Login

*कृष्णाच्या लोण्याचा गोळा*

केवळ चार फूट आधारावर उभा असलेला अडीचशे कीलो वजनाचा दगड
*कृष्णाच्या लोण्याचा गोळा*

आपल्या भारत देशाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपल्या देशात बऱ्याच विस्मयकारक गोष्टी बघायला मिळतात. इथे अशा अनेक अनोख्या गोष्टी आहेत की, ज्या आपल्याला उत्सुकतेपोटी विचार करायला भाग पाडतात.

आज आपण अशाच एका अद्भुत गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. जी समजल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही.

तुम्हाला सर्वांना माहित आहे का ? आपल्याकडे कृष्णाच्या लोण्याचा गोळा आहे.

हो, हे खरे आहे. हा गोळा आपल्याला एका महाकाय दगड स्वरूपात बघायला मिळतो. तमिळनाडूमधील महाबलीपुरम येथे एक चमत्कारित दगड आहे. त्याला "कृष्णाच्या लोण्याचा गोळा" किंवा "कृष्णाज् बटर बॉल" असे म्हणतात.

आता तुम्ही म्हणाल की, नुसता दगडासारखा दगड. मग तो महाकाय असला तरी, त्यात आश्चर्य व्यक्त करण्यासारखे काय आहे ? तर त्याचे कारण असे की, एका डोंगराच्या टोकाला 45 डिग्री उतारावर स्थित असलेला हा दगड पाहिल्यावर असे वाटते की, तो कधीही घरंगळत खाली येईल. परंतु , तो अजिबात जागचा हलत नाही. अजून अचंबित करणारी गोष्ट म्हणजे केवळ ४ फूट आधारावर २५० किलो वजनाचा उभा असलेला हा ग्रॅनाईटने बनलेला दगड १ हजार ३०० वर्ष जुना आहे. साधारण २० फूट उंच व ५ मीटर लांब असा हा विशालकाय दगड डोंगराच्या टोकाला अगदी कमी जागेत झुकलेल्या अवस्थेत आढळतो. दगडाचा पाठीमागचा काही भाग तुटलेला आहे. त्यामुळे तो मागच्या बाजूने अर्ध गोलाकार खडकासारखा दिसतो. तर इतर तिन्ही बाजूंनी गोल दिसतो. बघा आहे की नाही किमया.

*कृष्णाचे लोणी*

एका पौराणिक कथेनुसार नटखट कान्हा बाल्यावस्थेत आपल्या आईने तयार केलेले लोणी लपून छपून खात असे. त्याच चोरलेल्या लोण्याचा घट्ट गोळा म्हणजे हा दगड असावा, असे तिथले स्थानिक लोक मानतात. तर काही लोकांच्या मते, श्रीकृष्ण स्वर्गात बसून लोणी खात असताना त्यांच्या हातातून पडलेला काही भाग म्हणजेच हा दगड होय. म्हणून त्याला "कृष्णाचे लोणी" किंवा "कृष्णाज् बटर बॉल" असे नाव पडले.

*देवाचा दगड*

सर्वप्रथम ६३० ते ६८० या काळात दक्षिण भारतावर राज्य करणाऱ्या पल्लव शासक राजा नरसिंह वर्मा यांनी हा दगड हटवण्याचे आदेश दिले, पण त्यात ते असफल ठरले. पुढे १९०८ साली, ब्रिटिश शासन काळात मद्रासचे गव्हर्नर आर्थर हॅवलॉक यांनी सुरक्षेच्या कारणास्तव सात हत्तींच्या मदतीने तो दगड तिथून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचेही प्रयत्न विफल ठरले. त्यानंतरही अनेकांनी अनेक प्रयत्न केले पण कुणालाही तो दगड त्या जागेवरून हलवता आला नाही. म्हणून त्याला स्वर्गातून पृथ्वीवर पडलेला "देवाचा दगड" असेही बोलले जाते.

*नैसर्गिक आपत्तींचा सामना*

भूकंप, त्सुनामी आणि चक्रीवादळ अशा कितीतरी नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊनही तो दगड आहे तसाच उभा आहे. या दगडावर गुरुत्वाकर्षणाचा देखील परिणाम झालेला नाहीये. दगड कधीही कोसळून पडण्याच्या स्थितीत इतकी वर्ष कसा काय टिकून आहे, याचा शोध शास्त्रज्ञांना देखील अजून लागलेला नाही. भूवैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवर झालेल्या सामान्य घटनांमुळे या दगडाची निर्मिती झाली असावी. तसेच उतारावर उभा असलेला हा दगड गुरुत्वाकर्षणाच्या केंद्रामुळे व घर्षणामुळे खाली पडत नसावा असेही काही तज्ञांचे मत आहे. पण तरीही हा प्रचंड मोठा दगड खाली न पडण्याचे नेमके काय कारण असावे, ते अजून तरी कुणाला स्पष्ट सांगता आलेले नाही.

*भारत-चीन संबंध सेतू ठरला बटर बॉल*

सन २०१९ मधे भारत चीन संबंध सुधारण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची इतिहासातील आवड लक्षात घेता आपले पंतप्रधान मोदी यांनी त्यांची भेट महाबलीपुरम येथील बटर बॉल जवळच घेतली. या दोन्ही नेत्यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे हा अद्भुत दगड जास्त चर्चेत आला. शिवाय तो भारत-चीन संबंध सेतूचा साक्षीदारही ठरला.

*आकर्षणाचा केंद्र बिंदू*

पूर्वी हे ठिकाण निर्जन होते. सध्या मात्र ही जागा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. चेन्नई किंवा तमिळनाडूत आलेले लोक कुतूहल म्हणून हा चमत्कारित दगड पाहण्यासाठी महाबलीपुरम येथे आवर्जून येतात. काहीजण त्या दगडाच्या छत्रछायेखाली बसतात. त्यापैकी काही लहानथोर तो दगड असलेल्या उतारावर घसरगुंडी खेळतात. तर काही त्या भीमकाय दगडासोबत मनाजोगते फोटो काढून मिरवतात. तिथे गेल्यानंतर एकंदरीत सर्वांच्या मनात त्या दगडाचे कुतूहल निर्माण होते.

तुम्हाला ही उत्सुकता वाढवणारी अद्भुत आणि अनोखी माहिती वाचून कसे वाटले ते नक्की कळवा.

संकलन आणि लेखन - अपर्णा परदेशी.