Login

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 5

अवीला तो प्रेमात पडल्याची जाणीव झाली. रंजनाला कधी कळेल त्याचे प्रेम

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 5

मागील भागात आपण पाहिले अभय प्रधानवर उपचार करून अविनाश घरी आला. अविनाश आणि रंजनाच्या गोष्टीत आता रंगत येऊ लागली. हरवलेल्या घड्याळासाठी मुलींनी एका मुलाला बेदम मार दिला. आता पाहूया पुढे.


दुसऱ्या दिवशी सकाळी वरद तयार होताना म्हणाला,"बाबा,प्रणवच्या मामाला नीट समजावून सांग."

"काळजी करू नकोस. त्याला आम्ही हॅण्डल करु." अविनाशने त्याला समजावले.

खरतर अविनाशला सुद्धा दडपण आले होते. घरातून बाहेर पडताना रंजनाने आज छान गुलाब केसात लावला होता. तो त्यांचा कोड होता. एकमेकांना आधार द्यायचा.

दोघे हॉस्पिटलला पोहोचले. अविनाशने अभयला मुद्दाम शेवटी बोलावले होते. जेणेकरून त्यांना नीट बोलता येईल. सगळे पेशंट संपवून त्याने अभयला आत बोलावले. त्याची बायको सोबत आलेली नव्हती.

"मिस्टर प्रधान,तुमच्या मिसेस दिसत नाहीत?"

"डॉक्टर,तिला मीच माहेरी पाठवले आहे."

"हे पहा प्रधान,ह्या अशा संदर्भात दोघांनाही काही गोष्टी सांगणे आवश्यक असते." रंजना सौम्य आवाजात म्हणाली.

"अभय अजून अंतिम रिपोर्ट यायचे आहेत. त्याआधी तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन या. कोणताही अविचार करू नका." अविनाश अगदी हळूवार समजावत होता.

शेवटी रंजना स्वतः त्याच्या बायकोशी फोनवर बोलली आणि मग त्यांनी अभयला घरी जाऊ दिले.


दिवसभराचे पेशंट आवरून दोघे घरी पोहचले. वरद घरी नव्हता. रंजना पटकन फ्रेश होऊन आली. तोवर स्वयंपाकाच्या बाई आल्या होत्या. त्यांनी सगळा स्वयंपाक उरकला आणि त्या निघून गेल्या. तेवढ्यात वरद घरी आला.

"काय रे? कुठे गेला होतास? किती उशीर?" अविनाश थोडासा चिडला होता.

"बाबा,मी आणि प्रणव त्याच्या मामीला भेटायला गेलो होतो." वरदने शांतपणे उत्तर दिले.

"अरे पण ह्या काही तुम्ही मुलांनी बोलायच्या गोष्टी आहेत का?" अविनाश आणि रंजना दोघेही एकदम ओरडले
"चील गाइज्,आम्ही पर्सनल विषयावर कसे बोलू. फक्त त्यांना आता तुम्ही मामाबरोबर असायला हवे असे सांगितले. तुमची भेट घ्यायला तयार केले. मी फ्रेश होऊन आलो. पुढची गोष्ट सांगा."


वरद आत गेला आणि हे दोघे आ वासून पहात राहिले.

"अगदी तुझ्यावर गेलाय. कोणतीही अवघड गोष्ट सहज सोपी करून टाकतो." रंजना अवीच्या केसात हात फिरवत म्हणाली.

"तुझेही काही गुण घेतलेत बरं. हे इतके धाडस माझ्यात नाही." अवी डोळे मिचकावत हसला.

" खर सांगू अवी,त्याने धाडसी नाही झाले तरी चालेल. पण स्त्रीला जपणारा कृष्णसखा व्हावे अगदी तुझ्यासारखा." असे म्हणून रंजना अलगद त्याच्या मिठीत शिरली.

"अरे देवा,घरात वयात आलेला पोरगा आहे. काय चाललय हे?" वरद हुबेहूब आजीची नक्कल करत होता.


"कॉलेजच्या मैदानावरून मी थेट हॉस्पिटलमध्ये पोहचलो. जागे झालो तर सगळ्या सिनियर मुलींनी मला गराडा घातला होता." अविनाश मिश्किल हसत म्हणाला.

"मेल्या,संधी साधत होत्या. तुला सांगते वरद,त्या आंजीने पोटाला लागलं का? असे विचारत हळूच हात फिरवला."

ते ऐकून वरद खोखो हसू लागला."आई,ह्या पोटावरून?"

"तेव्हा मस्त फ्लॅट आणि..." रंजना लाजली.

"सेक्सी म्हणायचं आहे का तुला?" वरद नाटकी आवाजात बोलला.

" तेच ते. सगळ्या साळकाया साहेबांच्या भोवती जमा झालेल्या. मी घाबरून लपले होते. आता काय होणार. तेवढ्यात प्रोफेसर रोझी फर्नांडिस आल्या आणि सगळे बाजूला सरकले."

"यंग मॅन कोणी मारला तुला? काय चालू हाय हे?" प्रोफेसर चिडल्या होत्या.

"अवी,सांगा ना! कोणी मारले तुम्हाला?" अंजू लाडिक आवाजात बोलली.

"इकडे माझ्या काळजाची धडधड थांबली होती. आता माझे नाव आले तर संपले सगळे.माझ्या डोळ्यासमोर छडी घेऊन उभी असलेली आई नाचू लागली."

"मिस,मला कोणालाच पाहता आले नाही." अवीने उत्तर दिले आणि अक्षरशः जीव भांड्यात पडला.

"मग पुढे काय झाले? बाबा तुम्ही का नाही सांगितले आईचे नाव?"

"तेव्हा लांबसडक असणाऱ्या काळ्याभोर वेणीत जीव अडकला रे." अवी हसत होता.


"सगळे गेल्यावर मी हळूच अवीच्या जवळ आले. डोळे बंद करून तो झोपला होता. जखमांवर पट्ट्या बांधल्या होत्या. मी हळूच जायला निघाले."


"जखम दिलीत आता किमान त्यावर औषध तरी लावा."

"औषधे लावायला आख्खा वर्ग आला होता." हळूच त्याच्या कानात बोलून रंजना बाहेर पडली.


अवीच्या इतक्या जवळ गेल्याने काळजाची धडधड वाढली होती आणि मन पिसासारखे हलके तरंगत होते.


अभय बायकोला घेऊन येईल का? रंजना अवीच्या प्रेमात पडेल? त्यांची गोष्ट पुढे कोणत्या वाटेने जाईल?
वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all