डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ३९
रात्रीचे दोन वाजले होते. नर्मदा सदनच्या त्या छोट्याशा खोलीत लॅपटॉपच्या स्क्रीनचा निळा प्रकाश तन्मय आणि निखिलच्या चेहऱ्यावर पडला होता. वातावरणात कमालीचा तणाव होता, पण तन्मयच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती.एका अशा सत्याचा शोध लागल्याची चमक, जे संपूर्ण ओरियन ग्रुपला हादरवून टाकणार होतं. साक्षी एका कोपऱ्यात शांत बसली होती, तिचं भविष्य आता या डिजिटल कोडांच्या खेळात अडकलं होतं.
"साक्षी, शांत हो आणि हे बघ,"
तन्मयने अत्यंत गंभीर स्वरात तिला जवळ बोलावले. स्क्रीनवर हजारो ओळींचा नेटवर्क लॉग डेटा धावत होता. एखाद्या सामान्य माणसासाठी ते केवळ आकडे आणि इंग्रजी शब्द होते, पण तन्मय आणि निखिलसाठी तो एका गुन्ह्याचा नकाशा होता.
डिजिटल सापळा आणि आर.डी.पी. चा खेळ
तन्मयने माऊस फिरवत एका विशिष्ट एंट्रीवर क्लिक केले.
तन्मयने माऊस फिरवत एका विशिष्ट एंट्रीवर क्लिक केले.
" ज्या वेळी तुझ्या लॅपटॉप वरून तो वादग्रस्त ईमेल अमेय जहागीरदार यांच्या लीक झालेल्या प्रोजेक्ट बद्दल पाठवला गेला, नेमक्या त्याच सेकंदाला तुझ्या सिस्टिमवर एक रिमोट डेस्कटॉप प्रोटोकॉल ॲक्टिव्ह झाला होता. याचा अर्थ असा की, त्या वेळी तुझा लॅपटॉप तू स्वतः वापरत नव्हतीस, तर तो जगाच्या पाठीवर बसलेली दुसरीच कोणतीतरी व्यक्ती रिमोटली कंट्रोल करत होती."
साक्षीचा श्वास रोखला गेला. तन्मयने पुढे जे सांगितले ते अधिक धक्कादायक होते.
" आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या रिमोट कनेक्शनची रिक्वेस्ट ज्या आयपी ॲड्रेसवरून जनरेट झाली होती, तो आयपी ॲड्रेस दुसरा तिसरा कोणाचा नसून खन्नांच्या केबिनमधील त्यांच्या वैयक्तिक डेस्कटॉपचा होता ! "
आता सर्व चित्र काचेसारखं स्वच्छ झालं होतं. मिस्टर खन्ना, ज्यांना अमेय जहागीरदार आपला उजवा हात मानत होते, ते आपल्या केबिनमध्ये आरामात बसून मिरर इमेज तंत्रज्ञानाचा वापर करत होते. त्यांनी साक्षीच्या लॅपटॉपचा ताबा घेतला, तिच्या क्रेडेंशियल्सचा वापर केला आणि जगाला असं भासवलं की ही गद्दारी खुद्द साक्षीनेच केली आहे. खन्नांचा असा पक्का अंदाज होता की, अमेयची आयटी टीम फार फार तर लॅपटॉपचे लॉग्स तपासेल आणि तिथे साक्षीचं नाव पाहून तिलाच दोषी ठरवून कामावरून काढून टाकेल. पण तन्मयने या खेळाचे नियमच बदलून टाकले होते.
नेटवर्क ट्रॅफिकचा अदृश्य नकाशा तन्मयने केवळ साक्षीचा लॅपटॉप तपासला नव्हता. त्याने बँकेच्या एका अत्यंत विश्वासू आयटी ऑडिट कन्सल्टंट मित्राची मदत घेऊन त्या रात्रीच्या ओरियनच्या संपूर्ण ऑफिसचा नेटवर्क ट्रॅफिक डेटा मिळवला होता. ऑफिसच्या वायफाय आणि सर्व्हरवर त्या रात्री नेमकी कोणती हालचाल झाली, याचा हा कच्चा चिट्ठा होता.
" निखिल, हे बघ... इथे काहीतरी वेगळं वाटतंय," तन्मयने स्क्रीन वरच्या एका कोडिंगच्या पॅटर्नकडे निर्देश केला.
" खन्ना हे जरी अनुभवी खेळाडू असले, तरी डिजिटल जगात पूर्णपणे अदृश्य राहणं अशक्य असतं. घाईघाईत त्यांनी एक तांत्रिक चूक केली आहे."
निखिलने तो विशिष्ट कोड डिकोड करायला सुरुवात केली. काही मिनिटांच्या शांतते नंतर निखिल आनंदाने ओरडलाच,
" ओ माय गॉड ! तन्या, तू खरंच जीनियस आहेस ! खन्नांनी पुरावे मिटवण्यासाठी साक्षीच्या लॅपटॉपवर एक सेल्फ- डिस्ट्रक्टिंग स्क्रिप्ट रन केली होती. ही स्क्रिप्ट अशी प्रोग्राम केली होती की, ईमेल पाठवल्यानंतर पाच मिनिटांत ती लॅपटॉप मधील सर्व इव्हेंट लॉग्स आणि रिमोट एक्सेसचे पुरावे कायमचे नष्ट करणार होती."
" पण मग काय झालं ? " साक्षीने उत्सुकतेने विचारले.
" नशिबाची साथ ! " निखिल म्हणाला.
" त्या रात्री ऑफिसच्या इंटरनेट मध्ये काही सेकंदांसाठी तांत्रिक अडथळा आला असावा किंवा घाईमुळे खन्नांनी ती स्क्रिप्ट नीट एक्झिक्युट केली नाही. ती स्क्रिप्ट मध्येच थांबली. मी त्या अर्धवट राहिलेल्या स्क्रिप्टचे तुकडे शोधून काढले आहेत. आणि सर्वात मोठा धमाका इथे आहे. या स्क्रिप्टच्या हेड फाईलमध्ये ती ज्या मूळ लॅपटॉपवरून बनवली आणि पाठवली गेली, त्या लॅपटॉपचा मॅक ॲड्रेस नोंदवला गेला आहे. आणि हा मॅक ॲड्रेस खन्नांच्या वैयक्तिक लॅपटॉपचाच आहे!"
मॅक ॲड्रेस म्हणजे कधीही न पुसले जाणारे फिंगर प्रिंट्स असतात. तन्मयने साक्षीला समजावून सांगितले,
" साक्षू, आयपी ॲड्रेस बदलता येतो, व्हीपीएन वापरून लोकेशन लपवता येतं, पण मॅक ॲड्रेस हा त्या हार्ड वेअरचा असा फिंगरप्रिंट असतो जो कधीही बदलता येत नाही. हा तो पुरावा आहे जो जगातलं कोणतंही न्यायालय, कोणतीही सायबर लॅब किंवा अमेय जहागीरदारचा कितीही मोठा आयटी एक्सपर्ट नाकारू शकणार नाही. खन्नांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा फास तयार केला आहे."
तन्मयच्या आवाजात आता एक वेगळाच करारी आत्मविश्वास आणि शांतता होती. त्याने पुढे स्पष्ट केले की, खन्नांनी साक्षीला केवळ एक पडदा म्हणून वापरलं होतं. त्यांना खात्री होती की अमेय जहागीरदार संतापलेल्या अवस्थेत तर्कापेक्षा भावनेला आणि समोर दिसणाऱ्या पुराव्याला जास्त महत्त्व देतील. खन्नांच्या चेहऱ्यावरचा सज्जन पणाचा मुखवटा इतका घट्ट होता की कोणी त्यांच्यावर संशय घेण्याची शक्यताच नव्हती. पण तांत्रिक सत्याने आज त्यांचा बुरखा अक्षरशः फाडून टाकला होता.
साक्षीने त्या चमकणाऱ्या स्क्रीनकडे पाहिले. ज्या अक्षरांनी, ज्या कोडने तिला काही दिवसांच्यापूर्वी गद्दार आणि चोर ठरवलं होतं, तीच अक्षरे आज खऱ्या गुन्हेगाराचं नाव जगासमोर ओरडून सांगत होती. तिला एका गोष्टीची तीव्र जाणीव झाली होती, अमेय जहागीरदार याच्या त्या कॉर्पोरेट, ग्लॅमरस आणि स्पर्धात्मक जगात खन्नांसारखे धूर्त लांडगे टपून बसले होते, पण नर्मदा सदनच्या या साध्या, मध्यमवर्गीय जगात तन्मयसारखा एक सच्चा, बुद्धिमान आणि पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मित्रही होता.
तन्मयने पैशांचा मनी ट्रेल जो त्याने आधी शोधला होता आणि निखिलने शोधलेले हे डिजिटल फिंगर प्रिंट्स आता एकत्र जोडले होते. खन्नांच्या त्या चक्रव्यूहाचा रस्ता आता संपला होता.
तन्मयने लॅपटॉप बंद केला आणि बॅग भरली. त्याने साक्षीच्या डोळ्यांत बघून आश्वासक स्मितहास्य केलं.
" चल साक्षू , खूप रात्र झाली आहे. आता थोडी झोप घे. कारण उद्याचा सूर्य खन्नांच्या कारकीर्दीसाठी मावळणारा असेल आणि तुझ्यासाठी सन्मानाची एक नवीन पहाट घेऊन येईल. उद्या आपण अमेय जहागीरदारला त्याच्याच भाषेत उत्तर देणार आहोत. पण यावेळी आपण एकटे नाही आहोत "
तन्मयच्या या शांत पण धारदार युक्तीने एका महाकाय कॉर्पोरेट षडयंत्राचा पायाच हादरवून टाकला होता. ओरियनच्या साम्राज्यात उद्या एक मोठे वादळ येणार होते, आणि त्या वादळाचा केंद्रबिंदू नर्मदा सदन मधील हा छोटासा लॅपटॉप होता.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा