हात धुवून लगबगीने दिंडीच्या दरवाजाने आतमध्ये येत मोकळ्या आवाजात बोलली,
"कशाला रं जायाच हाये वाडीत?"

सखी उगाचच हसत बोलली,
"ते मघाशीच गेलेत."

सोनाईने सहज विचारलं,
"पानी तरी प्येल का?"

सखी उदासपणे बोलली,
"नाही."

सोनाईने कुतूहलाने बोलली,
"कशाला गेलाय?"

सखी उतरलेल्या चेहऱ्याने,
"सांगीतलं नाही."

सोनाईला नवल वाटलं. ती हनुवटीला हात लावून बोलली,
"काय झालं? कशात माशी शिकली कामदाराला?"

सखी उगाचच हसली,
"काहीच तर नाही."

ती असतानाही कृष्णाने सोनाईकडे पाणी मागणं,
दोघंच असतानाही तिला एकटीलाच ठेवून पाणीही न पिता त्याने बाहेर जाणं, नेहमी मोकळेपणाने हसणाऱ्या सखीने असं वरवर हसणं ही नवराबोयकोच्या भांडणाची लक्षण पाहून सोनाईही गप्पच राहिली.

कृष्णा सखीला दाखवण्यासाठी तरातरा घराबाहेर आला पण खूप दिवसांनी पारावर येऊनही मन उदास असल्याने तो त्या माणसांमध्ये फक्त प्रेक्षक बनला. गावकीचे किस्से या कानाने ऐकून त्याच्या त्या कानापर्यंत पोहचत नव्हते.

कृष्णामधील नवरा स्वतःमध्येच गुंग होता,
'आपण उठता बसता सारखं सखी सखी करावं. त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी वेडं व्हावं. त्यांच्या स्पर्शासाठी तरसावं आणि सखी?
त्या तरं स्वतःच्याच जगात!'

सखीच्या चेहऱ्यावरचा नकार आठवून कृष्णा स्वतःशीच नाराजीने पुटपुटला,
'नवरा-बायको मध्ये तेवढं चालतंय की! जगावेगळा हट्ट होता काय माझा? जाऊ दे, यानंतर सखी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत तोवर मी ही-'

तिला बायको म्हणून मनापासून स्वीकारलेला कृष्णा, त्यांच्या नात्यात पुढचं पाऊल टाकण्यासाठी आतुर असलेला कृष्णा सखीचं मागचं पाऊल पाहून तिच्यावर नाराज झालेला.

© प्रियांका सुभा कस्तुरी