डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ३३
तन्मयने आता आपलं पूर्ण लक्ष मिस्टर खन्नांच्या आर्थिक साम्राज्यावर केंद्रित केलं होतं. त्याला हे माहीत होतं की खन्नांसारखा धूर्त माणूस लाचेचे पैसे स्वतःच्या किंवा पत्नीच्या नावे असलेल्या खात्यांवर कधीच घेणार नाही. अशा व्यवहारांमध्ये मनी लाँड्रिंगचे असे मार्ग शोधले जातात जे वरवर पाहता अत्यंत कायदेशीर वाटतील.
तन्मयने ओरियन ग्रुपच्या अंतर्गत कागदपत्रांचा आणि सार्वजनिक उपलब्ध असलेल्या कॉर्पोरेट डेटाचा उपसा केला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर, त्याच्या तीक्ष्ण नजरेला एक विसंगती सापडली.
" साक्षी, इकडे ये आणि हे नीट बघ ! " तन्मयने लॅपटॉपवर एका विशिष्ट कंपनीचं प्रोफाइल उघडलं. कंपनीचं नाव होतं. रुद्रा इव्हेंट सोल्यूशन्स.
" हे काय आहे तन्या ? " साक्षीने गोंधळून विचारलं.
" ही तीच लिंक आहे साक्षू , जिच्या मागे खन्ना लपले होते. ही कंपनी खन्नांच्या मेहुण्याच्या नावे नोंदणीकृत आहे. कागदावर ही कंपनी छोटे-मोठे इव्हेंट्स मॅनेज करते, पण धक्कादायक बाब म्हणजे,
स्कायलाईनचा डेटा लीक होण्याच्या बरोबर तीन दिवस आधी, या कंपनीला निटको कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने पाच कोटी रुपयांचं एक मोठं 'मार्केटिंग कंत्राट' देण्यात आलं होतं.
एका अशा कंपनीला पाच कोटींचं काम मिळतं जिचा वार्षिक टर्न ओव्हर सध्या पाच लाखांच्या वर नाही... हे संशयास्पद नाही का ? " तन्मयच्या आवाजात एक प्रकारचा विजय होता.
साक्षीला आता सर्व धागेदोरे सुस्पष्ट दिसू लागले. तन्मयने स्पष्ट केलं,
" बँकिंग भाषेत याला किकबॅक्स किंवा राऊंड ट्रिपिंगचा एक प्रकार म्हणतात. खन्नांनी निटकोकडून थेट लाच घेतली नाही, तर आपल्या नातेवाईकाच्या व्यवसायाला कंत्राट मिळवून देऊन तो पैसा कायदेशीर करून घेतला.
या व्यवहाराची तारीख आणि तुझा डेटा लीक झाल्याची तारीख यांचा ताळमेळ तंतोतंत बसतोय. यालाच म्हणतात मनी ट्रेल पैसा कितीही फिरवला तरी तो आपल्या मूळ मालकाचा पत्ता सांगूनच जातो. "
तन्मयने आतापर्यंत गोळा केलेले सर्व पुरावे एका शिस्तबद्ध प्रेझेंटेशनमध्ये एकत्र केले. यात केवळ बँकिंग ट्रान्झॅक्शन्स नव्हते, तर निखिलने शोधून काढलेले डिजिटल फूटप्रिंट्स , खन्नांचे निटकोच्या अधिकाऱ्यांसोबत झालेले फोन कॉल्स (जे तन्मयने एका विश्वसनीय स्त्रोताकडून मिळवले होते) आणि सीसीटीव्ही फुटेजमधील वेळेची तफावत यांचा समावेश होता.
हे सर्व पुरावे मिळून खन्नांच्या विरोधात एक लोखंडी साखळी तयार झाली होती.
" आता काय करायचं तन्या ? आपण हे सर्व घेऊन आत्ताच पोलिसात जायचं का ? सायबर सेलला रिपोर्ट करूया का ? " साक्षीने घाईघाईने विचारलं. तिला आता लवकरात लवकर स्वतःवरील हा कलंक धुवून काढायचा होता.
तन्मयच्या ओठांवर एक उपरोधिक आणि धारदार हसू उमटलं.
" नाही साक्षू ! पोलिसात जाऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल, पण मला त्यापेक्षाही महत्त्वाचं काहीतरी साध्य करायचं आहे. आपल्याला अमेय जहागीरदारला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं आहे.
ज्या माणसाने पुराव्यांच्या आधारावर तुझ्या निष्ठेवर संशय घेतला, ज्याने एका मिनिटाचाही विचार न करता तुला कचऱ्या सारखं बाहेर फेकलं, त्याला त्याची चूक पुराव्या निशीच पटवून द्यायची आहे. मला त्याचा तो अहंकार आणि परफेक्शनचा मुखवटा उतरवायचा आहे."
तन्मयचा मास्टरस्ट्रोक आता पूर्णपणे तयार झाला होता. त्याने आपली लेदर बॅग, लॅपटॉप आणि फाईल्स नीट आवरल्या.
" तयार राहा साक्षू . उद्या सकाळी आपण थेट 'ओरियन टॉवर्स'मध्ये जाणार आहोत. पण यावेळी आपण एक लाचार आरोपी म्हणून नाही, तर सत्य आणि न्यायाचे ऑडिटर्स म्हणून तिथे पाऊल ठेवणार आहोत. उद्याचा दिवस तुझा स्वाभिमान परत मिळवण्याचा आहे आणि त्या अमेय जहागीरदारला जमिनीवर आणण्याचा आहे."
तन्मयच्या त्या शांत पण निश्चयी स्वभावातून एक वेगळीच शक्ती बाहेर पडत होती. त्याने आपल्या बँकिंग कौशल्याने आणि जिद्दीने एका मोठ्या कॉर्पोरेट कारस्थानाचा पर्दा फाश करण्याची पूर्ण तयारी केली होती.
नर्मदा सदनच्या त्या साध्या खोलीतून आता अमेयच्या काचेच्या महालाला तडे देण्याची योजना आखली गेली होती.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा