डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ११
पुढच्याच आठवड्यात ओरियन ग्रुपच्या एका महत्त्वाच्या प्रकल्पाला जागतिक मान्यता मिळाली होती. या यशाचा जल्लोष करण्यासाठी अमेय जहागीरदारने त्याच्या राहत्या घरी, म्हणजेच 'जहागीरदार व्हिला' मध्ये एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते.
ही केवळ पार्टी नव्हती, तर अमेयच्या सत्तेचं आणि प्रतिष्ठेचं प्रदर्शन होतं. अमेयने स्वतः साक्षीला आपल्या केबिनमध्ये बोलावून खास आमंत्रण दिले.
" साक्षी, तू या प्रोजेक्टचा कणा आहेस. या पार्टीत तुला यायलाच हवं. तिथे तुला कॉर्पोरेट विश्वातील अनेक मोठे लोक भेटतील, जे तुझ्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील." अमेयचे हे शब्द साक्षीसाठी कोणत्याही सन्मानापेक्षा मोठे होते.
साक्षी जेव्हा घरी आली, तेव्हा तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. आजवर तिने अशा पार्ट्या फक्त सिनेमात पाहिल्या होत्या. तिने आपल्या कपाटातून तिची सर्वात आवडती आणि छानशी मोराच्या डिझाईन केलेली मानाची जाणारी 'पैठणी' साडी काढली. एलेगंट आणि तितकच क्लासी.
तिला वाटलं की, अमेयच्या त्या उच्चभ्रू जगात आपली ही पारंपरिक साडी तिला एक वेगळी ओळख मिळवून देईल. ती आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळत होती, दागिन्यांची निवड करत होती.
तन्मयने तिला गॅलरीतून तयार होताना पाहिलं. साक्षी त्या पैठणीत खरोखरच सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यांतील तो 'मोह' तन्मयला अस्वस्थ करत होता. त्याने आपली गिटार बाजूला ठेवली आणि खोलीत येऊन दाद दिली,
" वा ! साक्षू, आज एकदम राजघराण्यातली राणी वाटतेयस. खूप छान दिसतेयस. लघवी दिसतेस."
"हो रे तन्या, आज अमेय सरांच्या घरी खूप मोठी पार्टी आहे. पुण्याचे सर्व मोठे लोक तिथे येणार आहेत. मला नीट राहिलं पाहिजे ना, नाहीतर तिथे कोणालाच माझं अस्तित्व जाणवणार नाही,"
साक्षीने कानातले डुल नीट करत म्हटलं.
तन्मयच्या चेहऱ्यावर एक क्षणिक अस्वस्थता आली. तो जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला,
तन्मयच्या चेहऱ्यावर एक क्षणिक अस्वस्थता आली. तो जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला,
" साक्षी, तू जशी आहेस, तशीच सर्वात छान वाटतेस. उगाच तिथे कोणाला इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःला हरवू नकोस. ती माणसं वेगळी आहेत, त्यांचं जग पूर्णपणे वेगळं आहे. तिथे फक्त बाह्य रूपाला किंमत असते, गुणांना नाही."
साक्षीने हातातील लिपस्टिक टेबलावर आदळली आणि चिडून वळून पाहिलं.
" तू नेहमी असंच नकारात्मक का बोलतोस तन्या ? तुला माझ्या प्रगतीचं, माझ्या आनंदाचं कौतुक नाहीये का ? तुला वाटतं का की मी आयुष्यभर याच वाड्यात आणि याच साध्या आयुष्यात खितपत पडावं? मला मोठं व्हायचंय, आणि अमेय सर मला ती संधी देत आहेत ! "
तन्मय शांत झाला. त्याला कळाले होते की आता त्याचे शब्द साक्षी पर्यंत पोहोचणार नाहीत. त्याने तिला वाड्याच्या गेट पर्यंत सोडले. टॅक्सी आली आणि साक्षी त्यात बसली. तिने एकदाही मागे वळून तन्मयकडे किंवा आपल्या 'नर्मदा सदन'कडे पाहिले नाही.
तिच्या डोळ्यांसमोर फक्त अमेयचा तो आलिशान व्हिला आणि तिथलं झगमगतं जग होतं. टॅक्सी जशी जशी पुढे जात होती, तशी तशी साक्षी आपल्या मुळांपासून, आपल्या संस्कृतीपासून आणि आपल्या सर्वात जवळच्या मित्रापासून लांब जात होती.
'नर्मदा सदन'ची ती जुनी भिंत आणि तन्मयची ती साधी गिटार आता तिला तिच्या आयुष्यातील सर्वात लहान गोष्टी वाटू लागल्या होत्या. मोहाचा हा प्रवास आता तिला एका अशा वळणावर घेऊन जाणार होता, जिथे परतीचा रस्ता शोधणे कठीण होणार होते.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा