Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग २८

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग २८
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग २८

कालच्या पावसाने नर्मदा सदनच्या भिंती भिजल्या होत्या, पण आजची सकाळ त्यापेक्षाही अधिक थंड आणि भयाण होती. सकाळी नऊच्या सुमारास वाड्याच्या दारात एका कुरिअर बॉयने बेल वाजवली. साक्षीने थरथरत्या हाताने ते पाकीट स्वीकारलं.

त्यावर ओरियन ग्रुपचा तोच राजेशाही लोगो होता, जो काही दिवसांपूर्वी तिच्यासाठी अभिमानाचं प्रतीक होता, पण आज तो एखाद्या धोक्याच्या इशाऱ्या सारखा वाटत होता.

तिने पाकीट उघडलं. आत दोन कागद होते. पहिला कागद होता तिचं अधिकृत टर्मिनेशन लेटर नोकरीवरून काढून टाकल्याचे पत्र. ज्यावर तिचे सर्व अधिकार तातडीने रद्द केल्याचं लिहिलं होतं. पण त्याहीपेक्षा भयानक होता दुसरा कागद.ती पोलीस तक्रारीची एक प्रत होती.

अमेय जहागीरदारने केवळ तिला कामावरून काढून समाधान मानलं नव्हतं, तर तो आता कायदेशीर कारवाई करून तिचं भविष्य, तिचं नाव आणि तिची प्रतिष्ठा कायमची मातीत मिळवण्याच्या तयारीत होता.

पत्रातील तांत्रिक आणि कोरडी भाषा साक्षीच्या काळजात सुरी सारखी खुपत होती:

" तुमच्या अनैतिक कृत्यामुळे आणि गोपनीय माहितीच्या चोरीमुळे ओरियन ग्रुपचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आला असून, जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही पुणे शहराबाहेर जाऊ शकत नाही. तुमच्या पासपोर्टवर आणि बँक खात्यांवर निर्बंध लादण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे."

हे वाचल्यावर साक्षीच्या पायाखालची उरली-सुरली जमीनही सरकली. तिला जाणवलं की अमेय तिला केवळ शिक्षा देऊ इच्छित नव्हता, तर तो तिचं अस्तित्वच पुसून टाकायला निघाला होता.

ज्या हातांनी तिला यशाच्या शिखरावर चढवलं होतं, तेच हात आता तिला पाताळात ढकलत होते. तरीही, मनात कुठेतरी एक वेडी आशा होती की अमेयला कदाचित चुकीची माहिती दिली गेली असावी, त्याला एकदा भेटलं किंवा बोललं की सर्व गैरसमज दूर होतील.

तिने आपला फोन उचलला आणि अमेयला शेवटचा एक मेसेज केला. तिचे हात थरथरत होते, डोळ्यांतून पाणी टपकत होतं. तिने लिहिलं ,

" अमेय सर, मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करत आहे, मी असं काहीच केलं नाहीये. मी ओरियनशी कधीच गद्दारी करू शकत नाही. मी कोणालाही माहिती दिलेली नाही, हा माझ्याविरोधात रचलेला मोठा कट आहे. प्लिज, माणुसकीच्या नात्याने माझं एकदा शेवटचं म्हणणं ऐकून घ्या. मला एकदा भेटण्याची संधी द्या."

मेसेज पाठवल्यानंतर ती श्वास रोखून उत्तराची वाट पाहू लागली. तिला वाटलं अमेय कदाचित तिला बोलावून घेईल. पाच मिनिटांनी फोनची रिंग वाजली. रिप्लाय आला होता. तिने घाईघाईने मेसेज उघडला, पण त्यातील शब्द वाचून तिचं हृदयच जणू थांबलं.

अमेयने लिहिलं होतं ,

" पुरावे बोलतात, भावना नाही. माझ्या जगात फक्त परफेक्शन आणि निष्ठेला जागा आहे, गद्दारीला नाही. पुन्हा माझ्याशी किंवा माझ्या ऑफिसमधील कोणाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यावर होणारी कारवाई ही फक्त सुरुवात आहे. गुडबाय."

अमेयच्या या शेवटच्या आणि अत्यंत निष्ठुर उत्तराने साक्षीला एका भीषण सत्याची जाणीव करून दिली. अमेय जहागीरदारच्या त्या चकाकत्या कॉर्पोरेट जगात माणसाला कधीच किंमत नव्हती, तिथे फक्त त्याच्या उपयोगाला किंमत होती.

जोपर्यंत ती अमेयच्या साम्राज्यासाठी फायदेशीर होती, तोपर्यंत ती त्याच्यासाठी 'स्पेशल' होती. तिचा उपयोग संपला आणि तिची गरज संपली, की तिला कचऱ्यासारखं बाहेर फेकलं गेलं होतं.

अमेयसाठी ती एक व्यक्ती नव्हती, तर एक गुंतवणूक होती, जी आता बुडीत निघाली होती.
साक्षीने फोन बेडवर फेकून दिला आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतलं.

तिला वाटलं की आता आयुष्यात काहीच उरलं नाहीये. पोलीस, चौकशी, बदनामी आणि अमेयचा हा टोकाचा तिरस्कार...
हे सर्व सहन करण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती. ती उशीत तोंड खुपसून जोरात रडू लागली. तिने ज्या जगाचा मोह धरला होता, त्याच जगाने तिला आज इतकं एकटं पाडलं होतं की तिला स्वतःच्या मरणाचीही भीती वाटेनाशी झाली होती.

पण त्याच वेळी बाहेरच्या खोलीत तन्मय शांतपणे ते पत्राचे कागद वाचत होता. त्याच्या डोळ्यांत अमेयबद्दल राग नव्हता, तर एक प्रकारची घृणा होती.

" अमेय जहागीरदार, तू पुराव्यांच्या गोष्टी करतोयस ना ? तर मग आता तुला पुरावेच उत्तर देतील." तन्मय स्वतःशीच पुटपुटला. त्याने आपल्या लॅपटॉपवर काही की-बोर्ड वर बटणवर बोटं नाचवली. एका जुन्या आयटी एक्सपर्ट मित्राला फोन लावला.

साक्षीला वाटत होतं की सर्व संपलंय , पण तन्मयला माहित होतं की युद्धाचा हा केवळ पहिला टप्पा आहे. ज्या मोहाच्या जगात साक्षी अडकली होती, तिथून तिला बाहेर काढण्यासाठी तन्मयने आता आपला मास्टर प्लॅन अंमलात आणायला सुरुवात केली होती.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही