Login

क्षण मोहाचा काळ प्रीतीचा भाग २३

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग २३
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग २३

स्कायलाईन प्रोजेक्टचे काम आता त्याच्या सर्वात शेवटच्या टोकावर पोहोचले होते. संपूर्ण पुणे शहरात ओरियन ग्रुपच्या या भव्य दिव्य प्रकल्पाची चर्चा होती. पण, या यशाच्या शिखरावर असतानाच एक असा धक्का बसला, ज्याने ओरियन टॉवर्सच्या पायालाच तडा गेला.

बातमी आली की, ओरियनचा सर्वात मोठा स्पर्धक असलेल्या निटको कन्स्ट्रक्शन्सने त्यांच्या नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब ही होती की, निटकोचा तो प्लॅन, त्यांची गुंतवणुकीची पद्धत आणि अगदी घरांच्या किमतीही स्कायलाईनच्या अगदी हुबेहूब होत्या, पण त्या ओरियनपेक्षा दहा टक्क्यांनी कमी होत्या.
याचा अर्थ स्पष्ट होता. ओरियन ग्रुपचा अत्यंत सिक्रेट असलेला फायनान्शिअल डेटा आणि स्ट्रॅटेजी लीक झाली होती. अमेय जहागीरदारच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्याचा अहंकार आणि त्याची प्रतिष्ठा यावर झालेला हा सर्वात मोठा वार होता. अमेयचा अवताराने रौद्र रुप धारण केले होते. त्याने तातडीची बोर्ड मीटिंग बोलावली. कॉन्फरन्स रूम मधील वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की, कोणाला साधा श्वास घेतानाही भीती वाटत होती.

" कोणाला एक्सेस होता या फाईल्सचा ? ओरियनच्या इतिहासात आजवर कधीही डेटा चोरी झाला नाही, मग आजच असं का घडलं ?

हा डेटा निटकोच्या टेबलवर पोहोचलाच कसा ? " अमेय ओरडत होता, त्याच्या आवाजातील रागाने काचेच्या भिंती थरथरत होत्या.

मिस्टर खन्नांनी नेमकी हीच वेळ साधली. त्यांनी अत्यंत संयमी पण धूर्तपणे आपला पत्ता टाकला.

" सर, मला हे बोलताना खूप त्रास होत आहे, कारण आपण सर्वांनी एका व्यक्तीवर खूप विश्वास टाकला होता. पण रेकॉर्ड्स अनुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून स्कायलाईनच्या मास्टर फाईल्सचा एक्सेस फक्त तुमच्याकडे आणि साक्षी मॅडमकडे होता. साक्षी मॅडम रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये एकट्याच या फाईल्सवर काम करत होत्या. आणि..."

खन्ना क्षणभर थांबले, जणू काही त्यांना खूप मोठं सत्य सांगताना त्रास होतोय.

" आमच्या सेक्युरिटी टीमला कळलंय की, काल संध्याकाळी साक्षी मॅडम निटकोच्या एका वरिष्ठ ऑफिसर सोबत एका खाजगी हॉटेलमध्ये खूप वेळ मीटिंग करत होत्या."

साक्षी अवाक होऊन खन्नांकडे पाहत राहिली. तिचं डोकं सुन्न झालं होतं.

" हे धादांत खोटं आहे सर ! खन्ना सर, तुम्ही हे काय बोलताय ? मी काल रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट पूर्ण करत होते आणि मी कोणालाही भेटले नाहीये ! " साक्षी ओरडून सांगत होती, पण तिचा आवाज त्या बंद खोलीत दाबला जात होता.

" मग हा डेटा लीक कसा झाला ? डेटा आपो आप चालत निटकोकडे गेला का ? " अमेयने निष्ठुरपणे, डोळ्यांत राग मावत नव्हता. रागाने थरथरत नजरेत नजर घालून साक्षीकडे पाहिले.

" तुझा लॅपटॉप आणि तुझे सर्व ई मेल्स आत्ताच्या आत्ता आयटी टीमद्वारे चेक केले जातील. मला पुरावा हवा आहे."

पुढच्या अर्ध्या तासात आयटी टीमने अमेयसमोर काही स्क्रीनशॉट्स ठेवले. साक्षीच्या अधिकृत ईमेल आयडीवरून निटको कन्स्ट्रक्शन्सच्या एका अज्ञात मेलवर काही गोपनीय पीडीएफ फाईल्स पाठवण्यात आल्या होत्या.

साक्षीला हे माहित नव्हतं की, खन्नांनी आधीच आयटी टीममधील एका माणसाला हाताशी धरून साक्षीच्या सिस्टममध्ये रिमोट एक्सेसद्वारे हे मेल प्लांट केले होते. तांत्रिक पुरावा आता साक्षीच्या विरोधात होता.

अमेयचा अहंकार पूर्णपणे दुखावला गेला होता. त्याला वाटलं की, त्याने ज्या मुलीला शून्यातून वर आणलं, जिच्या साधे पणावर विश्वास ठेवून तिला आपल्या साम्राज्याची गुरुकिल्ली दिली, तिनेच त्याच्या पाठीत खंजीर खुपसला.

त्याने साक्षीकडे पाहिले, पण त्या नजरेत आता ते पूर्वीचं कौतुक किंवा स्पेशल असल्याची जाणीव नव्हती , तिथे फक्त आणि फक्त थंड तिरस्कार होता.

" मिस देशपांडे, मला वाटलं होतं की तू वेगळी आहेस. पण तू सुद्धा या कॉर्पोरेट जगातल्या एका साध्या गद्दार कर्मचाऱ्या सारखीच निघालीस. पैशांसाठी तू माझं स्वप्न विकलंस ? "
अमेयचा आवाज आता शांत पण अत्यंत घातक होता.

" सर, विश्वास ठेवा... मी हे नाही केलं. हा कोणीतरी रचलेला कट आहे ! " साक्षी रडत होती, अमेयचे पाय धरू पाहत होती. पण अमेयने आपला पाय मागे घेतला.

" गेट आऊट ! तुला आत्ताच्या आत्ता सस्पेंड केलं जातंय. आणि ओरियन ग्रुप तुझ्यावर अधिकृतरीत्या कायदेशीर कारवाई करेल. तुझी सर्व बँक अकाउंट फ्रीज केली जातील." अमेयने आपला अंतिम निकाल दिला.

साक्षी कोसळली. ज्या मोहाच्या, चकाकत्या क्षणात ती मागचे काही महिने जगली होती, त्या मोहाने आज तिला एका अशा गर्तेत ढकललं होतं, जिथून बाहेर पडणं तिच्या कल्पने पलीकडचं होतं. नर्मदा सदनमधील त्या साध्या सुखाचा, आईच्या मायेचा आणि

तन्मयच्या निखळ मैत्रीचा त्याग करून ती ज्या ग्लोसी जगात आली होती, त्या जगाने आज तिला एक गुन्हेगार ठरवून उधळून लावलं होतं. तिच्या हातातलं ते अमेयने दिलेलं महागडं घड्याळ अजूनही टिक-टिक करत होतं, पण आता तिची वेळ पूर्णपणे बदलली होती.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही