पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२०९

कृष्ण सखी
कृष्ण सखी -२०९

शाळा बुडवून फिरायला जायचं, याचा आनंद आरव आणि गौरीच्या उत्साहात दिसत होता. सुरज नुसताच त्यांच्या मागेमागे लुडबुड करत होता. घासभर खाऊन सोनाईने लुगडं गुंडाळल्यावर मुलांची नुसतीच धावपळ चालू झाली.
“मामी क्येस विचरा की पटकन.”

“आयं ऽ, शरटं दे की शुवून."

“मामी फ्राॅक घालू का पंजाबी ड्रेस?”

“आयं ऽ, तुला खायला काय आनू?”

"मामी लय मज्जा यनारे तिकडं."

"आयं ऽ, तू बी च्हल की.."

आरव आणि गौरीची बडबड पाहून सुरजही उत्साहात “आई ऽ ऽ आई ऽ ऽ ऽ.” अशा हाका मारू लागला. त्या तिघांचा गोंधळ ऐकूनच सोनाईचं डोकं उठलं.

सोनाई बटाटे डोळे काढत तिघांवर खेकसली.
“ए ऽ कोमट्यांनू, पोरं हायेव का भूतं? गप बसा की जरा.”

सखीने आरवची कपडे काढून पलंगावर ठेवली आणि लगेचच गौरीची वेणी-फणी केली. सोनाई मुद्दामून पोरांची मजा घ्यायला डोक्यावरून पदर घेत बोलली,
“माजं झालंय. मी जाते आता.”

आरव आणि गौरी काळजीने ओरडले,
“थाम थाम झालंय माझं.”

मुलांची आवरायची लगबग चालू झाली. ‘फिरायला जायचंय' या भावनेने सुरज तरं लगेच सोनाईला बिलगला. या चौघांची गडबड चालू होती पण सखीचं मन उगाचच बावरलेलं. कसल्याश्या भावनेने ते स्वतःच्याच धुंदीत होतं.

कपडे घालून केसांवरून कंगवा फिरवून तयार झाल्यावर आरव सखीला बिलगून बोलला,
“आयं ऽ, मी तुझ्यासाठी खाव आनीन हा. मी लवकर यिन. मी सुऱ्याची बी काळजी घिन आनि मी गौरीदीदीबरूबर भांडरान बी न्हाय आनि मी-”

त्याचं शहाण्या मुलासारखंं बोलणं ऐकून सखीला आरवचं कौतुक वाटलं पण नेहमीसारखा त्याचा ‘र’ ऐवजी ‘न’ ऐकून सखी त्याला मध्येच तोडत बोलली,
“आरु ऽ, भांडणार असं बोलायचं हं.”

त्यावर आरव नेहमीसारखा हसत बोलला,
“मी त्यंच तं बोललो की.”

“ए ऽ पोरांनू, च्हला रं.” सोनाई मुलांना बाहेर काढण्यासाठी चपला घालत बोलली तसा सुरज घाईतच शुज अडकवत सखीचा निरोप घेत हात हलवत बोलला,
“आई ऽ, आई ऽ मैं आजी के साथ जायेगी! आजी गेली, मी बी जाते.”


सखीने हसतच त्याच्या गालाचा मुका घेतला. गौरीच्या आणि आरवच्या ही गालाचा मुका घेतला. सोनाईच्या पाया पडली. सगळे अचानक निघाल्यामुळे सखीला क्षणासाठी ते असतानाही घर भकास वाटलं. सखी सोनाईला निरोप देत बाहेर पायरीवर येत बोलली,
“आई ऽ, तुम्ही सगळेच गेल्यावर मला करमेल का? संध्याकाळीच या ना घरी.”


सोनाई अंगणात उतरलेली. ती हसतच मागे बघत बोलली,
“संध्याकाळी यनारा यिलंच की, मं आमची आठवन कोन काढतंय?”

सखीला लाजल्यासारखं झालं. ती ओठांत पुटपुटली,
“आई ऽ ऽ!”

फिरायला जाण्याची ओढ होतीच तरीही आरव अंगणातून खाली उडी मारत सखीला उद्देशून बोलला,
“आयं ऽ, आम्ही लवकर यिव गं.. घाबरू नगं. बाबा यतीलच.”

अंगणाच्या पायऱ्यांपर्यत सखी सोनाईसोबत गेली. आरव आणि गौरीची तिथेच मस्ती चालू झालेली. सुरज सोनाईचं बोट धरून सखीकडे बघून हात हलवत होता. सोनाई सखीचा निरोप घेत थोडीशी हसली,
“यिव का आता?”

सखीने गालात हसत मान हलवली,
“लवकर या.”

सोनाईने जाण्याआधी सखीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद, गोंधळ, लज्जा सगळे संमिश्र भाव होते. सकाळचा कृष्णाचा तोरा आठवून सोनाई लाजवीट सखीला मैत्रीणीसारखी समजावत मुलांना ऐकू जाणार नाही अशा बेताने बोलली,‌
"म्हाळसा ऽ, नवऱ्याच्या बायकूनं कसं हुशार वागावं, तवा कुठं संसार गुडीगुलाबीचा व्हतो."

सखीला पुन्हा लाजल्यासारखं झालं. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. सोनाई रस्त्याला लागत हसतच मस्करीने बोलली,
"आता आशाच लाजत बसा म्हनजे झालं कल्यान."

सखी लाजेने गोरीमोरी झालेली.‌ ती लाजून ओठांत पुटपुटली,
"कृष्णा ऽ, खूप लाजल्यासारखं होतंय रे!"

सोनाई मोकळेपणाने हसत रस्त्याला लागलेली. मुलंही नजरेआड होईपर्यंत माघारी फिरून फिरून सखीला हात दाखवत होती. काही क्षणांतच सगळेच सखीच्या नजरेआड झाले आणि पहिल्यांदाच घरात फक्त सखी उरली.

सोनाईचं बोलणं आठवून सखी स्वतःशीच हसली.
'नवऱ्याची बायको' या सोनाईच्या शब्दांनी सखीच्या मनात उगाचच गोड हुरहुर दाटून आली. ती पदराच टोक बोटाभोवती गुंडाळत स्वतःशीच हसत घरात आली.

ओटीवरून तिची नजर पलंगावर गेली आणि सखी स्वतःशीच लाजली. ती संथ पावलांनी खोलीत आली.  रोजच्यासारख्या दूर असणाऱ्या उशा जवळजवळ ठेवताना तिला गुदगुल्या झाल्या. ती तिथेच पलंगावर आडवी झाली.

ती, तो आणि एकांत!
कितीतरी वेळ तिचं मन या गोड त्रिकूटाभोवती घुटमळत राहिलं.

'हं ऽ ऽ बा ऽ ऽ ऽ ऽ.'
गोठ्यातून रंगीचं हंबरणं ऐकल्यावर सखीला वेळेचं भान झालं. घड्याळ पाहिलं तर दुपार झालेली. तिने रंगीला आणि वासराला पाणी दाखवलं. त्यांना ओली वैरण टाकली आणि मोबाईल घेऊन मागच्या परड्यात आली.

सकाळी फुरंगटून गेलेल्या कृष्णाला काॅल करावा का? तो सरळ बोलेल का? त्याला घरची कल्पना द्यावी का? अशा बऱ्याच येणाऱ्या 'का'मुळे ती उदासपणे स्वतःशीच बडबडली,
'कृष्णा ऽ, हे किती रे रागावलेले सकाळी ... आतातरी माझ्याशी धड बोलतील ना?'


मनाशी काहीतरी ठरवून ती निर्धाराने बोलली,
'करतेच!' मग मनात कोणत्याच नवीन विचाराला थारा न देता तिने सरळ कृष्णाला काॅल केला.‌

..........


        मनाची नाजूक तार दुखल्यामुळे कृष्णा सकाळपासून उदास होता. त्याचं ना शाळेत शिकवण्यात मन होतं, ना कोणाशी बोलण्यात त्याला रस होता. त्याला लयीच बेकार वाटत होतं. नवेपणात आलेला नकार, नाजूक प्रसंगी आलेला नकार त्यात सखीशी अबोला सगळ्याचाच त्याला त्रास होत होता.
त्याचं रुक्ष वागणं सर्वांच्या लक्षात आलेलं पण जिथं मुख्याध्यापकच त्याला वचकून होते तिथं त्याच्याशी बोलणार कोण?

सकाळपासून त्याच्या कपाळावर रेषा बघून दुपारच्या सुट्टीत राधा मॅडम त्याच्या वर्गात आल्याच आणि काळजीने बोलल्या,
"सर, काही टेन्शन आहे का?"

कृष्णा सखीच्याच विचारांत होता. त्याची विचार शृंखला तुटल्याने आणि ती राधामॅडममुळे तुटल्याने त्याला आपोआप राग आला तरीही तो होता होईल एवढं तटस्थपणे बोलला,
"माझं सगळं वाढीव चाललंय राधामॅडम, तुम्ही जेऊन घ्या. जा."

त्याच्याप्रती असलेल्या भावनेने प्रेरित होऊन
राधामॅडम आपसूकच त्याच्या जवळ आल्या आणि खांद्यावर हात ठेवून बोलल्या,
"तुम्हालाही जेवायचं असेल ना सर? माझा डबा शेअर करूयात का?"

तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या स्पर्शाचाच कृष्णाला राग आला. त्याने कपाळावर आठी आणत आपल्या खांद्याकडे पाहिलं आणि तशीच रोखलेली नजर राधामॅडमवर फेकली. त्याची नजरच पुरेशी होती. राधामॅडमनी लगेचच आपला हात खाली घेतला आणि तोंड पाडून बोलल्या,
"मी तुमच्या काळजीपोटीच बोलले ना सर."

सखीवरचा राग राधामॅडमवर काढत कृष्णा तशीच नजर रोखून बोलला,
"तुम्हाला किती काळजीये माझी मला चांगलं माहितीये. गपचूप डबा उचला आणि तुमचा तुम्हीच खा. उपवास आहे माझा."

राधामॅडम तोंड बारीक करून डबा घेऊन निघून गेल्यावर कृष्णा स्वतःशीच बडबडला,
'श्यॅ! ज्यांनी जवळ यायला हवं, त्या येत नाहीत आणि नको त्याच अंगचटीला येतात.'

कृष्णा जिच्या आठवणीत चरफडत होता नेमका तिचा तेव्हाच काॅल आला. मोबाईलवर सखीच नाव पाहून कृष्णाला कुठेतरी बरं वाटलं पण ते बुद्धीपर्यंत पोहचू न देताच कृष्णाने चटकन काॅल उचलला आणि आधीच्याच रुक्ष आवाजात बोलला,
"बोला, काय काम आहे?"

तिच्या अपेक्षेप्रमाणेच त्याचा सूर आल्यावर सखी मनातच बोलली,
'कृष्णा, राग पाहतोयस ना, अजून नाकावर आहे रे!'

पलिकडे शांतता पाहून कृष्णाची अजूनच चिडचिड झाली आणि तो त्याच सुरात बोलला,
"बोलायचं असलं तर बोला, नाहीतर कामं वाट बघत असतील तुमची."

त्याचा टोमणा कळूनही सखीने उगाचच हसत विचारलं,
"जेवला का?" आणि लगेचच तिने जीभ चावली.

पोटातील भुकेपेक्षा भुकेलेल्या भावनांच्या धगीने कृष्णा किंचित रागात बोलला,
"हे काय आत्ताच जेवलो. भाजी जरा जास्तच दिलेली ना तुम्ही?"

सखी अपराध्यासारखी बोलली,
"साॅरी."

"छे! साॅरी कशाला? पोटभर जेवलोय की मी."
कृष्णा तिरकसपणे बोलला.


त्याच्या रागाचं टेंम्प्रेचर माहीत असल्याने सखी अगदी शांतपणे बोलली,
"साॅरी, खरंच साॅरी! तुम्ही लवकर जाणार हे माहीत असतं तर मी लवकर उठून डबा केला असता."


तिची शालिनता पाहून त्याचा राग भंगला तरीही
आपलं बिनबुडाचं रागावणं सांभाळत कृष्णा तसाच फुगून गप्प बसला.

कृष्णा शांत झाल्यावर सखीही गप्प बसली. इकडे व्हरांड्यात जेवत असलेल्या मुलांची बडबड ऐकताना कृष्णा वैतागला तरं त्याला कसं सांगावं, कुठून सुरुवात करावी याचा विचार करण्यात तिकडे सखी हरवली.

समोर तरं समोर पण फोनवर ही तिला शांत पाहून कृष्णा वैतागून तिरकसपणे बोलला,
"गप्पा मारून दमला असाल तर फोन ठेवताय काय?"

त्याच्या एकसारख्या टोचून बोलण्याने सखीचं कोमल मन दुखावलं आणि टचकन तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ती दुखावल्या आवाजात बोलली,
"तुम्ही आता माझ्याशी नीट बोलणार पण नाही का? मी इतकी वाईट आहे का?"

तिच्या आवाजातील ओलाव्याने कृष्णाचा राग क्षणात पाघळला. तिच्या डोळ्यांत पाणी आल्याने फोनवरही कृष्णा बेचैन होत बोलला,
"मी म्हटलं काय तुम्ही वाईट आहात? उलट वाईट मीच आहे म्हणून तरं तुमच्यावर चिडचिड करतोय."

"तुम्ही वाईट नाही, उलट खूप चांगले आहात जर कोणी वाईट असेल, कुणाचं चुकत असेल तर माझंच चुकतंय." सखीचा अपराधी आवाज आल्यावर 'आपण जास्तच ताणल्याची जाणीव होऊन' कृष्णा विषय तोडत बोलला,
"ते जाऊ द्या. तुम्ही फोन कशाला केलेला? म्हणजे सहजच की काही काम होतं?"

मुख्य विषयाची आठवण करून दिल्याने सखी क्षणात सावरली. काॅलवर असतानाही तिची नजर भिरभिरली. ती बावरून बोलली,
"सहजच केलेला काॅल."

राग भंगल्यावर कृष्णा मूळ स्वभावावर येत लहरीपणे बोलला,
"आठवण बिटवण आली काय?"

सखी हसली आणि काॅलवरच तिची वरून खालपर्यंत मान हलत हलकासा हुंकार बाहेर पडला,
"हम्म ऽ."

तिचा तो हलकासा हुंकार ऐकून त्याला किती बरं वाटलं. तो मोठा श्वास सोडत स्वतःशीच पुटपुटला,
"मलाही."

सखी गालात हसत पुटपुटली,
"क्रिष्ण् ऽ..."

तिच्या तोंडून नेहमीसारखा सूर पाहून कृष्णाही शांत होत नेहमीसारखाच बोलला,
"बोला."

सखी गालात हसत बोलली,
"संध्याकाळी जेवण काय करू?"

कृष्णा खांदे उडवत बोलला,
"मला काय विचारता? तुम्हाला हवं ते करा नाहीतर आईला विचारा."

सखी गालात हसली. बोलतानाही ती लाजली,
"आई ऽ बाहेर गेलेत."

तो सरळ बोलला,
"मग आल्यावर विचारा."

जास्त फिरवाफिरव न करता सखी लाजून स्पष्ट पण संथपणे बोलली,
"त्या.... त्या मामांकडे राहती गेलेत. मुलांना घेऊनच गेलेत. आता उद्याच येतील."

कृष्णा अविश्र्वासाने बडबडला,
"दिवाळीच्या सुट्ट्यांना अजून वेळ आहे मग अचानक राहती? काय कारण?"

कारण काय सांगणार!
त्याच्या लक्षात आलं नव्हतं तरी सखीच्या काळजाची धडधड व्हायला लागलेली. 

कृष्णा स्वतःशीच बडबडला,
'आई नाही, मुलं नाहीत म्हणजे घरात आपण दोघंच!'

.. क्षणात चलबिचल मनाला सावरत त्याने विचारलं,
"पैलवान पण गेलाय काय?"

सखी लाजून हळूच..
"हम्म ऽ."

त्याच्या चलबिचल मनात आनंद पसरला. उगाचच मन बेचैन होत बोललं,
"म्हणजे पलंंगावर आपण दोघांच?"

सखी लाजरी हसत हुंकारली,
"हम्म ऽ."

आत्ता कृष्णाचा फुललेला चेहरा बघण्यासारखा झालेला! मनीच्या अबोल भावनांनी तो गालात हसला.

सखी लाजरी हसत बोलली,
"म्हणून विचारलं मी... संध्याकाळी स्वयंपाक काय करू?"

कृष्णाला आताच गुदगुल्या व्हायला लागलेल्या. आतापासूनच सखीला बाहू पाशात बंदिस्त करण्यास कृष्णा आतुरला आणि तो स्वैर होऊ पाहणाऱ्या भावनेने गालात हसत बोलला,
"काही नका बनवू. आज मी तुम्हाला खातो आणि तुम्ही मला खा."

ती लाजून ओठांत बोलली.
"काहीही!"

तिचं लाजणं पाहून कृष्णाच्या काळजाचे ठोके आत्तापासूनच चुकायला लागलेले. तो श्वास सांभाळत बोलला,
"खरंच तरं! पण सुरवात ओठांपासून करायची काय!"

त्या हव्याहव्याशा लाजऱ्या क्षणांच्या ओढीने सखी आताच लाजेने गोरीमोरी झालेली.

उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
१५/१०/२०२४

...........

फार उशीर झाला, त्यासाठी साॅरी!

भेटू उद्या!

🎭 Series Post

View all