Login

क्षण मोहाचा काळ प्रीतीचा भाग २

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग २
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग २

पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या 'ओरियन टॉवर्स'समोर उभं राहिल्यावर साक्षीला पहिल्यांदाच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. चकाकत्या निळ्या काचांची ती भव्य वीस मजली इमारत म्हणजे जणू आधुनिक प्रगतीचं प्रतीक होती.

हातातली फाईल घट्ट धरून साक्षीने आत पाऊल टाकलं. 'नर्मदा सदन'च्या जुन्या वास्तूतून ती थेट एका अशा जगात आली होती, जिथे सर्व काही वेगवान, शिस्तबद्ध आणि तितकंच थंड होतं.
रिसेप्शनवर असलेल्या मुलीने तिला कॉन्फरन्स रूममध्ये बसायला सांगितलं. तिथे तिच्यासारखेच अनेक उमेदवार टाय-सूटमध्ये बसले होते.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं 'कॉर्पोरेट' दडपण होतं. साक्षीने स्वतःच्या साध्या पण सुबक पंजाबी ड्रेसकडे पाहिलं आणि तिला तन्मयने सकाळी म्हटलेलं वाक्य आठवलं—

" तिथल्या चकाकीत स्वतःचा साधेपणा हरवू नकोस." तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं.

" मिस साक्षी देशपांडे ? प्लीज कम इन." एका गंभीर आवाजाने तिला भानावर आणलं.

साक्षी आत गेली. केबिन प्रचंड मोठी होती. समोरच्या भिंतीवर 'ओरियन ग्रुप'चा मोठा लोगो होता. समोरच्या खुर्चीवर एक तरुण बसला होता. काळ्या रंगाचा ब्रँडेड सूट, मनगटावर महागडं घड्याळ आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास - हाच तो अमेय जहागीरदार होता. ओरियन ग्रुपचा सर्वेसर्वा.

अमेयने मान वर करूनही पाहिले नाही. तो त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता.

" बसा."

त्याने केवळ हाताच्या इशाऱ्याने सांगितलं. पुढची दोन मिनिटं केबिनमध्ये फक्त कीबोर्डचा आवाज येत होता. साक्षीला तो शांतता अस्वस्थ करत होती. तन्मयच्या बासरीचे सूर आणि इथली ही 'डेड सायलेन्स' यात जमीन-अस्मानाचा फरक होता.

अचानक अमेयने लॅपटॉप बंद केला आणि त्याचे तीक्ष्ण डोळे साक्षीच्या चेहऱ्यावर खिळले. त्या नजरेत एक प्रकारचा अधिकार होता.

" साक्षी देशपांडे... पुण्यातूनच शिक्षण ? बँकिंग बॅकग्राऊंड नाहीये , तरीही फायनान्स डिपार्टमेंटमध्ये कशासाठी ? "

साक्षीने शांतपणे उत्तर दिलं,

" सर , ममाझी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सवर कमांड आहे. बँकिंग म्हणजे फक्त आकडेमोड नसते, तर लॉजिक असतं. आणि माझं लॉजिक स्ट्रॉन्ग आहे."

अमेयच्या ओठांवर एक हलकी, उपरोधिक स्मितरेखा उमटली.

" लॉजिक ? या ऑफिसमध्ये लॉजिकपेक्षा रिझल्ट्स महत्त्वाचे असतात. मला अशा लोकांची गरज आहे जे चोवीस तास आणि सात दिवस फक्त कामाचा विचार करतील. तुमचं हे टिपीकल 'मध्यमवर्गीय' वेळापत्रक इथे चालणार नाही."

साक्षीला अमेयचा तो टिपिकल 'मध्यमवर्गीय' शब्द थोडा टोचला, पण तिने स्वतःवर नियंत्रण मिळवलं.

" सर , काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल. मग त्यासाठी वेळ कितीही लागो."

अमेयने तिची फाईल बाजूला सरकवली.

" ठीक आहे. तुमचं सिलेक्शन झालंय असं समजा. पण लक्षात ठेवा, ओरियन ग्रुपमध्ये चुकांना माफी नसते. उद्या सकाळी ९ वाजता हजर राहा. लेट झालात तर तुमची जागा घ्यायला बाहेर शंभर लोक उभे आहेत."

इंटरव्ह्यू संपला होता. अमेय पुन्हा त्याच्या फोनमध्ये गुंतला होता. साक्षी केबिनच्या बाहेर आली, तेव्हा तिचे पाय थोडे लटपटत होते. अमेयचं ते व्यक्तिमत्व जितकं आकर्षक होतं, तितकंच ते दडपण आणणारं होतं. त्याच्या बोलण्यात एक प्रकारची 'प्रीमियम' झूल होती, ज्यासमोर सामान्य माणूस स्वतःला लहान समजू लागेल.

संध्याकाळी ती घरी परतली, तेव्हा तन्मय गॅलरीत तिची वाटच पाहत होता.

" काय झालं ग साक्षू ? गब्बरने नोकरी दिली की नाहीब? " त्याने हसत विचारलं.

साक्षीने बॅग सोफ्यावर टाकली आणि म्हणाली,

" नोकरी तर मिळाली रे, पण तो माणूस... अमेय जहागीरदार... खूप वेगळा आहे. खूप शिस्तप्रिय आणि थोडा अहंकारीसुद्धा.."

तन्मयने तिला पाणी दिलं.

" अरे वा! जहागीरदार नावच तसं आहे. पण काळजी नको करू, तुझी मेहनत त्याला नक्कीच पटेल. आज सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ! "

" नको रे तन्या, उद्या नऊला पोहोचायचंय. उशीर झाला तर तो मला पहिल्याच दिवशी काढून टाकेल तो गब्बर. " साक्षी काळजीने म्हणाली.

ते दोघंही अमेय जहागीरदारला गब्बर म्हणल्या खळाळून हसले. तन्मयला साक्षीच्या बोलण्यात आलेलं अमेयचं नाव आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते दडपण जाणवलं. आज त्याने त्याची लाडकी गिटार काढली होती.

त्याने गिटारवर एक हलकी धून वाजवली, जणू तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण साक्षीचं लक्ष आता त्या सुरांकडे नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर अमेयची ती आलिशान केबिन आणि त्याचं भेदक व्यक्तिमत्व वारंवार येत होतं.
त्या रात्री साक्षीला उशिरापर्यंत झोप लागली नाही.

अमेयचं ते जग तिला खुणावत होतं, तर दुसरीकडे तन्मयचा तो साधा गोडवा तिला आपल्याकडे खेचत होता. 'क्षण मोहाचा' खऱ्या अर्थाने सुरू झाला होता.

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही