Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ३८

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ३८
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग ३८

नर्मदा सदन मधील तन्मयची ती छोटी खोली आता एखाद्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालया सारखी दिसत होती. भिंतीवर लावलेले तक्ते आणि लॅपटॉपवर उघडलेले जटील पिव्होट टेबल्स एका मोठ्या आर्थिक षडयंत्राची साक्ष देत होते.

तन्मयने आपल्या बँकिंग अनुभवाचा पूर्ण कस लावला होता. त्याला मनी ट्रेल शोधायचा होता, पण मिस्टर खन्ना हे कॉर्पोरेट जगातले अत्यंत मुरलेले आणि धूर्त खेळाडू होते.

त्यांनी निटको कन्स्ट्रक्शन्स कडून मिळणारी लाचेची रक्कम थेट आपल्या किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात कधीच घेतली नव्हती. त्यांना ठाऊक होतं की, डिजिटल जगात रक्ताच्या नात्याची खाती सर्वात आधी तपासली जातात.

तन्मयने निटकोच्या मागील सहा महिन्यांच्या खर्चाचा आणि बाह्य देयकांचा एक्स्टर्नल पेमेंटस् चा हिशोब ताळेबंद तपासला. तेव्हा त्याच्या तीक्ष्ण नजरेला एक एन्ट्री खटकली.

निटकोने अवंतिका कन्सल्टन्सी नावाच्या एका अज्ञात कंपनीला सल्लागार फी कन्सल्टन्सी फी
म्हणून ५० लाख रुपये दिले होते. एका बांधकाम प्रकल्पात अशा प्रकारच्या सल्लागार कंपन्या असणं सामान्य होतं, पण या कंपनीचं नाव तन्मयला काहीतरी सुचवत होतं.

" साक्षी, हे नाव नीट बघ... अवंतिका कन्सल्टन्सी. तुला काही आठवतंय का ? " तन्मयने विचारलं.
साक्षीने नावाचा विचार केला आणि तिचे डोळे विस्फारले.

" तन्या, खन्ना सरांच्या पत्नीचं नाव अवंतिका आहे! पण मला वाटलं नव्हतं की त्यांची स्वतःची काही कंपनी असेल. ऑफिसमध्ये कधीच याबद्दल चर्चा झाली नाही आणि ही कंपनी नेमकी कुठे आहे, हेही कोणाला माहीत नाही." साक्षीने आश्चर्याने उत्तर दिलं.

तन्मयने त्वरित आपल्या लॅपटॉपवर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या एम सी ए च्या पोर्टलवर त्या कंपनीचा अधिकृत पत्ता शोधला. जेव्हा नकाशावर तो पत्ता उमटला, तेव्हा तन्मयच्या ओठांवर एक तिरस्कार युक्त हास्य आलं. तो पत्ता पुण्याच्या एका गजबजलेल्या झोपडपट्टी भागातील एका लहानशा पत्र्याच्या खोलीचा निघाला.

पाच कोटींचा सल्ला देणारी कंपनी एका पत्र्याच्या खोलीत असूच शकत नव्हती. याचा अर्थ स्पष्ट होता.ही एक शेल कंपनी होती, जी फक्त कागदावर अस्तित्वात होती आणि तिचा एकमेव उद्देश काळा पैसा पांढरा करणं हा होता.
पण खरा धागा अजून पुढे होता. तन्मयने त्या अवंतिका कन्सल्टन्सीच्या बँक स्टेटमेंटचा मागोवा घेतला. त्या ५० लाखांपैकी एकही रुपया तिथे स्थिर राहिला नव्हता.

ती रक्कम तातडीने तीन वेगवेगळ्या लहान बँकांच्या खात्यांवर वळवण्यात आली होती. तन्मयने आपल्या बँकिंग नेटवर्कचा वापर करून त्या तीन खात्यांचे के वाय सी डॉक्युमेंट पडताळले, तेव्हा त्याला बसलेला धक्का मोठा होता.

" साक्षी, हे बघ... ही खाती कोणाची आहेत माहितीये ? हा रामू आहे, जो ओरियनमध्ये ऑफिस बॉय आहे. ही कमल मावशी आहेत, ज्या तिथे साफसफाईचं काम करतात. आणि हा तिसरा माणूस तुमचा सिक्युरिटी गार्ड आहे ! " तन्मयने कागदपत्रे टेबलावर आपटत सांगितलं.
साक्षीला काहीच कळेना.

" पण या गरीब लोकांच्या खात्यात खन्ना सर पैसे का टाकतील ? "

" कारण, खन्नांनी अतिशय हुशारीने या गरीब कर्मचाऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला होता." तन्मयने समजावून सांगितलं.

" त्यांनी ऑफिस कामासाठी किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी म्हणून या कर्मचाऱ्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आधीच घेऊन ठेवले होते. त्यांच्या नावावर खाती उघडली आणि त्या खात्यांचा ताबा स्वतःकडे ठेवला.

निटको कडून आलेला पैसा या खात्यांमध्ये फिरवून त्यांनी तो व्हाईट केला आणि अखेर तो पैसा रोखीने काढून स्वतःच्या एका खाजगी लॉकरमध्ये जमा केला. यालाच लेअरिंग म्हणतात, जेणेकरून तपासाची साखळी खन्नां पर्यंत पोहोचू नये."

तन्मयने आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा वेळ आणि तारीख यांची स्कायलाईन प्रोजेक्टच्या प्रगतीशी तुलना केली. ज्या दिवशी साक्षीच्या लॅपटॉपवरून डेटा लीक झाला, बरोबर त्याच दिवशी दुपारी निटकोच्या खात्यातून ही ५० लाखांची रक्कम हलली होती.

हाच तो स्मोकिंग गन पुरावा होता.जो हे सिद्ध करत होता की डेटा चोरी आणि पैशांचे व्यवहार एकाच षडयंत्राचे दोन भाग होते.

तन्मयने सर्व पुरावे एका साखळीत गुंफले. आता खन्नांच्या गळ्या भोवतीचा फास तयार झाला होता.

" साक्षी, खन्नांनी वाटलं होतं की ते या गरीब लोकांच्या मागे लपून वाचतील. पण त्यांना हे माहीत नव्हतं की बँकिंग सिस्टिममध्ये प्रत्येक डिजिटल पावलाचा ठसा उमटतो. आता वेळ आली आहे, अमेय जहागीरदारला हे सांगण्याची की त्याने ज्याला एकनिष्ठ मानलं, तो साप त्याच्याच खिशात बसला आहे." तन्मयच्या आवाजात आता विजयाची खात्री होती.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही