डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग २६
रात्रीचे दहा वाजून गेले होते. आज सदाशिव पेठेतील रस्ते पावसाच्या धारेने उजळून निघाले होते, पण साक्षीच्या आयुष्यात मात्र काळोख दाटला होता. ती भर पावसात पूर्ण भिजलेली होती.
तिचे डोळे रडून रडून सुजले होते आणि पावसामुळे चेहऱ्यावर ओघळणारे पाणी, हे अश्रू आहेत की पावसाचे थेंब, हे ओळखणंही कठीण झालं होतं. काही तासांपूर्वी ती पुण्याच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट साम्राज्याची फाईनॅन्शिअल स्टार होती, आणि आता ती रस्त्यावरची एक सामान्य मुलगी होती, जिच्यावर चोर आणि विश्वास घातकी असल्याचा शिक्का मारला गेला होता.
तिला कुठे जायचं, कोणाला भेटायचं, काहीच सुचत नव्हतं. तिला वाटलं की अमेय जहागीरदारच्या जगाने तिला नाकारलं आहे, तर कदाचित नर्मदा सदनची माणसंही तिला स्वीकारणार नाहीत.
पण तिचे पाय आपोआप त्या दिशेने वळले, ज्या वास्तूतून तिने काही दिवसांपूर्वी रागाने आणि अहंकाराने पाठ फिरवली होती. ज्या जगाला तिने जुने ,संकुचित आणि कालबाह्य ठरवलं होतं, आज त्याच जगाचा तिला एकमेव आधार वाटत होता.
ती वाड्याच्या त्या जुन्या लाकडी कमानी जवळ पोहोचली. तिथे अंधारात उभं राहून ती वरच्या गॅलरीकडे पाहत होती. आता देखील तिथे तन्मय उभा होता.
कदाचित तो आजही तिचीच वाट पाहत होता. तन्मयने अंधारात पावसात भिजलेली ती आकृती पाहिली आणि तिचे ते विस्कटलेले रूप पाहून त्याचा काळजाचा ठोका चुकला. त्याने हातातली गिटार तिथेच खुर्चीवर टाकली आणि तो धावतच पायऱ्या उतरून खाली आला.
" साक्षी ! साक्षू .. अगं, हे काय झालंय तुला ? तू अशी पूर्ण भिजलेली... आणि तुझे डोळे ? "
तन्मयने जवळ येऊन तिला सावरलं. तिला थंडीने कापरं भरलं होतं. त्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या अंगावरच उबदार जॅकेट काढल आणि तिच्या थरथरणाऱ्या खांद्यावर टाकल.
साक्षीने तन्मयच्या डोळ्यांत पाहिले. त्या नजरेत कोणताही राग नव्हता, उपहास नव्हता की ,
" मी तुला आधीच सांगितलं होतं."
असा कोणताही भाव नव्हता. तिथे होतं ते फक्त निखळ प्रेम आणि काळजी. साक्षीला स्वतःच्या कृत्याचा इतका पश्चात्ताप झाला की , ती तन्मयच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली.
" तन्या... माझं सगळं संपलं रे ! मी काहीच केलं नाहीये, तरीही त्यांनी मला ऑफिसमधून कचऱ्यासारखं बाहेर काढलं. अमेय सरांनी माझ्यावर डेटा चोरीचा आरोप केलाय. माझं करिअर, माझं नाव... सगळं मातीत मिळालं. मी आता काय करू ? "
तन्मयने तिला आईच्या मायेने सावरलं आणि हळूच तिची पाठ थोपटली.
" साक्षी, शांत हो. आधी तू रडणं थांबव. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तुझं काहीच संपणार नाही."
त्याने तिला आई सारखं, माय माऊली सारखं सावरत आत नेलं. त्याने तिला गरम पाणी दिलं, तिचे डोके पुसण्यासाठी टॉवेल दिला आणि तिला स्थिर व्हायला वेळ दिला.
साक्षीने हुंदके देत अमेयचा तो निष्ठुर अवतार, खन्नांचे ते विषारी शब्द आणि लॅपटॉप मधील त्या बनावट पुराव्यांची सर्व हकीगत सांगितली.
अमेयचा अविश्वास तिला आता सुरीसारखा टोचत होता. तन्मयने तिचे एक एक शब्द शांतपणे ऐकले. त्याचे डोळे आता गंभीर झाले होते आणि कपाळावर एक आठी आली होती. त्याचा तो खोडकर तन्या आता मागे पडला होता आणि एका शार्प, तर्क संगत विचार करणारा बँकरचा चेहरा समोर आला होता.
" साक्षी , अमेय जहागीरदारला वाटत असेल की , तो पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर कोणालाही उद्ध्वस्त करू शकतो. पण त्याला हे माहीत नाही की, कॉर्पोरेट जगाच्या पलीकडेही एक सत्य असतं." तन्मयने अत्यंत ठाम स्वरात सांगितलं.
" तो अमेय बुद्धिवान असेल, पण तो आंधळा झाला आहे. मी तुला लहानपणापासून ओळखतो, तू कोणाचं मन दुखवू शकत नाहीस, तर कंपनीशी प्रतारणा करणं लांबची गोष्ट आहे."
साक्षीने तन्मयकडे आश्चर्याने पाहिलं. ज्याला ती काही दिवसांपूर्वी फक्त पासबुक प्रिंट करणारा साधा बँकर म्हणून हिणवलं होतं, जो तिला आता आउटडेटेड वाटू लागला होता, तोच माणूस आज तिच्यासाठी जगाच्या विरुद्ध ढाल बनून उभा होता. तन्मयने कोपऱ्यात ठेवलेली आपली खास डायरी काढली आणि पेन हातात घेतलं.
" साक्षी , तू जर निर्दोष आहेस, तर तुला न्याय मिळवून देणं ही आता माझी जबाबदारी आहे. आपण रडून चालणार नाही, आपल्याला पुराव्यांनी लढावं लागेल. अमेय जहागीरदारने तुला स्कायलाईनमधून बाहेर काढलं असेल, पण आता त्याला या स्कायलाईन मागचा खरा धोका मी दाखवून देईन."
तन्मयचे शब्द आता केवळ सांत्वन नव्हते, तर ते युद्धाचं रणशिंग होतं. गिटारचे सूर आज शांत झाले होते, कारण तन्मयच्या मेंदूत आता बँकिंगच्या कम्पलिकेटेड आकड्यांचं आणि फॉरेन्सिक ऑडिटचं चक्र सुरू झालं होतं. स्कायलाईनचा खरा लढा आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता, पण यावेळी हा लढा अमेयच्या सत्तेसाठी नव्हता, तर साक्षीच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या हरवलेल्या सन्मानासाठी होता.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा