Login

क्षण मोहाचा काळ प्रीतीचा भाग ३

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ३
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग ३

पुण्यातील बाणेर रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या चकाकत्या 'ओरियन टॉवर्स'च्या भव्य प्रवेशद्वारासमोर साक्षी उभी होती. 'नर्मदा सदन'च्या जुन्या वास्तूतून ती थेट भविष्यातील एका जगात आली होती. १९ व्या मजल्यावर जाणाऱ्या लिफ्टमध्ये असताना तिला स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. लिफ्टचे दरवाजे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून ती क्षणभर थबकलीच. चोहोबाजूंनी काचेच्या भिंती, लॅपटॉपवर वेगाने फिरणारी बोटं, कानाला हेडफोन्स लावून गंभीर चेहऱ्याने बोलणारे लोक आणि हातात कॉफीचे मग घेऊन घाईघाईने चालणारे कर्मचारी.हे सर्व तिच्यासाठी अगदी नवीन होतं.

'नर्मदा सदन'च्या गॅलरीत तन्मय सोबत चहा पिण्याच्या त्या निवांत क्षणांपेक्षा हे जग पूर्णपणे वेगळं आणि वेगवान होतं.

तिला 'फायनान्स ॲनालिस्ट' म्हणून एक छोटीशी पण अत्याधुनिक केबिन देण्यात आली होती. केबिनच्या खिडकीतून संपूर्ण पुणे शहर एखाद्या खेळण्या सारखं दिसत होतं. ती अजून स्वतःच्या खुर्चीवर स्थिरावते न स्थिरावते, तोच केबिनच्या दारावर टकटक झाली.

"हाय, मी नेहा. अमेय सरांची पीए. "

एका नीटस कॉर्पोरेट ड्रेस मधील, चेहऱ्यावर व्यावसायिक स्मितहास्य असलेल्या मुलीने तिचं स्वागत केलं. तिचं बोलणं आणि वागणं अगदी या इमारती सारखंच थंड आणि पॉलिश होतं.
नेहाने तिला ऑफिसचे काही नियम समजावून सांगायला सुरुवात केली, पण तिचा सूर थोडा कोरडा होता.

" साक्षी, अमेय सरांना शिस्त प्रचंड आवडते. इथे काम करताना फक्त 'डेडलाईन्स' महत्त्वाच्या असतात, भावना नाही. इथे कोणाला वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय, यात रस नसतो. तुमची 'आऊटपुट' काय आहे, एवढंच इथे पाहिलं जातं. लक्षात ठेवा, ओरियनमध्ये परफॉर्मन्स म्हणजे सगळं काही."

साक्षीने केवळ मान डोलवली. दुपारपर्यंत ती कामाच्या फाईल्समध्ये पूर्णपणे बुडून गेली होती. पण तिचं लक्ष वारंवार समोरील अमेयच्या मुख्य केबिनकडे जात होतं. अमेय जहागीरदार जेव्हा त्याच्या केबिन मधून बाहेर पडायचा, तेव्हा आजूबाजूच्या वातावरणात एक वेगळाच दरारा निर्माण व्हायचा. त्याचं चालणं, त्याची मोजकी पण स्पष्ट बोलण्याची पद्धत आणि त्याच्या चेहऱ्यावरचं ते गंभीर भाव कोणालाही दडपणाखाली आणण्यासाठी पुरेसे होते.

दुपारी साधारण दोनच्या सुमारास अमेयने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावणं धाडलं. साक्षी केबिनमध्ये शिरली, तेव्हा अमेय एका मोठ्या टच-स्क्रीनवर काही गुंता गुंतीचे ग्राफ्स आणि आकडेमोड पाहत होता. केबिनमध्ये अवीट सुगंध देणारं एक महागडं एअर प्युरिफायर होतं. अमेयने तिच्याकडे न पाहताच म्हटलं,

" बसा, मिस देशपांडे. "
त्याने रिमोटने स्क्रीनवरचे काही ग्राफ्स झूम केले.

" साक्षी, हे 'स्कायलाईन' प्रोजेक्टचे फायनान्शिअल प्रोजेक्शन्स आहेत. हा ओरियनचा पुढच्या पाच वर्षांचा सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मला उद्या सकाळपर्यंत या डेटाचा पूर्ण ऑडिट रिपोर्ट हवा आहे. प्रत्येक आकडा क्रॉस-चेक झालेला असावा."
साक्षीने स्क्रीन वरचा तो प्रचंड डेटा पाहिला आणि ती हादरली.

" उद्या सकाळपर्यंत ? पण सर, हा डेटा खूप मोठा आहे आणि मला सिस्टिम समजून घ्यायलाही वेळ लागेल." ती थोड्या संकोचाने आणि चुकून बोलून गेली.

अमेयने हळूहळू स्क्रीन वरून नजर हटवली.  आपले तीक्ष्ण डोळे साक्षीच्या चेहऱ्यावर स्थिर केले. त्याच्या नजरेत एक प्रकारचा थंडपणा आणि आव्हान होतं.

" मिस देशपांडे, ओरियन ग्रुपमध्ये 'अशक्य' हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाही. जर तुम्ही हे करू शकत नसाल, तर मला असं म्हणावं लागेल की माझी तुमची निवड चुकीची होती. मला 'रिझल्ट्स' देणारी माणसं हवी आहेत, तक्रारी करणारी नाही."

तो अपमान नव्हता, पण साक्षीच्या स्वाभिमानाला दिलेली ती एक मोठी चपराक होती. पण आश्चर्य म्हणजे, तिला अमेयचा राग आला नाही. त्या क्षणी तिला अमेयच्या त्या कठोरपणाचं, त्याच्या कामाप्रती असलेल्या त्या वेडाचं आणि त्याच्या 'परफेक्शन'चं एक विलक्षण आकर्षण वाटलं. अमेयच्या त्या ग्लॅमरस आणि पॉवरफुल जगाचा ती आता भाग होती आणि तिला सिद्ध करायचं होतं की ती केवळ एक मध्यमवर्गीय मुलगी नसून एक सक्षम प्रोफेशनल आहे.

ती आपल्या केबिनमध्ये परतली आणि कामाला लागली. बाहेर संध्याकाळ झाली, सूर्य मावळला आणि शहराचे दिवे चमकू लागले, पण साक्षीची नजर स्क्रीन वरून हलली नाही. रात्री नऊ वाजत आले होते. संपूर्ण मजल्यावर आता मोजकेच लोक उरले होते. अमेय अजूनही त्याच्या केबिनमध्ये काम करत होता. त्याच्या केबिनचा प्रकाश पाहून साक्षीला अधिकच जोम येत होता.

तन्मयचे तीन फोन येऊन गेले होते. त्याचे मेसेजेस पडत होते.

" साक्षी, कुठे आहेस ? घरी कधी येणार? आई वाट पाहतेय."

पण साक्षीने एकही फोन उचलला नाही. तिला वाटलं, तन्मयला हे जग कधीच समजणार नाही. तिथल्या त्या जुन्या गॅलरीतील चहाच्या गप्पांपेक्षा तिला अमेयच्या नजरेतलं ते 'परफेक्शन' मिळवणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. मोहाचा पहिला अंक सुरू झाला होता, जिथे कामाचा थकवा नव्हता, तर अमेयच्या जवळ जाण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची एक धुंदी होती.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही