डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ९
पुण्यातील 'ओरियन ग्रुप'च्या मुख्यालयात सकाळची वेळ म्हणजे जणू एखाद्या युद्धाची तयारी असायची. तिथे नऊ वाजले की घड्याळाच्या काट्यांसोबत लोकांच्या हालचालीही कमालीच्या वेगवान व्हायच्या.
पण खरा 'उन्माद' तेव्हा सुरू व्हायचा, जेव्हा अमेय जहागीरदारची काळी मर्सिडीज ऑफिसच्या पोर्चमध्ये येऊन थांबायची. अमेय जेव्हा गाडीतून उतरून, कोटची बटणं लावत थेट प्रायव्हेट लिफ्टकडे जायचा, तेव्हा संपूर्ण मजल्यावर एक प्रकारची विद्युत लहर पसरल्यासारखी हालचाल व्हायची.
अमेयची कामाची पद्धत अत्यंत टोकदार आणि शिस्तबद्ध होती. त्याच्या शब्दकोशात 'चूक' किंवा 'बघूया' या शब्दांना थाराच नव्हता.
साक्षीने आपल्या नवीन केबिनमध्ये बसून अमेयच्या प्रत्येक कृतीचं बारीक निरीक्षण करायला सुरुवात केली होती. तिला आता जाणवू लागलं होतं की, अमेय हा केवळ एक कंपनीचा मालक नव्हता, तर तो एक प्रचंड मोठा 'व्हिजनरी' होता.
जेव्हा तो बोर्ड रूममध्ये प्रेझेंटेशन द्यायला उभा राहायचा, तेव्हा समोर बसलेले मोठ्या कंपन्यांचे वयाने मोठे असलेले सीईओदेखील मंत्रमुग्ध होऊन त्याला ऐकायचे. त्याची शब्दांची फेक, त्याच्या आवाजातील कमालीचा आत्मविश्वास आणि क्लिष्ट तांत्रिक विषयांवरील त्याची जबरदस्त पकड पाहून साक्षीला त्याचं प्रचंड आकर्षण वाटू लागलं. तिने आजवर पाहिलेल्या जगापेक्षा हे जग कितीतरी पटीने शक्तिशाली आणि प्रभावशाली होतं.
एके दिवशी दुपारी अमेयने साक्षीला काही महत्त्वाच्या फाईल्स घेऊन त्याच्या केबिनमध्ये बोलावलं. ती आत गेली तेव्हा अमेय युरोपमधील एका मोठ्या इन्व्हेस्टर ग्रुपशी कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करत होता.
अमेय इतक्या सफाईदारपणे आणि अस्खलितपणे इंग्रजीसोबतच काही फ्रेंच शब्दांचा वापर करत होता की साक्षी अक्षरशः भारावून गेली. तो केवळ बिझनेस करत नव्हता, तर तो समोरच्याला आपल्या विचारांच्या जाळ्यात ओढत होता.
कॉल संपल्यावर अमेयने खुर्चीत मागे रेलून घेतलं आणि समोर उभ्या असलेल्या साक्षीकडे रोखून पाहिलं.
" साक्षी, तुला माहितीये या जगात सर्वात महागडी गोष्ट काय आहे ? " अमेयने अतिशय शांत स्वरात विचारलं.
साक्षी थोडी गोंधळली. तिने विचार करून उत्तर दिलं,
" पैसा ? किंवा कदाचित दुर्मिळ हिरे ? "
अमेयच्या ओठांवर एक उपरोधिक हसू उमटलं.
अमेयच्या ओठांवर एक उपरोधिक हसू उमटलं.
" नाही... या जगात सर्वात महागडी आणि दुर्मिळ गोष्ट म्हणजे 'परफेक्शन'. लोकांना वाटतं की मी खूप कडक आहे, मी लोकांशी निष्ठुरपणे वागतो. पण मी फक्त परिपूर्णतेचा आग्रह धरतो. लक्षात ठेव, जर तुझं काम ९९% बरोबर असेल, तर माझ्यासाठी ते १००% चुकीचं आहे. कारण त्या उरलेल्या १ टक्क्यामुळे अख्खा डोलारा कोसळू शकतो."
अमेयचे हे विचार साक्षीला थक्क करून गेले. आजवर 'नर्मदा सदन'मध्ये तिला हेच शिकवलं होतं की,
" मनापासून प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं."
पण अमेयने तिला एका क्षणात एक नवीन धडा दिला होता की,
" प्रयत्नांना किंमत नसते, फक्त रिझल्ट महत्त्वाचा असतो."
अमेयच्या त्या आलिशान केबिनमध्ये, तिथल्या त्या महागड्या अत्तराच्या सुगंधात आणि त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वात साक्षीला एक वेगळंच ग्लॅमर जाणवू लागलं. तिला वाटलं, हेच ते खरं जग आहे जिथे आपल्याला पोहोचायचं आहे. इथे फक्त बुद्धिमत्ता नाही, तर पॉवर आणि स्टेटस सुद्धा आहे.
त्या रात्री जेव्हा ती घरी परतली, तेव्हा तन्मय नेहमीप्रमाणे आपल्या बँकेतील एका साध्या रिकव्हरी केसबद्दल सांगत होता. तन्मयचं ते बँकिंगचं साधं जग, त्यातली ती छोटी छोटी माणसं आणि त्यांच्या साध्या समस्या आता साक्षीला थोड्या 'आऊटडेटेड' आणि कंटाळवाण्या वाटू लागल्या होत्या.
तिला अमेयच्या त्या 'हाय-प्रोफाईल' जगाचा उन्माद चढू लागला होता. अमेयची ती 'मॅजिक' तिच्या मध्यमवर्गीय मूल्यांना हळूहळू पुसून टाकत होती आणि तिला एका अशा स्वप्नवत प्रवासाला घेऊन जात होती, जिथे तिला फक्त यश आणि परफेक्शन दिसत होतं.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा