Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ४

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ४
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग ४

रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. पुण्यातील सदाशिव पेठेतील रस्ते सामसूम झाले होते आणि 'नर्मदा सदन'च्या जुन्या वास्तूतही शांतता पसरली होती. फक्त गॅलरीत तन्मय आपल्या गिटारच्या तारांशी चाळा करत बसला होता. त्याचं लक्ष वारंवार वाड्याच्या प्रवेशद्वाराकडे जात होतं. आज साक्षीचा ऑफिसचा पहिलाच दिवस होता, पण तिला परतायला इतका उशीर होईल असं त्याला वाटलं नव्हतं.

वाड्याच्या दारापाशी एक टॅक्सी थांबली आणि त्यातून साक्षी उतरली. तिचा थकलेला चेहरा, पण त्या चेहऱ्यावरचा एक वेगळाच अभिमान तन्मयने दुरूनच टिपला. ती जिने चढून वर आली, तेव्हा तन्मय उठून उभा राहिला.

" खूप उशीर झाला ग साक्षू , काळजी वाटत होती." तन्मयने अतिशय आश्वासक स्वरात विचारलं.

साक्षीने हातातील बॅग सोफ्यावर टाकली आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. तिने आपले केस नीट सावरले आणि म्हणाली,

" कामाचा प्रचंड लोड होता तन्या. अमेय सरांना 'स्कायलाईन' प्रोजेक्टचा पूर्ण रिपोर्ट उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत टेबलवर हवाय. तो रिपोर्ट केल्याशिवाय मला तिथून निघणंच शक्य नव्हतं."
तन्मयने तिचं बोलणं नीट ऐकलं. त्याच्या कानाला एक गोष्ट खटकली.

" अमेय सर ? कालपर्यंत ते फक्त 'जहागीरदार' होते, आज एकदम एका दिवसात 'सर' झाले? आणि तुझा फोन का बंद होता ग ? किमान मेसेज तरी करायचा होतास."

साक्षी थोडी चिडली. तिला तन्मयची ही साधी चौकशी आता 'बंधन' वाटू लागली होती.

" अरे तन्या, अशा मोठ्या मल्टिनॅशनल ऑफिसेसमध्ये सारखं फोनवर बोलणं किंवा मेसेज करणं चांगलं दिसत नाही. तिथे प्रत्येक मिनिटाचा हिशोब द्यावा लागतो. तिथे आमचे फोन सायलेंट मोडवर असतात. तुला नाही कळणार ते कॉर्पोरेट जग कसं असतं. तुमचं बँकेचं ते संथ काम आणि आमचं हे हाय-प्रोफाईल, हाय-स्टेक काम यात खूप फरक आहे," साक्षी नकळतपणे पण बोचऱ्या स्वरात बोलून गेली.

तन्मयला ते शब्द मनाला टोचले. आजवर साक्षीने कधीही त्याच्या बँकेच्या कामाला 'कमी' दर्जाचं लेखलं नव्हतं. त्याने स्वतःला सावरलं आणि शांतपणे म्हटलं,

" फरक तर नक्कीच आहे साक्षू. बँकिंगमध्ये आम्ही रोज शेकडो लोकांशी, त्यांच्या अडचणींशी जोडलेलो असतो. तिथे माणुसकी महत्त्वाची असते. आणि तुझ्या या नव्या कॉर्पोरेट जगात कदाचित फक्त 'टार्गेट्स' आणि 'आकडे' महत्त्वाचे असावेत. पण ठीक आहे, तुला हे नवीन जग आवडतंय, तू तिथे खूश आहेस ना, मग झालं तर ! "

साक्षीला क्षणभर आपली चूक उमजली. तिला जाणवलं की आपण तन्मयचा अपमान केला आहे, जो दिवसभर तिची वाट पाहत बसला होता. पण अमेय जहागीरदारच्या त्या आलिशान केबिनने आणि तिथल्या 'प्रीमियम' वातावरणाने तिच्या मनावर इतकं भारावून टाकलं होतं की तिने तन्मयची माफी मागणं टाळलं. तिला वाटलं, तन्मयला तिच्या या नवीन या जगाचा हेवा वाटतोय.

पुढचे काही दिवस साक्षीच्या बोलण्यात फक्त अमेयचेच विषय असायचे.

" आज अमेय सरांनी एक नवी मर्सिडीज घेतली..."

" आज सरांनी किती डॅशिंग डिसीजन घेतला..."

" त्यांचं घड्याळ किती महागडं आहे..."

अमेयचं ते चकाकणारं व्यक्तिमत्व तिच्या मध्यमवर्गीय विचारांवर अधिराज्य गाजवू लागलं होतं. तिला आता 'नर्मदा सदन'च्या गॅलरीत बसून चहा पिण्यापेक्षा अमेयच्या केबिनमधील ती 'एस्प्रेसो' कॉफी जास्त स्टेटसची वाटू लागली होती.
तन्मयला मात्र काहीतरी गंभीर खटकत होतं.

तो बँकर होता आणि त्याने अशा अनेक कंपन्या पाहिल्या होत्या ज्या झपाट्याने वर जातात आणि तितक्याच वेगाने कोसळतात. त्याचा 'सिक्सथ सेन्स' सांगत होता की, ओरियन ग्रुपचा हा झगमगाट जितका बाहेरून आकर्षक दिसतोय, तितकाच तो आतून पोकळ किंवा धोकादायक असू शकतो. अमेय जहागीरदारचा तो अती-अहंकार साक्षीला कोणत्या संकटात टाकेल का ?, याची भीती त्याला सतावत होती.

पण साक्षी आता तन्मयच्या सल्ल्यांकडे एका जुन्या विचारांच्या मित्राचा 'कंटाळवाणा उपदेश' म्हणून पाहू लागली होती. अमेयने दिलेल्या 'डेडलाईन्स' आता तिच्यासाठी तन्मयच्या 'मैत्री'पेक्षा जास्त महत्त्वाच्या झाल्या होत्या. 'नर्मदा सदन'च्या दोन भिंतींमध्ये आता हळूहळू एका नव्या, अदृश्य दरीची सुरुवात झाली होती का ?

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही