डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ३१
नर्मदा सदनच्या त्या जुन्या बेडरूमचं स्वरूप आता पूर्णपणे बदललं होतं. तन्मयने त्या खोलीला एका लहानशा वॉर-रूममध्ये रूपांतरित केलं होतं. खोलीच्या एका भिंतीवर त्याने पांढरा कागद लावून त्यावर स्कायलाईन प्रकल्पाची संपूर्ण टाईम लाईन, महत्त्वाच्या तारखा आणि संशयास्पद घटनांची मांडणी केली होती.
टेबलावर फायनान्शिअल जर्नल्स, लॅपटॉप आणि काही तांत्रिक डायऱ्यांचा ढिगारा पडला होता. तन्मयच्या डोळ्यांत एक वेगळीच एकाग्रता होती. तोच शार्प ऑफिसर जो बँकेत असताना एका सेकंदात चूक शोधून काढायचा.
साक्षी समोर बसली होती, अजूनही तिच्या मनात थोडी भीती होती, पण तन्मयच्या शांत स्वभावामुळे तिला बळ मिळत होतं.
" साक्षी, आपल्याला त्या रात्रीच्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब हवा आहे. डेटा लीक झाला त्या दिवशी तुचं लॉगिन रात्री ११:४५ ला दाखवलं होतं आणि त्याच वेळेत मेल गेला आहे. तू नेमकं काय करत होतीस ते पुन्हा एकदा अगदी बारकाईने आठवून सांग." तन्मयने विचारलं.
साक्षीने आपले डोळे मिटले आणि त्या रात्रीच्या घटनाक्रमात ती पुन्हा एकदा शिरली.
" तन्या, अमेय सर तेव्हा त्यांच्या केबिनमध्ये एका क्लायंटशी फोनवर बोलत होते. मी शेवटची फायनान्शिअल फाईल सेव्ह केली होती. मला खूप थकवा जाणवत होता, म्हणून मी सरांच्या केबिनमध्ये रिकामे झालेले कॉफीचे मग आणि फाईल्स द्यायला गेले होते. तिथून परत येईपर्यंत ऑफिसचे दिवे अचानक गेले होते.
कदाचित बॅकअप सुरू होण्यासाठी काही सेकंदांचा वेळ लागला असावा. त्या अंधारात आणि गोंधळात मी माझी सिस्टिम लॉक न करताच दोन मिनिटांसाठी बाजूला झाले होते. जेव्हा दिवे आले, तेव्हा मला सगळं नॉर्मल वाटलं आणि मी माझं काम आवरून घरी आले. " साक्षीने आठवत सांगितलं.
तन्मयच्या डोळ्यांत एक चमक आली. त्याने भिंतीवरच्या चार्टवर एक मोठं वर्तुळ काढलं.
" म्हणजे त्या १० ते १५ मिनिटांच्या गॅपमध्ये, जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरेही पॉवर फ्लक्च्युएशनमुळे बंद असावेत, तेव्हाच कोणीतरी तुझ्या सिस्टिमचा वापर केला. पण साक्षी, मुद्दा फक्त डेटा चोरीचा नाही. कॉर्पोरेट हेरगिरीमध्ये डेटा फक्त देऊन चालत नाही, तर त्यासाठी समोरच्या व्यक्तीला मोठा मोबदलाही मिळतो.
निटको सारखी बलाढ्य कंपनी फुकट डेटा घेणार नाही. जर त्यांनी कोणाला तरी लाच दिली असेल किंवा खरेदी केलं असेल, तर त्याचा मनी ट्रेल कुठे ना कुठे तरी बँकिंग सिस्टिममध्ये सापडणारच. आकडे कधीच खोटं बोलत नाहीत, फक्त त्यांना शोधण्याचं कौशल्य हवं."
तन्मयने आता जन-आस्था बँकेतील आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि फॉरेन्सिक ऑडिटच्या ज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली. त्याने ओरियन ग्रुपच्या गेल्या सहा महिन्यांच्या सार्वजनिक उपलब्ध असलेल्या आर्थिक व्यवहारांचा आणि साक्षीने दिलेल्या काही माहितीचा अभ्यास करायला सुरुवात केली.
त्याला हे पक्कं माहीत होतं की, जो कोणी खरा गुन्हेगार आहे, त्याने इतका मोठा पैसा स्वतःच्या अधिकृत खात्यावर नक्कीच घेतला नसणार. अशा कामांसाठी शेल कंपन्या किंवा बनावट नावावर उघडलेल्या खात्यांचा वापर केला जातो.
तन्मयने रात्री उशिरापर्यंत आपल्या बँकेच्या काही प्रगत सॉफ्टवेअर लॉजिकचा आणि डेटा मायनिंग तंत्राचा वापर करून काही संशयास्पद ट्रान्झॅक्शन्सची साखळी शोधायला सुरुवात केली.
" हे बघ." त्याने लॅपटॉपची स्क्रीन साक्षीकडे वळवली.
" ज्या दिवशी डेटा लीक झाला, त्याच्या बरोबर दोन दिवस आधी निटको कन्स्ट्रक्शन्सच्या एका सब-कॉन्ट्रॅक्टरकडून व्ही. के. एंटरप्रायजेस नावाच्या एका लहानशा कंपनीला ५० लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत. ही कंपनी कागदावर फक्त एक रद्दी साठवण्याचं काम करते, पण त्यांच्या खात्यावर इतकी मोठी रक्कम येण्याचं कारण काय ? "
"तन्या, ' व्ही. के.' ? खन्ना सरांचं नाव विजय खन्ना आहे." साक्षीने शॉक बसल्यासारखं विचारलं.
" कदाचित, पण इतकं सोपं नसतं साक्षू. खन्ना इतके मूर्ख नाहीत की स्वतःच्या इनिशियल्सने कंपनी काढतील. पण आपण जर या कंपनीचा मूळ पत्ता आणि त्याचा संचालक शोधला, तर आपण खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचू शकतो," तन्मयने ठामपणे सांगितलं.
" बँकिंग मध्ये याला लेअरिंग म्हणतात.पैसा इतक्या वेगाने फिरवायचा की मूळ स्रोत सापडू नये. पण त्यांना हे माहीत नाही की, मी पैशांच्या प्रवासावरून माणसाची नियत ओळखणारा ऑफिसर आहे."
तन्मयच्या या तांत्रिक पुराव्यांनी आता एक गोष्ट स्पष्ट केली होती की, हा कट फक्त एका रात्रीत रचला गेला नव्हता, तर हे एक महिनाभर चाललेलं नियोजन होतं.
स्कायलाईनच्या इमारतीचे आकडे आता एका मोठ्या घोटाळ्याची कहाणी सांगत होते. तन्मयने ठरवलं होतं की, तो अमेय जहागीरदारला तो मनी ट्रेल दाखवेल, ज्याने त्याच्या डोळ्यांवरचा विश्वासाचा पडदा कायमचा उडेल.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा