डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ३७: युद्धाची शेवटची तयारी
नर्मदा सदनच्या त्या जुन्या वास्तूवर आजची पहाट एका वेगळ्याच निश्चयाने उजाडली होती. खिडकीच्या फटीतून येणारं कोवळं ऊन खोलीतील त्या विखुरलेल्या फाईल्स आणि लॅपटॉपवर पडत होतं. तन्मय आज पहाटेपासूनच कामाला लागला होता. त्याने आपला नेहमीचा कॅज्युअल टी-शर्ट आणि जीन्स कपाटात ठेवून दिली होती.
त्याऐवजी, त्याने आपला कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट बाहेर काढला. टायची गाठ बांधताना आरशात पाहणारा तो तरुण आज तन्या नव्हता. तो होता जन-आस्था बँकेचा एक करारी, तत्त्वनिष्ठ आणि हिशोबात चोख असलेला ऑफिसर. त्याच्या डोळ्यांत एक प्रकारची शांत पण भेदक चमक होती.
बाहेरच्या खोलीत साक्षी तयार होऊन बसली होती. तिने आज अमेयने दिलेल्या त्या महागड्या, पश्चिमी धाटणीच्या कॉर्पोरेट सुट्सना स्पर्शही केला नव्हता. त्याऐवजी तिने नर्मदा सदनच्या संस्कृतीला साजेसा , एक साधा पण सुबक सुती कॉटनचा ड्रेस घातला होता. तिने साधेपणाने केस बांधले होते, पण तिच्या चेहऱ्यावर आज कमालीचा आत्मविश्वास होता.
अमेयने तिला ज्या साधेपणावरून हिणवलं होतं, तोच साधेपणा आज तिचं सर्वात मोठं शस्त्र बनणार होतं. तिच्या डोळ्यांतील ती भीती आणि अगतिकपणा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता, त्या जागी आता सत्याची एक धारदार तलवार तळपत होती.
" तयार आहेस ? " तन्मयने आपली लॅपटॉप बॅग खांद्याला लावत विचारलं.
साक्षीने दीर्घ श्वास घेतला आणि खुर्चीवरून उठली.
" हो तन्या, मी पूर्णपणे तयार आहे. पण..." ती क्षणभर थांबली आणि तन्मयच्या डोळ्यांत डोळे घालून हळूच विचारू लागली,
" तुला खरंच भीती नाही वाटत ? अमेय जहागीरदार हा केवळ एक बिझनेसमन नाहीये, तो पुण्यातला सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली माणूस आहे. त्याच्या एका शब्दावर पोलीस यंत्रणा हलू शकते. आपण एका अशा वादळाच्या समोर उभं राहायला निघालो आहोत, ज्याने कित्येकांची साम्राज्यं उद्ध्वस्त केली आहेत."
तन्मयच्या ओठांवर तेच चिरपरिचित पण आज अधिक आश्वासक वाटणारं मिश्किल हसू उमटलं. त्याने आपल्या बॅगेतील पुराव्यांच्या फाईल्स एकदा नीट तपासल्या आणि म्हणाला,
" साक्षी, एक बँकर कधीच समोरच्याच्या सत्तेला किंवा त्याच्या बँक बॅलन्सला घाबरत नाही. त्याला जर कशाची भीती वाटत असेल, तर ती फक्त एका गोष्टीची चुकीच्या एन्ट्रीची जोपर्यंत हिशोब बरोबर आहे, तोपर्यंत बँकर कोणासमोरही मान झुकवत नाही. आणि आज माझ्याकडे मिस्टर खन्नांच्या आयुष्यातील आणि अमेय जहागीरदारच्या हिशोबातील सर्वात मोठी रॉन्ग एन्ट्री पुराव्यानिशी तयार आहे.
आज अमेय जहागीरदारला हे कळेल की, गिटारच्या तारांवर फिरणारी ही बोटं जेव्हा कॅल्क्युलेटरवर चालतात आणि फॉरेन्सिक ऑडिट करू लागतात, तेव्हा मोठ्या मोठ्या साम्राज्यांचे हिशोबही चुकू शकतात."
तन्मयचा हा शब्दबद्ध आत्मविश्वास साक्षीसाठी एखाद्या पोलादी कवचा सारखा ठरला. दोघेही वाड्यातून बाहेर पडले आणि ओरियन टॉवर्सच्या दिशेने निघाले. बाईक वर बसल्यावर तन्मयने पुन्हा एकदा आपल्या बॅगेतील त्या पेनड्राइव्हला स्पर्श करून पाहिला. त्या इवल्याशा चिपमध्ये खन्नांच्या गद्दारीचा कच्चाचिठ्ठा, निटकोसोबत झालेल्या गुप्त करारांचे मनी ट्रेल्स आणि अमेयच्या विनाशाचा पूर्ण आराखडा दडलेला होता.
हे युद्ध आता केवळ एका नोकरीचं किंवा डेटा चोरीच्या आरोपाचं उरलं नव्हतं. हे युद्ध आता स्वाभिमानाचं होतं, नर्मदा सदनच्या मूल्यांचं होतं आणि एका निखळ विश्वासाचं होतं. अमेय जहागीरदारला त्याच्या अहंकाराची किंमत मोजावी लागणार होती, तर खन्नांना त्यांच्या नीच कृत्याचं फळ मिळणार होतं.
स्कायलाईन प्रकल्पाला विनाशापासून वाचवण्यासाठी आणि साक्षीच्या चरित्रावर लागलेला तो कलंक पुसण्यासाठी तन्मयने आखलेला मास्टरस्ट्रोक आता त्याच्या निर्णायक वळणावर येऊन ठेपला होता.
जेव्हा त्याची बाईक ओरियन टॉवर्सच्या त्या अवाढव्य काचेच्या इमारतीसमोर थांबली, तेव्हा साक्षीने मान वर करून त्या भव्यतेकडे पाहिलं. कालपर्यंत ही इमारत तिला तिचं स्वप्न वाटत होती, आज ही इमारत तिला एक रणांगण वाटत होती. तन्मयने तिचा हात धरला आणि धीर दिला,
" घाबरू नकोस साक्षू. आज आपण आरोपी म्हणून नाही, तर सत्य म्हणून या इमारतीत पाऊल ठेवणार आहोत. चल ! "
ओरियन टॉवर्सच्या लिफ्टमध्ये शिरताना तन्मयच्या चेहऱ्यावरील शांतता एका वादळाची चाहूल देत होती, जे थोड्याच वेळात अमेय जहागीरदारच्या केबिनमध्ये धडकणार होतं आणि तिथलं संपूर्ण सत्ता समीकरण बदलून टाकणार होतं.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा