Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ४९

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ४९
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग ४९

जन-आस्था बँकेचे कामकाज संपत आले होते. सायंकाळची वेळ होती आणि आकाशात केशरी रंगाच्या छटा पसरल्या होत्या. साक्षी बँकेच्या बाहेर असलेल्या एका जुन्या बाकावर तन्मयची वाट पाहत उभी होती.

अमेय जहागीरदारच्या त्या आलिशान आणि थंडगार केबिन मधून बाहेर पडल्यानंतर तिला आता निसर्गाचा हा मोकळा श्वास अधिक आपला वाटत होता. थोड्याच वेळात तन्मय आपली बॅग खांद्याला लटकवून, चेहऱ्यावर तोच नेहमीचा शांत भाव घेऊन बाहेर आला.

साक्षीला पाहताच त्याचे डोळे चमकले. साक्षीने पुढे होऊन काहीही न बोलता तन्मयच्या हातात आपला हात गुंफला.

दोघेही शांतपणे चालत नदीच्या काठावर गेले. नदीच्या पात्रावर मावळत्या सूर्याचे प्रतिबिंब पडले होते. तिथे एका जुन्या दगडाच्या पायरीवर बसल्यानंतर साक्षीने शांतता तोडली.

" तन्या, मी अमेय सरांचा प्रस्ताव नाकारला. त्यांची पार्टनरशिप, ते पदे आणि त्यांनी देऊ केलेलं ते झगमगतं भविष्य... मी सगळं नाकारून आले आहे."

तन्मय क्षणभर थांबला. त्याने तिच्या डोळ्यांत पाहिले.

" का साक्षू ? तुला तर ते ग्लॅमर, ती मोठी स्वप्नं आणि कॉर्पोरेट जगातील ते हाय-फाई आयुष्य खूप आवडायचं ना ?
तुला नेहमी वाटायचं की नर्मदा सदन खूप लहान आहे. मग आज इतकी मोठी संधी का नाकारलीस ? "

साक्षी हसली, पण या हसण्यात आता कोणताही उपरोध नव्हता, तर एक अगाध प्रगल्भता होती.

" आवडायचं तन्या, मला ती चकाकी नक्कीच आवडायची. पण आता मला एक गोष्ट उमजली आहे की, चकाकी फक्त डोळ्यांना सुखावते, पण शांतता मनाला सुखावते. चकाकी असेल तिथे सावली नसते, पण शांतता असेल तिथे आधार असतो."

तिने तन्मयच्या हातावर आपला हात घट्ट दाबला आणि पुढे म्हणाली,

" तन्या, जेव्हा संपूर्ण जग माझ्या विरोधात होतं, जेव्हा माझं करिअर धुळीला मिळालं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा माझ्या स्वतःच्या बुद्धीवरचा माझा विश्वास उडाला होता, तेव्हा फक्त तू माझ्या पाठीशी उभा राहिलास.

तू हे सिद्ध केलंस की संकटात जो सावली देतो, तोच आपला असतो. अमेय सरांना माझं कर्तृत्व आणि माझी बुद्धिमत्ता आवडली, पण तुला माझी मी आवडते. त्यांना माझं महत्त्व तेव्हा कळलं जेव्हा मी स्वतःला सिद्ध केलं, पण तुला माझं महत्त्व तेव्हाही माहीत होतं जेव्हा मी एक गुन्हेगार म्हणून बदनाम झाले होते. मला त्या मी ची खरी किंमत तुझ्यामुळेच कळली आहे."

तन्मयने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत कोणतेही मोठे शब्द किंवा जहागीरदार सारखी भव्य आश्वासने नव्हती, पण एक शाश्वत ओढ आणि आयुष्यभर पुरेल इतका विश्वास होता. त्याने आपल्या गिटारची एक धून हलक्या आवाजात गुणगुणली, जी नदीच्या प्रवाहावर तरंगत राहिली.

" साक्षू." तन्मय गंभीरपणे म्हणाला.

" मी तुला अमेय सारख्या मोठ्या आलिशान बंगल्यात किंवा मर्सिडीजमध्ये नेता येणार नाही. कदाचित आपलं आयुष्य मध्यम वर्गीयच राहील. पण नर्मदा सदनच्या त्या गॅलरीत, जिथे आपण चहा पिताना सूर्यास्त पाहतो, तिथे आपण जगातील सर्वात आनंदी माणसं असू, हे मी तुला नक्की सांगू शकतो. तिथली शांतता मी तुला आयुष्यभर देईन."

साक्षीने तन्मयच्या खांद्यावर डोके टेकवले. त्या संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीनं एका जुन्या बाल मैत्रीचं रूपांतर एका अथांग, अढळ आणि निस्वार्थी प्रेमात झालं होतं. ज्या मोहाच्या क्षणाने तिला वाटेवरून दूर नेण्याचा प्रयत्न केला होता, त्याच संघर्षाने तिला तिच्या खऱ्या जीवनाचा मार्ग दाखवला होता. नदीचा वारा वाहत होता आणि नर्मदा सदनच्या दिशेने जाणाऱ्या पावलांमध्ये आता एक वेगळीच स्थिरता आणि आत्मियता होती.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही