Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग २०

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग २०
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग २०

पुण्याच्या रात्रीचा झगमगाट ओरियन टॉवर्सच्या काचेच्या भिंतींतून एखाद्या स्वप्नवत जगासारखा दिसत होता. रात्रीचे अकरा वाजत आले होते आणि संपूर्ण ऑफिसमध्ये फक्त अमेय जहागीरदारच्या केबिनचा लाईट सुरू होता. एका अत्यंत मोठ्या परदेशी कंपनी सोबतच्या मर्जर डीलचे शेवटचे कागदपत्र तयार करण्यासाठी अमेय आणि साक्षी तिथे थांबले होते.

एसीच्या मंद आवाजात फक्त लॅपटॉपच्या बटणांचा आवाज येत होता. अमेयने फाईल बंद केली आणि तो खुर्चीवरून उठून साक्षीच्या जवळ येऊन उभा राहिला. केबिनमध्ये अमेयच्या महागड्या परफ्यूम आणि कॉफीचा उग्र सुगंध भरून राहिला होता.

" एक्सीलेंट वर्क साक्षी ! तुझ्याशिवाय हे स्कायलाईन प्रोजेक्ट पूर्ण होणं अशक्य होतं."

अमेयने तिचा आत्मविश्वास वाढवत म्हटलं. त्याने हळूच आपला हात साक्षीच्या हातावर ठेवला. साक्षी क्षणभर दचकली, पण अमेयच्या नजरेतील तो संमोहित करणारा आत्मविश्वास पाहून ती शांत झाली.

" साक्षी, तुला माहितीये ? तू ओरियनची आता फक्त एक एम्प्लॉयी उरली नाहीस. तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट झाली आहेस. मला तुझ्या डोळ्यांत ते व्हिजन दिसतंय जे माझ्याकडे आहे. मला तुझ्यासोबत मिळून हे ओरियनचं साम्राज्य संपूर्ण जगात उभं करायचं आहे. आपण एकमेकांसाठी बनलो आहोत असं तुला नाही वाटत ? "

अमेयचे ते शब्द आणि त्याची जवळीक साक्षीच्या मनातील राहिलेला साहिलेला विवेकही पुसून टाकत होती. तिला वाटत होतं की, आयुष्यातला हा सर्वात मोठा हाय-पॉइंट आहे.

नेमक्या त्याच वेळी साक्षीच्या फोनची स्क्रीन चमकली. तन्मयचा फोन येत होता. निवांत रात्रीच्या शांततेत तो व्हायब्रेशनचा आवाज अमेयला खटकला. अमेयने त्या फोनकडे अत्यंत तुच्छतेने पाहिले आणि एक उपरोधिक हास्य करत म्हटलं,

" परत तोच ? साक्षी, त्या एका साध्या, मध्यमवर्गीय बँकरला तुझी ही नवीन उड्डाण आणि तुझी ही भरारी कधीच समजणार नाही. तू आता एका अशा उंचीवर आहेस जिथे खालच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. तुझा विकास व्हायचा असेल, तुला खऱ्या अर्थाने जहागीरदार घराण्याच्या लायकीचं बनायचं असेल, तर तुला या जुन्या, गंजलेल्या गोष्टी आणि जुनी नाती मागे सोडावीच लागतील. गरुडाला आकाशात झेपावण्यासाठी घरट्याचा मोह सोडावा लागतो."

साक्षीने फोनकडे पाहिले. स्क्रीनवर तन्मयचं नाव चमकत होतं, ज्याने तिला आयुष्यातील प्रत्येक वळणावर सावरलं होतं. पण अमेयच्या शब्दांची धुंदी एवढी चढली होती की, तिला तन्मयची ती काळजी आता बंधन वाटू लागली. तिने फोन उचलला नाही. तिने तन्मयला ब्लॉक केलं नाही, पण त्याच्या अस्तित्वाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं. तिने फोन उलटा करून ठेवला, जणू काही तिने आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्यायच कायमचा मिटवून टाकला होता.

तिला वाटलं की अमेय हाच तिचा खरा मार्गदर्शक आहे, तोच तिला या साध्या आणि सामान्य आयुष्यातून बाहेर काढून एका जादुई जगात घेऊन जाईल. तिने अमेयच्या नजरेला नजर भिडवली आणि त्या क्षणी 'क्षण मोहाचा' पूर्णत्वास आला.

साक्षीने अमेयच्या त्या ग्लॅमरस, चकाकत्या पण पोकळ जगासाठी आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान मैत्रीची, नर्मदा सदनच्या मूल्यांची आणि तन्मयच्या निखळ प्रीतीची तिलांजली दिली होती.
त्या रात्री नर्मदा सदनच्या त्या जुन्या गॅलरीत फक्त अंधार होता. तन्मयने गिटार बाजूला ठेवून दिली होती.

त्याच्या हातात आता साक्षीचा फोन नव्हता, तर ओरियन ग्रुपच्या काही गुप्त फाईल्स होत्या, ज्या त्याने आपल्या बँकिंग सोर्सेस कडून मिळवल्या होत्या. तन्मयला आता फक्त दूरूनच तिला हरवताना पाहायचं नव्हतं; त्याला माहित होतं की, ज्या जहागीरदारच्या मोहात साक्षी अडकली आहे, तो रस्ता विनाशाकडे जातो.

साक्षीने जरी नात्याची तार तोडली असली, तरी तन्मयने तिला या संकटातून बाहेर काढण्याचं आपलं व्रत सोडलं नव्हतं. पण त्या रात्रीच्या त्या अंधारात, एका सुखी नात्याचा अंत झाला होता आणि एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली होती.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही