डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग १६
अमेय जहागीरदारची ती चकाकती पांढरी मर्सिडीज वाऱ्याच्या वेगाने गल्लीतून निघून गेली, मागे फक्त धुराचा लोट आणि उडालेली धूळ उरली. साक्षी तिथेच सुन्न होऊन उभी होती. तिचा श्वास जोरात चालला होता आणि डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. गाडी दिसेनाशी होताच ती ताडताड जिने चढून वर आली आणि गॅलरीत उभ्या असलेल्या तन्मयवर तुटून पडली.
" तन्या ! काय झालंय तुला ? काय गरज होती तुला अमेय सरांशी असं उद्धटपणे बोलायची ? तुला साधी कल्पना तरी आहे का ते कोण आहेत ? पुण्यातल्या कॉर्पोरेट जगतात त्यांचं नाव चालतं. तुझ्या या वागण्यामुळे माझी नोकरी आजच्या आज जाऊ शकली असती, याची तुला जाणीव आहे का ? " साक्षीचा आवाज रागाने आणि काळजीतून रडवेला झाला होता.
तन्मयने सायकल दुरुस्त करून काळे झालेले आपले हात कपड्याने पुसले आणि अतिशय शांतपणे तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत राग नव्हता, तर एक प्रकारची करुणा होती.
" साक्षू , नोकरीपेक्षा तुझा स्वाभिमान आणि माणसाचा आदर खूप मोठा असतो ग. तो माणूस तुला एक जिवंत माणूस म्हणून नाही, तर फक्त एक 'फाईल पूर्ण करणारं मशिन' म्हणून बघतोय. तुला हे जाणवत कसं नाहीये ? "
" ते प्रोफेशनल आहेत तन्या ! त्यांच्यासाठी 'रिझल्ट्स' महत्त्वाचे असतात. तुला त्यांचं ते कॉर्पोरेट जग आणि त्यांची 'पॅशन' कधीच कळणार नाही. तू फक्त पासबुक प्रिंट करण्याच्या पलीकडे विचारच करू शकत नाहीस ! " साक्षी ओरडून म्हणाली आणि पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली.
त्या रात्री 'नर्मदा सदन'मध्ये जेवणाचं ताट तसंच राहिलं. तन्मयला झोप लागली नाही. तो गॅलरीत रेलून बसला होता आणि रात्रीच्या काळोखात समोरच्या जुन्या वाड्याच्या छताकडे पाहत होता. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.
त्याने आज पहिल्यांदा अमेय जहागीरदारच्या डोळ्यांत पाहिले होते. त्या डोळ्यांत बुद्धिमत्ता होती, चमक होती, पण माणुसकीचा अंशही नव्हता. तिथे फक्त स्वतःचा फायदा, सत्ता आणि अफाट अहंकार होता.
तन्मयने आपल्या बँकिंग करिअरमध्ये आजवर अनेक मोठे क्लायंट्स आणि उद्योगपती पाहिले होते. त्याला माहिती होतं की, अमेय जहागीरदार हा गुन्हेगार किंवा 'व्हिलन' नव्हता, पण त्याचा हा अती-अहंकार आणि त्याची ही 'रिजिडिटी' अती ताठरपणा त्याला कधीही चुकीच्या मार्गावर नेऊ शकते.
अमेयसारखी माणसं जेव्हा 'स्कायलाईन'सारख्या मोठ्या प्रोजेक्टच्या मोहात पडतात, तेव्हा ते नियमांकडे आणि माणसांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात.
" साक्षी या माणसाच्या खरोखरच प्रेमात पडली आहे की अमेयच्या त्या ग्लॅमरस श्रीमंतीच्या मोहात ? "
हा प्रश्न तन्मयला आतून सतावत होता. त्याला जाणवले की, अमेय जहागीरदार हे फक्त एक नाव नाही, तर ते एक वादळ आहे जे साक्षीच्या साध्या, मध्यमवर्गीय आयुष्याचा डोलारा क्षणात उद्ध्वस्त करू शकते.
तन्मयने आज स्वतःशीच एक शपथ घेतली काहीही झाले तरी तो साक्षीला या वादळापासून वाचवेल. पण अडचण ही होती की, साक्षी आता स्वतःहून त्या वादळाच्या दिशेने धावत होती आणि तन्मयचा हात झटकून टाकत होती.
त्या रात्री तन्मयने गिटार हातात घेतली, पण तारा छेडण्याची त्याची हिंमत झाली नाही. आज सुरांमध्ये ती गोडी उरली नव्हती. 'क्षण मोहाचा' आता त्याच्या काळजाला स्पर्श करू लागला होता, पण त्या स्पर्शात थंडावा नव्हता, तर दाह होता. त्याने रात्रीच्या निवांत शांततेत आकाशाकडे पाहत स्वतःशीच पुटपुटले,
" साक्षी, आज तू ज्याला प्रकाश समजून त्याकडे झेपावते आहेस, तो कदाचित तुला पूर्णपणे जाळून टाकेल असा वणवा असू शकतो. देव करो आणि माझं हे वाटणं खोटं ठरो..."
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा