डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ६
पुण्यातील सदाशिव पेठेच्या गजबजलेल्या वातावरणात उभी असलेली 'जन-आस्था बँक' ही केवळ एक वित्तीय संस्था नव्हती, तर मध्यमवर्गीय पुणेकरांच्या विश्वासाचा एक अभेद्य किल्ल्या सारखी होती. या बँकेच्या मुख्य शाखेत पाऊल ठेवले की, जुन्या काळातील गांभीर्य आणि आधुनिक बँकिंगचा मेळ पाहायला मिळायचा.
या बँकेच्या क्रेडिट ऑथोरायझेशन विभागात बसणारा तन्मय कानिटकर हा घरच्या लोकांसाठी खोडकर 'तन्या' असला, तरी बँकेच्या चार भिंतींच्या आत तो एक अत्यंत धाक निर्माण करणारा शार्प ऑफिसर होता.
पांढराशुभ्र कडक इस्त्रीचा शर्ट, नीटनेटके विंचरलेले केस आणि डोळ्यांवरचा तो चष्मा... तन्मयच्या या रुपात एक वेगळीच जरब होती. त्याच्यासमोर फाईल्सचा ढिगारा असायचा, पण त्याचे लक्ष फक्त आकड्यांवर नसायचे, तर त्या आकड्यांच्या मागे लपलेल्या सत्यावर असायचे. बँकिंग हे त्याच्यासाठी केवळ नऊ ते सहाचे काम नव्हते, तर ते एका तर्काचे शास्त्र होते.
तो नेहमी म्हणायचा,
तो नेहमी म्हणायचा,
"आकडे कधीच खोटे बोलत नाहीत, फक्त ते वाचणारी नजर पारखी असावी लागते."
त्या दिवशी दुपारी तन्मय आपल्या केबिनमध्ये एका मोठ्या रिअल इस्टेट कंपनीचे पन्नास कोटींचे लोन प्रपोजल तपासत बसला होता. केबिनमध्ये एसीचा मंद आवाज येत होता, पण तन्मयच्या कपाळावर एक बारीक आठी होती. तेवढ्यात शेटे नावाचा एक ज्युनिअर क्लर्क फाईल घेऊन आत आला.
"सर, हे प्रपोजल रिजनल ऑफिसमधून क्लिअर होऊन आले आहे. सर्व पेपर्स ओके आहेत. फक्त तुमच्या फायनल सहीची वाट पाहत आहोत. पार्टी खूप मोठी आहे, त्यांचे आधीचे रेकॉर्ड्सही क्लीन आहेत." शेटे यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
तन्मयने फाईल उघडली. त्याने बॅलन्स शीटची पाने वेगाने उलटली. वरवर पाहता सर्व काही नियमानुसार वाटत होते. नफा वाढलेला दिसत होता, मालमत्तेचे मूल्यांकनही चढे होते. तन्मयने पेन बाजूला ठेवले आणि कॅल्क्युलेटरवर काही आकडे मोडले. अवघ्या पाच मिनिटांत त्याचे बोट एका विशिष्ट एन्ट्रीवर येऊन थांबले.
" शेटे " तन्मयचा आवाज केबिनमध्ये घुमला.
" या बॅलन्स शीटमध्ये डेबिट आणि क्रेडिटचा ताळमेळ बसतोय, पण कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये गडबड आहे. कंपनीने कागदावर दहा कोटींचा निव्वळ नफा दाखवला आहे, पण त्यांच्या बँक स्टेटमेंट्समध्ये प्रत्यक्ष पैसा कुठेच जमा झालेला दिसत नाहीये. हा फक्त अकाउंटिंग मॅनिप्युलेशनचा खेळ आहे. यांनी जुन्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी नवीन कर्जाचा हा सापळा रचला आहे."
समोर उभ्या असलेल्या शेटे यांना घाम फुटला. जे ऑडिटर्सच्या आणि रिजनल ऑफिसच्या नजरेतून निसटले होते, ते तन्मयने काही मिनिटांत शोधून काढले होते. तन्मयने त्या प्रपोजलवर मोठ्या अक्षरात ' रिजेक्ट ' असा शिक्का मारला.
" हे प्रपोजल आत्ताच्या आत्ता परत पाठवा. आणि त्यांना स्पष्ट सांगा की, जन-आस्था बँक अशा फसव्या प्रपोजल्सना थारा देत नाही. आपल्या बँकेचे नियम कडक आहेत आणि ते पाळलेच गेले पाहिजेत. पैशांच्या प्रवासावरून मला त्या माणसाची नियत कळतेय." तन्मयने ठामपणे सांगितले.
बँकेत तन्मयचा एक वेगळाच दरारा होता. कठीण प्रकरणे सोडवण्यासाठी मॅनेजमेंट नेहमी तन्मयचा सल्ला घ्यायची. जेव्हा तो कामात असायचा, तेव्हा त्याला आजूबाजूच्या जगाचा पूर्ण विसर पडायचा. पण संध्याकाळी सहाचे ठोके पडले की, तो आपले टेबल आवरून उठायचा. डोळ्यावरचा चष्मा काढून खिशात ठेवला की, तो पुन्हा गिटार किंवा बासरी वाजवणारा आणि साक्षीची वाट पाहणारा तोच जुना तन्मय व्हायचा.
आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. ओरियन ग्रुपमध्ये साक्षीचा पहिला मोठा क्लायंट मीटिंगचा दिवस होता. तिला नोकरी मिळाल्याचा आनंद त्याला आजही तितकाच होता. त्याला माहित होते की साक्षी हुशार आहे, पण तिला कॉर्पोरेट जगाच्या राजकारणाची सवय नाही.
तो घरी जाताना मनात विचार करत होता. साक्षी आता मोठ्या लोकांमध्ये मिसळू लागली आहे, तिला कदाचित माझ्या या साध्या बँकिंगच्या गप्पा आता कंटाळवाण्या वाटतील का ? पण तरीही, तो तिच्या यशासाठी तितकाच आतुर होता. आनंदी होता.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा