डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग १८
'नर्मदा सदन'मधील त्या जुन्या लाकडी खिडक्यांमधून आता संध्याकाळची सावली अधिकच गडद जाणवू लागली होती. तन्मयने नेहमीप्रमाणे गॅलरीत आपली जागा पकडली होती, पण आज त्याच्या हातात गिटार नव्हती. त्याचं पूर्ण लक्ष समोरच्या रस्त्यावर आणि हातातील मोबाईलकडे होतं. साक्षीचा ऑफिस सुटण्याचा वेळ होऊन आता दोन तास उलटले होते, पण तिचा अद्याप कोणताही पत्ता नव्हता.
साक्षीचा जास्तीत जास्त वेळ आता अमेय जहागीरदारच्या आलिशान केबिनमध्ये किंवा त्याच्या पांढऱ्या मर्सिडीजमध्ये 'बिझनेस ट्रिप्स' आणि 'साईट्स व्हिजिट्स'च्या नावाखाली जाऊ लागला होता. तन्मय तिला रोज संध्याकाळी काळजीपोटी फोन करायचा, पण साक्षी आता त्याचे फोन 'बिझी' असल्याचं सांगून किंवा ते सरळ कापून टाळू लागली होती.
कधी कधी तर ती फोन उचलतही नसे आणि दोन-तीन तासांनंतर एक साधा, कोरडा 'सॉरी, मीटिंगमध्ये होते' असा मेसेज टाकून मोकळी व्हायची. एकेकाळी फोनवर तासनतास गप्पा मारणाऱ्या या जोडीमध्ये आता डिजिटल भिंती उभ्या राहिल्या होत्या.
रात्रीचे दहा वाजले आणि वाड्याच्या गेटपाशी अमेयच्या गाडीचा आवाज आला. साक्षी गाडीतून उतरली आणि वर आली. तिच्या चेहऱ्यावर कामाचा थकवा नव्हता, तर अमेयच्या सहवासात मिळालेली एक वेगळीच कैफियत होती. तिने गॅलरीत बसलेल्या तन्मयकडे एक कटाक्ष टाकला आणि ती आत जाऊ लागली.
" साक्षू , किमान एक फोन तरी उचलत जा ग. घरचे काळजी करतात." तन्मयने अत्यंत शांत पण दुखावलेल्या स्वरात म्हटलं.
साक्षीने हातातील लॅपटॉप बॅग सोफ्यावर ठेवली आणि ती वळली.
" तन्या, प्लिज ! तू रोज तेच तेच बोलून मला वैताग आणतोस. अमेय सरांनी आज मला एका अत्यंत महत्त्वाच्या इंटरनॅशनल क्लायंटशी थेट बोलण्याची संधी दिली. तुला माहितीये, त्यांचं व्हिजन किती मोठं आहे?
ते किती माणसांना पारखून घेतात ? आपण विनाकारण त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. ते कडक आहेत, पण ते माझ्या भविष्याचा विचार करत आहेत." साक्षी उत्साहात आणि अमेयच्या प्रभावाखाली सांगत होती.
तन्मयने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे आता अमेयने दाखवलेल्या स्वप्नांच्या चकाकीने दिपले होते. त्याला मात्र अमेयच्या या अचानक बदललेल्या वागण्या मागचा हेतू अत्यंत संशयास्पद वाटत होता.
" साक्षी, मला तुझे यश नकोय असं नाही. पण अमेय जहागीरदार तुला कामाच्या नावाखाली हळूहळू स्वतःच्या प्रभावाखाली घेतोय, असं तुला खरंच वाटत नाही का ?
तो तुला तुझ्या माणसांपासून, तुझ्या मुळांपासून तोडतोय. हा कामाचा व्याप आहे की तुला गुंतवून ठेवण्याचं राजकारण ? " तन्मयने विचारलं.
तो तुला तुझ्या माणसांपासून, तुझ्या मुळांपासून तोडतोय. हा कामाचा व्याप आहे की तुला गुंतवून ठेवण्याचं राजकारण ? " तन्मयने विचारलं.
साक्षीचा चेहरा रागाने लाल झाला. तिला अमेयच्या विरोधात एक शब्दही आता सहन होत नव्हता.
" तुला माहितीये तुझं प्रॉब्लेम काय आहे तन्या ? तू स्वतः एका साध्या बँकेत आयुष्य काढलंयस, त्यामुळे तुला इतक्या मोठ्या यशाची भीती वाटतेय. तू नेहमीच इतका 'नेगेटिव्ह' का असतोस ? की तुला माझ्या प्रगतीचा मत्सर वाटतोय ? तुला कदाचित हे सहन होत नाहीये की मी तुझ्यापेक्षा जास्त वेगाने पुढे जातेय."
साक्षीचे हे बोचरे शब्द वाड्याच्या शांततेत एखाद्या शस्त्रासारखे घुसले.
तन्मय सुन्न झाला. ज्या साक्षीसाठी त्याने स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवल्या होत्या, ती आज त्याच्या काळजीला 'मत्सर' म्हणत होती. त्यांच्यातल्या संवादाची जागा आता एका भीषण मौनाने घेतली होती.
साक्षी आपल्या रूममध्ये निघून गेली आणि तन्मयने आपला फोन 'सायलेन्स मोड'वर टाकला. त्याला जाणवलं की, फक्त फोनच नाही, तर त्यांचं नातंही आता 'सायलेन्स मोड'वर गेलं आहे.
त्या रात्री 'नर्मदा सदन'च्या टेरेसवर बसून तन्मयने विचार केला—आता शब्दांनी काहीच होणार नाही.
त्या रात्री 'नर्मदा सदन'च्या टेरेसवर बसून तन्मयने विचार केला—आता शब्दांनी काहीच होणार नाही.
जर साक्षीला वाचवायचं असेल, तर अमेय जहागीरदारचा मुखवटा उतरवणं गरजेचं होतं. त्याच्या बँकरमधील तपासकाचा मेंदू आता काम करू लागला होता. ओरियन ग्रुपच्या त्या चकाकत्या आकड्यांमागे काहीतरी काळं-बेरं नक्कीच दडलं होतं, आणि तन्मयने ते शोधून काढायचं ठरवलं.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा