डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ५
'ओरियन ग्रुप'मध्ये रुजू होऊन आता एक महिना उलटला होता. गेल्या सहा सात दिवसांत साक्षीने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिलं होतं. अमेय जहागीरदारच्या वेगवान कार्य पद्धतीशी जुळवून घेताना तिची दमछाक होत होती, पण त्याच्या सहवासात मिळणारा तो 'प्रीमियम' अनुभव तिला सुखावत होता.
शुक्रवारी सकाळी अमेयने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि सांगितले,
" साक्षी, आज आपली 'स्कायलाईन' प्रोजेक्टसाठी एका आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर ग्रुपसोबत मीटिंग आहे. तू तयार केलेल्या फायनान्शिअल रिपोर्टवर ही डील अवलंबून आहे. गेट रेडी, आपण हॉटेल 'रॉयल प्लाझा'ला जातोय."
पुण्यातील त्या सर्वात महागड्या आणि सेव्हन स्टार हॉटेलच्या भव्य कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंग सुरू झाली. साक्षीने आजवर फक्त टीव्हीवर पाहिलेलं कॉर्पोरेट जग आज तिच्या डोळ्यांसमोर होतं. मोजक्या शब्दांत चालणारी चर्चा, महागड्या गाड्यांच्या चाव्या आणि ब्रँडेड सुट्सचा तो वावर पाहून ती भारावून गेली होती.
अमेयने जेव्हा प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली, तेव्हा साक्षी त्याच्याकडे थक्क होऊन पाहत राहिली. त्याचा आत्मविश्वास, समोरच्या बड्या बिझनेसमनच्या प्रश्नांना त्याने दिलेली तर्क शुध्द पद्धतीने भरलेली ती समर्पक उत्तरं आणि त्याची ती 'चार्मिंग' स्टाईल... साक्षीला वाटलं, हा माणूस खरोखरच एका वेगळ्या जगातील आहे.
मीटिंग संपली आणि 'स्कायलाईन' प्रोजेक्टवर शिक्कामोर्तब झाले. बाहेर हॉटेलच्या आलिशान लॉबीत अमेयने साक्षीकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक दुर्मिळ समाधान होतं.
" वेल डन, साक्षी ! तुझ्या अचूक रिपोर्टमुळे आणि डेटा ॲनॅलिसिसमुळे आज ही डील फायनल झाली आहे. तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळालंय."
अमेयने तिचं कौतुक केलं.
अमेयने तिचं कौतुक केलं.
साक्षीला जणू स्वर्गाला हात लागल्यासारखं वाटलं. ज्या अमेय जहागीरदारचं कौतुक मिळवण्यासाठी ऑफिसमध्ये अनेक वर्षांपासून लोक धडपडत होते, त्याने आज स्वतः तिची स्तुती केली होती.
" थँक यू सो मच, सर ! हे सर्व तुमच्या गाईडनस मुळे शक्य झालं." ती भारावून म्हणाली.
अमेयने एक पाऊल जवळ येत म्हटलं,
" यू डिझर्व्ह इट. खरं सांगू तर, मला वाटलं नव्हतं की 'नर्मदा सदन'सारख्या मध्यमवर्गीय वातावरणातून आलेली एक मुलगी इतक्या लवकर ही 'कॉर्पोरेट क्लास' आत्मसात करेल. तुझी बुद्धी खरोखरच तल्लख आहे. तू ओरियनचं भविष्य आहेस."
अमेयने तिला दिलेली ही एक हलकी स्तुती तिच्यासाठी कोणत्याही जागतिक पुरस्कारापेक्षा मोठी होती. तिचं मन मोहाच्या लाटेवर स्वार झालं होतं.
पण, हा आनंदाचा क्षण फार काळ टिकला नाही. तिथेच उभे असताना अमेयचा फोन वाजला. त्याने फोन उचलला आणि काही क्षणांतच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. कपाळावर आठी आली आणि डोळे रागाने लाल झाले.
" काय ? डेटा लीक झाला? अशक्य! कोणाला एक्सेस होता त्या फाईल्सचा ? "
तो तिथेच मोठ्याने ओरडला. लॉबीतील लोक त्याच्याकडे पाहू लागले.
अमेयने फोन खिशात ठेवला आणि तो साक्षीकडे वळला. त्याची ती मघाची कौतुकाची नजर आता संशयाच्या आगीत बदलली होती.
" साक्षी, 'स्कायलाईन' प्रोजेक्टचे काही अत्यंत गुप्त फिगर्स प्रतिस्पर्धी कंपनीकडे पोहोचले आहेत. निटको कन्स्ट्रक्शन्सने आपल्या प्रोजेक्टच्या सारखाच प्लॅन अर्ध्या किमतीत मार्केटमध्ये आणला आहे. त्या फाईल्सचा पासवर्ड फक्त तुझ्याकडे आणि माझ्याकडे होता. हा डेटा बाहेर कसा गेला ? "
साक्षीचे हातपाय थरथरू लागले. तिला काहीच सुचेनासं झालं.
" सर, मी... मी शपथ घेऊन सांगते, मी काहीच केलं नाहीये. मी तर कोणाला पासवर्डही सांगितला नाही आणि फाईल्सचा एक्सेसही दिला नाही."
" ते आपण पाहूया." अमेय थंडपणे, पण अगदीं निष्ठुरपणे म्हणाला.
" जर या मागे तुझा हात असेल, तर लक्षात ठेव साक्षी, मी जितक्या लवकर तुला या वरच्या मजल्यावर चढवलंय, तितक्याच वेगाने मी तुला खालीही पाडू शकतो. मला फसवणाऱ्यांना मी सोडत नाही."
अमेय रागाने तिथून निघून गेला आणि साक्षी तिथेच अवाक होऊन उभी राहिली. काही वेळापूर्वी ज्याच्या नजरेत तिला स्वतःचं भविष्य दिसत होतं, त्याच नजरेत आता तिरस्कार होता. ती रडत रडत कशीबशी घरी पोहोचली. 'नर्मदा सदन'च्या गॅलरीत तन्मय नेहमीप्रमाणे गिटारवर एक धून वाजवत होता.
पण आज त्या सुरांनी तिला शांत करण्याऐवजी अधिकच अस्वस्थ केलं. तिला जाणीव झाली की, ज्या चकाकत्या जगाच्या मोहात तिने पाऊल ठेवलं होतं, तिथला रस्ता खूप निसरडा आहे. ज्या संकटात ती आता अडकली होती, तिथून बाहेर पडण्याचा मार्ग तिला दिसत नव्हता आणि तन्मयच्या नजरेला नजर भिडवण्याची तिची हिंमत होत नव्हती.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा