पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१९३

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१९३

तिची दुःखी नजर त्याच्या दुःखी नजरेला भिडली आणि डोळे पुसतच सखी त्या मुसळधार गडगडाटी
पावसात पुन्हा घरी येण्यासाठी एकटीच टेकडी उतरू लागली. आज तिला कशाचीच भीती वाटत नव्हती कारण आतला भावनांचा गडगडाट तिला बाहेरच्या दुनियेचा पत्ताच लागू देत नव्हता. ती स्वतःच्याच कोशात हुंदके देऊन वाट मागे टाकू लागली.

नजरेसमोर त्याच्या चेहऱ्यावरील अपराधी भाव आणि कानात त्याचे ‘मी वाहवलो’ हे दोन शब्द सखीला आतून टोचणी देत होते त्यामुळे पावसात ओलिचिंब होऊन सुद्धा डोळ्यांतून गरम अश्रू गालांवर धावत होते.

ती घरी पोहोचली तेव्हा नाना खाटेवर बसून हसत होता आणि सोनाई भिंतीला टेकून मशेरी घासण्याच्या तयारीत होती. सोनाई नानाला कृष्ण-सखीचा सकाळचा वेडेपणा सांगत होती. दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगात आलेल्या आणि अचानक ओलीचिंब सखी दरवाजात उभी राहिली आणि कोण आलं? म्हणून दोघांनीही हसतच दरवाजाकडे पाहिलं.

संपूर्ण भिजलेली सखी दरवाज्यात उभी राहून उसासे देत होती. तिच्या भिजलेल्या चेहऱ्यावरचे अश्रू नाना आणि सोनाईने ओळखले आणि दोघेही क्षणातच उठून उभे राहिले. सोनाई हातावरची मशेरी कोपऱ्यात झाडत काळजीने बोलली,
“म्हाळसा ऽ का गं?”

“सखी तू रडतीयेस?”
नाना काळजीने पुटपुटला.

सोनाई पुढे येत चिंतीत स्वरात बोलली,
“तू यकटीच आनि किशना कुठंय? काय झालं? कोन काय बोललं का?”

सखीला पुन्हा हुंदका आला. सखीने कसेतरी पायातले सॅंडल पायरीवर काढले आणि लडबडीत पायांनी आतमध्ये आली.

सखीला अशी रडताना पाहून सोनाई घाबरली. सखीचे डोळे पुसत तिने रडवेली होत विचारलं,
“आगं काय झालं बोल की, तू सांगितलं न्हायंस तं मला कळायचं कसं?”


ती टोचणी सहन करत कशीतरी घरापर्यंत पोहोचलेली सखी सोनाईला पाहताच पुन्हा कोसळली. ती सोनाईला घट्ट मिठी मारून रडू लागली. तिचा थंड ओला देह प्रेमाने मिठीत घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत सोनाई सुद्धा रडवेली झाली.

“आगं काय झालं म्हाळसा ऽ? सांग की.”

सखी सोनाईला मिठी मारून मुसमुसत बोलली,
“संसार माझ्या नशिबात असूनही संसार सुख माझ्या नशिबात नाहीये आई ऽ.”


नाना आणि सोनाईने एकमेकांकडे गोंधळून पाहिलं. सोनाई आपला खरबडीत हात सखीच्या थंड देहावरून फिरवत मायेने बोलली,
“काय बोलत्यास तू म्हाळसा? मला समजंंल आसं बोल की.”

सखी उसासे देत कशीतरी बोलली,
“मी क्रिष्णच्या आयुष्यात आरतीताईंची जागा कधीच घेऊ शकत नाही आई ऽ.”

आलेल्या हुंदक्यामुळे सखी थरथरत्या ओठांनी दुःखाने बोलली,
“आई ऽ, मी… मी क्रिष्णची बायको कधीच होऊ शकत नाही.”

नाना डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये उभा होता. सखी खोलवर दुखावलीये हे पाहताना सोनाई सुद्धा रडवेली झाली. तिच्या पाठीवरून हात फिरवताना ती “म्हाळसा..” एवढंच पुटपुटली.

सखी रडत उसासे देत बडबड होती,
“माझं नशीबच वाईट…कृष्णा का माझी परिक्षा घेतोय आई ऽ?”

सखीच्या पाठीवरून हात फिरवत सोनाई भाऊकपणे बोलली,
“समदं धड भलं व्हैल म्हाळसा ऽ. नगं काळजी करू.”

सखी दुःखाने उसासे देत बोलली,
“नाही आई ऽ, माझं नशीबच वाईट! माझ्यासारखं नशीब कुण्णाचं कुण्णाचं असू नये.”

नाना आणि सोनाईने एकमेकांकडे पाहिलं. सखीचा कुडकुडणारा देह बघून सोनाई तिला आपल्यापासून बाजूला करत तिचे डोळे पुसत बोलली,
“आधी धडूतं बदल. न्हाय तं डोकं पकडंल.”

“हम्म ऽ..” सखी डोळे पुसत साडी घेऊन न्हाणीघराकडे गेली.

सखी उभी होती, ती भुई संपूर्ण ओली झालेली. सोनाईने तिथे पोतं टाकलं आणि आपला ओला पदर झाडून डोकं पकडून भिंतीला टेकून बसली,
नाना टेन्शनमध्ये खाटीवर बसत बोलला,
“काकू आपण काय विचार करत होतो आणि काय झालं?”

सोनाई डोक्याला हात लागूनच बोलली,
“काय करायचं ह्या किशनाचं? त्याजा राग बी यतो आनि त्याज्यासाठी जीव बी तुटतो.”

रडून रडून बेहाल झालेल्या सखीची अवस्था पाहून नाना टेन्शनमध्ये बोलला,
“पण त्याचं प्रेम आहे सखीवर मला माहितीये काकू.”

सोनाई डोक्याला हात लावूनच बोलली,
“मला बी समदं म्हायतीये पन ज्याचं त्याला उमगाया नगं?”

“असा का आहे हा?” नाना वैतागून बोलला.

सकाळचे कृष्ण-सखी आठवून सोनाईचे डोळे भरले. ती डोळ्याला पदर लावत बोलली,
“सकाळी कसली गुडीला आल्यालीतं. मला म्हायती व्हतं आज काय शाळंत जानं व्हायचं न्हाय पन आस काय व्हैल आस नव्हतं म्हायती.”


“काकू ऽ, मी बोलतो कृष्णाशी.” नाना बोलत होता की त्याला स्वयंपाकघरात सखीची चाहूल लागली. सखी ओले केस पुसत उसासे देत शांत पावलांनी ओटीवर आली.

एरवी हसणारा नाना आज शांतपणे बोलला,
“काय झालं सखी?”

सखी दिंडीच्या दरवाज्याजवळ उभी राहत दूरवर बघत आपले केस पुसत बोलली,
“काही नाही.”

नाना खाटेवरून उठला आणि एक दोन पाऊल चालत बोलला,
“सांग ना, कृष्णा काही बोलला का?”

मघासचा प्रसंग आठवून बाहेर पडणारा पाऊस पाहतानाही सखीचे डोळे भरून आले. डोळ्यांतील पाणी दिसू नये म्हणून ती पाठमोरी झाली आणि रडवेल्या आवाजात बोलली,
“वास्तवाची जाणीव झाली, बाकी काही नाही.”

“कसलं वास्तव? तू वास्तव आहेस सखी, आरती भूतकाळ आहे त्याचा. तू का बोलत नाहीस त्याला?” नाना थोडासा रागात बोलला.


सखी आपलं दुःख लवपत उगाच हसत बोलली,
“आहे की मग, आईंची मुलगी आहे, या घरची सून आहे, मुलांची आई आहे आणि क्रिष्णची सखी आहे.”


“श्यॅ! तू तशीच आणि तो कृष्णाही तसाच!”
नाना वैतागून बोलला.


सखी आपल्या डोळ्यांची कड पुसत पाठमोरीच स्वतःला सावरत बोलली,
“नाना, अरे तू नको काळजी करू. ठीक आहे मी.”


सोनाईला खुणावून नाना “येतो.” बोलून निघून गेला. केसांना टॉवेल गुंडाळून सखीही स्वयंपाकघरात चुलीतील विस्तव मागे ओढून उबेला चूलीपुढं बसली. सोनाईचा एक जीव चूलीपुढं उसासे देणाऱ्या सखीकडे बघून तळमळत होता तरं दुसरा जीव असल्या धो धो पावसात अजून घरी न आलेल्या कृष्णासाठी तितकाच कासावीस होत होता.



कृष्णा सखी गेल्यावर जड अंतःकरणाने सपाटीवरच बसून राहिला. त्याला बरसणाऱ्या पावसाची, कोसळणाऱ्या विजांची, अंगाला झोंबणाऱ्या गारांची, वावटाळीसारख्या वाटणाऱ्या वादळाची, कशाचीच पर्वा नव्हती. त्याच्या ओल्याचिंब दाढीवर मधूनच ओघळणारे त्याच्या डोळ्यांतील उष्ण अश्रू हनुवटीपर्यंत थंड थेंबात विलिन होत होते.

सगळं सुरळीत चालू असताना, आनंदाच्या झुल्यावर झुलताना, उंच उंच हवेमध्ये झोके घेताना अचानक तोल जाऊन पडावं आणि पाठीला रसड लागावी मग उठू नये की बसू नये अशी स्थिती व्हावी. कृष्णा अशाच काही मनःस्थितीत तसल्या बेभान पावसात तिथेच बराचवेळ बसून होता.

अगदी मघासपर्यंत सखीसोबतच मैत्रीपूर्ण त्याचं नातं, थोड्या वेळापूर्वी त्याने स्वतःलाही विसरून उचललेलं ते मोहक पाऊल, त्यानंतर झालेली वास्तवाची जाणीव, दुखावलेली सखी, या सगळ्यांमुळे त्याच्या काळजात होणारी उलथापालथ अश्रूंद्वारे बाहेर निघत होती.


“मास्तर ऽ ऽ, आव घरला जा ऽ. इजं ब्येकार कोसाळते. उगा भलतसलतं व्हयाचं.” तसल्या पावसात मागून आवाज आला.

कृष्णाने चेहऱ्यावरून हात फिरवत तसाच केसांवरून फिरवला आणि उठून उभा राहिला. मागे चिमाजी अंगावरची प्लास्टिकची खोळ दोन्ही खांद्यावरून छातीजवळ ओढून उभा होता. त्याची गुडघ्यापर्यंतची जाडसर खोळ असूनही त्याला भिजलेला पाहून कृष्णा केसांवरून हात फिरवत बोलला,
“आप्पा असल्या पावसात काय करताय खाली?”


चिमाजी आपली खोळ सांभाळत पावसाकडे पाठ करून जोरात बोलला,
“आवं सकाळीच खाली गेल्यालो. दुदाचा पगार व्हता ना आज, पन तुम्ही हिथ कसं?”

कृष्णा उगाचच हसला,
“आलो तेव्हा पाऊस नव्हता. निघतोच आता.”

चिमाजी डोक्यावरची खोळ काढत बोलला,
“ही खोळ आसू द्या तुमचा आंगाव, उगा गारा बादायच्या तरन्या आंगाला.”

“आप्पा ऽ .. “ कृष्णा लगेच त्यांचा हात पकडत बोलला,
“मी असाही भिजलोय. तुम्ही भिजू नका.”

चिमाजीचं अवघडलेपण पाहून कृष्णा पाऊलं उचलत बोलला,
“हे काय निघतोच आता. तुम्ही पण जा.”


चिमाजीमुळे कृष्णाने घराची वाट पकडली. तो घरी पोहोचला तरीसुद्धा पावसाचा जोर काही कमी झाला नव्हता. सोनाई उंबऱ्यातच त्याची वाट बघत होती. कडकडणारी वीज तरणं रक्त पितेच हे जणू गावच्या ठिकाणी नेहमीच झालेलं, त्यामुळे अशा गडगडाटी पावसात कृष्णा घरी येईपर्यंत सोनाईच्या जीवात जीव होता नव्हता. सखी आता शांत झाली असली तरी तिचाही जीव त्याच्या भोवतीच घुटमळत होता.‌

सोनाई उंबऱ्यात आणि सखी खाटेवर दरवाजाकडे नजर लावून बसलेली. कृष्णा दिसताच सोनाई डोळ्याला पदर लावत बोलली,
“आला यकदाचा.”

‘कृष्णा आला’, हे ऐकून सखीच्या जीवात जीव आला. सखीला दुखावल्यामुळे ‘त्याला ओरडायचं’ असं सोनाईने आधीच ठरवलेलं पण आधीच तासनतास पावसात भिजलेल्या काय ओरडायचं! त्याचेही डोळे लालसर होतेच! पावसात भिजूनही चेहरा रडवेला होताच.

जे झालं ते गंगेला सोडून सोनाई पावसाळी बूटं उतरवणाऱ्या कृष्णाला मायेने बोलली,
“पाणी तापलंय बग चांगलं. जा गरमागरम आंगूळ घे.”

कृष्णाने टॉवेल घेताना नजर खाली करून बसलेल्या सखीकडे एकदा पाहिलं आणि अंघोळीला गेला. अंघोळ करून आला तरी सखी ओटीवरच होती.
तिच्या चेहऱ्यावरचे ते अलिप्त भाव पाहताना त्याला विचित्र वाटत होतं.

सोनाई काहीच माहित नसल्यासारखी बोलली,
“जेवताव आता, च्हला.”

कृष्णा लगेचच ओटीवरचा रेनकोट अडकवत बोलला,
“तुम्ही जेवा. मी शाळेत जातोय.”


“आनि तुला जेवान रं?”

कृष्णाने बाईकची चावी घेतली आणि बाहेर जात बोलला,
“भूक नाहीये.” तिच्यासमोर तो उपाशी निघालेला तरी खाटेवर बसलेल्या सखीने त्याला आवाज दिला नाही.‌


तो गेल्यावर सोनाई डोळे भरलेल्या सखीच्या डोक्यावरून हात फिरवत मायेने बोलली,
“तू तरी दोन घास पोटात ढकंल.”

सखी नाक ओढत बोलली,
“पोट भरलंय माझं.”


“पांडुरंगा कसला रं ह्यो गुत्ता करून ठेवलायंस?”
सोनाई काळजीने बडबडली तशी सखी डोळे पुसत अपराधीपणे बोलली,
“सॉरी आई, आमच्यामुळे तुम्हालाही काळजी.”


“आगं पाॅराबाळांना सुख तं माज्या जिवाला शांती, न्हात तं काय करायचं हाये समदं.” सोनाई डोळ्याला पदर लावत बोलली आणि सखी लगेचच डोळे पुसून उगाच हसत बोलली,
“चला आई ऽ, जेऊया. भूक लागलीये.”

डोळ्यांत पाणी असतानाही सखीला हसताना पाहून सोनानेही डोळे कोरडे केले आणि दोघीही तोंड उष्टावणीसाठी स्वयंपाकघरात गेल्या.

………….


कृष्ण दुपारीच शाळेत पोहोचलेला. तो नेहमीपेक्षा शांत होता. वर्गातसुद्धा त्याने फक्त उजळणी घेतलेली. अजूनही एक एक पावसाची सर पाणी पाणी करून जात होती, नुकतीच शाळा सुटलेली. छत्री, रेनकोट तरं कोणी डोक्यावर पोतं-पोतडी-घुंटी घेऊन घराकडे पळत होते. दररोज शाळा सुटल्यावर मुलांच्याच ओढीने हसत उत्साहात घरी जाणारा कृष्णा आज मात्र वऱ्हांड्यावर उभा होता.‌

शिक्षकांनी-प्राध्यापकांनी विचारल्यावर “थोडं काम आहे” एवढंच सांगून त्याने वेळ मारून नेलेली.

त्याच्या फोनची वाट पाहणाऱ्या नानाने शेवटी कंटाळून स्वतःच फोन केला. शाळा सुटलेली वेळ पाहून नानाने फोन केला तेव्हा कृष्णा मोकळ्या वऱ्हांड्यावर एकटाच उभा होता.

दिवसभर शांत असणारा मोबाईल वाजल्यावर कृष्णाने मोबाईल पाहिला. बोलण्याची अजिबातच इच्छा नव्हती पण नानाचा फोन होता म्हणून त्याने उचलला आणि अनिच्छेनेच बोलला,
बोल नाना.

त्याचा उतरलेला आवाज ऐकूनसुद्धा नाना उगाचच हसत बोलला,
यार कुठे आहेस? फोन नाही काय नाही.

“शाळेत. काही काम नसलं तर नंतर बोलू.”

कृष्णा फोन ठेवण्याच्या तयारीत आहे हे लक्षात येताच नाना टेन्शनमध्ये बोलला,
“ऐक, फोन ठेवू नकोस यार.. एक हेल्प कर ना.”

“कसली?”

नाना टेन्शनमध्ये बोलला,
“यार नैनाने विचारलंय,
आपण प्रेमात पडल्यावर ‘प्रेमात पडलोय किंवा’ पडले' असंच का बोलतो?
मी प्रेम करत आहे किंवा मला प्रेम झालं आहे, असलं काही किंवा दुसरं का बोलत नाही?”

कृष्णा मान हलवत कुरकुरला,
“ती नैना पण तुझ्यासारखीच. काय प्रश्न पडेल! खरंच!”

कृष्णा नाना टेन्शनमध्ये बोलला,
सांग ना यार काय सांगू तिला?

कृष्णा जड झालेलं डोकं मोठे श्वास घेत शांत करण्याचा प्रयत्न करत बोलला,
आज तू विचार कर, मी उद्या सांगतो.

“ए ऽ ए ऽ कृष्णा, मास्तर तू आहेस आणि मी एवढा हुशार असतो तर तुला विचारलं असतं का? सांग ना यार, किती भाव खाशील? आपल्या रिस्पेक्टचा प्रश्न आहे.” नाना उगाचच काळजीने बोलला.


कृष्णाने मोठा श्वास घेतला आणि शाळेच्या पत्र्याच्या वळचणीच्या पाण्याची संततधार हातावर घेत बोलला,
“आपण रस्त्याने चालत असतो. प्रवास चालू असतो. आपण आनंदी असतो आणि चालता चालता अचानकच आपण पाय घसरून पडतो, मुद्दामून पडत नाही पण पडतो; अगदी असंच, अगदी असंच व्यक्ती प्रेमात पडते. तिच्याही नकळत, तिला तर ठाऊकही नसतं पण अशीच अपघाताने प्रत्येक व्यक्ती प्रेमात पडते. ती मुद्दामून प्रेम करत नाही आणि ते ठरवून होतही नाही. आपोआप होतं, अगदी चालता चालता पडल्यासारखं म्हणून तसं म्हणतात, प्रेमात पडलो किंवा प्रेमात पडले.”

सांगून झाल्यावर कृष्णाने मोठा श्वास घेतला. नेहमीसारखा तोरा नाही की ठेका नाही तो अगदी शांतपणे बोलला,
“समजलं काय?”

नाना पलीकडून तितक्याचं शांतपणे बोलला,
“मला चांगलं समजलं कृष्णा पण जे मला समजलं ते स्वतःलाही समजाव की.”

“म्हणजे?”

नाना हिम्मत करून डायरेक्ट बोलला,
‘म्हणजे तू सखीच्या प्रेमात पडलायस कृष्णा.”

“नाना?’
कृष्णा घोगऱ्या आवाजात बोलला,
“माझं आरुवर प्रेम आहे. तुला काय म्हणायचंय, माझं तिच्यावरचं प्रेम खोटं आहे?”

नाना होता होईल एवढं शांतपणे बोलला,
“मी असं कुठे म्हटलं? आणि तू तरी असं मनात का आणतोयस? तू पुन्हा प्रेमात पडलास मी असं बोलतोय.”


कृष्णा तसाच घोगऱ्या आवाजात बोलला,
“नाना तोंड आवर! माझ्या आरुवरच्या प्रेमावर बोट ठेवतोयंस तू.”

नाना काकुळतीने बोलला,
“कृष्णा तू आरतीला मध्ये आणूच नकोस. तू सखीच्या पुन्हा प्रेमात पडलायेस यार.”

कृष्णा डोळ्यांत पाणी घेऊनच दुःखाने बोलला,
“माझं तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम होतं आणि आजही आहे मग असं असताना-”

नाना मान हलवत बोलला,
“लै सोप्पं आहे यार तू अवघड करतोयस.”

कृष्णा दुःखाने हसला,
“व्हयं काय?”

“नैनावर कधीपासून प्रेम करतोस?”

“लहानपणापासून.”

कृष्णा दुःखाने बोलला,
“आता असं समज जिच्यावर तू इतकं प्रेम करतोस ती तुझी बायको लग्नानंतर डिलिव्हरीत गेली आणि बाळासाठी तो दुसरं लग्न केलंस, तरं तिची जागा दुसऱ्या बायकोला देशील? तितकंच प्रेम जमेल करायला?”


भावी आयुष्याची स्वप्न पाहणारा नाना नैनाबद्दल असलं अभद्र ऐकून थोडासा बावरला. घाबरलाच.
“ए कृष्णा, काही पण काय बोलतो यार?
माझं आयुष्य पण लागू दे तिला.”

कृष्णा दुःखाने हसला,
“दुसऱ्याला उपदेश देणं सोपं असतं नाना.”

..बोलता बोलता त्याचे डोळे भरले. सकाळपासूनच दुःख नानाशी बोलताना आता ओठांतून बाहेर आलं आणि कृष्णा घोगऱ्या आवाजात बोलला,
“सकाळपर्यंत जी माझी मैत्रीण होती तिला अचानक बायको म्हणून स्वीकारणं सोपं आहे नाना? अपघातानेच मला कळतं आमचं नातं पुढे गेलंय, हे क्षणात स्वीकारणं सोपं आहे नाना? आणि अशा वेळी जेव्हा आजही माझं आरुवर जिवापाड प्रेम आहे. माझंच एक मन मला खातंय, तुझं आरुवर प्रेम असताना असं कसं-” पुढचे शब्द तो बोलूच शकला नाही.

“कृष्णा अरे किती विचार करशील? बर मला एकच सांग सखी हवीये ना तुला?” नानाने जरा धाकधूकीनेच विचारलं.


कृष्णा वेदनेने बोलला,
“माझ्या सखी आहेत त्या नाना, असं काय विचारतोय.”

नाना मोकळा श्वास सोडत बोलला,
“मग घरी तू घरी जा आणि सखीशी बोल. बाकी काही विचार करू नकोस, सरळ तिच्याशी जे वाटेल ते बोल.”

“हम्म ऽ.” कृष्णा हुंकारला आणि कॉल ठेवून दिला.


कृष्णा हातात आता सावध झाल्यासारख्या पडणाऱ्या पावसाची ती संततधार झेलत त्या धारेत स्वतःचेच मूक अश्रू शोधत स्वतःशी पुटपुटला,
‘पुरुषांना कोमल काळीज नसतं, पुरुष स्त्रियांसारखं एकचित्ती प्रेम करत नाहीत, पुरुष स्त्रियांसारखे हळवे नसतात, पुरुषाचं एका स्त्रीवर भागत नाही,
किती आरोप झेलत जगतो आम्ही!’

दुपारी तो समोर असूनही नजर झुकलेल्या सखीचा चेहरा आठवून कृष्णा उच्छवास टाकत स्वतःशीच वेदनेने बोलला,
“मला हव्या आहात तुम्ही सखी.. मला दूर लोटू नका. मला नाही सहन होणार ते.”

© प्रियांका सुभा कस्तुरी
२६/०७/२०२४

🎭 Series Post

View all