डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ४७
साक्षी जेव्हा जहागीरदार व्हिला मधून बाहेर पडून नर्मदा सदनच्या दिशेने निघाली, तेव्हा तिचं मन विचारांच्या एका विचित्र चक्रव्यूहात अडकलं होतं. रिक्षाच्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांकडे तिचं लक्ष नव्हतं. तिच्या कानात अमेयचे ते संमोहित करणारे शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते.
"बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये पद",
"कंपनीची पार्टनरशिप",
"अमाप संपत्ती " आणि
सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेयसारखा एक अत्यंत प्रभावशाली आणि रुबाबदार जोडीदार... हे केवळ स्वप्न नव्हतं, तर एका सामान्य मध्यमवर्गीय मुलीच्या कल्पने पलीकडचं अवाढव्य प्रलोभन होतं.
घरी आल्यावर तिने आपल्या त्या जुन्या खोलीत प्रवेश केला.
घरी आल्यावर तिने आपल्या त्या जुन्या खोलीत प्रवेश केला.
टेबलावर अमेयने दिलेलं ते सोन्याच्या पेंडंटचं बॉक्स उघडलं. त्यातील सोन्याची चमक त्या अंधाऱ्या खोलीतही प्रकर्षाने जाणवत होती. साक्षीने त्या पेंडंटकडे पाहत असताना तिला अमेयशी झालेली तिची पहिली भेट आठवली. त्यावेळी अमेयने एका उपरोधिक स्मित हास्यासह तिच्या मध्यमवर्गीय मूल्यांची आणि साध्या राहणीमानाची खिल्ली उडवली होती.
त्याला वाटलं होतं की हे विचार म्हणजे प्रगतीच्या वाटेतील अडथळे आहेत. पण आज नियतीचा खेळ बघा, तोच अमेय आता तिच्या त्याच मूल्यांच्या, तिच्या त्याच साधेपणाच्या प्रेमात पडला होता. तिला गद्दार ठरवून बाहेर काढणाऱ्या अमेयला आता तिच्याशिवाय आपलं साम्राज्य अपूर्ण वाटू लागलं होतं.
पण या सगळ्या चकाकीच्या मागे दडलेला अंधार साक्षीने जवळून अनुभवला होता. तिला राहून राहून आठवत होतं की, अमेयचं हे कॉर्पोरेट जग किती क्षणभंगुर आणि निष्ठुर आहे. तिथे एका संशयामुळे माणसाचा अनेक वर्षांचा इतिहास आणि निष्ठा एका क्षणात पुसली जाते.
तिथे माणसं उपयोगासाठी वापरली जातात आणि उपयोग संपला की कचऱ्या सारखी फेकली जातात. अमेयने आज तिला पद आणि प्रेम दोन्ही देऊ केलं होतं, पण उद्या जर पुन्हा एखादं संकट आलं, तर तो तिचा पाठीराखा म्हणून उभा राहील का, की पुन्हा एकदा पुराव्यांच्या नावाखाली तिला वाऱ्यावर सोडेल ?
साक्षी खोलीतून बाहेर येऊन वाड्याच्या गॅलरीत उभी राहिली. बाहेर पावसाचा ओलावा अजूनही हवेत होता. समोरच्या बाजूला तन्मय जमिनीवर बसून आपल्या जुन्या गिटारच्या तुटलेल्या तारा अत्यंत तन्मयतेने दुरुस्त करत होता.
साक्षीची चाहूल लागताच त्याने वर पाहिले आणि तिला एक अत्यंत निखळ, पारदर्शक आणि आपुलकीने भरलेलं हास्य दिलं. त्या एका हसण्यात इतका जिवंतपणा होता की, अमेयच्या जगातल्या त्या महागड्या वाईनच्या पार्ट्या, रोषणाई आणि कृत्रिम हास्य या सर्वांपेक्षा तन्मयच्या या साध्या रूपात तिला अधिक रिचनेस जाणवली.
तिला एका क्षणात लख्खपणे जाणवलं की, अमेय तिला एका मोठ्या करारा सारखी ऑफर देत आहे, पण तन्मयने तिला संकटाच्या काळात कसलीही अपेक्षा न ठेवता आधार दिला होता.
अमेयचं तिच्या बद्दलचं आकर्षण हे उन्हाच्या एका चटक्यासारखं होतं. जे वरून प्रखर आणि आकर्षक असलं तरी मनाला होरपळून टाकू शकतं. याउलट तन्मयचं प्रेम हे दुपारी मिळणाऱ्या एखाद्या वडाच्या झाडाच्या सावली सारखं होतं ,
जे अत्यंत स्थिर, शांत आणि सुरक्षित होतं.
जे अत्यंत स्थिर, शांत आणि सुरक्षित होतं.
अमेय तिला शिखरावर घेऊन जाण्याचे वचन देत होता, पण तन्मयने तिला जमिनीवर पाय ठेवून खंबीरपणे उभं राहायला शिकवलं होतं. साक्षीने पुन्हा एकदा त्या सोन्याच्या पेंडंटकडे पाहिलं आणि मग तन्मयच्या त्या साध्या गिटारकडे.
तिची ओढ आता एका अशा जगाकडे होती, जिथे किंमत वस्तूंना नाही, तर माणसांच्या विश्वासाला होती. क्षण मोहाचा तिला पुन्हा एकदा खुणावत होता, पण यावेळी साक्षीचं मन सत्याच्या आणि प्रीतीच्या उजेडात न्हाऊन निघालं होतं.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा