Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग १

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग १
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग १

पुण्यातील त्या जुन्या पण देखण्या 'नर्मदा सदन'च्या गॅलरीत सकाळच कोवळा ऊन पसरलं होतं. वातावरणात ओल्या मातीचा आणि गॅलरीत लावलेल्या जुईच्या फुलांचा एक संमिश्र, हवाहवासा वाटणारा सुगंध दरवळत होता.

तन्मय आपल्या नेहमीच्या लाकडी खुर्चीवर बसुन बासरीचे सुर छेडण्यात मग्न होता. त्याची बोटं वेळूच्या छिद्र आणि त्यावर त्याची फुंकर, हवे वर त्याची बोटं अगदी सहजतेने फिरत होती की, जणू त्या सुरांनाही त्याच्या स्पर्शाची सवय झाली होती.

" तन्मय! अरे, सकाळी सकाळी हे काय वेळू वाजवण चालु केलंयस ? जरा गप्प बसशील का? मला इथे मेल टाईप करता येत नाहीये." शेजारच्या गॅलरीतून साक्षीचा थोडा चिडलेला पण गोड आवाज आला.

तन्मयने बासरी वाजवण थांबवली नाही, उलट त्याने स्वरांचा वेग वाढवला आणि डोळे मिचकावत म्हटलं,

" अगं साक्षू, हे 'रडगाणं' नाहीये, हे 'मेलडी' आहे. आणि तुझी ती 'टाईप-टाईप' ऐकण्यापेक्षा लोकांनी माझे सूर ऐकलेले काय वाईट ? "

साक्षी गॅलरीत आली. तिने कपाळावर आलेली बट मागे सारली. लॅपटॉप हातात धरून ती तन्मयकडे रागाने बघत होती. पण तिच्या डोळ्यांतला तो राग फार काळ टिकणारा नव्हता. तन्मयचा पांढरा शर्ट, विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावरचं ते निरागस हसू पाहून कोणालाही त्याचा राग येणं कठीणच होतं.

" मेलडी म्हणे ! साहेबांना बँकिंगच्या परीक्षेचा अभ्यास करायचा सोडून गिटार वाजवायला सुचतंय. बँकर होणार की रॉकस्टार ? " साक्षीने विचारलं.

तन्मय हसून म्हणाला,

" का? असा रॉकस्टार जो लोकांचे पैसे सुरक्षित ठेवतो आणि फावल्या वेळात त्यांना गाणी ऐकवतो... कूल कॉम्बिनेशन आहे ना ? तसंही, बँकेत गेल्यावर फक्त आकड्यांशी खेळायचंय, मग आता थोडं सुरांशी खेळलो तर काय बिघडलं ? "

तन्मय हा स्वभावाने जितका खोडकर होता, तितकाच कामाच्या बाबतीत 'शार्प' होता. जन-आस्था बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली होती, पण घरी मात्र तो अजूनही तोच लहान मुलासारखा वागणारा 'तन्या' होता. साक्षीने एक सुस्कारा सोडला.

" तुझं लॉजिक तुलाच लखलाभ. मला आज 'ओरियन ग्रुप'च्या इंटरव्ह्यूसाठी तयार व्हायचंय. ही नोकरी माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, तुला माहितीये ना ? "

तन्मयने बासरी बाजूला ठेवली आणि तो गंभीर झाला. तो रेलून उभा राहिला आणि म्हणाला,

" साक्षू, तू टेन्शन घेऊ नकोस. तू बेस्ट आहेस. ओरियन ग्रुपचं ते कॉर्पोरेट जग तुझ्यासाठी नवीन असेल, पण तुझ्या टॅलेंटसमोर ते काहीच नाही. फक्त एक लक्षात ठेव, तिथल्या चकाकीत स्वतःचा साधेपणा हरवू नकोस."

साक्षी थोडी शांत झाली. तिला तन्मयच्या शब्दांतून नेहमीच एक वेगळा आधार मिळायचा. लहानपणापासूनची त्यांची ही मैत्री. एकमेकांच्या सुख-दुःखात ते नेहमीच सावलीसारखे सोबत असायचे. साक्षीच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर तन्मयचा सल्ला किंवा त्याची एखादी मिश्किल टिप्पणी अनिवार्य असायची.

" आईने इडली सांबार केलंय, येऊन खाऊन जा. रिकाम्या पोटी गेलीस तर तिथे इंटरव्ह्यू घेणाऱ्यावरच चिडशील." तन्मयने पुन्हा खोड काढली.

" मी येत नाहीये तुझ्याकडे इडली सांबार खायला ! मी आईला सांगते की तू मला चिडवतोयस." असं म्हणत साक्षी आतल्या खोलीत निघून गेली.

तन्मयने पुन्हा बासरी हातात घेतली. यावेळी त्याने एक मंद आणि आश्वासक धून वाजवायला सुरुवात केली. त्याला माहित होतं की साक्षी आता नवीन जगात पाऊल टाकणार आहे.

'ओरियन ग्रुप' हे नाव ऐकायला जितकं मोठं होतं, तितकंच तिथलं जग गुंतागुंतीचं होतं. तन्मयला कुठेतरी एक अनामिक भीती वाटत होती—साक्षी या नव्या प्रवाहाच्या मोहात स्वतःला विसरून तर जाणार नाही ना?

गॅलरीतील जुईच्या फुलांचा सुगंध हवेच्या झोताने अचानक अधिक तीव्र झाला. तन्मयने आकाशाकडे पाहिलं. ऊन तर प्रखर होत होतं. 'नर्मदा सदन'च्या त्या भिंती साक्षी आणि तन्मयच्या बालपणाच्या साक्षीदार होत्या. पण आता काळ बदलणार होता. एक 'क्षण' असा येणार होता जो दोघांच्याही आयुष्याची दिशा बदलून टाकणार होता.

" साक्षी... ऑल द बेस्ट ! " तन्मय पुटपुटला आणि त्याने बासरीचे मोहक सूर छेडले. एक खणखणीत आवाज आसमंतात घुमला, जणू येणाऱ्या वादळाची किंवा नव्या सुरुवातीची ती नांदी होती.

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही