डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ४४
पोलिसांनी खन्नांना बेड्या ठोकून केबिनबाहेर नेले, तेव्हा ओरियन टॉवर्सच्या त्या आलिशान १९ व्या मजल्यावर एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली. बोर्ड मेंबर्सही अवाक होऊन आपल्या केबिनमध्ये परतले होते.
आता त्या विस्तीर्ण केबिनमध्ये फक्त तिघेच उरले होते.अमेय जहागीरदार, तन्मय आणि साक्षी. खिडकीतून दिसणारा पुण्याचा विस्तीर्ण पसारा आणि 'स्कायलाईन'चे ते भव्य स्वप्न आजही तिथेच होते, पण अमेयसाठी मात्र जग पूर्णपणे बदलले होते.
अमेय जहागीरदार, जो काही वेळापूर्वी अत्यंत दिमाखात आपल्या खुर्चीत बसून दुसऱ्यांचे नशीब ठरवत होता, तोच आज त्याच खुर्चीत पूर्णपणे कोलमडून पडला होता. त्याने आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले होते.
आयुष्यात पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या श्रीमंतीचा, त्याच्या 'हाय-सोसायटी' वर्तुळाचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या जजमेंटचा निर्णय क्षमतेचा जो प्रचंड गर्व होता, तो एका क्षणात मातीला मिळाला होता.
ज्या मध्यमवर्गीय साधे पणाला त्याने आउटडेटेड ठरवून तुच्छ लेखले होते, त्याच साधेपणाने आणि निस्वार्थी बुद्धिमत्तेने त्याला आज विनाशाच्या उंबरठ्यावरून ओढून बाहेर काढले होते.
अमेयने अत्यंत जड अंतःकरणाने आपली मान वर केली. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्यातील तो सत्तेचा माज आता पूर्णपणे ओसरला होता. त्याने समोर उभ्या असलेल्या साक्षीकडे पाहिले.
" साक्षी... मी... मला काय बोलायचं तेच कळत नाहीये. " अमेयचा आवाज कमालीचा थरथरत होता.
" मी तुला खूप वाईट बोललो. तुझा स्वाभिमान पायदळी तुडवला. तुला गद्दार ठरवून भर पावसात बाहेर काढलं. मला वाटलं होतं की मी जगातील सर्वात हुशार बिझनेसमन आहे, ज्याला माणसं आणि आकडे दोन्ही कळतात. पण आज मला समजलं की, मी जगातील सर्वात मोठा मूर्ख ठरलो आहे."
साक्षीने अमेयच्या या कबुलीकडे पाहिले. तिला अमेयचा राग येत नव्हता, तर त्याची दया येत होती. अमेयने आजवर फक्त किमती पाहिल्या होत्या, मूल्ये कधीच पाहिली नव्हती.
मग अमेयची नजर तन्मयकडे वळली. ज्या तन्मयला त्याने काही दिवसांपूर्वी नर्मदा सदनच्या दारात 'एक सामान्य बँकर' आणि कालबाह्य विचारांचा माणूस समजून अपमानित केले होते, तोच तन्मय आज अमेयच्या कोट्यवधींच्या साम्राज्याचा तारणहार बनून समोर उभा होता.
अमेयला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याने आजवर जेवढा पैसा कमावला, जेवढी प्रसिद्धी मिळवली, त्यापैकी काहीही त्याला एका विश्वासू माणसाची आणि एका खऱ्या शत्रूची पारख देऊ शकली नव्हती.
अमेयला जाणीव झाली की, त्याचा हा पराभव व्यावसायिक नव्हता.व्यावसायिकदृष्ट्या तर तो तन्मयमुळे वाचला होता. पण हा पराभव वैयक्तिक, वैचारिक आणि नैतिक होता.
क्षण मोहाचा फक्त साक्षीसाठी नव्हता, तो अमेय साठीही होता. अमेयला वाटले होते की तो पैशाने कोणाचीही निष्ठा विकत घेऊ शकतो आणि सत्तेने कोणालाही वाकवू शकतो. पण सत्याच्या एका साध्या धक्क्याने त्याचा हा भ्रमाचा भोपळा फुटला होता.
क्षण मोहाचा फक्त साक्षीसाठी नव्हता, तो अमेय साठीही होता. अमेयला वाटले होते की तो पैशाने कोणाचीही निष्ठा विकत घेऊ शकतो आणि सत्तेने कोणालाही वाकवू शकतो. पण सत्याच्या एका साध्या धक्क्याने त्याचा हा भ्रमाचा भोपळा फुटला होता.
" मिस्टर तन्मय." अमेय खुर्चीवरून उठून तन्मयच्या जवळ आला.
" तुमच्यासारखी माणसं आजच्या जगात दुर्मिळ आहेत. मी तुम्हाला कमी लेखलं, त्याबद्दल मी तुमची आणि साक्षीची माफी मागतो. साक्षी, तुला जर परत यायचं असेल, तर पूर्ण सन्मानाने तू या कंपनीची व्हाईस प्रेसिडेंट म्हणून पदभार स्वीकारू शकतेस. मला तुझ्यासारख्या निष्ठावान माणसाची गरज आहे."
तन्मयने शांतपणे अमेयच्या डोळ्यांत पाहिले.
" जहागीरदार साहेब, नोकरी आणि सन्मान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. साक्षीला तुम्ही पद देऊन तिची निष्ठा विकत घेऊ शकत नाही. तिने ही लढाई ओरियनसाठी नाही, तर तिच्या आई-वडिलांच्या संस्कारांसाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढली आहे. आणि राहिला प्रश्न माझा, तर बँकर म्हणून मी फक्त हिशोब पूर्ण केला आहे. आता साक्षीने ठरवायचं आहे की तिला कोणत्या जगात राहायचं आहे."
तन्मयचे हे शब्द अमेयच्या काळजावर घाव घालून गेले. त्याला समजले की, काही गोष्टी जहागीरदार नावाच्या शिक्क्याने किंवा पैशांच्या जोरावर कधीच मिळवता येत नाहीत. अमेय आपल्याच नजरेत पूर्णपणे हरला होता. नर्मदा सदनच्या त्या साध्या बँकरसमोर अमेय जहागीरदारचं हे मोठं कॉर्पोरेट वलय आज अत्यंत लहान आणि पोकळ भासत होतं.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा