डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग १३
'जहागीरदार व्हिला'मधील पार्टी आता रंगात आली होती. हॉलमधील उंची झुंबरांचा प्रकाश तिथल्या चकचकीत फरशीवर परावर्तित होऊन डोळे दिपवत होता. अमेयचे आई-वडीलही तिथे उपस्थित होते. त्यांचे वागणे, बोलणे आणि चालणे अत्यंत शिस्तबद्ध आणि औपचारिक होते. अमेयच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा तो श्रीमंतीचा रुबाब आणि आईच्या देहबोलीतील तो 'हाय-सोसायटी'चा वावर पाहून साक्षीला स्वतःच्या अस्तित्वाची उणीव भासू लागली.
ती एका कोपऱ्यात ज्यूसचा ग्लास घेऊन मुकाट्याने उभी होती. तिला आज पहिल्यांदाच स्वतःच्या हातातील त्या सोन्याच्या बांगड्यांचा आवाजही खटकू लागला होता. ती हालचाल करतानाही जपून वागत होती, जणू तिच्या साधेपणाचा आवाज कोणाच्या तरी शांत आणि पॉश जगात व्यत्यय आणत होता.
तिला आठवले, जेव्हा ती तयार होऊन घराबाहेर पडत होती, तेव्हा तन्मय तिला म्हणाला होता,
" साक्षू, तू तुझ्या या साधेपणात सर्वात सुंदर आणि राणीसारखी दिसतेस."
पण आज त्या आलिशान हॉलमध्ये तिला ते 'सौंदर्य' एक ओझं वाटू लागलं होतं. तिला जाणवलं की, तिचं हे मध्यमवर्गीय रूप या जगासाठी केवळ एक कुतूहल किंवा चेष्टेचा विषय आहे.
तिने दुरूनच पाहिले की अमेय, त्याची बहीण ईशा आणि त्यांच्या मित्रांसोबत मोठ्याने हसून काहीतरी गप्पा मारत आहे. तो तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. ऑफिसमध्ये
" साक्षी, तू माझ्या टीमचा कणा आहेस. "
असं म्हणणारा अमेय या पार्टीत मात्र तिला साधी ओळखही देत नव्हता. तिथे ती त्याची 'फायनान्स स्टार' नव्हती, तर केवळ एक 'कर्मचारी' होती, जिला तिच्या 'उपयुक्तते'मुळे तिथे बोलावण्यात आलं होतं. हॉलमधील त्या महागड्या इटालियन सोफ्यावर बसतानाही तिला भीती वाटत होती की, आपल्या साडीचा पदर कुठे अडकेल का किंवा कशाचा डाग लागेल का ? ती स्वतःच्याच कोषात आकुंचन पावली होती.
रात्री उशिरा जेव्हा ती पार्टीतून बाहेर पडली आणि टॅक्सीत बसली, तेव्हा तिच्या डोळ्यांत साचलेल्या अश्रूंचा बांध फुटला. अमेयच्या त्या ग्लॅमरस जगाचा तिला प्रचंड मोह होता, पण त्या जगाने तिला दिलेल्या वागणुकीमुळे तिचं मन आतून सोलवटून निघालं होतं.
तिला स्वतःच्या मध्यमवर्गीय मूल्यांची टोचणी वाटू लागली. तिला वाटलं की, तिचं राहणीमान, तिची भाषा आणि तिची आवड या सर्व गोष्टी अमेयच्या जगाशी जुळत नाहीत. जर तिला अमेयच्या जवळ जायचे असेल, अमेयच्या बरोबरीने उभे राहायचे असेल, तर तिला हे 'साधेपण' आणि जुन्या जगाचे संस्कार सोडून द्यावे लागतील.
ती जेव्हा 'नर्मदा सदन'मध्ये पोहोचली, तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. गॅलरीत तन्मय खुर्चीवर बसुन झोपला होता. त्याच्या कुशीत अजूनही तीच जुनी गिटार होती. कदाचित तिची वाट पाहत पाहत त्याला तिथेच डोळा लागला होता. साक्षीने क्षणभर त्याच्याकडे पाहिले.
चांदण्याच्या प्रकाशात तन्मयचा तो निरागस आणि शांत चेहरा पाहून तिला वाटले की, हेच तिचे खरे आणि सुरक्षित जग आहे. इथे तिला कोणाला इम्प्रेस करण्याची गरज नव्हती.
पण दुसऱ्याच क्षणी, ईशाचे ते उपरोधिक हसणे आणि अमेयचा तो
" हरकत नाही, साडी ट्रॅडिशनल आहे."
हा थंड स्वर तिच्या कानात घुमला. एका बाजूला तन्मयची स्थिर प्रीती होती आणि दुसऱ्या बाजूला अमेयच्या जगाचे आव्हानात्मक आकर्षण.
" मी बदलणार. मला त्यांच्यासारखं बनायचंय. मला असं आयुष्य नकोय जिथे लोक माझ्यावर हसतील." तिने स्वतःशीच एक कठोर निश्चय केला.
तिने तन्मयला उठवले नाही आणि त्याच्या जवळ न जाता गपचूप आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री 'नर्मदा सदन'च्या भिंतींमध्ये शांतता होती, पण साक्षीच्या मनात एका नव्या महत्त्वाकांक्षेने आणि मोहाने घर केले होते. तिने नकळतपणे त्या रेशीमगाठींना तडा द्यायला सुरुवात केली होती, ज्या तिला तिच्या मुळांशी बांधून ठेवत होत्या.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा