Login

कृष्णसख्याची जडली बाधा अंतिम भाग

एका प्रेम कथेतून जन्माला आलेला सुख पेरायचा विचार.

कृष्णसख्याची जडली बाधा अंतिम भाग.


मागील भागात आपण पाहिले अभय प्रधानला अविनाशने समजावले. त्याचबरोबर रंजना आणि अविनाश खऱ्या अर्थाने एकत्र आले. आता ही प्रेमकहाणी सुफळ होण्याबरोबर अभयचे काय होईल? वाचूया अंतिम भाग.


रंजना पुढे बोलू लागली,"आम्ही पुढचे शिक्षण घेत होतो. एम. डी.पूर्ण झाले आणि आम्ही प्रॅक्टिस सुरू केली. दुसरीकडे आमचे संशोधन चालू होते. आम्हाला नैसर्गिकरीत्या मुल होणार नसल्याने उपचार करावे लागणार होते. त्यासाठी मानसिक तयारी होतीच.

परंतु ह्या दरम्यान आम्हाला काही गोष्टी स्वानुभव असल्याने शिकायला मिळाल्या." रंजनाने थांबून अवीकडे पाहिले.

"दवाखाना सुरू झाला आणि हळूहळू कुणकुण कानावर येऊ लागली. डॉक्टरांना स्वतः ला मुल नाही आणि दुसऱ्यांना उपचार देणार? परंतु आम्ही ठामपणे उपचार सुरू ठेवले.

त्याचवेळी आमच्या लक्षात आले की पुरुषांना समुपदेशन करणे गरजेचे आहे. तुला सांगतो वरद,इतक्या दिवसात,ह्या तासात मोजून सेक्स करा असे यांत्रिक सांगितले की पुरुष त्यात सफल होत नाहीत. नकळत मानसिक दबाव तयार होत राहतो."


"बाबा,अभय मामाचे असेच काही झाले असेल का?" वरदने प्रश्न विचारला.

" होय, नव्वद टक्के पुरुषांना ही अडचण येते." अवी स्मितहास्य करत म्हणाला.

"पण तुम्हाला तर डॉक्टर असल्याने काही अडचणी आल्या नसतील ना?" वरद म्हणाला.

" बाळा आयुष्य इतके सोपे नसते. डॉक्टर अविनाश आधी पुरुष आहे. मला सुरुवातीला हे सोपे वाटायचे. पण मित्रांची लग्न होऊ लागली. त्यांना मुले होऊ लागली. आपल्या लोकांना दुसऱ्यांची काळजी फार."अवी एकदम गप्प झाला.



"आता माझी आई आणि अवीचे आई वडील दोघेही आडून आडून विचारू लागले. आधीच वय झाले आहे. आम्हाला नातवंडं पाहू द्या असा घोष सुरू झाला. त्या दिवशी अवीच्या बहिणीचे कुमुदचे डोहाळे जेवण होते.

मी आणि सासूबाई कार्यक्रमाला जायला निघालो. तिथे गेल्यावर काहीच्या कपाळावर सूक्ष्म नाराजी मला दिसत होती.

"हीच ती,स्वतः डॉक्टर आहे. पण अजून मुल नाही झाले. आता हिच्यात काहीतरी दोष असेल. डॉक्टरांनी करायचे दुसरे लग्न." कुजबुज कानावर येऊन मला हसू आले.

तेवढ्यात ओटी भरणे सुरू झाले. मी आपसूक मागे हटले. कुमुद तिची इच्छा असूनही काही करू शकली नाही. सासूबाई मात्र अस्वस्थ झाल्या.

घरी आल्यावर त्या माझ्याजवळ आल्या,"पोरी,मला माफ कर. इथून पुढे अशा ठिकाणी तुला नाही नेणार. बाई म्हणजे पोर व्हायची मशीन आहे का? तुला आज माझ्यामुळे वांझोटी हा शब्द ऐकावा लागला."

अवीने हे सगळे ऐकले होते.रात्री अवी मला म्हणाला,"रंजू,माझ्यासाठी का हे सगळे सहन करतेस? तू मला सोडून जा."

"अवी,समज आपले लग्न झाले असते आणि दोष माझ्यात असता तर मला सोडले असतेस तू?" अवी आणि मी शांत झालो.


दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला सकाळीच एक पत्र आले. पत्र मिळताच मी आनंदाने अवीला मिठी मारली. ज्या डॉक्टरांनी टेस्टिकल मधून शुक्राणू काढण्याची पद्धत शोधली होती त्यांचे उत्तर आले होते.

त्यांनी पेटंट केले नसल्याने ती पद्धत मला शिकवायला ते तयार झाले होते.

"रंजू,तू एक स्त्री डॉक्टर आहेस. मग हे उपचार लोक घेतील का?" अवीला अजूनही शंका होती.

" अवी,मी आधी एक डॉक्टर आहे. मला प्लीज जाऊ दे." त्यानंतर हे तंत्र शिकायला मी जायचे ठरवले.

त्यानंतर हे तंत्र मी वापरले तो पहिला पेशंट होता डॉक्टर अविनाश." रंजना शांत झाली.

" वरद,त्यानंतर जवळपास सहा सायकल करावी लागली. प्रत्येक वेळी ती जीवघेणी प्रक्रिया नको वाटायची. अनेकदा वाटायचे दत्तक घ्यावे मुल." अवी डोळ्यात पाणी आणून सांगत होता.

" पण त्याच वेळी मला आठवत लोकांच्या नजरा. माझ्या स्त्रित्वावर,माझ्या नवऱ्याच्या लैंगिक क्षमतेवर हसणारी आणि मजा घेणारी आपलीच आसपासची माणसे.

अवीला प्रत्येक सायकलसाठी मी धीर देत असे. तब्बल वर्षभर उपचार घेतले आणि तो क्षण आला. आम्ही आई बाबा होणार होतो. एक अंकुर रुजला होता. त्या सरशी अनेक नजरा बदलल्या होत्या.

माझा नवरा जो एक परिपूर्ण माणूस आहे. त्याला त्याचा आत्मविश्वास परत मिळाला होता." रंजना थांबली.

तेवढ्यात अवीने अभयला इशारा केला.अभय आत येताच वरद उभा राहिला.

"मीच बोलावले आहे त्यांना. मिस्टर अभय खरतर आजवर हा कप्पा आम्ही कधीच उघडला नाही. परंतु आज एक डॉक्टर म्हणून पेशंटसाठी तसेच आमच्या मुलाला पुरुष म्हणजे लैंगिक क्षमता नव्हे हे समजण्यासाठी आम्ही सगळे सांगितले आहे."


अभय जवळ आला."डॉक्टर,मी तयार आहे. मॅडम रिपोर्ट सकारात्मक आला तर मी तुमच्याकडून उपचार घ्यायला तयार आहे. नकारात्मक आला तरीही मी अविचार करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बायकोचा सखा बनून उत्तर शोधील." अभय बाहेर निघून गेला.

रंजना आणि अविनाश एकमेकांचे हात हातात घेऊन उभे होते. कृष्णसखा म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा.

आज ते दोघेही कृष्णसख्याच्या भूमिकेत सुख पेरायला आणि वाटायला सज्ज झाले होते.

कृष्णसख्याची ही बाधा अनेकांना जडणार होती आणि अनेक आयुष्यात आनंद फुलणार होता.


खर तर प्रेमकथा मिश्किल आणि हलकी फुलकी लिहायचा विचार होता. परंतु वैद्यकीय पार्श्वभूमीवर लिहिताना अचानक ही कल्पना सुचली. डॉक्टर अवीच्या माध्यमातून काही प्रश्न मांडावे वाटले आणि उत्तरे शोधता आली. कथेला प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.