Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग २४

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग २४
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग २४

ओरियन ग्रुपच्या एकोणीसाव्या मजल्यावर असलेल्या मेन कॉन्फरन्स रूममध्ये आज एक भयानक अशी स्मशान शांतता पसरली होती. बाहेर पुण्याच्या शहराचा गडबडाट सुरू होता, पण या काचेच्या भिंतींच्या आड एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

कॉन्फरन्स रूममधील मोठ्या प्रोजेक्टर स्क्रीनवर साक्षीच्या लॅपटॉपचा डेस्कटॉप झळकत होता. आयटी एक्सपर्ट्सची एक टीम वेगाने की-बोर्डवर बोटं फिरवत होती. अमेय जहागीरदार आपल्या खुर्चीत ताठ बसला होता, त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि हाताच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या.

मिस्टर खन्ना एका कोपऱ्यात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक कृत्रिम काळजी आणि खोटं दुःख होतं, पण मनात मात्र विजयाचा उन्माद होता. त्यांनी रचलेलं चक्रव्यूह आता पूर्णपणे कार्यान्वित झालं होतं.

" सर, हे पाहा ! " आयटी हेडने स्क्रीनवर एक फोल्डर उघडलं आणि सेंट मेल्स या सेक्शनवर क्लिक केलं.

" डिजिटल फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, गेल्या मंगळवारी रात्री बरोबर ११:४५ वाजता, जेव्हा ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती शून्य होती आणि
फक्त साक्षी मॅडम त्यांच्या केबिनमध्ये होत्या, तेव्हा स्कायलाईनचे सर्व गोपनीय फायनान्शिअल मॉडेल्स आणि इन्व्हेस्टर डेटा एका खाजगी जीमेल आयडीवर फॉरवर्ड करण्यात आले आहेत. आणि धक्कादायक म्हणजे, तो ईमेल आयडी निटको कन्स्ट्रक्शन्सच्या एका सिनियर मॅनेजरचा आहे."

साक्षीने स्क्रीनवरचे ते आकडे आणि तो मेल आयडी पाहिला. तिचं डोकं गरगरायला लागलं, पायाखालची जमीन जणू सरकली होती.
११:४५ वाजता ?
त्या दिवशी ती खरंच ऑफिसमध्ये होती, अमेयने दिलेल्या एका कम्पलिकेटेड रिपोर्टवर ती काम करत होती. पण तिने असा कोणताही ईमेल कोणालाही पाठवला नव्हता.

" सर, हे... हे शक्यच नाही ! मी शपथ घेऊन सांगते, मी त्या दिवशी फक्त तुमचा रिपोर्ट फायनल करत होते. मी कोणताही ईमेल कोणालाही पाठवला नाहीये. हे बघा, हा ईमेल आयडी माझा आहे, पण हे मेल्स मी केलेले नाहीत !
कोणीतरी माझा लॅपटॉप हॅक केला असावा किंवा माझा पासवर्ड चोरला असावा." ती ओरडून सांगत होती, पण तिचा आवाज भीतीने आणि निराशेने थरथरत होता.

अमेय खुर्चीवरून उठला आणि सावकाश चालत साक्षीच्या जवळ आला. त्याच्या नजरेत इतका थंडपणा होता की साक्षीला दरदरून घाम फुटला. अमेय उपरोधिकपणे हसला.

" पासवर्ड चोरला ? साक्षी, ओरियनची सिस्टिम इतकी कच्ची नाहीये. तुझे बायोमेट्रिक लॉग्स आणि सर्व्हरचे आयपी ॲड्रेस स्पष्ट सांगतात की, त्या वेळी तूच तुझ्या सिस्टिमवर ॲक्टिव्ह होतीस. तुझ्याच फिंगरप्रिंटने लॅपटॉप अनलॅक झाला होता. आणि ज्या कॅफेमध्ये तू खन्ना सरांना दिसली होतीस,

तिथले सीसीटीव्ही फुटेज आम्ही लीगली मागवले आहेत. खन्ना सर चुकीचे असू शकतात, पण हे डिजिटल पुरावे खोटे बोलत नाहीत. तू तुझ्या मध्यमवर्गीय गरजा पूर्ण करण्यासाठी आणि श्रीमंतीच्या मोहापायी आम्हाला... मला विकलंस साक्षी ss ! "

साक्षीला शब्द सुचत नव्हते. ज्या अमेयने तिला परफेक्शनचा धडा दिला होता, ज्या अमेयच्या कौतुकासाठी तिने तन्मयसारख्या मित्राला दुखावलं होतं, तोच आज तिला विश्वासघातकी आणि गुन्हेगार ठरवत होता. तिने खन्नांकडे पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते क्रूर हसू तिला आता स्पष्ट दिसत होतं.

तिला जाणीव झाली की ती एका अशा चक्रव्यूहात अडकली आहे, जिथे प्रत्येक तांत्रिक पुरावा तिच्या विरोधात उभा केला गेला होता.

" सर, प्लीज... एकदा तन्मयशी बोला, तो बँकेत आहे, त्याला यातलं तंत्रज्ञान कळतं. तो सांगू शकेल की हे कसं शक्य आहे." साक्षीने हताश होऊन तन्मयचं नाव घेतलं.

अमेयने तिरस्काराने तिची केबिनमधील बॅग तिच्यासमोर भिरकावली.

" तन्मय ? तोच बँकर ना, ज्याने माझ्या घरात येऊन मला अक्कल शिकवली होती ? कदाचित त्यानेच तुला हे सुचवलं असेल. नर्मदा सदनच्या त्या गल्लीतल्या संस्कारांचा मला आज प्रत्यय आला. तू आत्ताच्या आत्ता हे ऑफिस सोडायचं. तुझे सर्व एक्सेस कार्ड्स जप्त केले जात आहेत. उद्या पोलीस तुला घरी येऊन विचारणा करतील. गेट आऊट ! "

साक्षी रडतच तिथून बाहेर पडली. तिचं जग उद्ध्वस्त झालं होतं. लिफ्टमधून खाली येताना तिला आरशात स्वतःचं रूप दिसलं—हातात तेच महागडं घड्याळ होतं जे अमेयने दिलं होतं, पण आता त्या घड्याळाची टिक-टिक तिला एखाद्या बॉम्बसारखी वाटत होती.

मोहाच्या शिखरावरून ती आता सरळ जमिनीवर आपटली होती. ज्या जगाला तिने आपलं मानलं होतं, त्या जगाने एका क्षणात तिला कचऱ्यासारखं बाहेर फेकलं होतं. नर्मदा सदनकडे जाणारा रस्ता आता तिला खूप लांब वाटत होता, आणि त्या रस्त्यावर तिची वाट पाहणारा तन्मय हाच तिचा शेवटचा आधार होता, ज्याचा तिने काही दिवसांपूर्वीच अपमान केला होता.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही