Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग १९

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग १९
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग १९

साक्षीचा वाढदिवस म्हणजे 'नर्मदा सदन'मध्ये दरवर्षी एक छोटासा उत्सव असायचा. तन्मय तिच्यासाठी तिच्या आवडत्या मोगऱ्याचा गजरा आणि एखादं छानसं पुस्तक घेऊन यायचा. पण या वर्षीचा वाढदिवस पूर्णपणे वेगळा होता.

ऑफिसमध्ये अमेयने तिच्यासाठी एक छोटेखानी पण अत्यंत क्लासी सेलिब्रेशन आयोजित केलं होतं. संध्याकाळी अमेयने तिला त्याच्या केबिनमध्ये बोलावले आणि तिच्यासमोर एक गडद निळ्या रंगाचा, मखमली पेटीतील बॉक्स ठेवला.
साक्षीने तो बॉक्स उघडला आणि तिचे डोळे विस्फारले. आत सोन्याच्या मण्यांनी जडलेलं एक अतिशय महागडं 'डिझायनर स्विस घड्याळ' चमकत होतं.

" सर, हे... हे मी नाही घेऊ शकत. हे खूप महागडं आहे." साक्षीने अडखळत नकार दिला.

अमेयने खुर्चीत पुढे झुकत, तिच्या डोळ्यांत डोळे घालून अतिशय कुशलतेने आणि मृदू आवाजात म्हटलं,

" साक्षी, हे फक्त एक घड्याळ नाहीये. हे तुझ्या आयुष्यातील त्या वेळेची निशाणी आहे, जो आता पूर्णपणे बदलणार आहे. तू आता सामान्य राहिली नाहीस, तू ओरियनचा चेहरा आहेस. माझ्या खास माणसाला साध्या गोष्टी शोभत नाहीत. याला भेट समजू नकोस, हे तुझ्या कष्टाचं फळ आहे."

अमेयचे हे शब्द एखाद्या जादूच्या मंत्रा सारखे तिच्या मनावर गारुड करून गेले. तिने ते घड्याळ हातात बांधलं आणि त्या क्षणी तिला वाटलं की तिचं संपूर्ण जगच बदललं आहे.

साक्षी आता पूर्णपणे बदलली होती. तिचे मध्यमवर्गीय संस्कार आणि साधेपणा आता एका आधुनिक मुखवट्या खाली दडपले गेले होते. तिची साधी सुती साडी आणि घरगुती पेहराव आता इतिहास जमा झाला होता. त्याजागी आता चकाकते कॉर्पोरेट सुट्स, हाय-हील्स आणि महागड्या ब्रँडेड परफ्युम्सचा उग्र सुगंध आला होता.

तिचं चालणं आता अधिक ताठ झालं होतं, बोलण्यात एक प्रकारची कृत्रिम व्यावसायिकता आली होती आणि तिचे विचार अमेयच्या तालमी नुसार फक्त नफा आणि स्टेटस याभोवती फिरू लागले होते.

तिला आता 'नर्मदा सदन'च्या त्या जुन्या, शेवाळलेल्या भिंती गुदमरल्या सारख्या वाटू लागल्या होत्या. वाड्याच्या बाहेरची ती अरुंद आणि गजबजलेली गल्ली तिला आता 'घाणेरडी' आणि 'गावंढळ' वाटू लागली. ज्या गिटारच्या सुरांनी कधीकाळी तिचं मन शांत व्हायचं, तन्मयने वाजवलेली तीच धून आता तिला नॉईजी वाटू लागली. तिला वाटायचं की तन्मय अजूनही त्याच जुन्या कोळशात अडकला आहे, तर ती मात्र हिऱ्याच्या खाणीत पोहोचली आहे.

एके दिवशी तन्मयने तिचा मूड ठीक करण्यासाठी तिला तिच्या कॉलेजच्या दिवसातल्या आवडत्या साध्या हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी नेण्याचं ठरवलं.

" साक्षू, चल आज जुन्या आठवणींना पुन्हा जिवंत पणा देऊया." तन्मय उत्साहाने म्हणाला.

पण साक्षीने स्वतःच्या हातातील त्या महागड्या घड्याळाकडे पाहिले आणि नाक मुरडलं.

" तन्या, प्लिज ! मला त्या गर्दीच्या आणि अस्वच्छ जागी आता नाही यायचं. आणि आज अमेय सरांसोबत माझं एका मोठ्या हॉटेलमध्ये बिझनेस डिनर आहे. तिथे खूप मोठे इन्व्हेस्टर्स येणार आहेत, मी हे मिस नाही करू शकत. " तिने अत्यंत कोरड्या स्वरात त्याला नकार दिला.

तन्मय तिथेच स्तब्ध उभा राहिला. ज्या साक्षीचा हात पकडून तो लहानाचा मोठा झाला होता, जिच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात तो सावली सारखा उभा होता, ती आज त्याच्या हातांतून वाळूसारखी निसटत चालली होती.

तिला अमेयच्या जगाचा इतका जबरदस्त मोह झाला होता की, तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नात्यांची किंमत कळेनाशी झाली होती. 'क्षण मोहाचा' आता तिच्या संपूर्ण आयुष्याचा 'काळ' बनू पाहत होता आणि तन्मय हताशपणे हे सर्व बदलताना पाहत होता.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही