डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ४८
सकाळची वेळ होती. ओरियन टॉवर्सच्या त्या काचेच्या इमारतीत आजही नेहमीसारखीच धावपळ सुरू होती, पण साक्षीसाठी आजची ही भेट कोणत्याही डेडलाईनपेक्षा किंवा प्रेझेंटेशनपेक्षा अधिक महत्त्वाची होती.
ती अमेय जहागीरदारच्या केबिन समोर उभी राहिली, तेव्हा तिच्या मनात कोणताही गोंधळ नव्हता. तिने काल रात्रभर विचार केला होता आणि आता तिच्या निर्णयाला सत्याचा पाया होता.
केबिनमध्ये शिरताच अमेयने उत्साहाने तिचे स्वागत केले. त्याला वाटले होते की, काल त्याने दिलेला तो अफाट प्रस्ताव, बोर्डातील पद आणि ते सोन्याचे मौल्यवान पेंडंट कोणत्याही मुलीला भुरळ घालण्यासाठी पुरेसे आहे. त्याने अपेक्षेने तिच्याकडे पाहिले, पण साक्षीने अतिशय शांतपणे तो मखमली बॉक्स आणि अमेयने दिलेली कराराची फाईल टेबलावर परत ठेवली.
" हे काय आहे साक्षी ? तुला काही अटी मान्य नाहीत का ? " अमेयने आश्चर्याने विचारले.
" सर, अटींचा प्रश्नच नाहीये." साक्षीने अतिशय स्थिर आवाजात सुरुवात केली.
" तुम्ही माझी सर्वांसमोर माफी मागितली आणि माझी निष्ठा मान्य केली, हेच माझ्या स्वाभिमानासाठी पुरेसे आहे. त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. पण मला वाटतं, आपली वाट आता पूर्णपणे वेगळी आहे.
ओरियनला एका सक्षम फायनान्स ऑफिसरची गरज आहे आणि मी एक प्रोफेशनल म्हणून माझी जबाबदारी नक्कीच पार पाडेन, पण ते नातं केवळ कामापुरतंच मर्यादित असेल. त्यापलीकडचे तुम्ही देऊ केलेले कोणतेही वैयक्तिक नाते किंवा भागीदारी मला मान्य नाही."
अमेय चकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिला.
" साक्षी, तू नीट विचार केला आहेस का ? मी तुला जे देऊ पाहतोय, ते मिळवण्यासाठी लोकांना संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतं. तुला सत्ता मिळतेय, प्रतिष्ठा मिळतेय आणि जहागीरदार नावाचं कवच मिळतंय. हे सगळं तू नाकारतेयस ? "
साक्षीच्या ओठांवर एक प्रगल्भ हास्य उमटलं.
" सर, तुम्ही जे देताय ते नक्कीच खूप मोठं आहे, पण त्यासाठी जे साधेपण आणि जी शांतता गहाण ठेवावी लागते, त्याची किंमत देण्याची माझी आता तयारी नाही. तुमच्या या झगमगत्या जगात विश्वास हा पुराव्यांवर अवलंबून असतो. मला अशा माणसासोबत आयुष्य घालवायचं आहे, ज्याने संपूर्ण जग मला गुन्हेगार म्हणत असतानाही माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला. ज्याला माझ्या चारित्र्याचा पुरावा देण्यासाठी कोणत्याही फॉरेन्सिक रिपोर्टची गरज भासली नाही."
तिने अमेयच्या डोळ्यांत रोखून पाहिले आणि पुढे म्हणाली,
" मला अशा माणसाची साथ हवी आहे ज्याने संकटात माझा हात धरला, अशा माणसाची नाही ज्याला माझं महत्त्व सिद्ध झाल्यावर माझं प्रेम हवं आहे. तुमची ओढ ही माझ्या यशासाठी आहे, पण तन्मयचं प्रेम माझ्या अस्तित्वासाठी आहे. आणि सर, खऱ्या प्रेमात प्रपोजल्स नसतात, तर परस्परांवरचा अढळ विश्वास असतो."
अमेय जहागीरदारला आज पहिल्यांदाच जाणवलं की, त्याने केवळ एक उत्कृष्ट कर्मचारी गमावला नव्हता, तर त्याने ती अमूल्य संधी गमावली होती जी तन्मयने आपल्या निस्वार्थी मैत्रीने आणि विश्वासाने जतन केली होती.
अमेयकडे मर्सिडीज होती, महाल होता, सत्ता होती... पण त्याच्याकडे तो तन्मय नव्हता जो कोणाचं खोडरबरही चोरत नाही आणि संकटात जगा विरुद्ध उभा राहतो.
साक्षी केबिनबाहेर पडली, तेव्हा तिला हलकं वाटत होतं. अमेयच्या जगाचा तो क्षण मोहाचा आता कायमचा संपला होता. लिफ्टमधून खाली उतरताना तिने खिडकीतून बाहेर पाहिलं.
तिला आता ते आकाश खुणावत नव्हतं, तर तिला नर्मदा सदनच्या त्या साध्या गॅलरीत वाट पाहणारा तन्मय दिसत होता. तिने आपली बॅग घट्ट धरली आणि एका नवीन, खऱ्या आणि पारदर्शक आयुष्याकडे पाऊल टाकलं. अमेयच्या सत्तेच्या महालापेक्षा तिला तन्मयच्या गिटारच्या सुरांमधलं घर आता अधिक समृद्ध वाटत होतं.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा