डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग २१
ओरियन ग्रुपच्या मुख्यालयात सध्या एकाच नावाचा जप सुरू होता, स्कायलाईन. हा केवळ एक गृहनिर्माण किंवा व्यावसायिक बांधकाम प्रकल्प नव्हता, तर तो अमेय जहागीरदारच्या अफाट महत्त्वाकांक्षेचा कळस होता. पुण्यातील सर्वात उंच, काचेच्या भिंतींची आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेली ही वास्तू अमेयला जागतिक रिअल इस्टेटच्या नकाशावर नेणार होती.
अमेयसाठी हा प्रकल्प म्हणजे त्याची प्रतिष्ठा आणि ओरियन ग्रुपचे भविष्य होते. या भव्य प्रकल्पाचे संपूर्ण आर्थिक नियोजन, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा गोपनीय डेटा आणि या प्रकल्पाची भविष्यातील धोरणे तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त जबाबदारी अमेयने पूर्ण विश्वासाने साक्षीवर सोपवली होती.
साक्षीसाठी हे सर्व एखाद्या स्वप्नवत प्रवासा सारखे होते. काही महिन्यांपूर्वी 'नर्मदा सदन'च्या साध्या वातावरणात राहणारी ती मुलगी आज कोट्यवधींच्या व्यवहारांच्या फाईल्स हाताळत होती. तिने स्वतःला या कामात पूर्णपणे झोकून दिले होते.
तिचे दिवस आता फाईल्सच्या ढिगाऱ्यात आणि रात्री लॅपटॉपच्या निळ्या प्रकाशात सरत होत्या. अमेयने तिला या प्रोजेक्टचे फेस चेहरा बनवले होते. प्रत्येक मोठ्या मीटिंगमध्ये तो साक्षीला सोबत ठेवायचा आणि तिच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करायचा.
" साक्षी, तुला माहितीये ? स्कायलाईन हा फक्त पुण्या पुरता मर्यादित नाही. या प्रकल्पाचे यश आपल्याला थेट युरोपच्या मार्केटमध्ये प्रवेश मिळवून देणार आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला की, पुढच्याच महिन्यात आपण लंडनच्या नवीन ऑफिसचे उद्घाटन करायला जाणार आहोत."
अमेयने एकदा तिच्या केबिनमध्ये येऊन तिला सांगितले होते. अमेयने दिलेले हे लंडनचे प्रलोभन आणि त्याच्या शब्दातील ती जादू साक्षीच्या डोळ्यांत भविष्याची गुलाबी स्वप्ने रंगवत होती. तिला आता स्वतःची मध्यमवर्गीय मुळे आणि साधेपणा विसर पडू लागला होता; तिला फक्त अमेयचे ते ग्लॅमरस जग खुणावत होते.
पण या झगमगत्या यशाच्या सावलीतच मत्सराचे पेव फुटले होते, याची साक्षीला पुसटशीही कल्पना नव्हती. ओरियन ग्रुपमध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून काम करणारे जुने आणि अनुभवी व्यवस्थापक मनातून धुमसत होते.
ज्या पदावर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली होती, तिथे एक नवखी, मध्यमवर्गीय मुलगी केवळ अमेयच्या मर्जीतली आहे म्हणून इतक्या वेगाने वर चढत होती, हे अनेकांना खुपत होते. ऑफिसच्या कॅफेटेरियात आणि कोपऱ्यां कोपऱ्यात आता कुजबुज सुरू झाली होती.
" ही साक्षी देशपांडे नक्की काय जादू करतेय कोणास ठाऊक ! अमेय सर तिच्याशिवाय एक पाऊलही टाकत नाहीत."
अमेयची पीए नेहा आपल्या मैत्रिणींशी बोलताना म्हणाली.
" तिला मिळालेला हा मुक्त प्रवेश आणि सरांच्या केबिनमधील त्या तासनतास चालणाऱ्या गुप्त चर्चा... हे काही नीट वाटत नाहीये. स्कायलाईनच्या यशाचे सर्व श्रेय ही एकटीच लाटणार असं दिसतंय."
साक्षीला अमेयच्या केबिनमध्ये मिळणारे प्राधान्य आणि तिचे अचानक वाढलेले महत्त्व ऑफिसमधील पॉवर स्ट्रक्चरला धक्का देणारे होते. ज्या कर्मचाऱ्यांनी ओरियनला उभं केलं होतं, त्यांना आता आपली जागा असुरक्षित वाटू लागली होती.
अमेयने साक्षीला या प्रोजेक्टचा कणा बनवलं होतं, पण त्याच वेळी त्याने तिला नकळतपणे शत्रूंच्या गराड्यातही उभं केलं होतं.
साक्षी मात्र या सुप्त वादाची, त्या मत्सराच्या नजरांची आणि पाठीमागे होणाऱ्या निंदेची पूर्णपणे अनभिज्ञ होती. ती केवळ अमेयने दाखवलेल्या लंडनच्या स्वप्नात आणि स्कायलाईनच्या त्या चकाकत्या मोहात बुडाली होती.
तिला वाटत होतं की तिचं टॅलेंट तिला इथवर घेऊन आलंय, पण तिला हे माहित नव्हतं की कॉर्पोरेट जगात टॅलेंट पेक्षा जास्त राजकारण धोकादायक असतं. स्कायलाईन नावाचा हा डोलारा जितका उंच होता, तितकाच त्याचा पाया आता अंतर्गत कारस्थानांनी पोखरला जाऊ लागला होता.
एका बाजूला अमेयची प्रलोभनं आणि दुसऱ्या बाजूला ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा वाढता द्वेष
साक्षी एका अशा वादळाच्या केंद्रस्थानी उभी होती, ज्याची तिला कल्पनाही नव्हती.
साक्षी एका अशा वादळाच्या केंद्रस्थानी उभी होती, ज्याची तिला कल्पनाही नव्हती.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा