Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ३६

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ३६
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग ३६

तन्मयने आता आपला तपासाचा मोर्चा साक्षीच्या आरोपां कडून वळवून थेट अमेय जहागीरदारच्या वैयक्तिक आर्थिक साम्राज्याकडे वळवला.

जन-आस्था बँकेत काम करताना तन्मयने अनेक मोठ्या उद्योजकांच्या पतनाचा प्रवास जवळून पाहिला होता. त्याला ठाऊक होतं की,

अमेयसारखा माणूस जो सतत परफेक्शन आणि मोठ्या उड्डाणांच्या गप्पा मारतो, तो अनेकदा स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात आगीशी खेळत असतो. तन्मयने अमेयच्या वैयक्तिक मालमत्तेचे आणि स्कायलाईनसाठी घेतलेल्या कर्जांचे तपशील खणून काढायला सुरुवात केली.

तपासाअंती तन्मयसमोर जे सत्य आलं, ते पाहून त्याचेही डोळे विस्फारले.

" साक्षी, इकडे बघ... अमेय जहागीरदारने स्कायलाईनसाठी फक्त कंपनीचा पैसा वापरलेला नाहीये. त्याने आपली पुण्यातील पिढीजात मालमत्ता, राहता जहागीरदार व्हिला आणि त्याचे सर्व वैयक्तिक शेअर्स गहाण ठेवून एका प्रायव्हेट बँकेकडून अवाढव्य कर्ज घेतलं आहे."

तन्मयने लॅपटॉपवर कर्जाचे दस्तऐवज दाखवत सांगितलं. साक्षीला धक्का बसला. तिला वाटलं होतं की अमेय हे सर्व सहजपणे पेलत आहे. तन्मय पुढे म्हणाला,

" याचा अर्थ असा आहे की, जर स्कायलाईन प्रोजेक्ट एका महिन्याने जरी लांबणीवर पडला किंवा गुंतवणूकदारांनी आपला हात मागे घेतला, तर अमेय जहागीरदार रस्त्यावर येणार आहे.

खन्ना आणि निटकोचा खरा प्लॅन आता स्पष्ट झालाय. त्यांना फक्त डेटा चोरी करायची नव्हती, तर त्यांना तुझं निमित्त करून अमेयचं लक्ष विचलित करायचं होतं. तू बाहेर पडल्यामुळे प्रकल्पाचं आर्थिक नियोजन कोलमडलं आहे. अमेय आता संतापात आणि तणावात चुकीचे निर्णय घेईल, ज्यामुळे प्रोजेक्टचं काम रखडेल.

आणि नेमकं याच संधीची वाट पाहून त्याचे कर्जदार त्याच्या मालमत्तेवर टाच आणतील. खन्ना अमेयला दिवाळखोर बनवून त्याचं साम्राज्य निटकोच्या मालकाच्या घशात घालण्यासाठी आतून दरवाजे उघडून बसले आहेत."

साक्षीच्या अंगावर काटा आला. तिला त्या माणसाची काळजी वाटू लागली ज्याने तिला भर पावसात घराबाहेर काढलं होतं.

" तन्या, आपण अमेय सरांना हे सगळं आत्ताच सांगायला हवं. त्यांना खूप मोठा धोका आहे. खन्ना सर त्यांच्या अगदी जवळ आहेत, ते कधीही काहीही करू शकतात." साक्षी अत्यंत काळजीने म्हणाली.

तन्मयने शांतपणे खुर्चीत मागे झुकत गिटारच्या एका तुटलेल्या तारेकडे पाहिलं.

" सांगणार आहोत साक्षू, पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं. अमेय जहागीरदार हा अशा प्रकारचा माणूस आहे ज्याला जोपर्यंत त्याचा 'इगो' त्याचा अहंकार ठेचला जात नाही, तोपर्यंत समोरचं सत्य दिसत नाही. सध्या त्याला वाटतंय की त्याने तुला बाहेर काढून आणि तुझ्यावर गुन्हा दाखल करून कंपनी वाचवली आहे.

पण प्रत्यक्षात त्याने रक्षक असलेल्या तुला बाहेर काढून खऱ्या शत्रूला आपल्या केबिनच्या बाहेर बसवून ठेवलंय. त्याला वाटतंय की त्याचे पुरावे बरोबर आहेत, पण त्याला हे माहीत नाही की डिजिटल पुरावे हे आरशा सारखे असतात, त्यांना हवं तसं फिरवता येतं."

तन्मयच्या आवाजात आता एक धारदार आत्मविश्वास होता.

" अमेयला ज्या कॉर्पोरेट लॉजिकचा आणि त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रचंड अभिमान आहे, त्याला आता हे सिद्ध करून देण्याची वेळ आली आहे की, बँकिंग लॉजिक आणि जमिनीवरचे आकडे कितीतरी जास्त प्रभावी असतात. तो आकड्यांचा मालक असेल, पण मी आकड्यांचा शिकारी आहे."

तन्मयने सर्व गोळा केलेले पुरावे. हे खन्नांच्या शेल कंपन्यांचे दस्तऐवज, निटकोशी झालेल्या व्यवहारांचे मनी ट्रेल, निखिलने शोधलेले डिजिटल फूटप्रिंट्स आणि अमेयच्या विनाशाचा हा पूर्ण नकाशा.एका सुरक्षित पेनड्राइव्हमध्ये कॉपी केले. त्याने खन्नांच्या त्या रुद्रा इव्हेंट कंपनीशी असलेल्या गुप्त संबंधांचे मूळ कागदपत्रेही आपल्या बॅगेत नीट लावून घेतले.

हा तपास आता एका अशा टप्प्यावर आला होता जिथे अमेयचा अहंकार आणि खन्नांचे कारस्थान या दोघांचाही अंत एकाच वेळी होणार होता. तन्मयने आपली फाईल बंद केली.

" साक्षी, उद्या सकाळी जेव्हा आपण ओरियन टॉवर्सच्या लिफ्ट मधून वर जाऊ, तेव्हा तू मान खाली घालून नाही, तर ताठ मानेने जाणार आहेस. उद्या अमेय जहागीरदारला कळेल की त्याने ज्या मुलीला मिडल क्लास म्हणून हिणवलं होतं, तिच्याच मिडल क्लास मित्राने त्याचं जग उद्धवस्त होण्यापासून वाचवलं आहे."

तन्मयच्या शांत पण प्रखर डोळ्यांत आता उद्याच्या युद्धाची तयारी स्पष्ट दिसत होती. नर्मदा सदनच्या त्या साध्या खोलीतून निघालेला हा बँकर आता पुण्याच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट वादळाला शांत करण्यासाठी सज्ज झाला होता.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही